ऑस्करसाठी गेलेल्या ‘पेबल्स’चं अस्सलपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 06:00 AM2021-11-21T06:00:00+5:302021-11-21T06:00:02+5:30

‘पेबल्स’ या अस्सल भारतीय चित्रपटानं मानाचा‘गोल्डन’ पुरस्कार पटकावला. जगभरातले सर्वच फिल्म फेस्टिवल्स त्यानं गाजवले. आता तो ‘ऑस्कर’साठी सज्ज झाला आहे..

The authenticity of the 'Pebbles' that went to the Oscars | ऑस्करसाठी गेलेल्या ‘पेबल्स’चं अस्सलपण

ऑस्करसाठी गेलेल्या ‘पेबल्स’चं अस्सलपण

Next
ठळक मुद्देनुकताच पेबल्सला भारतातर्फे ऑस्कर्स पुरस्काराच्या स्पर्धेत पाठवण्यात आलंय. यासाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ सिने-दिग्दर्शक शाजी एन करुण यांनी पेबल्सला प्युओर अर्थात अस्सल सिनेमा असल्याचं म्हटलंय. 

- नरेंद्र बंडबे
सदस्य, फ्रिप्रेस्की (आंतरराष्ट्रीय फ़िल्म क्रिटीक्स असोशिएशन)
------------------------------

प्रतिष्ठेच्या रॉटर्डम आंतरराष्ट्रीय फ़िल्म फेस्टिवलमध्ये कुळंगल अर्थात पेबल्स (२०२०) सिनेमानं बाजी मारली. गोल्डन टायगर पुरस्कार पटकावला. त्यानंतर दिग्दर्शक विनोथराजच्या या तामीळ सिनेमानं जगभरातले सर्वच फिल्म फेस्टिवल्स गाजवले. दिग्दर्शक म्हणून विनोथराजचा हा पहिलाच सिनेमा आहे. नुकताच पेबल्सला भारतातर्फे ऑस्कर्स पुरस्काराच्या स्पर्धेत पाठवण्यात आलंय. यासाठीच्या निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ सिने-दिग्दर्शक शाजी एन करुण यांनी पेबल्सला प्युओर अर्थात अस्सल सिनेमा असल्याचं म्हटलंय. 
रॉटर्डम फ़िल्म फेस्टिवलमधल्या ज्युरींनीही असंच मत नोंदवलं होतं. पेबल्सबद्दल निरीक्षण मांडताना ते म्हणाले “स्पर्धेत एकापेक्षा एक सरस सिनेमे होते. पण पेबल्सच्या साध्या आणि सोप्या मांडणीच्या आम्ही प्रेमात पडलो. दिग्दर्शकानं आपल्या पात्रांमार्फत कमीत कमीत साधनांमध्ये जास्तीत जास्त प्रभाव साधलाय. हे अस्सल सिनेमाचं लक्षण आहे. किचकट विषयाची मुद्देसुद मांडणी करताना त्याचं सौंदर्य अबाधित ठेवण्यात आलंय.”
रॉटर्डममध्ये पेबल्सचा वर्ल्ड प्रिमियम झाला होता. पहिल्या प्रयत्नाच मिळालेली ही कौतुकाची थाप पेबल्सच्या पुढच्या वाटचालीसाठी फायद्याची ठरली. जगातल्या जवळपास सर्वच फिल्म फेस्टवलमध्ये पेबल्सचा दबदबा कायम राहिला. त्यामुळं ऑस्कर्ससाठी भारताचं प्रतिनिधीत्व करण्याआधीच तो जगभर पोचला. याचा पेबल्सला ऑस्कर पुरस्कारासाठी हवा करण्यात नक्कीच फायदा होईल. 
हॉलीवुड रिपोर्टर, न्यूयॉर्क टाईम्स, न्यूयॉर्कर आदींच्या माध्यमातून तो आधीच जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोचलाय. त्यामुळं द अकादमीच्या जवळपास दहा हजार मतदात्यांपर्यंत पोचणं पेबल्सला सहज शक्य झालंय. ऑस्कर्स हा अतिउत्तम सिनेमापेक्षा पीआर स्ट्रॅटेजीसाठीचा पुरस्कार आहे. तो बेस्ट इंटरनॅशनल फिल्म या कॅटेगरीत स्पर्धा करतोय. त्यासाठी पेबल्सची निर्मिती करणाऱ्या रावडी पिचर्सनं कॅलिफोर्नियातल्या पीआर एजन्सीची मदत घेतलीय. आता सावकाश तो अकादमीच्या सर्वच मतदारांपर्यंत पोचवण्याची प्रक्रिया सुरु झालीय. आधी १५ सिनेमांसाठी शॉर्ट लिस्ट होणं आणि त्यानंतर शेवटच्या सहा सिनेमांमध्ये नामांकन मिळवण्यासाठी नेटानं प्रयत्न केले जातायत. ऑस्कर मिळेल न मिळेल ही पुढची गोष्ट आहे. एका अस्सल भारतीय सिनेमानं जगभरातल्या प्रेक्षकांवर गारुड केलं ही भावना मोठा आनंद देणारी आहे.
जगभरातल्या वेगवेगळ्या फ़िल्म फेस्टिवलमध्ये हा पेबल्स तिथल्या प्रेक्षकांशी थेट कनेक्ट होत होता. दिग्दर्शक विनोथराज सांगतो, जॉर्जियातल्या प्रेक्षकांना पेबल्स प्रचंड आवडला. सिनेमा संपल्यावर त्याच्याभोवती गर्दी झाली. हे आमच्याकडेही असंच घडलं असतं. फरक फक्त इतकाच आहे की हे कथानक बर्फानं गारठलेल्या वातावरणात घडलं असतं तुमच्याकडे ते रखरखीत उन्हात दुष्काळी भागात घडतंय. जगाच्या टोकावरच्या प्रेक्षकांना तो भावला, आपला वाटला, यातच सिनेमाचं यश आलं असं विनोथराज अगदी विश्वासानं सांगतो.
---------------------------------
तामीळनाडूतला दुष्काळी 
भागही पेबल्सचं पात्र

