पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 08:00 AM2019-07-21T08:00:00+5:302019-07-21T08:00:12+5:30
आपण बहुभाषिक होत, नकळत भाषेपलीकडे जाऊ लागलो आहोत. बहुभाषिक होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि मातृभाषा टिकवणं हीदेखील ! कारण समूह टिकले तर संस्कृती टिकेल आणि भाषाही टिकेल. मराठी बोलणा-या , प्रेमानं बोलणा-या आणि मराठी संस्कृती प्रेमानं सांभाळणा-या समूहांची वीण घट्ट राहिली पाहिजे. ते समूह नव्या जगात जगण्यासाठी सर्मथही झाले पाहिजेत. हे कसं साधता येईल?
-अरुणा ढेरे
शेकडो वर्षांपूर्वी एका कवीनं मराठी माणसाचं व्यवच्छेदक लक्षण सांगितलं होतं - मराठी माणसं कशी ओळखायची? दडमडह, सामलंगे, कलहसीले.. ओबडधोबड, रांगडी - नाजुकसाजुक नव्हेत - राकट, खडबडीत, काळीसावळी आणि मुख्य म्हणजे भांडखोर - प्रेमळ, गोड नव्हेत - कलहशील - भांडायची खुमखुमी ज्यांच्या रक्तातच आहे ती मराठी माणसं.
आपल्या प्रत्येकाच्या मनात या मराठीपणाविषयीची काही एक कल्पना असतात. त्यात पोषाख आणि खाण्यापिण्याविषयीच्या कल्पना असतात. पण काळानं आपल्याला बदलायला लावलं आहे. मराठीपणाची बाहेरची लक्षणं आता आपल्याला दूर ठेवता येतायत. आपण हौसेनं, आनंदानं, नॉस्टाल्जिया म्हणून घालतो ते वेगळं; पण सुरुवार-झब्बा किंवा मोहनमाळ, नथ आणि साडी म्हणजे मराठी असणं असं सिद्ध करण्याची गरज कधीच संपली आहे. महाराष्ट्र तर याच्याही पलीकडे गेलाय असं म्हणायला हवं. मराठी
पोषाखासाठी पुण्या-मुंबईच्या कॉलेजमध्ये ‘ट्रॅडिशनल डे’ साजरे होतात आणि पारंपरिक पद्धतीनं साडी नेसणार्या बायका ‘सुशिक्षित आहेत की नाही’, अशा तुच्छ भावानं अनेकदा त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपलं मराठीपण हे अजूनही काही ठिकाणी पोषाखाशी आणि पर्यायानं कमीपणाशी, तुच्छतेशी जोडलं गेलं आहे. भाषेच्या बाबतीतही महाराष्ट्रात हीच स्थिती आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. शुद्ध मराठीतून बोलणं हद्दपार होत चाललं आहे. इंग्रजीच्या आक्रमणाची भीती अजून पुष्कळांच्या मनात आहे आणि धड चांगली मराठीही नाही आणि चांगली इंग्रजीही नाही, अशा भाषादारिद्रय़ाला नि:संकोच मिरवणारी तरुण मुलं भोवती वावरताना दिसू लागली आहेत.
पण याचबरोबर मराठी सिनेमा, नाटक, साहित्य आणि इतर कलांमध्ये मात्र भरभरून समृद्ध असं कितीतरी निर्माणही होतं आहे. वेगवेगळे प्रयोग करायला न घाबरणं, भूतकाळानं जे दिलंय त्याचा पूर्ण आदर ठेवून विवेकानं त्यातलं आपल्या काळाला उपयोगी ते स्वीकारणं आणि सतत पुढे जात राहणं. या मंडळींनी निर्माण केलेली सर्जनशीलतेची गजबज हे मराठी संस्कृतीच्या जिवंतपणाचंच उत्तम लक्षण आहे. यांच्या सिनेमांची, नाटकांची, कथा-कादंबर्या-कवितासंग्रहांची नावं भले अनेकदा इंग्रजीत असतील, यांनी लिहिलेली गाणीही अनेकदा इतर भाषांमधले शब्द किंवा वाक्यांचे तुकडे घेऊन रचलेली असतील; पण आपापलं माध्यम पुढे घेऊन जाणारं काम ही नवी-जुनी प्रतिभावान मंडळी करत राहिली आहेत.
