बाकरवडी आणि भाऊ
By Admin | Published: March 26, 2016 09:05 PM2016-03-26T21:05:27+5:302016-03-26T21:05:27+5:30
बंद गळ्याचा फुल पांढरा शर्ट, पांढरंशुभ्र धोतर, काळा कोट, काळी टोपी या वेशातले भाऊसाहेब चितळे केवळ महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातच नव्हे, तर जनप्रिय-संस्कृतीमध्येही अमर झाले आहेत. चितळ्यांच्या दुकानाचं शटर बंद झाल्यावर बाकरवडी घ्यायला आत घुसलेल्या रजनीकांतला त्यांनीच नव्हतं का बखोटं धरून बाहेर काढलं?
बंद गळ्याचा फुल पांढरा शर्ट, पांढरंशुभ्र धोतर, काळा कोट, काळी टोपी या वेशातले भाऊसाहेब चितळे केवळ महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासातच नव्हे, तर जनप्रिय-संस्कृतीमध्येही अमर झाले आहेत. चितळ्यांच्या दुकानाचं शटर बंद झाल्यावर बाकरवडी घ्यायला आत घुसलेल्या रजनीकांतला त्यांनीच नव्हतं का बखोटं धरून बाहेर काढलं? जागतिकीकरणाच्या आधी जगभर पोचलेल्या मोजक्या भारतीय नाममुद्रांपैकी एक त्यांनी घडवलेली! ही त्यांची कहाणी..
पराग पोतदार
पुण्यातल्या कुमठेकर रस्त्यावरून जाताना पेशवाईच्या थोडंसं पुढे उजव्या हाताला दोन-तीन मजली इमारत दिसते- ‘चितळे सदन’.
खूप भारी वाटावं असं तिथं काहीही नाही. इमारतीच्या तळमजल्यावर पाहाल तर तिथं चक्का तयार होत असतो. दोन-चार टेम्पो दाटीवाटीने उभे. तयार होणारा चक्का ‘गुणवत्तेची खात्री’ करून मगच टेम्पोत भरला जात असतो. अव्याहतपणे दोन-तीन मशीनवर चक्का बनवण्याचं काम सुरू असतं. दुस:या मजल्यावर हिरव्या रंगाचे गुंडाळलेले पडदे खालून दिसतात..
तिकडे बोट दाखवून एकजण सांगतो, ‘याच गॅलरीत उभे राहून भाऊसाहेब सूर्यनमस्कार घालायचे बरं का! शहाण्णव वर्षाचं वय होतं तरी अगदी काल-परवापर्यंत सकाळी चालायला जाणारे भाऊसाहेब रोज दिसत.’
‘हे कोप:यावरचं वंडर हेअर कटिंग सलून दिसतंय ना, भाऊसाहेब इथेच केस कापायला जायचे. श्रीमंती पायाशी लोळण घेत असली तरी साधेपण सुटलेलं नाही त्यांचं कधी.. इतकंच काय अजूनही सगळी मुलं साध्या दुचाकीवरूनच जातात दुकानात..’ - आणखी एकजण सांगतो. ‘अहो, त्यांच्या घरातल्या स्त्रिया पाहा, आजही हातात कापडी पिशवी घेतील आणि मंडईत जाऊन भाजी खरेदी करतील..’
- प्रत्येकाच्या नजरेतले हे ‘भाऊसाहेब’ अर्थात रघुनाथराव चितळे. आता त्यांच्या आठवणी तेवढ्या मागे.
हे सारे संदर्भ गोळा करीत ‘चितळे सदन’ वास्तूत प्रवेश केला. भाऊसाहेबांच्या वियोगाची छाया.! अद्याप घर सावरलेलं नाही हे जाणवत होतं. जवळची माणसं आस्थेनं, जिव्हाळ्यानं भेटायला येत होती.
हे चितळ्यांचं घर.
‘नसलेली’ एक गोष्ट प्रकर्षानं नजरेत भरेल अशी.. बडेजाव! कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबातील घरापेक्षाही साधं वाटावं असं घर. हॉलमध्ये फक्त टीव्ही आणि त्यावर लावलेले काही पुरस्कार.. भिंतीवर टोलचं ‘टिंग टाँग’ करणारं जुन्या जमान्यातलं घडय़ाळ.. हॉलमध्ये एक साधीशी चादर घातलेली कॉट, बसायला साध्याशा प्लॅस्टिकच्या खुच्र्या.. बाकी डामडौल, दिखावा, चमकधमक अजिबातच नाही. अस्मितेची खूण दाखवणारा पेशव्यांचा पुतळा तेवढा दिमाखदार!