कुळंगलचं कथानक दक्षिण तामीळनाडूतल्या दुष्काळी भागात घडतंय. अख्ख्या सिनेमात रखरखत्या उन्हातून दारुड्या तुसडा बाप आणि त्याच्या दहा वर्षाच्या निर्विकार मुलाचा प्रवास दाखवण्यात आलाय. या प्रवासात अनेक गोष्ट घडतात. त्या पाहण्याची गम्मत वेगळी आहे. ज्या ठिकाणी हे कथानक घडतंय तिथलं सभवताल हेदेखील सिनेमाचं एक प्रमुख पात्र आहे. हे भवताल सिनेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी महत्त्वाचं आहे. तो सेटींगचा भाग असतो. जेव्हढं सेटींग प्रभावी तेव्हढा सिनेमाही प्रभावी हे गणित पेबल्सला तंतोतंत लागू पडतं.
दिग्दर्शक विनोथराज यांच्या मते रोजच्या संघर्षातून इथल्या लोकांच्या जगण्यात एक रुक्षपणा आलाय. तो रुक्षपणा, रखरखीतपणा तिथल्या वातावरणाचा भाग आहे. प्रेक्षकांना तिथली सामाजिक स्थिती समजावून घ्यायला ते उपयोगी पडतं. यामुळंच उपजीविकेसाठी जेव्हा उंदीर मारुन खाणारी इरुलर जमात समोर दिसते तेव्हा त्याचं अप्रुप न वाटता तिथल्या परिस्थितीशी प्रेक्षक एकरुप होतो. तिथल्या पात्रांमध्ये गुंततो आणि पुढे जाऊन मनाने त्यांच्या कथानकाचा भाग बनतो. यामुळं विनोथराजच्या सिनेमातला दक्षिणेकडचा दुष्काळी भवताल भारतात आतल्या भागात सुरु असलेल्या जगण्याच्या संघर्षाचा आरसा दाखवतो.
-----------------------------

