स्वत:ची सर्व संपत्ती दान करणारे अझीम प्रेमजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:47 PM2019-06-10T12:47:22+5:302019-06-10T12:48:33+5:30
विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष व प्रबंध संचालक अझीम प्रेमजी ३० जुलै २०१९ रोजी व्यवसायातून निवृत्त होत असून आपला वारस मुलगा रिषद प्रेमजी असेल अशी घोषणा अझीम प्रेमजी यांनी केली.
सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष व प्रबंध संचालक अझीम प्रेमजी ३० जुलै २०१९ रोजी व्यवसायातून निवृत्त होत असून आपला वारस मुलगा रिषद प्रेमजी असेल अशी घोषणा अझीम प्रेमजी यांनी केली.
अझीम प्रेमजी यांना ओळखणारी मंडळी, एखादा निर्णय घेण्यासाठी ते किती दीर्घवेळ घेतात याबद्दल तक्रार करीत असतात. परंतु आपल्या परिवाराचा सनफ्लॉवर खाद्य तेलाचा छोटेखानी व्यवसाय केवळ २१ व्या वर्षी खांद्यावर घेऊन तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातली एक बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी बनवण्यापर्यंत कसा वाढवला याबद्दल या मंडळांना अझीम प्रेमजींबद्दल नितांत आदर आहे. जवळपास ५७००० कोटींची उलाढाल असलेला विप्रो समूह (मूळ नाव वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस्) आज खाद्यतेले, सौंदर्य प्रसाधने, व्यक्तिगत उपयोगिता वस्तू व कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअर अशा विविध क्षेत्रात एक आघाडीचा समूह समजला जातो.
व्यावसायिक निर्णय घेताना अझीम प्रेमजी अतिशय खोलात जाऊन बारीक सारीक बाबींची पडताळणी करतात व निर्णय चुकू नये याची अत्याधिक खबरदारी बाळगतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला वेळ लागत असला तरी प्रेमजींचा निर्णय कधीच चुकत नाही हे आजवर हजारवेळा सिद्ध झाले आहे. विप्रोचा छोटा व्यवसाय एका वटवृक्षात कसा परिवर्तीत झाला त्यासाठी अझीम प्रेमजी यांची ही अचूक निर्णय क्षमता जबाबदार आहे. त्यामुळेच २१.७० अब्ज डॉलर्स संपत्ती मूल्य असलेले अझीम प्रेमजी, मुकेश अंबानीनंतर (संपत्ती मूल्य ४३.६० अब्ज डॉलर्स) भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
अझीम प्रेमजींचे कुटुंबीय मूळचे खान्देशातील अमळनेरचे. तिथे त्यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस् या नावाने सनफ्लॉवर खाद्यतेलाचा कारखाना टाकला होता व ७८७ या नावाने एक कपडे धुण्याचे साबणही हा उद्योग बनवत असे. १९६६ साली अझीम प्रेमजी अमेरिकेत स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकत असतानाच त्यांना वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली व शिक्षण अर्धवट सोडून ते भारतात परत आले त्यावेळी त्यांचे वय २१ वर्षाचे होते.
वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस् (विप्रो) त्यावेळी वनस्पती तूप व ७८७ साबण बनवत असे. हा व्यवसाय वाढवून अझीम प्रेमजींनी त्यात बेकरी प्रॉडक्टस्, पारंपरिक साबण, बेबी केअर प्रॉडक्टस्, सौंदर्य प्रसाधने यांची भर घालून व्यवसाय विस्तार केला.
१९८० साली संगणक युग येणार अशी चर्चा सुरू झाली त्यावेळी अझीम प्रेमजी यांनी कॉम्प्युटरचे महत्त्व अचूक दूरदृष्टीने हेरले व त्या व्यवसायात प्रवेश करायचे ठरवले. त्याचवेळी आयबीएम ही बलाढ्य संगणक कंपनी भारत सोडून अमेरिकेत गेली होती. त्याचा फायदा उठवत अझीम प्रेमजींनी ‘विप्रो’ डेस्कटॉप कॉम्प्युटर्स भारतात सादर केले. लवकरच त्यांनी अमेरिकेच्या सेंटनिल कॉम्प्युटर कॉर्पोरेशन बरोबर करार केला व उन्नत प्रकारचे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरही बनवायला सुरुवात केली. आज विप्रो ही जगातली बलाढ्य कॉम्प्युटर कंपनी म्हणून ओळखली जाते. साबण ते सॉफ्टवेअर किंग अशी ही अझीम प्रेमजींची यशोगाथा आहे.
अझीम प्रेमजींचा विवाह यास्मीन यांचेशी झाला असून त्यांना रिषद व तारीक ही दोन मुले आहेत. रिषद सध्या विप्रोच्या माहिती तंत्रज्ञान विभागात चीफ स्ट्रॅटेजी आॅफिसर म्हणून काम करतो.
अझीम प्रेमजी यांच्या या कामगिरीसाठी त्यांना बिझनेस वीकने ग्रेटेस्ट एंटरप्रेन्युअर हा पुरस्कार दिला आहे तर २००० साली मणिपाल विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगने त्यांना लक्ष्य बिझनेस व्हिजनरी तर कनेक्टिकट विद्यापीठ व म्हैसूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिल्या आहेत. भारत सरकारने त्यांना २००५ मध्ये पद्मभूषण व २०११ मध्ये पद्मविभूषण सन्मान बहाल केला आहे.
२००१ साली अझीम प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाऊंडेशनची स्थापना केली व त्यामार्फत ते समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. अझीम प्रेमजी फऊंडेशनने २०१० साली दोन अब्ज डॉलर्स (१४००० कोटी रुपये) खर्चून भारतातील शालेय शिक्षण व्यवस्था उन्नत करण्याचा प्रकल्प उभा केला आहे. आजवर अझीम प्रेमजी यांनी या फाऊंडेशनला २१ अब्ज डॉलर्स म्हणजे स्वत:ची सर्व संपत्ती दान केली असून निवृत्तीनंतर ते स्वत:ला समाजसेवेला वाहून घेणार आहेत.
वॉरेन बफे व बिल गेट्स यांना आदर्श मानणारे अझीम प्रेमजी म्हणतात, ‘‘ज्यांच्याजवळ सुदैवाने संपत्ती आहे तिचा सदुपयोग त्यांनी गरीब लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी केला पाहिजे यावर माझा ठाम विश्वास आहे’’. स्वत:च्या त्यागमय आयुष्याने अझीम प्रेमजींनी हे सिद्ध केले आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.