कलेतील अडगळ

By admin | Published: June 24, 2016 05:15 PM2016-06-24T17:15:50+5:302016-06-24T17:15:50+5:30

रंग, रेषा, पोत, आकार, अवकाश. कलेतील ही महत्त्वाची तत्त्वे. पण कलाकृतींमध्ये काही गोष्टींचा अतिरेक व्हायला लागल्यावर त्याची तीव्रता कमी करण्यात आली.

Artillery | कलेतील अडगळ

कलेतील अडगळ

Next
रंग, रेषा, पोत, आकार, अवकाश. कलेतील ही महत्त्वाची तत्त्वे. पण कलाकृतींमध्ये काही गोष्टींचा 
अतिरेक व्हायला लागल्यावर त्याची तीव्रता कमी करण्यात आली. रचनेतील आणि आकारांमधील गुंतागुंत, क्लिष्ट विषय, प्रतीकात्मकता, चिन्हांचा अतिरेक, चित्नातली तात्त्विक मांडणी. अशा अनेक गोष्टींचं अवडंबर कमी करण्यात आलं. अर्थपूर्णता आणि सोपेपणाला अधिक प्राधान्य देण्यात आलं.
 
- शर्मिला फडके

'Art is the elimination of the unnecessary : Pablo Picasso

 
साधेपणात सौंदर्य असतं, सोपेपणात आनंद असतो. मिनिमलिझमचे हे मूलभूत सूत्र रोजच्या जगण्याला जितकं लागू पडतं तितकंच कलेलाही. कदाचित म्हणूनच जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या कलेमध्ये फार पूर्वीपासून मिनिमलिझमचा वापर महत्त्वाचा मानला गेला. मिनिमलिझमचे मूलभूत तत्त्व कलेमध्ये अनेकांनी वापरले. क्लिष्टता, किचकटपणा, गर्दी, कोलाहल या गोष्टी जगण्याला आणि जगण्याला वेढून असलेल्या कलेलाही कुरूप बनवतात. अगदी रोजच्या जगण्यात आपल्या रोज समोर येणारी कला म्हणजे जाहिरात कला. जाहिरातीच्या डिझाइनमध्ये एकाच वेळी वापरलेले वेगवेगळे फॉण्ट्स, इमेजेसची गर्दी, अनेक रंग, खूप आकार मनावर ताण आणतात, त्यातली आक्रमकता नकोशी होते. या उलट कमीतकमी रेषा, रंगांमधून साकारलेले डिझाइन आपण पुन्हा पुन्हा बघतो, ते दीर्घकाळ स्मरणात राहते. अशा डिझाइनमधून दिला गेलेला संदेश, त्यातली भावनिकता आपल्यापर्यंत पटकन पोचते. साध्या रचनेतून प्रभावी परिणाम साधता येतो. 
एका सलग रेषेच्या डौलदारपणातून साकारलेले महात्मा गांधींचे प्रोफाइल किंवा गणपतीचे सुंदर आकार, काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लोगो नजरेसमोर आणले तर ही गोष्ट सहज पटेल. 
इतरही अनेक उदाहरणो यासंदर्भात घेता येतील. असंख्य दागिने एकाचवेळी घातलेली आणि खूप गिचमिड डिझाइन असलेले कपडे अशा वेशभूषेची व्यक्ती मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण करते. साधेपणा आणि नीटनेटकेपणाचा वापर म्हणजेच मिनिमलिझमचा वापर. मिनिमलिझम म्हणजे चित्रतील शांतता. कलाकृतीमध्ये अती प्रमाणात केले जाणारे व्यक्तिगत भावनांचे आरोपण, प्रतीकात्मकतेचा अतिरिक्त वापर करण्याची जी लाट आली होती त्याला प्रतिकारात्मक अशी ही कलेतील मिनिमलिझमची चळवळ. ती अधोरेखित करणारे फरॅन्क स्टेलाचे शुभ्र कॅनव्हासवर ठळक काळ्या रंगाचे पट्टे असलेले पेंटिंग प्रसिद्ध आहे. 
कलेतील महत्त्वाची तत्त्वे म्हणजे रंग, रेषा, पोत, आकार, अवकाश. चित्रकडे बघणा:या कोणाचेही या मूलभूत तत्त्वांकडे दुर्लक्ष होऊ नये, चित्रमधली दृश्यात्मकता आणि सौंदर्यात्मकता नष्ट होऊ नये असे या कलाकारांना वाटत होते. सत्तरच्या दशकात अमेरिका आणि युरोपमध्ये भरलेल्या सर्व महत्त्वाच्या कला प्रदर्शनांमध्ये आर्ट आणि मिनिमलिझमची सांगड घातलेल्या कलाकृती फार मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित झाल्या. मिनिमलिझमचे तत्त्व कलेमध्ये खोलवर रुजल्याची ही पावती होती. हे साध्य करण्याकरता त्यांनी आपल्या कलाकृतींमधून काही गोष्टींचा अतिरेक किंवा अडगळ काढून टाकण्याचे ठरवले. उदा. रचनेतील आणि आकारांमधील गुंतागुंत, क्लिष्ट, न समजणारा