Attack on Sharad Pawar House: महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय..?

By अतुल कुलकर्णी | Published: April 10, 2022 10:04 AM2022-04-10T10:04:00+5:302022-04-10T10:24:18+5:30

Maharashtra's politics: सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते. मात्र पातळी घसरू लागली, तर येणाऱ्या पिढ्या त्याच पद्धतीचे राजकारण करू लागतील. उत्तर प्रदेश, बिहार याची उत्तम उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात सुडाच्या राजकारणाची बीजे पेरायची का? याचा निर्णय सगळ्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून घेतला पाहिजे.

Attack on Sharad Pawar House: What is going on in Maharashtra's politics? | Attack on Sharad Pawar House: महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय..?

Attack on Sharad Pawar House: महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय..?

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी
महाराष्ट्राच्याराजकारणात चाललंय तरी काय..? हा प्रश्न आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहे, चर्चेत आहे. ज्या पद्धतीने चौकशा सुरू आहेत, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते पाहिले तर कोणाचा पायपोस कोणात नाही, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचेराजकारण याआधी या थरापर्यंत कधीही गेले नव्हते, ही प्रत्येकाची भावना आहे. मात्र ते सुधारण्यासाठीचा कोणताही प्लॅन कोणत्याही नेत्याकडे नाही.

एखादी खोटी गोष्ट दहावेळा खरी आहे, असे सांगण्याला सुरुवात केली की ती कालांतराने खरी वाटायला लागते. किंवा एखादी खरी गोष्ट खोटी आहे, असे दहावेळा सांगितले, तर ती खरी वाटू लागते. या सिद्धांतावर विश्वास ठेवून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चालू आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार चिखलफेक सुरू आहे. मराठी साहित्यात रोज नव्या शिव्यांची भर पडत आहे. राज्यातले राजकारण इतके घाणेरडे, गलिच्छ कधीच झाले नव्हते, याचे दाखले सगळेच देत आहेत. मात्र समोर येऊन चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची कोणाची तयारी नाही. गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून किरीट सोमय्या ज्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोप करत आहेत, त्याच पातळीवर जाऊन खा. संजय राऊत यांच्याकडून उत्तर दिले जात आहे. गुणरत्न सदावर्तेसारखे नेते जाहीर सभेतून जी भाषा वापरतात ते पाहता, सगळे एका माळेचे मणी वाटावेत इतके सारखेपणाने वागत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. महामंडळाचे विलीनीकरण सरकारमध्ये करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने नकार दिला गेला. त्याचे पडसाद शुक्रवारी ज्या पद्धतीने उमटले, ते अत्यंत चिंताजनक आहे. एखाद्या नेत्याच्या घरी संतप्त जमाव हातात दगड, चपला घेऊन घुसण्याच्या इराद्याने जाऊ शकतो, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्राला पूर्ण सहानुभूती आहे. एसटी टिकली पाहिजे, खासगी वाहतूकदारांच्या दावणीला ती जाऊ नये, यावर कोणाचेही दुमत असणार नाही. मात्र त्यासाठी जे मार्ग निवडले जात आहेत, ते महाराष्ट्राला बिहारच्या दिशेने नेणारे आहेत.

याआधी हिंदुस्तानी भाऊने धारावीत हजारो मुलांना जमा केले. त्याचा थांगपत्ता पोलीस गुप्त वार्ता विभागाला लागला नाही. नांदेडमध्ये भरदिवसा बिल्डरची गोळ्या घालून हत्या होते. त्याचा व्हिडिओ देशभर व्हायरल होतो. शुक्रवारी आझाद मैदानावरून लोक निघतात, तेव्हा ते कुठे जाणार आहेत? काय करणार आहेत? याचे कसलेही अलर्ट पोलीस विभागाला मिळाले नाहीत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ज्या अधिकाऱ्यांचे हे काम होते व त्यांनी त्यात कुचराई केली त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे. जर दारू पिऊन लोक आले असतील, तर त्यांच्या तपासण्या करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले पाहिजेत. अन्यथा उद्या कोणत्याही पक्षाच्या, कुठल्याही नेत्याच्याबाबतीत असे प्रकार घडत राहतील आणि ते थोपविण्याची क्षमता कोणाकडेही उरणार नाही.

दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येचा तपास लागत नाही. जनतेचे असंख्य प्रश्न उत्तराविना पोरके झाले आहेत. त्याचा छडा लावण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात नाही. एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप त्वेषाने केले जातात. निवडणुका जवळ येऊ लागल्या की, हनुमान चालीसा, मशिदीवरील भोंगे आठवू लागतात. महाराष्ट्र असा आहे का? याचा विचार सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून करण्याची गरज आहे.

विचार करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातली ही खदखद आहे. या अस्वस्थतेवर उत्तर सोपे आहे. मात्र सगळ्यांनीच जाणीवपूर्वक ते अवघड करून ठेवले आहे. आज अवघड करून ठेवलेले उत्तर उद्या संपूर्ण महाराष्ट्राला किती महागात पडेल, याचा थोडा विचार करुया आणि अशा गोष्टींच्या पलीकडेदेखील एक सुंदर देखणा महाराष्ट्र आहे, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन सोडला पाहिजे. एखादी दंगल झाली आणि जातीय व धार्मिक तणाव निर्माण झाले, तर सर्वपक्षीय नेते एकत्र येतात आणि त्यातून जो संदेश देण्याचा प्रयत्न करतात, तोच संदेश देण्याची हीच ती वेळ आहे.

Web Title: Attack on Sharad Pawar House: What is going on in Maharashtra's politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.