बाप्पा, आमचे गाव हटवा.
By admin | Published: June 11, 2016 02:53 PM2016-06-11T14:53:51+5:302016-06-11T14:53:51+5:30
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील भीषण स्फोटामुळे अनेक गंभीर प्रश्न नव्याने उभे राहिले आहेत. यापूर्वीही येथे स्फोट झाले आहेत. भूतकाळापासून प्रशासनाने जरी नाही, तरी लोकांनी मात्र धडा घेतला आहे. प्रचंड दहशतीत जगणा:या परिसरातील लोकांना आता आपले गावच दुसरीकडे वसवून हवे आहे.
Next
नरेश डोंगरे / राजेश भोजेकर
संपूर्ण भारताचीच सुरक्षा व्यवस्था ज्यावर अवलंबून आहे आणि शत्रुराष्ट्रांना नामोहरम करण्याची क्षमता असलेले हे एक अतिशय महत्त्वाचे केंद्र. 30 मे 2016 च्या मध्यरात्री या भांडारात भीषण स्फोट झाला आणि आपल्याच सुरक्षा व्यवस्थेची लक्तरं समोर आली.
या स्फोटामुळे सुरक्षा व्यवस्थेकडे आपण कसे पाहतो, त्याकडे किती लक्ष देतो, एवढेच नव्हे तर भूतकाळापासून आपण काही शिकतो की नाही याबरोबरच अनेक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. पुलगाव परिसर आणि येथील भांडाराला जसा ऐतिहासिक वारसा आहे, तसा सामाजिकही. लष्करी वारशामुळे त्याला आणखीही एक वेगळे परिमाण लाभले आहे.
पुलगावचा वारसा पार दुसरे महायुद्ध आणि त्याहीआधीचा.
1939 साली दुसरे महायुद्ध छेडले गेले, त्याचवेळी स्वातंत्र्यलढाही तीव्र झाला होता. परिणामी भारतासोबत स्वत:च्याही सुरक्षेची चिंता ब्रिटिशांना वाटत होती. त्याचीच परिणती म्हणून 1942 मध्ये ब्रिटिशांनी पुलगाव येथे केंद्रीय दारूगोळा भांडाराची निर्मिती केली. प्रारंभी येथे हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रज चालते झाले, मात्र जगभरात वाढलेल्या आक्रमणांमुळे या दारूगोळा भांडाराला कडेकोट सुरक्षा कवच घालण्यात आले. त्यापूर्वी पीरबाबा आणि बहिरमबाबांच्या टेकडी यात्र महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर पौष महिन्यात नागरिकांनी अक्षरश: फुलून जात होता. मात्र, सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या नावाखाली परिसराचा घेरा वाढला. आसपासच्या 5क् पेक्षाही जास्त गावांजवळ सीमा वाढलेला हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने मात्र झाकला गेला. पुलगावलाही जगाच्या नकाशावरून लपविण्यात आले.
आशिया खंडातील दुसरे आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे हे दारूगोळा भांडार पुलगाव सीएडी कॅम्प या नावाने ओळखले जाते. पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाच्या वेळी येथे खास तळ उभारण्यात आले. या तळावरूनच युद्धाची विमाने आणि हेलिकॉप्टर शत्रुदेशाला धडा शिकविण्यासाठी दारूगोळा भरून उड्डाण घेत असल्याची माहिती सांगितली जाते. पाकिस्तानने कारगिलमध्ये हल्ला चढवला त्यावेळी शत्रुराष्ट्राच्या सैन्यावर हल्ला चढवण्यासाठी बोफोर्स आणि अन्य तोफांसाठी याच कॅम्पने दारूगोळा पाठविला. देशातील विविध आयुध निर्माणीत बनविण्यात येणारा दारूगोळा आणि स्फोटकांचा साठा सुरक्षित ठेवण्याची अनन्यसाधारण जबाबदारी असलेल्या या दारूगोळा भांडाराची सुरक्षा अन् यंत्रणा कशी आहे, त्याबाबत आत्ताआत्तार्पयत सा:यांचाच गोड गैरसमज होता. 3क् मेच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अग्निस्फोटाने सा:यांनाच खडबडून जागे केले. स्फोटाने फार मोठय़ा प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी तर झालीच, पण लोकांच्या मनावरील भीतीच्या खपल्याही पुन्हा भळभळून वाहू लागल्या.