विषय, प्रतीकात्मकता, चिन्हांचा अतिरेक, चित्रमध्ये तात्त्विक, आध्यात्मिक किंवा दैववादी विचारांची मांडणी, वैयक्तिकता, बाह्य संदर्भ, भावनिकता, सामाजिक भाष्य, पारंपरिक कलेतील घटक इत्यादि. अर्थातच कालांतराने यातले अनेक घटक जे कलाकृतीला अर्थपूर्णता आणतात ते पुन्हा प्रस्थापित केले गेले; मात्र सोपेपणा आणि अडगळविरहितता हा मिनिमलिझमचा मुख्य विचार केन्द्रस्थानी राहिला. पॉल क्ली या कलाकाराने भौमितिक आकारांमध्ये भरलेले केशरी, पिवळे, निळे, लाल रंग आणि त्यांची केलेली सोपी रचना यातून अद्वितीय सौंदर्याची अनुभूती येते, कारण त्या कलेत मिनिमलिझमच्या सर्व तत्त्वांचा कलापूर्ण वापर आहे. 
मिनिमलिझममुळे चित्र आणि शिल्प कलाकृतींमधील मोकळ्या अवकाशाचे सौंदर्य नव्याने कळले. चित्रमधल्या मोकळ्या अवकाशाकडे बघण्यातली नकारात्मकता गेली हे मिनिमलिझमचे मोठे यश. 
जपानी पारंपरिक चित्रकलेत मुळातच अशा मोकळ्या अवकाशाला फार मोठे महत्त्व होते. जपानी सामाजिक, व्यक्तिगत आयुष्यात तसेच कला-संस्कृतीत आणि कार्य व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि आवर्जून पाळला गेलेला विचार म्हणजे अडगळ सर्जनशीलतेला मारक ठरते. अडगळ म्हणजे कामातील दिरंगाई, अडगळ म्हणजे आळशीपणा, अडगळ म्हणजे बेशिस्ती- त्यामुळेच कामाची जागा यावर विश्वास असल्याने कलाकाराचा स्टुडिओ आणि कामाची जागा ही साधी, स्वच्छ, नीटनेटकी, अडगळविरहित असणो हे जपानी कलावंत आणि कर्मचारी दोघांकरताही सारखेच गरजेचे. व्यक्ती जितकी क्रिएटिव्ह तितका त्याच्या स्टुडिओतला पसारा मोठा आणि कामाच्या टेबलावर कागदपत्रंचा, फाइलींचा पसारा जितका जास्त तितकी ती व्यक्ती बिझी या आपल्याकडच्या सर्वमान्य गृहितकाला पूर्णपणो छेद देणारा हा विचार आहे. गरज नसलेल्या, अडगळ माजवणा:या घटकांना दूर केले की महत्त्वाच्या, आवश्यक घटकांवर लक्ष केन्द्रित करणो सोपे होते. वर वर सहजसाध्य वाटणारे मिनिमलिझमचे हे तत्त्व प्रत्यक्ष जगण्यात वापरणो सोपे नसतेच. मिनिमलिझमच्या प्रक्रि येमागे खूप खोलवर केलेला विचार आणि सातत्य असते. एक फॅड म्हणून मिनिमलिझमकडे वळलेले अनेक जण अशा अतिरेकांचा वापर करतात आणि मग त्यापासून दूर जातात. 
आज ठरवून उद्या कुणालाही साधे, सोपे जगता किंवा वागता येत नसते. मिनिमलिझमची फिलॉसॉफी अंगात मुरवून घेतल्याशिवाय ते शक्य होत नाही. याचे मुख्य कारण मिनिमलिझममध्ये सोपेपणा असला तरी मिनिमलिझम अंगीकारणो सोपे नाही. पिकासो म्हणाला होता, लहान मुलाच्या साधेपणाने आणि सोपेपणाने चित्र काढायला शिकायला मला आयुष्यभर साधना करावी लागली. 
मिनिमलिझममधील म्हणजेच साधेपणातील आणि सोपेपणातील सौंदर्य, कलात्मकता सर्वांनाच जाणवेल किंवा आवडेल असंही नसतं. खरंतर अशा लोकांची संख्या ही मोजकीच असते. खूप नक्षीकाम, कलाकुसर, रंगांची उधळण आवडणा:यांना कलेतील मिनिमलिझम आवडत नाही. मिनिमलिझमचा अतिरेक रोजच्या जीवनात नाकारणारेही अनेक असतात. साधेपणाची, मिनिमलिस्ट जीवनशैली ही प्रत्यक्षात ‘हाय मेण्टेनन्स’ आहे आणि ज्यांच्याकडे खूप प्रमाणात मुबलकता आहे, समृद्धी आहे त्यांनाच ती शक्य होते असं मानणारेही आहेतच. अनेक कलाकार, चित्रकार असेही आहेत ज्यांच्या रोजच्या जगण्यातला मिनिमलिझमचा वापर त्यांच्या कलेत आपोआप उतरला. जगणो आणि कला या दोन्हीमधला समतोल साधणो त्यांना कसे जमले याबद्दल पुढच्या वेळी आपण अधिक जाणून घेऊया. कदाचित मिनिमलिझमबद्दल, साधेपणाने व सोपेपणाने जगण्याबद्दल ज्यांच्या मनात अजूनही अढी आहे किंवा त्याकडे जे एक फॅड म्हणून बघतात, त्यांच्या मनातली नकारात्मकता दूर होऊ शकेल. 
 
