डिझाइनमधला कृतिविचार
By admin | Published: December 12, 2015 05:23 PM2015-12-12T17:23:06+5:302015-12-12T17:23:06+5:30
समजा आपल्याला सुईत दोरा ओवायचा आहे, पण काही केल्या सुईत दोरा जात नाहीये. मग आपण काय करतो? - दोरा चपटा करून बघतो, सुईचा छेद प्रकाशात धरतो, आपल्या लक्ष्याचं केंद्र बदलून बघतो. - केवळ बुद्धी किंवा संवेदनानुभवाने प्रत्येक तंत्रकौशल्य आत्मसात होत नसते, त्या दोहोंचा समतोल साधावा लागतो. डिझाइनच्या संदर्भातही हे तितकंच खरं आहे.
Next
>- नितीन कुलकर्णी
आर्ट अॅण्ड डिझाइनमधील शिक्षणाचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की यातल्या अभ्यासप्रणालीचा विचार वेगळ्याने करावा लागत नाही, तो वस्तुनिर्मितीच्या प्रक्रियेतच (प्रोसेस) दडलेला असतो आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आर्ट अॅण्ड डिझाइन या दोन्ही क्षेत्रंच्या केंद्रस्थानी असलेला तो मानवी अनुभवव्यवहार. या दोन्ही क्षेत्रंमधील वस्तुनिर्मितीद्वारे मानवाची भौतिक व मानसिक समृद्धी अपेक्षित असते; आणि अशी समृद्धी एकंदर सामाजिक विकासाबरोबर होत असते. या विकासात आणि प्रक्रि येत डिझाइन अंगभूत असते. कला ही माणसाच्या जगण्याचे संवेदनाजन्य अनुभव व भावना संग्रहित करण्याचे माध्यम म्हणून अस्तित्वात असते. विकासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर विज्ञान व तंत्रज्ञानाने दिलेली साधनं व शक्यता माणसांर्पयत पोहोचवण्याचं काम डिझाइनची प्रक्रिया करते, त्यामुळे उद्योग व आर्थिक प्रगतीच्या संदर्भात डिझाइनमधील कल्पकता हीच कला ठरते. आणि ललित कला व इतर सांस्कृतिकता ही डिझाइनसाठी प्रेरक पाश्र्वभूमी ठरतात. सामान्य लोकांना ललित कलेचे अंश हे उपयोजित कलेच्या द्वारे अनुभवायला मिळतात. उदाहरणार्थ गाडीचा एखादा सुंदर आकार, चादरी, पडदे यांवरील नक्षीचा पोत, लोगोमधील लालित्यपूर्ण रेषा इत्यादि.
कलेच्या प्रक्रि येत कलाकार व्यक्तिगत अनुभवांशी संलग्न असतो व हा अनुभव तो कला माध्यमातून व्यक्त करण्यातून संवेद्य जाणिवांची निर्मिती करत असतो; आणि डिझाइनर वस्तुनिर्मितीच्या आधारे जाणिवा व प्रेरणा जागृत करत असतो, अर्थात हे भौतिक संस्कृती रुजवता रुजवता. कलेमध्ये अनुभव हे सामग्री म्हणून वापरले जातात, तर डिझाइनमध्ये मार्ग म्हणून. मानसिकता आणि त्या मानसिकतेचे मूर्तरूप ही प्रक्रि या मूलभूत अशी आहे आणि ती सृजनाच्या (क्रि एटीव्हिटी) शिक्षणात महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच की काय, पहिल्यावहिल्या डिझाइनचे शिक्षण देणा:या संस्थेत आधुनिक चित्रकलेत नावाजलेले चित्रकार, शिक्षक म्हणून नेमले गेले. हे झाले बाऊहाउसमधे (1919 वाईमार, जर्मनी) बाऊहाउस या शब्दाचा अर्थ बांधणीचे घर. वॉल्टर ग्रुपीयस या स्थपतीने पुढाकार घेऊन कला व हस्तकला यांचा संगम घडवून आणला तो आधुनिक यंत्रयुगातल्या वस्तुनिर्मितीच्या तंत्रज्ञानाशी. ही होती इंडस्ट्रीअल डिझाइन, यापुढे अवाढव्य बनणा:या क्षेत्रची मुहूर्तमेढ. यातूनच नवीन प्रकारचे यंत्र सौंदर्य (मशीन अॅस्थेटिक्स) रूढ झाले. वासिली काण्डिन्स्की, पॉल क्ली, जोहानस इटेन आदि संवेदनाक्षम कलाकार डिझाइनच्या विविध विषयांचे अनुभवजन्य शिक्षण देत होते. या शिक्षणाचा पाया सापेक्षतावादात (प्रॅग्मॅटीझम) होता; म्हणजे सिद्धांतांना अवास्तव महत्त्व दिलेले नव्हते, तर