भान समाजमाध्यमाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 06:56 PM2018-09-26T18:56:18+5:302018-09-26T18:57:46+5:30
नेटयुक्त मोबाईल ही युवावर्गाची मिरासदारी, हे अशा मंडळीमध्ये सर्वमान्य सूत्र तयार झालं होतं. मात्र, या वयात तुम्ही हे हाताळणार याचं कौतुक करणारेही कमी नव्हते.
सद्या मी वयाची सत्तरी गाठली; पण ७ वर्षांपूर्वी अर्थात वयाच्या ६३ व्या वर्षी माझी फेसबुक आणि व्हाट्सअॅप या दोन्ही समाजमाध्यमांबद्दलची उत्सुकता प्रचंड होती. आपल्याला ते नीट जमेल का, अशी अनामिक भितीही मनात होती; पण मोबाईल हातात घेवून हा खटाटोप सुरू केला. काही जवळच्या मंडळींनी म्हणजे जे साधे नेटविरहित मोबाईल वापरत, त्यांनी माझी टवाळीसुद्धा केली. ‘आता हे काय पोट्ट्यासोट्ट्यांसारखं ?’ नेटयुक्त मोबाईल ही युवावर्गाची मिरासदारी, हे अशा मंडळीमध्ये सर्वमान्य सूत्र तयार झालं होतं. मात्र, या वयात तुम्ही हे हाताळणार याचं कौतुक करणारेही कमी नव्हते.
सुरूवातीला सारा गोंधळच गोंधळ. नेटचा वापर कसा करायचा, यात काही काळ गेला, मग हळूहळू सराव होत गेला. त्यावेळी फेसबुकपेक्षा वाट्सअप व्यक्त व्हायला बरं वाटायचं. वेगवेगळे ग्रुप, काही व्यक्तीगत अशी खूप सारी गर्दी भोवती होऊ लागली. आधीचा वेळ इतरांच्या पोस्ट वाचण्यातच जाऊ लागला. कमेन्ट्स करणे हा प्रकार मग कधी सरावाचा झाला, ते कळले नाही. सावधपणे मीही स्वतंत्रपणे व्यक्त होऊ लागलो. तेथे खूप काही मांडता आले. दु:ख याविषयीच्या अभंगांची एक मालिका मी दीर्घकाळ चालविली. त्यावर आजच्या आघाडीच्या समीक्षकांनी आपली मते विस्तृतपणे नोंदवली, मग मोर्चा वळवला तो फेसबुककडे.
माध्यमांची व्यापकता आणि संपर्क ही माध्यमे किती अफाट ताकदीची आहेत हे लक्षात यायला वेळ लागला नाही. फेसबुकवर एखादी पोस्ट टाकली रे टाकली की ती दुस?ऱ्याच क्षणी किती जणांपर्यंत पोचेल, याचा सुमार नाही. फ्रेंड्सची यादी कपील देव, धोनीच्या षट्कार-चौकारांसारखी वाढत जात होती. विशेषत: नव्या पिढीतील नव्याने लिहायला लागलेल्या युवक-युवतींशी संपर्क वाढला. नुक्कड ग्रुप ही फार मोठी उपलब्धी हे याचं उदाहरण देता येईल. अर्थात सगळे मला एक ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार म्हणून ओळखणारे होत, असे नाही. आजही कित्येक जण मला त्यासंदर्भात ओळखत नाहीत; पण जे कोणी ओळखत आहेत त्यांच्याकडून मिळणारा आदर, सन्मान सुखावून जातो.
जगातील बाकी सर्व देशांपेक्षा भारतात फेसबुक वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. असे असले तरी येथे जबाबदारीने, गांभीर्याने लिहिणारे फार कमी आहेत. उथळपणे व्यक्त होणाºयांची मांदियाळी अधिक आहे. विशेषत: नव्याने कविता लिहिणारांची आणि कविता लिहिली की लगेच ती फेसबुकवर टाकणारांची तर कीवच करावी, अशी एकूण स्थिती आहे. जशी कवितेची गोष्ट तशीच कवितासंग्रहांचीही. वाघिणीचं वीत बारा वर्षांचं असतं म्हणूनच तिचे बच्चे सशक्त जन्माला येतात. येथे तर वर्ष पूर्ण होण्याआधीच दुसरा संग्रह येतो. गावाकडे एखाद्या बाईला लेकरांमागून लेकरं होत असत (ही कुटुंब नियोजनापुर्वीची) तेव्हा अशा बाईला ‘थानगाभणी’ असे संबोधून हिणवत. मी अलीकडे माझयाशी अधिक जवळीक असणाºया नवकवींना कविवर्य नारायण कुलकर्णी कवठेकर यांचं उदाहरण सांगतो. मात्र कित्येकांना हे नावही माहित नसतं. कवठेकरांचा पहिला कवितासंग्रह आल्यावर कितीतरी वर्षांनी दुसरा कवितासंग्रह आला. गेली ५०-५५ वर्षे ते सातत्याने दर्जा राखून कविता लेखन करीत आहेत, पण कविता संग्रहांची संख्या फक्त दोन.
फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्टचाही नुसता भडिमार सुरू आहे. अलीकडे अशीच एका युवतीची (!) रिक्वेस्ट डिलीट केल्यावर तिने पुन्हा रिक्वेस्ट पाठवली. मी तिला तिच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन विचारले, पुन्हा रिक्वेस्ट का पाठवली? तिने उलट मलाच विचारले, तुम्ही माझी पहिली रिक्वेस्ट का डिलीट केली? तिच्या वॉलवर सर्व फोटोच होते, असे मी तिला म्हटलं, तर तिने काय उत्तर द्यावं? ती म्हणाली, मी ही रिक्वेस्ट माझ्यासाठी नाही तर माझ्याा नवºयासाठी पाठवते आहे. कारण ते तुमचे फॅन आहेत. मला कौतुक वाटलं.