नवं तंत्रज्ञान वापरणारी तरुण पिढी सुसाट लिहिते आहे. जुन्या पिढीला जाणवायच्या त्या कोणत्याच अडचणी त्यांच्यापुढे नाहीत. वाटलं की वाटेल ते आणि वाटेल तसं लिहिणार्या नवलेखकांमध्ये सत्तर टक्के मंडळी लेखनाकडे गंभीरपणे पाहणारी नाहीत. हौस म्हणून, मजा म्हणून, खेळ म्हणून, जमतंय म्हणून लिहायचं ! त्यात अनेकदा छोटीशी प्रतिभेची चमक दिसतेही; पण तिचा परिणाम तात्पुरताच असतो. माणसाला विचारांनी समृद्ध करणारं किंवा त्याचं भावात्मक पोषण करणारं साहित्य - टिकाऊ साहित्य तिथे बहुतेक जन्माला येत नाही. उरलेल्या तीस टक्क्यांमध्ये मात्र आशेचे आणि आनंदाचे किरण उजळणारं पुष्कळ काही मिळतं आहे. नवं तंत्रज्ञान यांच्या हाताशी आहे; पण ते साधन आहे हे त्यांना कळलंय. मुळात त्यांना नव्या जगाविषयी काहीतरी अर्थपूर्ण म्हणायचंय. यंत्रानं वाटेल ती किमया करता येते हे खरं; पण यंत्र महत्त्वाचं नव्हे किंवा त्यानं करता येणार्या अद्भुत गोष्टी महत्त्वाच्या नव्हेत. महत्त्वाचं आहे की तुम्हाला भवताली पाहताना, आयुष्य जगताना जे दिसलं आहे, जाणवलं आहे, तुम्ही जगाचा, स्वत:चा, निसर्गाचा जो विचार केला आहे त्याचा अनुभव. तो महत्त्वाचा आहे.
विचार न करता तंत्रज्ञान वापरणं आणि त्याच्याच करामती दाखवणं नव्हे, तर ते वापरून आपण काय घडवणार आहोत, ते महत्त्वाचं आहे. परंपरा परंपरा म्हणत नुसतं कर्मकांड सांभाळणं, निरूपयोगी रीतीभाती सांभाळणं, एकमेकांना एकमेकांपासून दूर नेणार्या प्रथापरंपरा सांभाळणं महत्त्वाचं नाही. परंपरेशी असलेली नाळ तोडण्याची जरूर नाही; पण आधुनिक जगात वावरताना त्या परंपरेतलं नव्या जगासाठी काय उपयोगी ठरेल हे कळून ते वेचता आलं पाहिजे. ते महत्त्वाचं आहे.
शिवाय परंपरा ही काही दगडाची किंवा लाकडाची वस्तू किंवा मूर्ती नाही. ती तर एक अतिशय जिवंत आणि सारखी बदलणारी गोष्ट आहे. आणि आपणच, म्हणजे माणसांनीच निर्माण केलेली गोष्ट आहे. एका बंगाली विचारवंतांनी सांगितलेला एक किस्सा मला आठवतो. एकदा एका गृहस्थांना भेटलेला एक तरुण मुलगा त्यांना सांगू लागला की त्यांच्या घरी एक अत्यंत दुर्मीळ अशी हजार वर्षांपूर्वीची कट्यार आहे. ऐकणारे गृहस्थ थक्क झाले. हजार वर्षांपूर्वीची कट्यार ! पाहिली पाहिजे. ‘दाखवशील मला?’ - मुलगा ‘हो’ म्हणाला आणि त्यांना घेऊन घरी गेला. अगदी काळजीपूर्वक सांभाळलेली, काचेचं झाकण असलेल्या नक्षीदार लाकडी पेटीत ठेवलेली ती कट्यार - मुलगा अभिमानानं सांगत होता - आम्ही पिढय़ान्पिढय़ा सांभाळलीय ही. गृहस्थ म्हणाले, ‘फार सुंदर आहे ! फारच उत्कृष्ट आहे हिची मूठ. हजार वर्षं झाली; पण कशी अजून नवी वाटतेय!’
मुलगा म्हणाला, ‘ती तर माझ्या आजोबांनी बनवलीय. खापरपणजोबांनी जुनी मूठ खराब झाली म्हणून नवी पूर्वीसारखीच बनवली होती; पण तीही खराब झाली हो. मग आजोबांनी अगदी पूर्वीसारखीच बनवली.’