 
दुस:या महायुद्धानंतर पाश्चिमात्य कलेच्या सादरीकरणात अनेक महत्त्वाचे, आमूलाग्र म्हणता येतील असे बदल झाले. कलाकृतींच्या माध्यमातून जास्तीत जास्त तीव्रतेने मनातील भावनांचे, अस्वस्थतेचे, कोलाहलाचे आणि अशांततेचे प्रकटीकरण करण्यावर कलाकारांचा या काळात भर होता. अॅक्शन पेंटिंग, अॅब्स्ट्रक्ट एक्स्प्रेशनिझमचा हा काळ. वैयिक्तकतेचा अतिरेक झालेली ही कला सामान्य रसिकाला कळणो जास्तीत जास्त अवघड बनत गेले. सामान्य चित्ररसिक कलेपासून दूर जाऊ लागला. 
आणि मग यातूनच साठच्या दशकाच्या पूर्वार्धात कलेमध्ये मिनिमलिझम तत्त्वाचा वापर जाणीवपूर्वक करण्याची सुरु वात न्यूयॉर्कमध्ये झाली. तत्कालीन कलेमधील रंगांच्या आणि रेषांच्या कोलाहलात कलेतील मूलभूत सौंदर्याचा नाश होतो आहे अशा विचारातून फरॅन्क स्टेला, टोनी स्मिथ, अॅग्नेस मार्टिन, लॅरी बेल, डोनाल्ड जड यांसारखे अनेक चित्रकार, शिल्पकार मिनिमलिझमकडे वळले. 
 
(लेखिका ख्यातनाम कला समीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com 

Web Title: Artillery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.