मंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:03+5:302019-12-01T06:05:06+5:30
धनंजय परांजपे ऊर्फ मंबीराम. प्रसिद्ध चित्रकार. अपघातानंच त्यांच्याशी ओळख झाली आणि नंतर दोस्ती. मंबीराम एकदम कलंदर आयुष्य जगताहेत. चित्रकार व्हायचं होतं; पण आईच्या आग्रहाखातर इंजिनिअर झाले. विद्यापीठात पहिले आले. अर्थशास्रात रस असल्यानं अमेरिकेत जाऊन डॉक्टरेट घेतली. गोल्ड मेडल मिळवलं. पण चित्रकलेची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. गाडी, घर सर्व विकून टाकलं. गोल्ड मेडल वितळवून टाकलं. गोल्डन गेट ब्रीजवरून डिग्रीचं सर्टिफिकेट सोडून दिलं. एका गाडीत चित्रकलेचं सामान भरून अमेरिका पालथी घातली. तिथेही मन रमेना. मग सगळं आवरून भारतात आले..
- सतीश पाकणीकर
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आम्ही मित्नांनी पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊनही एक वर्ष उलटले होते. पण तरीही आमच्या स.प. महाविद्यालयाची आमची ओढ काही कमी झाली नव्हती. मधूनच लहर आली की कॉलेजमधील आमच्या डिपार्टमेंटमधील सगळ्यांना भेटण्यास, प्रशस्त अशा ग्राउण्डवरील जिमखान्यावर, गेटसमोरच्या उदय विहारमध्ये, कॉर्नरच्या चहावाल्या नागनाथ भुवनमध्ये, तर कधी होस्टेलवर चक्कर होत असे. विद्यापीठातील वातावरणाने दिलेली जबाबदारीची जाणीवपण त्याबरोबरच कॉलेजचे मोरपंखी दिवस संपल्याची रुखरुख अशा मिर्श भावनांचा कल्लोळ त्यावेळी मनांत फेर धरत असे. त्यातही होस्टेलवर गेलो की वेळ ‘रॉकेटवेगाने’ निघून जात असे. याला कारणं होती दोन. एक म्हणजे तेथे या ना त्या कारणाने राहात असलेले काही मित्न आणि दुसरं म्हणजे आम्हाला ‘थिअरॉटिकल फिजिक्स’ शिकवणारे, होस्टेलवरच राहणारे, मित्नासारखे वागणारे, तरुण असे डी.पी. मेहेंदळे सर. त्यांना त्या काळात ‘प्रिन्स’ या टोपणनावाने ओळखत. त्यांच्या रूमवर पदार्थविज्ञान आणि गणित अशा दोन्ही विषयांवर चर्चा आणि गप्पा होत राहत.
असेच एकदा दुपारी मी व माझा जिवलग मित्न संदीप होले, मेहेंदळेसरांच्या रूमवर गेलो. त्यांच्या खोलीत दारातून आत जाताच समोरच्या भिंतीला एक खिडकी होती. एक व्यक्ती मांडी घालून बसू शकेल अशी. तेथून मागचे झाडांच्या गर्दीत वेढलेले एस.पी.चे ग्राउण्ड दिसे व त्याच्या मागे थेट पर्वतीचे दर्शन होत असे. बसण्यास ती जागा आम्हाला खूपच आवडे. पण आज एक व्यक्ती तिथे बसलेली होती. पुस्तक वाचनात गढून गेलेली. लक्षात येतील अशा जाड मिशा, डोक्यावर कसेही वाढलेले केस, लोकरीची टोपी, अंगात मळके म्हणता येतील असे कपडे, गळ्यात घातलेली तुळशीच्या बारीक मण्यांची डबल माळ. आमच्या खोलीत येण्याची दखलही त्या व्यक्तीने घेतली नाही. आमच्या सरांशी गप्पा सुरू झाल्या. काही वेळ गेला. त्या व्यक्तीने पुस्तक मिटून खाली ठेवले. त्यांनी आमच्याकडे पाहिले. मेहेंदळे सरांनी त्यांची ओळख करून दिली, ‘हे माझे मित्न मंबीराम. हे मोठे चित्नकार आहेत.’