मुळात हा स्फोट कुणी घडवून आणला नव्हता, तर आपलेच दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे तो झाला. भांडार परिसरात तीव्र उन्हामुळे वाळलेल्या गवताला आग लागली. ही आग पसरत पसरत ज्या खंदकात शक्तिशाली बॉम्ब ‘सुरक्षित’ ठेवण्यात येत होते, त्या खंदकार्पयत गेली. तोर्पयत कुणाचेच लक्ष कसे गेले नाही, हा कळीचा प्रश्न. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर धावपळ सुरू झाली. कर्नल रंजित पवार आणि मेजर मनोजकुमार यांनी आपल्या सहकारी जवानांना घेऊन आग विझविण्याची धडपड सुरू केली. मात्र, तोर्पयत उशीर झाला होता. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा भक्कम आधार असलेला सीएडी कॅम्प किती असुरक्षित आहे, हेदेखील त्यामुळे अधोरेखित झाले. हे दुर्लक्ष पुढेही असेच कायम राहिले तर त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला पुढेही भोगावे लागणार आहेत.
भूतकाळातील अनुभवाची दहशत
पुलगाव भांडार परिसरात लागलेली आग आणि स्फोट नवीन नाहीत. सुरक्षेचा उपाय म्हणून कालबाह्य मात्र शक्तिशाली बॉम्ब येथून दरवर्षी नष्ट केले जातात. 1995 र्पयत हे नियमितपणो केले जायचे. बॉम्ब नष्ट करण्याची एक पद्धत होती. त्यानुसार, एक मोठा खड्डा खोदून त्यात बॉम्ब पुरला जायचा. या बॉम्बची वात 5क्क् ते 1 हजार मीटर एवढी लांब असायची. लष्कराचे प्रशिक्षित जवान या वातीला पिस्तुलासारख्या शस्त्रतून आग लावायचे. त्यानंतर वाहनातून सुसाट वेगाने सुरक्षित ठिकाणी निघून जायचे. बॉम्बची वात संपताच मोठा स्फोट व्हायचा. आजूबाजूच्या जवळपास 15 किलोमिटर अंतरावरची गावे हादरायची. रोज चार ते पाच स्फोट करून हे बॉम्ब निकामी केले जायचे.
परवाच्या बॉम्बस्फोटासारखाच प्रकार 1989 मध्येही झाला होता. बॉम्ब निकामी करत असतानाच दूर गवताला आग लागली. ती कोणाच्या ध्यानातच आली नाही. आग खंदकार्पयत पोहचली. एका पाठोपाठ बॉम्बस्फोट होऊ लागले. अवघा परिसरच उद्ध्वस्त होतो की काय, या भीतीने आजूबाजूच्या गावातील लोकांनी तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवळी शहरात धाव घेतली. एक रात्र अन् पुढचा अख्खा दिवस आग धगधगत होती. बॉम्बही फुटत होते. मात्र, यंत्रणाही सुसज्ज असल्याने एकही जीव गेला नाही. मात्र केव्हा काय होईल ही भीती नागरिकांचा कायम जीव पोखरत असते. पुलगाव भांडार परिसरातील आगरगाव, लोणी, नागझरी, पिंपरी, येसगाव, मुरदगाव, नांदोरा, डिगडोह, सोनेगाव, पळसगावसह डझनभर गावातील नागरिक नेहमीच दहशतीखाली असतात. 3क् मेच्या स्फोटाने ही दहशत अधिकच गडद केली आहे.