- ही साधेपणातली श्रीमंती. भाऊसाहेब आणि राजाभाऊ चितळे यांच्या कष्टसाध्य आयुष्याचं सारच!
आधी राजाभाऊ गेले. आता भाऊसाहेब. अखंड कष्टातून, सचोटीचा कमालीचा ध्यास धरून आणि शिस्तीला सवय बनवून व्यवसायाला अहर्निश आकार देत राहिलेल्या एका पिढीचा हा अस्त!
सायकलवरून दुधाचा रतीब टाकणारे भाऊसाहेब आजही जुन्या पुण्याच्या आणि ज्येष्ठ पुणेकरांच्या स्मरणात आहेत..
भाऊंची बाकरवडी
96 च्या जानेवारीपासून ती हातातून नव्हे, मशीनमधून बाहेर पडू लागली.
बाकरवडी गुजरातची. भाऊसाहेब कुमारवयात सुरतेत होते. सत्तरीच्या दशकात त्यांनीच गुजरातेतून आचारी आणून बाकरवडीला मराठी अंगरखा चढवण्याची धडपड सुरू केली. किती चवींचे प्रयोग झाले. त्यातून फॉम्यरुला तयार झाला. आणि चोखंदळ पुणोकरांना तो आवडलाही.
सुरुवातीला जेमतेम 50-100 किलो बाकरवडी दिवसाकाठी बनायची. डेक्कन आणि सदाशिव इथल्या चोखंदळ पुणोकरांनी पसंतीची पावती दिल्यानंतर बघताबघता खप वाढला. कारागीर
वाढविले तरी मागणी-पुरवठय़ाचा मेळ बसेना. त्यातून ‘बाकरवडी संपली’ या पाटीवरून किस्से तयार होऊ लागले. पण हाती केलेल्या बाकरवडीचं दिवसाकाठी कमाल उत्पादन जेमतेम नऊशे किलोर्पयत गेलं. त्यातूनच सगळ्यांना मिळावी या हेतूनं बाकरवडीचं बहुचर्चित रेशनिंग सुरू झालं. हीच बाकरवडी चव न बदलता, दर्जाला मुरड न घालता मशीनवर तयार करता येईल काय? - हा प्रश्न या मंडळींना सतावत होता. त्यासाठी अव्याहत प्रयत्न सुरू होते. बाकरवडी बनते कशी याचे व्हिडीओ नेदरलँड्स आणि जर्मनीला पाठविले गेले. मग असं मशीन बनवून घेण्याची जबाबदारी राजाभाऊंचा मुलगा संजय आणि त्यांचा भिलवडीचा चुलतभाऊ अनंत या पुढच्या पिढीनं उचलली. त्यासाठी परदेशवारी झाली. जर्मनीतली ट्रायल फसली. पण प्रयत्न जारी होते. त्यातूनच संजय आणि o्रीकृष्ण चितळे पुन्हा हॉलंडला गेले आणि मशीन सिद्ध झालं. 1995 साली मशीन भारतात आलं आणि 96च्या जानेवारीपासून बाकरवडी मशीनमधून बाहेर पडू लागली. चितळे बाकरवडी कुठूनतरी बाहेरून बनवून घेतात, आउटसोर्सिग करतात असल्या वदंतांना पूर्णविराम मिळाला.
आतातर मशीनवरच्या या उत्पादनाचा व्हिडीओच चितळ्यांच्या दुकानात बघायला मिळतो. यथावकाश या यंत्रंची संख्या वाढली. नजीकच्या भविष्यात आणखीही वाढेल.
कुंकू, टेनिस आणि वामकुक्षी
पांढरा शर्ट, पांढरंशुभ्र धोतर आणि काळा कोट-टोपी.. काउंटरवर बसल्यावर चष्म्याच्या आडून रोखलेले डोळे अशा रूपातील भाऊसाहेबांची प्रतिमा माङया मनात कोरली गेलेली आहे. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने मी त्यांची मुलाखत घेतली होती. भाऊसाहेब दुकानात असले तरी फारसे कुणाशी बोलत नसत. मी मुलाखतीच्या निमित्ताने त्यांना सहज म्हटलं, की अहो, तुम्ही शिष्ट आहात असं वाटतं लोकांना; तर म्हणाले, हे पाहा, मी आपणहून कुणाशी बोलायला जात नाही. तो माझा स्वभावच नाही. दरवर्षी दिवाळीत सगळे लोक तुम्ही बनवलेले पदार्थ, फराळ आणि मिठाई घरी नेतात. तुम्ही घरी दिवाळीला आवडीने काय खाता? - असा जरा भोचक प्रश्न विचारला, तेव्हा भाऊसाहेब हसून म्हणाले होते, ‘असं पाहा, बासुंदी करपली तर नाही ना, श्रीखंड बिघडलं तर नाही ना आणि जिलबीत साखर जास्त तर झाली नाही ना हे पाहण्यासाठी मी प्रत्येक पदार्थाची चव दररोज घेत असतो. त्यामुळे दिवाळीला आम्ही त्यातला एकही पदार्थ घरी बनवत नाही. दिवाळीला आमच्याकडे साखरभात व पुरणाची पोळी असा साधा मेनू असतो.’