चित्नकला हा माझा आवडीचा विषय. माझी उत्सुकता वाढली. पण पुन्हा पुस्तक घेऊन मंबीराम ते वाचू लागले. नंतर मेहेंदळेसर व संदीप हे गणितातल्या ‘टोपोलॉजी’ या विषयावर बोलू लागले. टोपोलॉजीच्या उल्लेखाने मंबीराम यांनी त्यांच्या वाचनातून नजर काढली आणि ते त्या दोघांकडे पाहून म्हणाले, ‘‘टोपोलॉजीवर जॉन केलींचे फार अप्रतिम पुस्तक आहे. तुम्ही ते वाचले आहे का?’’ त्यांच्या या वाक्यावर मी चकितच झालो. नुकतीच त्यांची ओळख एक चित्नकार म्हणून झाली होती. एक चित्नकार कशाला जाईल गणिताचे पुस्तक वाचायला असा भाबडा प्रश्न माझ्या मनात आला. मनकवड्या संदीपने त्यांना प्रश्न केला की, ‘‘तुम्हाला कसे काय ते पुस्तक माहीत?’’ त्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तराने आम्ही फक्त चाटच पडू शकत होतो. मंबीराम आत्यंतिक शांतपणे म्हणाले, ‘‘मी बर्कले विद्यापीठात असताना माझा ‘मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स’ हा विषय होता. त्यावेळी मी केलींकडे टोपोलॉजी शिकलोय.’’
आमच्या चेहर्यावरच्या चकित भावामुळे मग मेहेंदळेसरांनी परत त्यांची ओळख करून दिली की, ‘‘यांचं मूळ नाव धनंजय परांजपे. मंबीराम हे त्यांचे टोपण नाव. ते इंजिनिअर आहेत. ते विद्यापीठात पहिले आले होते. मग त्यांनी अमेरिकेत जाऊन इकॉनॉमिक्स या आवडीच्या विषयात डॉक्टरेट केली. त्यावेळी त्यांना रेगन सरकारचे गोल्ड मेडल मिळाले होते. पण शाळेपासून त्यांना चित्नकार व्हायचे होते. त्यामुळे आता ते एक चित्नकार आहेत.’’
सरांच्या प्रत्येक शब्दागणिक आमच्या चेहर्यावरील चकित भाव जास्तच दृग्गोचर होत गेला. हे सर्व वर्णन खूपच उत्सुकता वाढवणारं होतं. ही उत्सुकता आमच्या चेहर्यावर दिसली असणारच. मी त्यांना म्हणालो, ‘‘इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स आणि चित्नकला हे खूपच वेगवेगळे प्रांत आहेत. हे सगळं कसं जमवलं तुम्ही?’’ माझ्या या प्रश्नावर मंबीरामांनी डोळ्यावरचा जाडा चष्मा काढला. विस्कटलेल्या केसांमधून हात फिरवला आणि म्हणाले, ‘‘चित्नकला मला लहानपणापासूनच आवडीची होती. मला चित्नकारच व्हायचे होते. वडिलांचा त्याला नकार नव्हता. पण आईचा हट्ट होता की, मी इंजिनिअर व्हावे. मी झालो. मला अर्थशास्रात रस होता. मग पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेलो. पी.जी.साठी मला एक कोर्स घ्यायचा होता. मी विषय घेतला मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स. डॉक्टरेट मिळाली. काही काळ नोकरी केली. भरपूर पैसे मिळायचे. पण मजा नव्हती. माझी मूळ आवड मला हाका मारत होती. एकदा ठरवले की बस्स. आता यापुढे हे बंद. आता फक्त चित्न काढायची. मी माझ्याजवळच्या सर्व किमती वस्तू, गाडी, घर सर्व विकून टाकले. मला रोनाल्ड रेगन यांच्या हस्ते गोल्ड मेडल व डिग्री मिळाली होती. मी ते मेडल वितळवून टाकलं. गोल्डन गेट ब्रीजवर वारं खूप भन्नाट वाहतं. त्यावरून माझं डिग्रीचं सर्टिफिकेट मी सोडून दिलं. असं लपक-छपक करत गेलं ते. खूप हलकं हलकं वाटलं मला तेव्हा. मग मी खूप सारं साहित्य आणलं पेंटिंग करण्यासाठी. मोठं इझल आणलं. एक मोठी स्टेशन वॅगन घेतली. त्यात सारं समान कोंबून निघालो फिरत. आख्खी अमेरिका पालथी घातली. वेगवेगळ्या गावात चित्नं काढायची. ती तेथेच विकून टाकायची. त्या पैशात पुढचा प्रवास. परत चित्न. असा मस्त क्र म सुरू झाला. माझ्याबरोबर माझी एक मैत्नीणपण फिरत असे. आम्ही दोघेही चित्नं काढायचो. ती नंतर हॉलिवूडमधील एक अभिनेत्नी बनली. नंतर माझं तेथेही मन रमेना. मग सगळं आवरून मी भारतात आलो.’’