प्रत्यक्ष-रीत अवलंबण्याच्या अनुभवावर लक्ष केंद्रित केलेले होते. इथे प्रथमच कोणालातरी मशीन निर्मितीच्या शक्यता व मर्यादा लक्षात घेऊन सौंदर्यपूर्णता व उपयोगिता यांचा समन्वय साधायचा होता. यातूनच आधुनिक जीवनाची प्रत व पत निरखणार होती. अभियांत्रिकी, कला व हस्तकला या तिन्ही प्रणालींचा मिलाफ करून देणारी एक प्रणाली निर्माण करायची होती. आणि या सर्व निर्मितीच्या केंद्रस्थानी होते घर (स्थापत्य). ला कार्बूङिाए या प्रसिद्ध स्थपतीच्या म्हणण्यानुसार घराचा नवीन अर्थ होता ‘अ मशीन फॉर लिव्हिंग इन’ आणि अशा मशीनची निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रतल्या नवीन संकल्पनांची गरज होती. पाश्र्वभूमी होती ती जागतिक महायुद्धाच्या अंताची. नवीन आधुनिक जग तयार करण्याची गरज होती. यातून तयार झालेली डिझाइन संस्कृती पुढे सर्व जगाने अंगीकारली.
आपण हे बघितले आहे की, डिझाइनच्या प्रक्रि येचा दृश्य अथवा कल्पनेचे मूर्तरूप हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ही प्रक्रि या वेगवेगळ्या टप्प्यांवर कार्यान्वित होत असते. 1) अप्रकट जे मनात प्रतिमेचे व्यक्त रूप असते. 2) सरावचित्र वा रेघोटीचित्र जे मनातील चित्रचे व्यक्त रूप असू शकते. 3) संकल्पनेचं अंतिम रूप जे हाताने अथवा संगणकाने रेखाटलेले असू शकते.
4) प्रत्यक्ष प्रतिकृती जी त्रिमीतीय असते. हा सर्व डिझाइन व्यवहार अंतस्थ व बाह्य अशा दोन प्रकारच्या प्रतिमांच्या मिश्रणातून होत असतो आणि प्रत्येक टप्प्यात कमी अधिक प्रमाणात हात व बुद्धी यांच्या समन्वयाने प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून होत असतो. कुठलीही कृती ही विचार-संदेश व शारीरिक हालचाल या द्वयीत होत असते. या द्वयीचा ताळमेळ साधला जातो तो संवेदनांच्या जागृतावस्थेतून (कॉन्शसनेस). सृजनाची कृती करायला शिकणं म्हणजे संवेदनांचा योग्य प्रकारे वापर करणं, जेणोकरून कुठला विचार बघायचा आणि कुठल्या संवेदनेचा अनुभव नव्याने घ्यायचा हे समजणं. साधारणपणो पुढील उदाहरण मासलेवाइक ठरावे.
जेव्हा आपल्या संवेदना आपल्याला साथ देत नसतात तेव्हा आपण बुद्धीचा वापर करतो. समजा आपल्याला सुईत दोरा ओवायचा आहे आणि काही कारणांमुळे सुईच्या छेदात दोरा जात नाहीए मग आपण काय करतो? आपण विचार करतो आणि खालीलपैकी काहीतरी करतो. दोरा चपटा करून बघतो, दोरा सरकवताना अंदाजाने पुढे मागे हालचाल करून बघतो, सुईचा छेद नीट दिसेल अशा स्थितीत धरून दोरा आपल्या बाजूने पुढे सरकावून बघतो. थोडक्यात काय तर आपल्या लक्ष्याचं केंद्र बदलून बघतो, बघून न बघितल्यासारखं करतो. सुईत दोरा गेल्यानंतर आपल्याला कळतं की तो गेलाय. प्रत्येक तंत्रकौशल्य केवळ बुद्धी किंवा संवेदनानुभवाने आत्मसात होत नसते, तर त्या दोहोंचा समतोल साधला जावा लागतो. असा जो समतोल आपण दैनंदिन कृतीमधे सहजपणो साधतो. आपल्या सृजनाच्या शिक्षणात मात्र तंत्र आणि संकल्पना वेगळे वेगळे केल्याने असा समन्वय घडत नाही. बाउहाउसच्या शिक्षणपद्धतीत असा समन्वय साधण्याचा प्रयत्न होता, जेथे अनुभवाचा आत्ताच बघितलेल्या उदाहरणासारखा खरा अर्थ अभिप्रेत होता ज्याला कृतिविचार म्हणता येईल. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज तंत्रविषयक व विचार शिकवणारे विषय विभक्त आहेत व ते शिकवण्याची पद्धत ही समग्र नाही, हे चित्र प्रयासाने बदलता येईल.
