आर्यन व्हॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:03 AM2019-10-13T06:03:00+5:302019-10-13T06:05:06+5:30

लडाख परिसरात निसर्गानं निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. याच परिसरातील ‘आर्यन व्हॅली’नं  तर जगाला वेड लावलं आहे.  मात्र हीच केवळ इथली ओळख नाही. येथील संस्कृती, भाषा, पोषाख.  सगळंच इतरांपेक्षा वेगळं आहे. बौद्ध संस्कृतीशी मिळतेजुळते घेऊनही स्वत:ची संस्कृतीही त्यांनी जपलीय. या परिसरातील लोक हेच मूळ आर्य असंही म्हटलं जातं.

Aryan Valley- Ladakh’s Dard Aryans struggle to preserve their cultural legacy | आर्यन व्हॅली

आर्यन व्हॅली

Next
ठळक मुद्देआर्यन संस्कृतीविषयी आपण बरंच वाचतो-ऐकतो; पण प्रत्यक्ष ही संस्कृती आजही जिवंत असून, त्याला आपण निश्चित भेट देऊ शकतो.

- समीर देशमुख

निसर्गसौंदर्याचा अनोखा नजराणा म्हणजे लडाख. उत्तुंग पर्वत, तशाच खोल दर्‍या आणि हिमनद्यांनी वेढलेल्या लडाखला चंद्रासारखा भूभाग म्हटले जाते.
हा प्रदेश लडाख या नावाने जगप्रसिद्ध असला तरी प्राचीन काळात मरयुल अथवा लालभूमी या नावाने त्याची ओळख होती. चिनी प्रवासी युआन सांगने (630) लडाखला मोनालीपो या नावाने पुकारले होते. प्राचीन इतिहास ग्रंथात याचे नाव लदक्स आणि लथक असे लिहिले आहे. काही जाणकारांनी त्याला पश्चिम तिबेट किंवा लामाभूमी म्हटलंय. पारसी इतिहासकारांनी लहान तिबेट असंही याचं वर्णन केलंय. 
इथे प्रचंड मोठय़ा दर्‍या, पर्वत तसेच सियाचीन, नोनकुन, ससेट इत्यादी प्रसिद्ध हिमनद्या आहेत. लडाख येथे धर्मपंडित, लामा, सिद्धीप्राप्त व्यक्तींद्वारा निर्मित गुफा अतिशय प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त पँगाँग, सोमोरीरी आणि सोकर या पवित्न तलावांनी हा प्रदेश अतिशय देखणा बनलाय.
लेह शहरापासून 160 ते 175 किमी अंतरावर पश्चिमेकडे सिंधू नदीच्या उजव्या व डाव्या डोंगरावर दा, हानु, गारकोन, दारचिक ही गावे वसलेली आहेत. हा भाग ‘आर्यन व्हॅली’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. येथील संस्कृती, भाषा, पोषाख. लडाख आणि इतर भागांपेक्षा वेगळा आहे. येथील ‘दर्द’ समुदायाने बौद्धधर्म व त्यांच्या संस्कृतीशी मिळतेजुळते घेऊन दुसरीकडे स्वत:ची संस्कृतीही जपलीय. 
आर्यन व्हॅली येथील बौद्ध दर्द यांच्या गाण्यातील उल्लेखानुसार आणि अभ्यासकांच्या मतानुसार त्यांचे पूर्वज हे गिलगीट येथील मूळ रहिवासी होते. तसेच काही अभ्यासकांच्या मते प्राचीन काळात ते मध्य आशियातील रहिवासी होते. त्यानंतर ते गिलगीट, जे आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, तिथे त्यांची वस्ती होती. नंतर ते क्रमश: लडाखला पोहोचले. तरीही यावर अजून ठाम मत नाहीये की येथील निवासी हे गिलगीट की मध्य आशिया, यापैकी नेमके कुठले? तरी एक मात्न निश्चित आहे की, लडाख या भागात राहणारे दर्द म्हणजेच आर्यन हे सिंध-गिलगीट येथून आलेत. 
प्रसिद्ध र्जमन विद्वान ए.एच. फ्रँके यांनी लडाखच्या इतिहासाविषयी खूप संशोधन केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार लडाख येथील दर्द जमातीचे लोक सिंधू नदीच्या तिरावर दुरदुरपर्यंत पसरलेले होते. दर्द जमातीतील सांस्कृतिक उत्सव, लोकगीते व पुरातन अवशेषाच्या अभ्यासाअंति फ्रॅँके यांचे असे मत आहे की, सिंधू नदीच्या काठी दा, गारकोन, दारचिक, हानु या भागापासून लेह-शे-ग्युद-उपशीपर्यंत सारा परिसर हा कधीकाळी दर्द जमातीच्या प्रभावाखाली होता.
दर्द जमातीचे पूर्वज गिलगीट सिंधू येथून आले व लडाख क्षेत्नातील सिंधू नदीच्या किनारी स्थायिक झालेत. इतिहासाच्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, पाकिस्तान येथील सिंध प्रांताचे नामकरण हे सिंधू नदीच्या नावामुळेच झालंय. सिंधू नदी लडाख येथून जाते. भारत व पाकिस्तान येथे या नदीला सिंधू या नावाने पुकारले जाते. पारसी भाषेत ‘स’ चा उच्चार ‘ह’ होतो त्यामुळे सिंधू हा शब्द काळानुरूप हिंदू असा झाला आणि या नदीच्या आसपास राहणार्‍या भारतीयांना हिंदू असे नंव पडले व त्यांच्या राहण्याच्या जागेला हिंदुस्थान म्हटले जाऊ लागले.