पेबल्समधले स्त्री-पुरुष संबंध आणि भारतीय कुटुंब व्यवस्था :
पेबल्सला अस्सल भारतीय सिनेमा म्हणण्यामागची अनेक कारणं आहेत. त्यातलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. त्यात दाखवलेली इथली भारतीय कुटुंबपध्दती. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत महिलांचं स्थान दुय्यम आहे. तो घर चालवतो, तो घराचा मालक आहे. तिला या घरावर अधिकार सांगता येत नाही. घरातल्या कुठल्याही गोष्टीवर तिचा हक्क नाही. अश्यावेळी मग जेव्हा ती घर सोडून जाते तेव्हाही पुरुषाची गोची होते. तो तिच्याशिवाय कुटुंब चालवू शकत नाही. बाहेरचं करु की घरातलं बघू अशा दुहेरी चक्रात तो अडकतो. मग घर सांभाळण्यासाठी, रांधायला, उष्टी काढायला तिची गरज आहे. यासाठीच तो पेबल्समधला नायक त्याच्या बायकोला माहेरुन आणायला निघालाय. यावेळी जाताना तिचा इरादा पक्का असल्याचं त्याच्या लक्षात आलंय. यासाठी शाळकरी पोराला वर्गातून काढून सासुरवाडीकडे निघालाय. त्या प्रवासात तुसडा बाप त्या पोराला झोडपतोय. उन्हातून पळवतोय. हे सर्व दाखवताना विनोथराज म्हणतो की मी हे असंच लहानपणापासून अनुभवलंय. जे पाहिलं, जे भोगलं ते दाखवताना पुन्हा अंगावर काटा आला. स्त्रीला स्वत:चं मत नाही, दुष्काळानं होरपळणाऱ्या भागात अनेक किलोमीटर जाऊन खळग्यातून पाणी आणण्याची जबाबदारी तिचीच, मुलंही तिनंच सांभाळायची. असं पूर्णपणे पितृसत्ताक समाजाचं प्रतिबिंब पेबल्समध्ये आहे. हे फक्त भारतीय नक्कीच नाही. जिथं-जिथं स्त्री-पुरुष संबंधाच्या गोष्टी केल्या जातात तिथं तिथं या सिनेमातले पात्रं जागतिक परिस्थितीत अलगद बसतात. हे विशेष.
---------------------------
मुकनायक मुलांची दुनिया
आसपास घडणाऱ्या आणि अनुभवायला लागणाऱ्या प्रसंगाकडे पाहण्याचा लहान मुलांचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो. ते त्या भीषण परिस्थितीचे मुकनायक असतात. ही मुकनायकाची भूमिका बजावताना जेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हा ही छोटी मंडळी आपला बदला घेतातच. पेबल्समधला रखरखत्या उन्हातला प्रवास हा याचाच भाग आहे. नॉन-ॲक्टर्स आणि नवख्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या विनोथराजला हा मुकनायक शोधायला फार कठीण गेलं. शेवटी अगदी सिनेमात जी परिस्थिती दाखवलीय तशीच असलेला मुलगा सापडला. तो या रोलसाठी फिट होता. घरातलं दारीद्र्य, बेवडा बाप, आईची परवड, रोज बापाकडून आईला होणारी मारझोड हे सर्व अगदी सहज सहन केलेला हा वेणू निर्विकार होता. परिस्थितीच्या ओझ्याखाली दबला होता. त्याचं बालपण हरवलं गेलं होतं. त्यामुळं विनोथराजसाठी हवा असलेला मुकनायक तो प्रभावीपणे साकारु शकला.
------------------------
साऊथचा सिनेमा - आतला आणि बाहेरचा
दक्षिणेकडे सिनेमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसारणाची नवीन लाट आलीय. खास करुन तामीळनाडू, केरळ आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये सामाजिक विषयांवरच्या इंडिपेन्डंट सिनेमांची एक शृंखलाच तयार झालीय. तामीळनाडूमध्ये गल्लेभरु सिनेमाबरोबरच समांतर सिनेमाची मोठी पंरपरा आधीपासूनच होती. बाळू महेंद्रन, के बाला, रवि, आदी दिग्दर्शकांनी सत्तरच्या दशकात गाजलेल्या समांतर सिनेमा दिग्दर्शकांनी रान उठवलं. सामाजिक विषय, स्त्रीवाद, राजकारण आणि बरंच काही मांडून सिनेमा क्षेत्राला सामाजिक जाण दिली. त्यानंतर चेरनसारख्या दिग्दर्शकांनी ते काम पुढे नेलं. सामाजिक प्रश्न मांडलेच, शिवाय अस्सल तामिळीयन मातीशी नातं छातीठोकपणे सांगितलं.
गेल्या चार ते पांच वर्षांमध्ये तामीळनाडूतल्या फ़िल्म इंडस्ट्रीमध्ये उपेक्षित समाजाचा आवाज वाढलाय. खासकरुन दक्षिण तामीळनाडूतून येणाऱ्या दिग्दर्शकांनी तिथल्या जातीय समीकरणाची कास धरली. ती अगदी पेबल्सपर्यंत कायम आहे. पेबल्सचे राजकीय सबटेक्स्ट प्रभावी आहेत. उंदीर खाऊन जगणाऱ्या इरुलर जमातीवर गुन्हागारी असल्याचा ठपका अगदी १८ व्या शतकापासून आहे. आजही या समाजाकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिलं जातं. ३१ ऑगस्ट १९५२ ला इरुलर आणि त्यासारख्या असंख्य डिनोटीफाईड जमातींना या गुन्हेगारी छाप्याच्या जोखडातून मुक्त करण्यात आलं, पण आजही समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. चोरी किंवा इतर तत्सम गुन्हे घडले की गावकुसाबाहेर असलेल्या या जमातीच्या लोकांना उचललं जातं. त्यांचा अतोनात छळ केला जातो. जन्मानं गुन्हेगार ठरवलं गेल्यानं त्यांना समाजात कधीच सन्मानाची वागणूक मिळत नाही. तामीळ दलित साहित्य आणि नाटकात त्यांचे सामाजिक प्रश्न आधीच मांडण्यात आलेत. आता हे प्रश्न मांडण्यासाठी पा. रणजिथ, मारी सेल्वाराज, वेर्तीमारन, टी जे ग्नावेलसारख्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी सिनेमाचा मार्ग निवडला. जात, जमात, त्यांची सामाजिक ओळख आणि त्यांचा सवर्णांशी संघर्ष दाखवून ज्वलंत विषय मांडले. हे सर्व करताना तिकिट खिडकीवर गाजणारे अभिनेते घेतले, तर कधी नवख्या अभिनेत्यांनीही भाव मारुन नेला. अलिकडे आलेल्या कर्णन, असुरन, जय भीम ते रजनीकांतच्या काला सिनेमापर्यंत सर्व काही सिनेमॅटिक पोलरायजेशनच्या दिशेने जाणारे सिनेमे बनले.
तरीही पेबल्स यापेक्षा वेगळा आहे. सिनेमातल्या वेणू या लहान मुलाच्या पात्रासारखाच तो भारतीय समाजाचा मुकनायक आहे. रखरखत्या उन्हातल्या प्रवासात हा सिनेमा भारताच्या आत नक्की काय सुरु आहे याची जाणिव करुन देतो. हा आतला आणि बाहेरचा संघर्ष दाखवण्यात यशस्वी झाल्यानं पेबल्स आधीच्या सर्व सिनेमांवर भारी पडला आणि ऑस्कर स्पर्धेच्या पंगतीत बसला.

