स्वाभिमानाच्या प्रात्पीसाठी बाबासाहेबांचे धर्मांंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 07:45 AM2020-10-25T07:45:12+5:302020-10-25T07:50:02+5:30

बाबासाहेबांचे धर्मांतर हा हिंदू  धर्मावर सूड नव्हता.  ते राष्ट्रांतरही नव्हते.  धर्मांंतर आर्थिक  लाभासाठी नव्हते.  सक्तीचेही नव्हते,  तर ते स्वाभिमानाच्या  प्राप्तीसाठी होते.

Babasaheb's conversion for the sake of self-respect! | स्वाभिमानाच्या प्रात्पीसाठी बाबासाहेबांचे धर्मांंतर!

स्वाभिमानाच्या प्रात्पीसाठी बाबासाहेबांचे धर्मांंतर!

Next
ठळक मुद्देआज धम्मचक्र प्रवर्तन दिन. त्यानिमित्ताने विशेष लेख.

-बी. व्ही. जोंधळे

हिंदू धर्म रूढी-परंपरेने अस्पृश्य समाजाच्या हातापायांत ज्या गुलामगिरीच्या बेड्या ठोकल्या होत्या, त्या तोडून पूर्वास्पृश्य समाजास समता-स्वातंत्र्य-बंधुभाव नि माणुसकीचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  सत्याग्रही आंदोलने केली. हिंदू धर्मात राहून माणुसकी मिळवून घेणे अशक्य आहे, याची खात्री पटल्यावर बाबासाहेबांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
गत 63 वर्षांचा प्रवास पाहता धर्मांतरामुळे बौद्ध समाजात अस्मितेची जाणीव निर्माण होऊन त्याला एक स्वतंत्र ओळख मिळाली आहे, हे नाकारता येत नाही. बाबासाहेबांचे धर्मांतर हा हिंदू धर्मावर सूड नव्हता. ते राष्ट्रांतरही नव्हते. धर्मांतर आर्थिक लाभासाठी नव्हते. सक्तीचेही नव्हते, तर ते स्वाभिमानाच्या प्राप्तीसाठी होते. बाबासाहेबांनी म्हटले होते, ‘धर्मांतराचा विचार सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक दृष्टीने जसा केला पाहिजे, तसाच तो तात्त्विक अंगानेही केला पाहिजे.’
बाबासाहेबांवर सुरुवातीपासून बौद्ध धम्माचा प्रभाव होता. बुद्धाने सामाजिक समतेचा 
पुरस्कार करताना कर्मकांडास दिलेला नकार, चातुर्वण्र्य व जातिव्यवस्थेस केलेला 
विरोध बाबासाहेबांना महत्त्वाचा वाटला.  
कोलंबो येथील ‘अखिल दलित फेडरेनशनच्या सदस्यांसमोर भाषण करताना त्यांनी म्हटले होते. ‘मी सर्व धर्मांचा अभ्यास केला असून, शेवटी या निर्णयावर आलो आहे की, ‘बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांसाठी दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही, जर तुम्हास समता हवी असेल, तर बौद्ध धर्म स्वीकार हाच मार्ग आहे.
बाबासाहेबांना तथागत बुद्ध हे पहिले समाजसुधारक वाटत होते. बुद्धाने यज्ञसंस्थेवर चढविलेला हल्ला कर्मकांडास केलेला  विरोध, भिक्खू संघात शूद्रातिशूद्रांना व  स्रियांना दिलेले बरोबरीचे स्थान बाबासाहेबांना मानवी मूल्यांचे निदर्शक वाटले.  बाबासाहेबांचा बुद्ध धम्म स्वीकार हा माणुसकीच्या प्राप्तीसाठी व दडपलेल्या, खचलेल्या, 
पिचलेल्या अस्पृश्य वर्गात स्वाभिमानाचा वन्ही चेतविण्यासाठी होता. 

धर्मांतराच्या वेळी काही टीकाकारांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की, धर्मांतरामुळे दलितांचे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत काय? यासंदर्भात धर्मांतराच्या पूर्वसंध्येस नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत एका वार्ताहराने बाबासाहेबांना असा प्रश्न विचारला होता की, तुम्ही बौद्ध धम्म का स्वीकारीत आहात? या प्रश्नाचे उत्तर देताना बाबासाहेबांनी म्हटले होते, ‘हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला व तुमच्या पूर्वजांना का विचारत नाही? राखीव जागांचे फायदे मिळविण्यासाठी आम्ही काय कायम अस्पृश्यच राहावे की काय? आम्ही आमचे मनुष्यत्व मिळविण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करीत आहोत?’- बाबासाहेब- जे म्हणत होते ते खरेच आहे. त्यांचे धर्मांतर सामाजिक परिवर्तनासाठी होते नि आहे. 
बौद्धांनी धम्माच्या तत्त्वाप्रमाणे आचरण करावे; अन्यथा जग उद्या बौद्धांनी धम्म निंदाव्यंजक स्थितीला आणून ठेवला म्हणून आपणास  दोष देईल, असा इशाराही बाबासाहेबांनी 
दिला होता. या पार्श्वभूमीवर बौद्ध समाजाची जबाबदारी मोठी होती नि आहे. बौद्ध  भिक्खूंनी तळागाळातील-जातिव्यवस्थेचे  शिकार ठरलेल्या वर्गात धम्म रुजविण्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती. तात्पर्य, बौद्ध समाजाने आपण आपले आचरण धम्मानुसार ठेवत आहोत की, पुन्हा एकदा हिंदू रूढी-परंपरांकडे वळून कर्मकांडात रमत आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे वाटते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांंना मंगल कामना.

(लेखक आंबेडकरी चळवळीचे  अभ्यासक आहेत.)

 

 

 

Web Title: Babasaheb's conversion for the sake of self-respect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.