दाक्षायणी-शर्वाणीची - वेगळी वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:36 AM2019-01-20T00:36:07+5:302019-01-20T00:36:35+5:30
जखमी कुत्री व मांजरांना आसरा देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या दाक्षायणी जाधव यांची प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त दाक्षायणी व शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणींच्या वेगळ्या वाटेवरची सफर...
- इंदुमती गणेश
जखमी कुत्री व मांजरांना आसरा देऊन त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या दाक्षायणी जाधव यांची प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर निवड झाली आहे. त्यानिमित्त दाक्षायणी व शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणींच्या वेगळ्या वाटेवरची सफर...
रस्त्यावर भटकी कुत्री, मांजरं आणि तेही जखमी अवस्थेतील दिसली तरी आपण कडेने निघून जातो. दारात काय गल्लीतही त्यांचा आवाज आला, तर दगड मारायला कोणी मागेपुढे पाहत नाही; पण कोल्हापुरातील दाक्षायणी आणि शर्वाणी जाधव या दोन्ही बहिणी अशा जखमी कुत्री व मांजरांना आपल्या घरात आसरा देऊन त्यांचे खाद्य, सेवाशुश्रूषा, औषधोपचार करतात. गेल्या १५ वर्षांत त्यांनी २५0 हून अधिक कुत्री व मांजरांना जीवदान दिले आहे.
कोल्हापुरातील साळोखेनगर परिसरात राहणाºया दाक्षायणी या जर्मन व इंग्रजी भाषेचे क्लासेस घेतात, तर शर्वाणी या सीए आहेत. आई-वडिलांच्या संस्कारातून आलेले ‘प्राण्यांवर दया करा’ हे वाक्य त्यांनी प्रत्यक्ष जीवनातही अंगीकारले. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा काही नवीन विषय नाही; पण त्यांनाही जीव आहे, वेदना होतात हेच आपण विसरून गेलो आहोत. १५ वर्षांपूर्वी एका कुत्रीला मारून महापालिकेचे कर्मचारी निघून गेले. तिच्या लहानग्या पिलांची केविलवाणी अवस्था बघून दाक्षायणी यांनी त्यांना घरी आणले आणि तेथूनच कुत्री व मांजरांच्या सेवाशुश्रूषा व संगोपनाला सुरुवात झाली. सुरुवातीला आई-वडिलांची नाराजी होती, पण आपल्या मुली एक चांगलं काम करताहेत, या भावनेतून त्यांनीही या कामाला साथ दिली.
या बहिणी कुठेही जाताना एखादे कुत्रे किंवा मांजर जखमी अवस्थेत दिसले, तर त्याला घरी आणून औषधोपचार, जेवण, डॉग फूड, शुश्रूषा करतात. ते बरे झाले की सोडून देतात. हे प्राणी खूप लहान असेल तर इच्छुक कुटुंबांना सांभाळण्यासाठी देतात. एवढ्यावरच न थांबता ते कुत्र्यांचे निर्बीजीकरणदेखील करून आणतात. हे सगळे त्या स्वखर्चाने करतात.
घरात जिथे एका प्राण्याला सांभाळणे त्रासदायक असते, तिथे सध्या १५ कुत्री आणि १५ मांजरांना आपले व्याप पाहून त्या सांभाळतात. स्वत:साठीचा खर्च बाजूला ठेवतात, घर बंद ठेवून किंवा एकत्र कोठेही त्यांना जाता येत नाही. अनेकदा या प्राण्यांचा त्यांना त्रासही होतो, मात्र परिसरातील नागरिकांना त्यांचा त्रास होऊ नये याची काळजी घेतात. अनेक तडजोडी आणि प्रसंगी विरोध पत्करून त्यांनी हे काम अखंड सुरू ठेवले आहे. प्राण्यांशी ट्युनिंग जुळलं की ते आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी घेतात. ते विनाकारण आपल्याला त्रास देत नाहीत. त्यांना मारणे हा उपाय नाही, तर पर्यायी सक्षम यंत्रणा हवी असे त्यांचे म्हणणे आहे.
(लेखक कोल्हापूर ‘लोकमत’मध्ये वरिष्ठ बातमीदार आहेत.)