सिंधू नदीला युरोपियन ‘इंडस’ असे म्हणतात. त्यामुळे भारतीयांना ‘इंडियन’ म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती याच सिंधू नदीच्या किनार्‍यावर हडप्पा व मोहोंजोदडो यांसारखी प्राचीन शहरे विकसित झाली. सिंधू नदी तिबेटच्या कैलास पर्वतातून दक्षिण-पश्चिम भागातून लडाखच्या सीमेत प्रवेश करते. ही नदी देनचोपासून लेह शहर, लडाख व आर्यन व्हॅलीपर्यंत 450 किमीचा प्रवास करते. त्यानंतर पाकिस्तानमार्गे ती अरब सागरास मिळते.
प्राचीन भारतीय संस्कृत कोशात लिहिलंय की, पंजाबच्या पश्चिमेकडील प्रांत वाल्हिक प्रदेश येथे भरतवंशी राजा दर्दने एका विशाल साम्राज्याची स्थापना केली. त्या दर्द राजाच्या नावाने त्या प्रदेशास ‘दरदस्थान’ म्हणून ओळखले जाते. यामुळेच तेथील रहिवासी दर्द होय. अभ्यासकांनी दर्द भाषेला भारतीय आर्यभाषा समूहात ठेवलंय.
ही संस्कृती भारत व जगातील एक प्राचीन संस्कृती आहे. तसेच या आर्यन गावामधील भौगोलिकदृष्ट्या मध्यभागी वसलेले गारकोन हे गाव सिंधू नदीच्या किनारी उत्तरेकडे 70 किमीच्या व्यासामध्ये आहे. ज्याचे केंद्रीय स्थान उत्तरेकडून कारगिलच्या पश्चिमेकडे 170 किमी अंतरावर लेह जिल्हा आहे. हे कारगिल जिल्ह्यातील उत्तरेकडील शेवटचे गाव. येथील उंच पठारांचा भाग त्यांच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक ठेव्यासाठी प्रसिद्ध आहे या आर्यकालीन गावात अनेक जत्ना आणि उत्सव साजरे केले जातात. 
आर्यन व्हॅलीच्या वरील डोंगराळ भागात अनेक सुंदर सरोवरे आहेत. व्हॅलीजवळ व लष्कराच्या काही उंच डोंगरावरील पोस्टजवळ ही सरोवरे आढळून येतात. ‘गूगल सॅटेलाइट सर्च’मध्ये गारकोन हे गाव दिसत नाही.
हा सारा परिसर अतिशय देखणा आहे, मात्र आर्यन गावात फिरताना व छायाचित्ने काढताना विशिष्ट काळजी घेणेही आवश्यक आहे.
प्राचीन रॉक कला- स्वस्तिका, आयबॅक्स, शिकारी फुटप्रिंट्स इत्यादी रॉक आर्ट्स आणि खारोष्टी/शारदा स्क्रिप्टमध्ये हे सर्व रेकॉर्ड आहे. बिमा आणि दा या गावांमध्ये इतिहासाचा हा ठेवा सापडतो. ही ठिकाणं दर्द समुदायाच्या इतिहास आणि संवर्धनासाठी खूप महत्त्वाची आहेत. शारदा लिपीदेखील अतिशय दुर्मीळ असून, संशोधनाच्या स्तरावर आहे.
येथे सोने मोठय़ा प्रमाणात सापडते असे मानले जाते. स्थानिक लोक तर सांगतात, खणून काढलेल्या वाळूतून सोने कसे काढायचे, हेही येथील लोकांना फार पूर्वीपासून माहीत होते. सिंधू नदीच्या काठी खलसे-बटालीक मार्गावर दा, गारकोन व दारचिक या ठिकाणी पूर्वी अशा अनेक जागा होत्या, जेथे सोने सापडायचे.
याच खलसे-बटालीक रोडवर दा गावात सिंधू नदीजवळ गुरु  रिंगपोचे एक प्राकृतिक ‘रॉक फॉर्मेशन’ आढळून आले आहे. त्याला ‘नॅशनल रॉक ऑफ गुरु  रिंगपोचे’ असेही म्हणतात. आचार्य पद्मसंभावना गुरु  रिंगपोचे म्हणून लोकप्रिय व ज्ञात होते. त्यांच्या बोटांचे ठसे, गुफा आणि त्यांच्या ध्यानधारणेच्या जागा लडाखमध्ये असंख्य ठिकाणी आढळतात.
26 जुलै रोजी येथे कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. मे 1999 रोजी सर्वप्रथम याच ठिकाणी गारकोन या गावातील ताशी नामग्याल व सिरिंग मोरूप या मेंढपाळ बांधवांना गारकोन व्हॅलीत सर्वप्रथम घुसखोरी आढळून आली. तसेच यालदूर व्हॅलीत सोनम नॉरफल यास ही घुसखोरी लक्षात आली. त्याच आधारावर भारतीय सैन्याने वाटचाल करीत विजयर्शी खेचून आणली.
आर्यन संस्कृतीविषयी आपण बरंच वाचतो-ऐकतो; पण प्रत्यक्ष ही संस्कृती आजही जिवंत असून, त्याला आपण निश्चित भेट देऊ शकतो.

deshmukhsameer2003@gmail.com

Web Title: Aryan Valley- Ladakh’s Dard Aryans struggle to preserve their cultural legacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.