तसेही सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात अनेक गोष्टींना मज्जाव करण्यात आला आहे. काही गावात दुमजली बांधकाम करण्यास मनाई आहे. भांडार परिसरातील शेतात विहीर खोदण्यास मनाई आहे. परिसरात गुरे चराईसुद्धा करता येत नाही. परिणामी शेतकरीच नव्हे तर गावकरीही नेहमीच बिकट स्थितीत असतात. जीव मुठीत घेऊनच आम्ही जगतो, असे सांगणा:या गावातील जुन्याजाणत्या माणसांची अगतिकता घालमेल वाढवणारी आहे. केव्हा काय होईल आणि स्फोटांची मालिका केव्हा सुरू होईल या भीतीने नागरिकांना त्रस्त केले आहे. परिसरातच शेती आणि कष्ट करून उदरनिर्वाह करणा:या या गरीब नागरिकांसमोर नेमके करावे तरी काय, असा यक्षप्रश्न ठाकला आहे. भयमुक्त इथे राहताही येत नाही आणि हा परिसर सोडताही येत नाही अशी केविलवाणी अवस्था येथील लोकांची झाली आहे. त्यामुळे एकेकटय़ाने कुठे जाण्याऐवजी ‘बाप्पा, आमचे गावच इथून हटवा आणि सुरक्षित ठिकाणी आम्हाला स्थानांतरित करून सर्व सुविधा पुरवा’ अशी येथील लोकांची अनेक वर्षापासूनची एकमुखी मागणी आहे.
‘लोकमत’ची सजगता
पुलगाव दारूगोळा भांडारातून पूर्वी भंगाराचा नियमित लिलाव व्हायचा. 1991 मध्ये झालेल्या लिलावात वर्धा येथील एकाने भंगार खरेदी केले. ते भंगार त्यांनी आपल्या कंपनीत आणले. त्यात एक, दोन नव्हे तर चक्क 135 जिवंत बॉम्ब होते. हादरलेल्या खरेदीदाराने लगेच भांडार प्रशासनाला त्याची माहिती दिली. त्यावर प्रशासनाने काय करावे? - ‘ते बॉम्ब आमचे नाहीत’, असे सांगून घोंगडे झटकले. आपल्या कंपनीत असलेल्या जिवंत बॉम्बचा स्फोट झाल्यास किंवा देशाच्या शत्रूच्या हातात ते लागल्यास काय अनर्थ होऊ शकतो, याची कल्पना असल्याने खरेदीदाराने स्थानिक प्रशासनापासून तर केंद्र शासनार्पयत बॉम्ब परत न्यावेत यासाठी पाठपुरावा केला. तब्बल 25 वर्षे लढा दिला. शेवटचा पर्याय म्हणून त्याने ‘लोकमत’कडे धाव घेतली. लोकमतने प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर कोरडे ओढताच सर्वत्र खळबळ उडाली. वृत्त प्रकाशित होताच हालचालींना वेग आला आणि मार्च 2क्16 मध्ये भांडार प्रशासनाने हा दारूगोळा कंपनीतून उचलून परत नेला. भांडार परिसरात तो नष्ट करण्यात आला. त्यातील 6क् बॉम्ब तेव्हाही जिंवत होते. कर्तव्यपरायणता अन् सजगतेची थट्टा उडविणारा हा प्रकार आहे.
स्फोट परिसरातला ‘बाजार’!
1995 र्पयत पुलगाव येथील कालबाह्य बॉम्बचा जमिनीत स्फोट करून ते नष्ट केले जात. मात्र त्या स्फोटांना आणि बॉम्बस्नाही पूर्वी एक विचित्र संदर्भ होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यातून तांबा, पितळ, जस्त, लोखंड, तसेच इतर धातू उंच उडून त्याचे तुकडे परिसरात विखुरायचे. हे तुकडे गोळा करण्यासाठी परिसरात जणू ‘जत्र’ भरायची. आजूबाजूच्या गावातील आबालवृद्ध हे धातूचे तुकडे गोळा करायचे. तिथेच कबाडीही दुकान थाटायचे. झटपट पैसे मिळायचे. बाजूलाच अवैध दारू विकणारे, शेवचिवडा, मिठाई, चहा विक्रेतेही असायचे. ज्याला जे पाहिजे ते मिळत असल्याने त्या काळात बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी बाजार भरायचा!
(लेखक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत
उपसंपादक आहेत.)