बाबा अमरनाथ
By admin | Published: February 6, 2016 02:38 PM2016-02-06T14:38:52+5:302016-02-06T14:38:52+5:30
माझा श्वास फुलला होता. शक्य तेवढी हवा छातीत भरून एकेक पाऊल पुढं टाकत मी हिमालयातल्या बर्फाळ वाटांनी पवित्र अमरनाथच्या दिशेनं निघालो होतो.
Next
>- सुधारक ओलवे
माझा श्वास फुलला होता.
शक्य तेवढी हवा छातीत भरून एकेक पाऊल पुढं टाकत मी हिमालयातल्या बर्फाळ वाटांनी पवित्र अमरनाथच्या दिशेनं निघालो होतो.
अंगात एकावर एक गरम कपडे चढवले होते तरी त्या बर्फाळ गारठलेल्या वा:यात मी कुडकुडत होतो. आपल्या कल्पनेपेक्षाही हिमालय कितीतरी मोठा आहे हे या वाटांवर चालताना जाणवतं.
चहूबाजूंनी उत्तुंग नेत्रसुखद पर्वत, खोल खोल जाणा:या द:या आणि निसर्गानं स्वत:ला मनमुक्त उधळून दिलेलं खोरं. बर्फाळ खटय़ाळ वारा सुसाट येत आपल्या गालांवर सपासप फटके मारत पळत सुटतो. अशा वातावरणात सहा लाख लोकांमधला एक होत मी ही वाट चालत होतो. काही पाऊलं माझ्या पुढे चालत होती, काही माझ्या मागे. पण सगळ्यांची मंझिल एक. मनात दिव्यदर्शनाची अभिलाषा आणि सोबत नितांत सुंदर आणि महाकाय निसर्ग.
देशाच्या कानाकोप:यातून दरवर्षी माणसं ही वाट चालतात. काही हजार वर्षाची परंपरा म्हणून, सांस्कृतिक, धार्मिक रीत म्हणून आणि श्रद्धा म्हणूनही!
त्याच लाखो पावलांच्या साथीनं मीही अमरनाथला निघालो.
जगातली नसेलही, पण भारतातली ही सगळ्यात अवघड आणि आव्हानात्मक धार्मिक यात्र. पाच दिवसांचा अत्यंत कठीण पर्वतवाटांचा ट्रेक. समुद्रसपाटीपासून 12 हजार फूट उंचीवरच्या गारठलेल्या प्रदेशातल्या थंड वाटांवरची गोठवून टाकणारी ही चाल. अशा चढणीच्या वाटेवर चालताना धाप लागते, कारण अवतीभोवतीच्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. एकीकडे चढ चढायचा, दुसरीकडे फुफ्फुसांना पूर्ण शक्तीनं कामाला लावत श्वास घ्यायचा आणि दुसरीकडे फोटो काढायचे हे सोपं काम नाही. आपलाच श्वास कमी पडायला लागतो. आणि तो कसा कमी पडतो याचा अनुभवही मला याच वाटेवर आला. आयुष्यात पहिल्यांदा मला ऑक्सिजनचा मास्क लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास करावा लागला, तेही आर्मीच्या मदतीनं. या वाटांवर आर्मीनं लावलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये!
या यात्रेच्या वाटेवर नागर संस्कृतीच्या खाणाखुणा नाहीत. सगळीकडे तात्पुरते उभारलेले तंबू, लोकांच्या निवा:यासाठी घातलेले मंडप आणि त्या यात्रेनिमित्तानं या तात्पुरत्या तंबूंची उभी राहिलेली तात्पुरती वस्ती. या भागात जुलै ते सप्टेंबर या काळात मोसम आल्हाददायक असतो, त्याच काळात ही यात्र दरवर्षी असते.
अतीव श्रद्धेनं लाखो लोक ही पराकोटीची अवघड वाट दरवर्षी चालतात. बाबा अमरनाथ बर्फानीचं दर्शन घेण्यासाठी जिवाचे पाय करून ही सश्रद्ध गर्दी चालत राहते. बाबा अमरनाथ बर्फानीचं दर्शन घेण्यासाठी आतूर झालेली ही माणसं, काही नवस फेडण्यासाठी येतात, काही नवस बोलण्यासाठी. कुणाला स्वत:साठी, आपल्या माणसांसाठी उत्तम आरोग्य, दैवीकृपा हवी असते. कुणाला चांगल्या पीकपाण्याची आस असते. मात्र या सा:यापलीकडे सगळ्यांना एक दैवी अनुभूती घ्यायची असते. हजारो वर्षे जुना असलेला अमरनाथ गुहेमधला हा बर्फानी बाबा. भोळ्या शिवाचं एक वेगळं रूप. गुहेच्या तळाशी तयार झालेला चुनखडीचा थर आणि त्यावर तयार होणारी ही बर्फाची पिंडी. ते अतिव सुंदर रूप पाहणं हा एक नितांत वेगळा अनुभव असतो.
म्हणून तर लोक म्हणतात की, असं वाटलं म्हणून नाही जाता येत अमरनाथ यात्रेला. त्यासाठी बाबा अमरनाथाची दैवी हाक यायला हवी, त्यानं आपल्याला बोलवायला हवं. त्यानं बोलावलं तर ही खडतर वाट सोपी होते आणि दर्शन होतंच.
माझा या वाटेवरचा प्रवास निसर्गाच्या सुंदर, मोहक आणि विराट रूपानं भारलेला होता. बर्फाच्छादित शिखरांची सूर्यप्रकाशात चमचमणारी शिखरं आणि हिमालयाचं महाकाय विराट दर्शन. थक्क होऊन आपण फक्त पाहत राहतो ते निसर्गाचं रूप आणि हिमालयाच्या नजर खिळवून ठेवणा:या रांगा. ते सारं पाहून वाटतं निसर्गाच्या या उत्तुंग विराट पसा:यात माणूस म्हणजे केवढासा क्षुद्र कण आहे. या जाणिवेनंच त्या हिमालयासमोर आपण नतमस्तक होतो.
आणि या भावनेनंच मला निसर्गाच्याच त्या भव्य रूपात माझी अलौकिक दिव्य अनुभूती लाभली!