दुकानातल्या कामाव्यतिरिक्त तुमचा विरंगुळा काय? - असं विचारलं, तेव्हा ते म्हणाले होते, ‘कुठे हो? मला रोजच्या कामातून वेगळा वेळच मिळत नाही. मी शेवटचा चित्रपट पाहिला होता तो म्हणजे कुंकू. धंद्यापलीकडे आनंदाची जागा म्हणजे, टेनिस! तो खेळ खेळायला आवडतो.’
आमच्या या गप्पांच्या ओघात दुपारी 1 ते 4 दुकान बंद ठेवण्याचा विषय आलाच. मी त्यांना स्पष्टच विचारलं, की हा इतका अतिरेक का? - तर ते ताडकन म्हणाले होते, ‘आम्ही पहाटे चारला काम सुरू करतो. आम्हाला मध्ये आराम नको?’
- सुधीर गाडगीळ
पारी 1 ते 4 या वेळेत बंद असणा:या चितळ्यांच्या दुकानातून बाकरवडी आणून दाखवतोच असं म्हणत एक माणूस खटपट करत बंद होणा:या शटरखालून आत घुसला.
काही वेळाने भाऊसाहेब चितळ्यांनी त्याला कानाला धरून बाहेर काढला. कुणीतरी विचारलं, ‘काहो? कोण होता?’
भाऊसाहेब म्हणाले, ‘कोणास ठाऊक.. मी रजनीकांत आहे, असं म्हणत होता सारखं.’
***
हे आणि असे असंख्य किस्से पुण्याच्या चितळे बंधूंच्या नावावर आहेत. त्यात नव्या नव्या किश्श्यांची भर सततच पडत असते. वरकरणी विनोद असला तरी त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येतं, की गुणवत्तेत राखलेलं सातत्य, शिस्तीचा व वेळेचा कमालीचा आग्रह आणि इतरांनाही अनुकरणीय वाटावा असा प्रस्थापित केलेला दर्जाचा मानदंड या गोष्टींनीच जगविख्यात बनलेलं हे अस्सल मराठी उद्योग घराणं आता जनप्रिय संस्कृतीचा (पॉप्युलर कल्चर) भाग बनण्याएवढं मराठी अभिमानबिंदूंशी जोडलं गेलं आहे. चितळे हे व्यावसायिकतेच्या निकषांवर यशस्वी ठरलेलं नुसतं नाव नव्हे, तर चांगल्या व्यवसायाच्या उभारणीचा तो कृतिशील मानदंड ठरला आहे. चितळेंनी व्यवसायाची उभारणी करताना नफ्याच्या बेरीज-वजाबाकीपेक्षा गुणवत्तेचा आग्रह अधिक महत्त्वाचा मानला. कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी तडजोड करण्याचा साधा विचारही त्यांना कधी स्पशरू शकला नाही. किंबहुना ज्या दिवशी दर्जात तडजोड करावी लागेल त्या दिवशी व्यवसाय बंद करू असे मानणारी आदर्श व्यावसायिक बांधिलकी पुढच्या पिढीर्पयत ङिारपत नेण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. या सा:या व्यावसायिक पसा:याच्या केंद्रस्थानी असलेला, परिवाराच्या कर्तृत्व-सातत्यातला सर्वात प्रभावी दुवा म्हणजे रघुनाथ तथा भाऊसाहेब चितळे. चरवीने माप घालून दिल्या जात असलेल्या दुधाला पॅकिंगच्या सीलबंद पिशवीत आणणारे. पेढा, बर्फी किंवा कुठल्याही पदार्थाच्या चवीसाठी अस्सल पुणोकराहून अधिक चोखंदळ असणारे. गुजराथी बाकरवडीला अस्सल मराठमोळा साज चढवून त्या चवीने सर्वाना वेड लावणारे. दूध, चक्का, तूप यांच्या दर्जाविषयी कमालीचे आग्रही असणारे असे भाऊसाहेब चितळे!