पेबल्स आणि पुढे बरंच काही
पेबल्स तामीळनाडूतल्या फिल्म इंडस्ट्रीत नवी वाट दाखवणारा परिवर्तनाचा वाटसरु बनलाय का, तर त्याचं उत्तर नाही असं असेल. ही परिवर्तनाची कास अगदी एमजीआर आणि करुणानिधी यांनी पेरीयार यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम केलं तेव्हापासूनची आहे. करुणानिधी यांनी सामाजिक संघर्षातून सत्तेपर्यंत पोचण्याचा मार्ग निवडला. त्यांची साहित्य निर्मिती आणि त्यातूनच घातलेली भाषिक आणि सामाजिक एकिकरणाची सांगड यामुळं तामीळनाडूला आणि तिथल्या सिनेमाच्या इंडस्ट्रीला बरंच काही दिलं. तिथून आता पेबल्सपर्यंत येताना तामीळ सिनेमानं जो टप्पा पार केलाय तो कौतुक करण्यासारखा आहे. अलिकडच्या काळात या एकाच राज्यातून ज्या पध्दतीचे सिनेमे पुढे आलेत. त्यानं तिथल्या सामाजिक चौकडीत सर्व काही ठिकठाक चाललेलं नाही हे अगदी स्पष्ट जाणवतंय. आता ओटीटी आणि इतर माध्यमांमुळं देशभरात हे सिनेमे मत आणि चर्चा घडवण्यात यशस्वी झालेत, हे मान्य करायला हरकत नसावी.

Web Title: The authenticity of the 'Pebbles' that went to the Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.