‘असं होय ! आणि पातं? ते तर नव्या धारेनं लखलखतंय !’
मुलगा म्हणाला, ‘माझ्या वडलांनीच केलंय ते. जुनं पातं अगदीच गंजलं होतं. फार उत्तम कारागीर आहेत माझे वडील!’
गृहस्थ थक्क झाले. हजार वर्षांपूर्वीची कट्यार ! तिची मूठ वारंवार बदलली. तिचं पातं नवं नवं घडत राहिलं. पण कट्यार मात्र जुनी - हजार वर्षांची ! परंपरा अशीच आहे. लोक हजारो वर्षं-शतकानुशतकं ती सांभाळत आले. जुनं-निरूपयोगी ते काढून टाकत आले. कधी लोकांना काढायचं सुचलं नाही किंवा कधी लोक बिचकले तेव्हा कुणी जाणती, ज्ञानी, थोर माणसं पुढे आली आणि त्यांनी टाकाऊ, गंजलेले भाग काढून टाकले. नवे घडवले. परंपरा तीच. आपण पुढे नेत असलेली.
आपली मराठीची परंपराही अशीच आहे आणि आपण ती आधुनिक करून घेतो आहोत. या परंपरेच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी मोठी आहे.
महाराष्ट्रात इतके लहान-मोठे जनसमूह आहेत आणि ते प्रगतीच्या इतक्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, की सगळ्यांचा एकजिनसी विचार शक्यच होऊ नये. विविधता आणि विविधतेतही टिकून राहणारी एकता हे आपल्या देशाचं व्यवच्छेदक लक्षण. भौतिक जगण्यावर विजय मिळवण्यासाठी आंतरिक-आत्मिक शक्ती वाढवणं हे आपण हजारो वर्षं महत्त्वाचं मानलं. आज जागतिकीकरणाच्या घुसळणीत हे आपलं सार्मथ्य टिकवायचं कसं हा पेच आपल्यापुढे आहे.
इतक्या वेगवेगळ्या परंपरा-संस्कृती आणि वेगवेगळ्या भाषाही आपल्याकडे आहेत. सगळ्या जगातही तसंच वैशिष्ट्य आहे. पण एकमेकांना जोडणारे काही उत्तम पूलही नव्या जगानं निर्माण केले आहेत. उदाहरणार्थ, उत्तम वेबसिरीज आहेत, देशभरातले आणि जगभरातले, इतिहासातले, वर्तमानातले आणि भविष्यवेध घेणारे वेगवेगळे सिनेमे, नाटकं आणि दृकश्राव्य कार्यक्रम आहेत - नेटफ्लिक्स आहे.
परवाच अमृता सुभाषसारखी तरुण अभिनेत्री मला सांगत होती, ‘मी एका ब्रिटिश दिग्दर्शकाबरोबर काम करतेय आणि माझ्याबरोबर काम करणारी एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. पहिल्यांदा आम्ही दोघीही एकमेकींबरोबर फार अवघडलो होतो. पण मग गप्पांमध्ये नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या अनेक उत्कृष्ट गोष्टी निघत गेल्या आणि आमचा छान संवाद सुरू झाला. आमच्या कामात ते फार जरुरीचं होतं, ते नेटफ्लिक्सनं घडवलं.’
संवादाचा आणखी एक पूल म्हणजे अनुवाद. जगभरातली माणसं - त्यांचं मन आणि जीवन, त्यांचे विचार आणि भावना समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अनुवाद. आज तर भाषांतरामधून साहित्य हे माणसांसारखंच स्थलांतरित होत नव्या नव्या देशांमध्ये वसाहती करायला लागलं आहे. आपण बहुभाषिक होत, नकळत भाषेपलीकडे जाऊ लागलो आहोत.
खरं तर जगभरात शेकडो-हजारो भाषा आज मरू घातल्या आहेत. भाषा मरतात म्हणजे ती भाषा बोलणा-याची संस्कृती मरते आहे. सांस्कृतिक सपाटीकरणाचा हा काळ आहे. पण एका बाजूला एक नवी संस्कृतीही उदयाला येते आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या अनेक देशांच्या भूमीवर अमेरिकन, ब्रिटिश, र्जमन मुलंमुली भारतीय मुलामुलींबरोबर वाढत आहेत आणि त्यांची आपसात लग्नंही होताहेत. या नव्या विश्वसंस्कृतीत मराठी भाषेला कोणती जागा आहे? असणार आहे?