- भाऊसाहेबांचे वडील बी. जी. चितळे हे या उद्योग-घराण्याचे आद्यपुरुष! साता:याजवळच्या लिंब आणि गोवे या जुळ्या गावात चितळ्यांची दूध डेअरी होती. दूध, लोणी, चक्का असं सारं रेल्वेने मुंबईला जाई. पुढे 1936 च्या सुमारास अचानक एका रोगात त्यांच्या दोनेकशे म्हशी दगावल्या आणि कजर्बाजारी झालेले चितळे सांगलीजवळ भिलवडीला आले. दूध पुण्याला जायला लागलं. भाऊसाहेबांनी ऐन तरुण वयात पुण्यात पाऊल टाकलं, ते विक्रीची व्यवस्था नीट लावण्यासाठी! कुंटे चौकातल्या एका प्रिंटिंग प्रेसच्या जागेत पहिलं दुकान सुरू झालं. त्या दरम्यान भाऊसाहेब आणि त्यांचे बंधू राजाभाऊ दोघेही घरोघरी सायकलवर जाऊन दुधाचा रतीब घालीत. पुढे दुधाबरोबर खवा, पेढे, मग चक्का, लोणी यांचीही विक्री सुरू झाली. मग मिठाया आल्या. त्यामागोमाग फरसाण आणि खारे जिन्नस बनू लागले. 1954 साली डेक्कनवर पहिलं दुकान उघडलं. व्यवसायाने बघता बघता पंख पसरले.
चरवीतून घातलं जाणारं रतिबाचं दूध प्लॅस्टिकच्या सीलबंद पिशवीतून घरोघरी पोचवण्यासाठी राजाभाऊ आणि भाऊसाहेब यांनी कोण धडपड केली. तीही सत्तरच्या दशकात. केंद्र सरकारशी भांडून परदेशातून आयात केलेल्या पाऊच पॅकिंग मशीनवर भरलेल्या दुधाच्या पिशव्या ही चितळ्यांनी घडवलेली पहिली क्रांती! - त्यामागोमाग आली ती बाकरवडी.
गुजरातेतून आणलेल्या या खा:या पदार्थाला मराठी टोपडं चढवण्याची हिकमत भाऊसाहेबांची!
पुढे मग चितळ्यांना मागे वळून बघण्याची वेळच आली नाही. पुण्यात शनिपाराजवळ किंवा डेक्कनवर असलेलं चितळे बंधू नावाचं एक मिठाईचं दुकान आज जगभरात ब्रँड म्हणून प्रस्थापित झालं आहे.
भाऊ शिस्तीने जुन्या वळणाचे, करारी; पण वृत्तीने मात्र आधुनिक. महाराष्ट्रातले परंपरागत व्यवसाय काळाच्या ओघात मागे पडत गेले, कालबाह्य ठरले आणि दर्जा असूनही मार्केटिंगअभावी किंवा नुसत्या मार्केटिंगच्या खणखणाटात दर्जा विसरल्याने अपयशी झाले. चितळे तरले. एवढंच नव्हे, तर वाढलेही; कारण काय बदलावं आणि काय कायम राखावं, याचं नेमकं भान त्यांनी ठेवलं. ही कसरत केली ती भाऊसाहेबांनी! पारंपरिक व्यवसायातली सचोटी कायम राखून अत्याधुनिकतेचा स्वीकार करीत नवतंत्रज्ञानाच्या मदतीने सातत्याने बदलत बदलत सतत अपडेट होण्याचं व्हीजन त्यांच्याजवळ होतं. त्यांनी जुना पीळ तर सोडला नाहीच; शिवाय नव्या तंत्रंवरही हुकूमत मिळवली. भाऊसाहेब न चुकता पहाटे 4 वाजता उठत. त्यावेळी दुधाच्या गाडय़ा यायच्या. त्यांची व्यवस्था, रोजचा व्यायाम, सूर्यनमस्कार, रोजची आन्हिकं उरकून ते बरोब्बर 8 वाजता दुकानात हजर असत. त्यांची ही वेळ कधीही चुकली नाही. भाऊसाहेबांनी वक्तशीरपणाची, गुणवत्तेची, दर्जाची, सातत्याने आधुनिक बनण्याची जी पायवाट चोखाळली होती, त्या वाटेवरूनच आपल्या पुढच्या पिढय़ांनाही मार्गस्थ करण्याची किमयाही त्यांना साधली. भाऊसाहेबांच्या संस्कारांचा आणि शिस्तीचा वारसा इतका मजबूत, की आता त्यांच्या माघारीही सकाळी बरोबर 8 वाजता चितळे बंधू दुकान उघडलेलं असेल आणि तिकडे काहीही झालं, तरी दुपारी एक ते चार बंद म्हणजे बंद!
(लेखक ‘लोकमत’च्या पुणो आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
parag.potdar@lokmat.com