दृश्यप्रतिमांच्या संदर्भातले दोन प्रमुख भाग बाह्य व अंतस्थ. आपल्या अभ्यासक्रमात फक्त बाह्य प्रतिमांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. त्या बरोबरीनेच अंतस्थ प्रतिमानुभवाला जर महत्त्व दिले तर हे शिक्षण बहुआयामी होईल व त्याचे उपयोजन केवळ कलेतच राहणार नाही. एक साधे उदाहरण घ्यायचे तर रंग सिद्धांतातल्या उत्तर प्रतिमा (आफ्टर इमेज) या एका भागाचे घेऊ. ज्याचा संबंध पूरक रंगाशी (कॉम्प्लीमेंट्री कलर्स) आहे. पूरक रंगजोडी ही रंगचक्रावर दिसणा:या एकमेकाविरुद्धच्या रंगांनी बनते. यामुळेच प्रश्न पडतो की विरुद्ध असलेले रंग पूरक कसे? यासाठी एक अनुभव कृती करावी लागेल. एका हिरव्या रंगाच्या कागदात हत्तीसारखा (दुसरा कुठलाही आकार चालेल) आकार कापून आपल्यासमोर पांढ:या कागदावर लावून ठेवा व त्याकडे एकटक एक ते दहा आकडे मोजेपर्यंत बघत राहा. नंतर लगेच पांढ:या भिंतीकडे बघा आणि लालसर गुलाबी रंगाचा मोठा हत्ती आपोआप अवतरेल. डोळे बंद केले तर तशाच रंगाच्या छोटय़ा हत्तीचा आकार दिसेल. असं का होतं? पुस्तकातील वैज्ञानिक विवेचनानुसार आपण जेव्हा एकटक हिरव्या रंगाकडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यातील पडद्यामधील हिरव्या रंगाचे चेतातंतू थकतात व मेंदूपर्यंत संदेश पाठवण्याचे काम थांबवतात. आपण सफेद पाश्र्वभूमीवर जेव्हा नजर केंद्रित करतो तेव्हा हिरव्या भागाच्या अधोरेखित प्रतिमेच्या जागी पूरक रंगाची म्हणजे गुलाबी रंगाची विरुद्ध फसवी संवेदना तयार होते. उणो व अधिक यांचा हा अजब व्यवहार वास्तवाचेच रूप असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या रंगांमध्ये चितारलेली दृश्ये आपली नजर खिळवून ठेवतात.
बाउहाउसमध्ये अशा सिद्धांतांच्या अनुभवाबरोबर भारतीय योगसाधनेसारखा सरावदेखील करून घेतला जाई. एक कलाशिक्षक जोहानस इटेन ज्याने डिझाइन अॅण्ड फॉर्म, 1963, हे पुस्तक लिहिले. मन व शरीर (महत्त्वाचे म्हणजे हात) यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी वर्ग सुरू होण्याआधी रिलॅक्सेशनचे सराव करून घेत असे. यात श्वसनाच्या बरोबर एकाग्रता वाढवण्याच्या कृतींचाही समावेश होता. तो म्हणत असे, ‘जेव्हा माझा हातच अवघडलेला असेल तेव्हा त्यातून निघणारी रेषा कशी भावनिर्मिती करू शकेल?’ हे सृजनशील शिक्षक एवढय़ावरच थांबलेले नव्हते, तर त्यांनी विशिष्ट प्रकारे बनवलेल्या खाद्यपदार्थाचा अंतर्भाव अभ्यासक्र मात केला होता.
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत.)
nitindrak@gmail.com