- हे सगळं म्हणजे एखाद्या सिनेमात सहज खपून जाईल असं होतं. आणि सांगताना त्यांचा कणभरही, कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नव्हता. आम्ही सर्द झालो होतो. मग मी त्यांना विचारले की, ‘‘ चित्नकार म्हणून तुम्ही मंबीराम हे नाव घेतलं का?’’ त्यांनी सांगितलं, ‘‘अमेरिकेत लोकांना माझं धनंजय परांजपे हे नाव उच्चारायला अवघड जात असे. कुठून आलास? याच्यावरचे उत्तर असे की मुंबईहून. कारण मुंबई माहीत असे सर्वांना. मग बोलताना अपभ्रंश होत होत ते ‘मंबी’ असं म्हणत. मग मीच ठरवलं की आता आपलं नाव ‘मंबीराम’!’’ याचीपण आम्हाला गंमत वाटली. सगळंच अजब होतं या माणसाचं.
मी एम.एस्सी. करता करता फोटोग्राफीचा व्यवसायही करतो आहे हे ऐकल्यावर मंबीराम खूश झाले. मी त्यांना विचारले की, ‘‘मला तुमची चित्नं बघायला येता येईल का?’’ त्यांनी सहजच हो म्हटले आणि मला पत्ता सांगितला. मंडईतील ‘लाला लजपत राय’ या हॉटेलच्या वर. म्हणजे माझ्या घरापासून फक्त शंभर मीटर अंतरावर. हे त्यांना कळल्यावर म्हणाले - ‘‘अरे, म्हणजे आपण गल्लीकर आहोत.’’ माझं मंबीराम यांच्या स्टुडिओवर जाणं-येणं वाढलं. अहो ‘मंबीराम’चं ए ‘मंबी’मध्ये रूपांतर कधी झालं हे माझं मलाही कळलं नाही. विद्यापीठात मी सायकलवर जातो कळल्यावर त्यांनी मला त्याची व्हेस्पा स्कूटर दिली. पण ती स्कूटरही त्याच्यासारखीच लहरी. त्याशिवाय खूप पेट्रोल पिणारी निघाल्यामुळे काहीच दिवसात मी ती परत त्याच्या दारात नेऊन लावली.
डिसेंबर महिन्याची कडाक्याची थंडी. सकाळी सकाळी 7 वाजता मंबी घरी आला. मी झोपेतच होतो. त्यानं मला उठवलं आणि म्हणाला, ‘‘झोपलास काय? उठ, आपल्याला पी.टी. उषाला भेटायला जायचंय.’’ मला काहीच बोध होईना. तो म्हणाला - ‘‘तू लवकर आवरून तयार हो. मी अध्र्या तासात परत येतो. मग आपण निघू.’’ माझ्याजवळ पर्याय नव्हता. पावणेआठला मी आणि मंबीने माझ्या ल्युना या महान वाहनावरून नेहरू स्टेडियम गाठले. त्याच्या बखोटीला एक फोल्डर होते. नेहरू स्टेडियमवर सर्वत्न सामसूम होती. तिथल्या एका माणसाला विचारल्यावर त्याने सांगितले की, पी.टी. उषा स्टेशनजवळच्या हॉटेल अमीरमध्ये उतरली आहे. दरम्यान, मी मंबीला नक्की कारण काय असे विचारले. त्याने उत्तर दिले की - ‘‘अरे मला काल कळले की, आज मॅरेथॉनच्या उद्घाटनाला पी.टी. उषा येणार आहे. म्हणून रात्नी जागून मी तिचे चित्न काढले आहे. ते तिला दाखवायचे आहे.’’ मंबीच्या मनात ते आल्यावर त्याला चैन पडणार का? आमची वरात स्टेडियमवरून स्टेशनच्या दिशेनं निघाली. सुमारे अध्र्या तासात आम्ही हॉटेल अमीरच्या दारात होतो. आम्ही हॉटेलच्या पायर्या चढत असतानाच समोरील काउण्टरवरील दोन कन्यांनी आमच्याकडे अशा काही नजरेनं पाहिले की, मी ती नजर कधी विसरूच शकणार नाही. ‘न जाने कहाँ कहाँ से आते है’ असे म्हणणारी ती नजर दुर्लक्षित करीत आम्ही काउण्टरपाशी पोहोचलो. जाताना मंबी मला हळूच म्हणाला - ‘‘त्या दोघींची मजा बघ आता तू.’’ त्यातील एका कन्येने मंबीकडे पाहत तुच्छतेनं प्रश्न केला, ‘‘येस?’’ मंबीने एकदम अमेरिकन अँक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. मंबीच्या गबाळ्या ड्रेसकडे पाहून याच्या तोंडून असे काही इंग्रजी ऐकायला मिळेल याची जराही कल्पना नसलेली ती कन्या एकदम भांबावून गेली. मंबीने तिला सांगितले की, मला पी.टी. उषाला भेटायचे आहे. त्याने तेथील एका कागदावर त्याचे नाव लिहून त्या कन्येजवळ दिला. ती म्हणत होती की, पी.टी. उषा यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. त्या भेटू शकणार नाहीत. मंबीने तिला जवळ जवळ दमच भरला. ती मुलगी मंबीची चिठ्ठी घेऊन आत गेली. आम्ही तेथील सोफ्यावर बसलो. काही सेकंदात बदललेला चेहरा घेऊन ती कन्या परत बाहेर आली. आता ती विनयाने मंबीला म्हणाली, ‘‘त्यांनी तुम्हाला पाच मिनिटे बसायला सांगितले आहे. त्या येतीलच. तुमच्यासाठी काय पाठवू चहा की कॉफी?’’ मंबीच्या चिठ्ठीने जादू केली होती.
पाच-सात मिनिटांत काही पत्नकारांबरोबरच पी.टी. उषा बाहेर आली. अर्जुन पदक विजेती, भारताची सुवर्णकन्या, क्विन ऑफ ट्रॅक - श्यामलवर्णी पी.टी. उषा आमच्या समोर उभी होती. मंबीने सोबत आणलेल्या फोल्डरमधून तिचे चित्न बाहेर काढले आणि तिच्या समोर धरले. त्या चित्नातली गतिमानता पाहून सगळेच खूश झाले. मंबी तिला म्हणाला - ‘‘मी तुला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहतो आहे. तू जितकी आहेस त्याच्यापेक्षा मी तुला जास्त काळी दाखवले आहे त्याबद्दल क्षमस्व !’’ पी.टी. उषा दिलखुलास हसली. तिने मंबीला धन्यवाद दिले. आम्ही तेथून बाहेर पडलो.
मंबी एकदम खूश होता. स्टेशनसमोरील इराण्याच्या हॉटेलात आम्ही चहा प्यायला गेलो. मंबी म्हणाला - ‘‘मी आज एकदम खूश आहे.’’
मी विचारले, ‘‘तिला चित्न आवडले म्हणून का?’’ तर म्हणाला, ‘‘नाही रे, तू आज बातमी नाही वाचलीस का? तिने सांगितले आहे की, ती अजून तीन-चार वर्षे लग्न करणार नाहीये. म्हणजे मला तीन-चार वर्षे तरी प्रेमभंगाचे दु:ख होणार नाहीये.’’ मी कपाळाला हात लावण्याशिवाय काय वेगळे करणार?
नंतर नंतर मंबी कृष्णभक्तीमध्ये बुडून गेला. त्याच्या चित्नाचे विषयही तसे बदलू लागले. त्याच्या स्टुडिओत बरेच दिवस तो एक चित्न करीत होता. त्या चित्नात सिनेमातील नट्यांचे चेहरे त्यानं वापरले होते. चित्नाचे नाव होते ‘फॉरेस्ट वुमन व्हिजिट कृष्णा’. पण त्या चित्नातील बारकावे, त्या महिलांच्या चेहर्यावरील भाव कमालीच्या कुशलतेने रंगवले होते हे मात्न नक्की. या प्रकारची त्याची चित्नं पुढे खूपच नावाजली गेली. त्यांच्यावर पुस्तके निघाली. असा हा मंबी. नंतर मंबी अचानक पुण्यातून गायब झाला.
नुकतेच मला असे कळले की, तो सध्या अलिबागला त्याच्या र्जमन पत्नीबरोबर राहतो. इतक्या वर्षांनंतर भेटल्यावर तो आता मला ओळखेल का नाही ही शंकाच आहे. पण त्यानं सिअँटल येथील माउण्ट ऑलिम्पिक नॅशनल पार्कमध्ये बसून 1970 साली चितारलेलं त्याच्या सहीचं एक अप्रतिम असं मूळ चित्न माझ्या संग्रहात आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवाच आहे.
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)