मॅक्समुल्लर भवनच्या एका कविता प्रकल्पात मी काम करत होते - पोएट ट्रान्स्लेटिंग पोएट - एका र्जमन कवयित्रीनं माझ्या आणि मी तिच्या कवितांचा थेट अनुवाद इंग्रजीचा आधार न घेता, दुभाषाच्या मदतीनं एकत्र बसून कविता समजून घेत केला. त्या अनुभवाबद्दल जर्मनीत बोलत असताना तिथल्या एका र्शोत्यानं मला विचारलं, ‘इंग्रजीच्या मदतीशिवाय तुम्ही हे र्जमन भाषेतल्या कवितांचं भाषांतर करू शकलात. मग तुमच्या देशात माणसं इंग्रजीची मदत का घेतात?’
- मी त्याला म्हटलं, ‘आमच्या देशात तुमच्याप्रमाणे फक्त एकच भाषा - जशी तुमच्याकडे फक्त जर्मन - तशी नाही. आम्ही 26 संपन्न भाषा आणि पुन्हा त्या भाषांच्या अनेक बोली सांभाळणारे लोक आहोत आणि प्रत्येक भाषेला - म्हणजे ती भाषा बोलणार्या समाजाला स्वत:ची स्वतंत्र अस्मिता आहे; कारण त्या समाजाची म्हणून एक स्वतंत्र जीवनशैली आहे. स्वतंत्र पोषाख, खाणं-पिणं, रीतीभाती - स्वतंत्र संस्कृतीच आहे. ती जपायची तर कोणतीही एकच भाषा इथे इतर भाषकांनी स्वीकारणं अवघड आहे. म्हणून इंग्रजी !’
- हे उत्तर नाइलाजानं दिलं तरी मी कमालीची अस्वस्थ झाले. मला वाटतं की, शेवटी बहुभाषक होणं ही काळाची फार मोठी गरज आहे आणि मातृभाषा टिकवणं हीही संस्कृती टिकवू पाहणा-या समाजाची अतिशय निकडीची गरजच आहे. कारण समूह टिकले तर संस्कृती टिकेल आणि भाषाही टिकेल. म्हणून मराठी बोलणा-या- प्रेमानं बोलणा-या आणि मराठी संस्कृती प्रेमानं सांभाळणा-या समूहांची घट्ट वीण राहिली पाहिजे आणि ते समूह नव्या जगात जगण्यासाठी समर्थही झाले पाहिजेत. हे कसं साधता येईल?
-----------------------------------
जरा शहाणे व्हा
भगवान बुद्धांची एक गोष्ट आहे. एकदा कोणी चार जण नदीपलीकडे जाण्यासाठी काठावर आले. त्यांना नावाडी दिसला नाही; पण एक नाव दिसली. ती नदीत लोटून वल्हवत वल्हवत ते पलीकडे पोहोचले आणि मग ती नाव डोक्यावर घेऊन बाजारातून चालत निघाले. लोकांनी त्यांना विचारलं,
‘ही नाव का डोक्यावर घेतली आहे?’
ते म्हणाले, ‘हिच्यातून आम्ही आलो. ही नसती तर नदी ओलांडून आम्ही इथे कसे पोहोचलो असतो ! हिने आम्हाला इथे आणलं आणि आता हिला सोडून देऊ? आम्ही कृतघ्न होणार नाही. हिचं ऋण आम्ही नेहमी डोक्यावर वागवू.’
बुद्ध म्हणाले, ‘अरे, त्या मूर्खांना कोणीतरी सांगा. नाव हे साधन होतं रे. ते ओझं डोक्यावर कसलं वागवता? महत्त्वाचं आहे तुमचं वल्हवणं. चौघांनी एकदिलानं श्रम करणं, महत्त्वाचं आहे तुमचं पोहचणं. पोहचण्यासाठी मदत करणार्याविषयी कृतज्ञता मनात असू द्या; पण महत्त्वाचं काय आहे ते ओळखा. जरा शहाणे व्हा.’
ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच आहे खरं तर.
(उत्तरार्ध पुढच्या रविवारी)