फेसबुकवर व्यक्त होणारे विशिष्ट विचारसरणीचे लोक-अवतीभवती थोडे काही खुट्टं झाले की लगेच शक्य असेल तर फोटोंसह ती गोष्ट फेसबुकवर अपलोड करतात. दररोज सामाजिक स्वास्थ्याला नख लावणाºया कित्येक गोष्टी घडत असतात. आत्महत्या, अपघात, खून, बलात्कार, विनयभंग, जाळपोळ, मारामाºया, चोºया, फसवणूक, गुन्हेगारी, घातपात, ब्लॅकमेलिंग, रोगराई, भाववाढ, महागाई, कुपोषण, बेरोजगारी,आंदोलने, मोर्चे, तोडफोड, सण-उत्सवामागील विकृती, अराजकता, नक्षलवादी कारवाया, धार्मिक आणि जातीयवादी संघर्ष इत्यादी इत्यादी...
यातल्या काही बाबींवर घमासान, तुंबळ, हातघाईवर येत चर्चा होते. त्यातून खुन्नस निर्माण होऊन खुनाच्या धमक्या देणे, क्वचित त्या अंमलात आणणे हेही घडते. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी हे कायम तापत राहणारे विषय. अलीकडे धार्मिक कट्टरता, त्यातून भयानक साथीच्या रोगासारखी फोफावत, पसरत जाणारी दहशत, त्यामागचे राजकारण, त्याची आपापल्या परीने उपयुक्त-अनुपयुक्तता, आक्रमक स्वरूपाच्या धार्मिक संघटनांचे जनसामान्याला धडकी भरवणारे कुटील, विध्वंसक उद्योग वगैरे वगैरे... आणि हे सगळं फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर हिरिरीने व्यक्त होणारे लोक आणि त्यांचे तेवढेच आक्रमक विरोधक. सामाजिक सहिष्णुता, सामाजिक ऐक्यभाव, सामाजिक सहानुभाव यांचं काय होईल याची धास्ती तटस्थपणे या सगळ्या गदारोळाकडे पाहणाराला वाटणे स्वाभाविक आहे.
अशावेळी माझे फेसबुकीय वर्तन- मी गेली पंचेचाळीस वर्षे कथा, कादंबरी, कविता, प्रासंगिक लेख अशा स्वरूपाचे लेखन करतो. माझया कथा, कादंबºया महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांत अभ्यासक्रमाला होत्या, आहेत. मी मुळात ग्रामीण भागातून आलेला असल्याने शोषणाची ओळख डोळे उघडले तेव्हापासून होत आलेली. कुटुंब, गाव, गावकुस यातील शोषण पातळ्यांचे कडवट घोट नित्यश: पचवलेले. शेती, तिच्यातील कष्ट, आडमाप खर्च, लहरी निसर्ग, तुटपुंजे उत्पन्न, खाऊ का गिळू यासाठी सदैव सज्ज होऊन बसलेली बाजारव्यवस्था, कास्तकाराबद्दलचे सरकारी उदासीन धोरण, गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा, यासह कर्जबाजारीपण, त्यातून उद्भवणाºया कास्तकारांच्या आत्महत्यांची न संपणारी मालिका... हे आणि असले गावपातळीवरचे विषय हाताळत कथा, कविता, कादंबºया, लेख असे लेखन करणारा मी समाजमाध्यमांवर तेवढ्याच संयमाने व्यक्त होतो. खरं म्हणजे टोकाची आक्रमकता, असहिष्णुता, अराजकता वगैरे हा माझा स्थायीभाव नाही. फेसबुकवरील माझ्या पोस्ट श्यामळू असतात. त्या वाचून मुंगीलाही मुंग्या येणार नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की, फेसबुकवरच्या एकेरी, भडक, विघातक पोस्ट्स वाचून मला काहीच वाटत नसेल. मी पूर्णरूपात माणूस आहे. म्हणजे लैंगिकता वा तत्सम पोस्ट टाळण्याचे मला काही कारण नाही. जी कोणती पोस्ट (ज्या मला वाचाव्याशा वाटतात) मी वाचतो, ती वाचल्यावर जी काही पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते ती माझ्या मनात निर्माण होतेच होते. त्यातून त्या पोस्टच्या स्वरूपानुसार माझ्या मनात हवे ते भाव निर्माण होतात. आनंद, दु:ख, उद्वेग, वैफल्य, क्रोध, कीव, आश्चर्य, मद, क्वचित मत्सरही. त्याक्षणी माझी चित्तवृत्ती काहीशी अस्थिर बनते. त्यावेळी मी माझा आतल्या आत शोध घेतो. तो पूर्ण होईल तेव्हा त्यातून बाहेर पडतो. मन स्थिर झाल्यावर मी अमूक एक पोस्टबद्दल व्यक्त व्हायचं का, झालं तर ते कशा पद्धतीने याचा विचार करतो आणि व्यक्तही होतो. अर्थातच त्यात जोशपूर्ण असं काही नसतं. त्यामुळे त्यातल्या त्यात काही आक्रमक विषयांवर माझी मते ही माझ्यापुरतीच मर्यादित असतात. ज्यामुळे समाजमाध्यमांवर कोणाच्या भावना दुखावण्याचा कधी प्रश्नच येत नाही. अनेकांना मी अशा बाबतीत न्यूट्रल वाटत असणे शक्य आहे. अर्थात त्याला माझा इलाज नाही.
- बाबाराव मुसळे
जुनी आययूडीपी कॉलनी, वाशिम
(लेखक प्रख्यात साहित्यीक आहेत)