बालरंगभूमी परिषद ... हक्काचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:23 AM2019-10-13T00:23:40+5:302019-10-13T00:25:55+5:30

संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते.

Balranbhumi Parishad... Hakkache Yaspeeth | बालरंगभूमी परिषद ... हक्काचे व्यासपीठ

बालरंगभूमी परिषद ... हक्काचे व्यासपीठ

googlenewsNext

संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते. लहान मूल ते बघतं त्याचं अनुकरण करतं. हा त्याचा नाट्यकलेचा पहिला धडा असतो. यातूनच त्याचे अनुभवविश्व प्रगल्भ होण्यास सुरुवात होते. हे अनुभवविश्व प्रगल्भ करताना आणि त्यात रंग भरताना बालक नाट्यकला शिकतो. त्यासाठी त्याला वेगळे शिक्षण देण्याची गरज नसते.
कलेमार्फत बालकांचा भावनिक विकास तर क्रीडेमार्फत शारीरिक विकास होतो. या दोन गोष्टी बालकांचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी आवश्यक असतात. पण आज दुर्दैवाने आमच्या शालेय अभ्यासक्रमातून त्या दुर्लक्षित झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास व्हावा, त्यांना विविध स्पर्धेत सहभागी होता यावे, समाजात वावरताना येणाऱ्या अनेक संकटांचा धैर्याने सामना करण्याची हिंमत यावी, एक उत्तम व्यासपीठ त्यांना मिळावे या उद्देशाने नागपुरात नव्यानेच बालरंगभूमी परिषदेची स्थापना करण्यात आली. ही संस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था आहे.
बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा मधुराताई गडकरी यांनी स्वीकारली. तर लहान मुलांमध्ये समरस होऊन गेल्या १५ ते २० वर्षांपासून उत्साहाने कार्य करणारे रोशन नंदवंशी हे या रंगभूमीला प्रमुख कार्यवाह म्हणून लाभले. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मंडळी या परिषदेशी जुळली गेली. संजय रहाटे, आभा मेघे, संजय वलिवकर, संजय भरडे, अ‍ॅड. रमण सेनाड, विलास कुबडे, अमोल निंबर्ते, वैदेही सोईतकर, रश्मी फडणवीस, नितीन पात्रीकर, राजेश रोडे, योगेश राऊत, स्रेहल जोशी, संजय गायकवाड आणि अनेक शाळांचे प्रतिनिधी यांचा येथे प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
मुलांच्या शिक्षणाचा हक्क या कायद्यात प्रत्येक प्राथमिक (१ ते ८) या वर्गासाठी कला, क्रीडा आणि संगीत शिक्षक (दीडशे मुलांमागे अर्धवेळ) असणे अत्यावश्यक आहे. पण गेल्या दहा वर्षात राज्य शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. आतापर्यंत चित्रकला, लोककला, खेळ, संगीत याकरिता वेगळे गुण दिल्या जायचे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रवेश प्रक्रियेत पाच टक्के जागा आरक्षित होत्या. त्या विविध कलांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य दिल्या जात असे. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाºया विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित आहेत. त्यामुळे काहीच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. स्पर्धेच्या या युगात विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. परीक्षेत जास्त गुण कोण मिळविणार या एकाच निकषावर पालक आणि विद्यार्थ्यांनी कलेकडे पाठ फिरविली आहे आणि शालेय जीवनात विविध कला आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध नाहीत. शासनाने दाखवलेल्या या अनास्थेपायी चांगले कलाकार, क्रीडापटू होणे दुरापास्त झाले आहे.
याचा संपूर्ण विचार करून बालरंगभूमी परिषदेने आपल्या कार्याला सुरुवात केली असून याअंतर्गत आंतरशालेय बालचित्रकला स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पार पडली. यामध्ये नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जिल्हापरिषद, महानगरपालिकांच्या ५२ शाळांमधील ७,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गेल्या आठवड्यात एक दिवसीय बालनाट्य महोत्सव घेण्यात आला. भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

  • सीमा रवींद्र फडणवीस

Web Title: Balranbhumi Parishad... Hakkache Yaspeeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक