बाप्पा @ लंडन : ऐतिहासिक थेम्सच्या तीरावर रंगला अस्सल मराठमोळा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 03:25 PM2017-09-02T15:25:43+5:302017-09-03T07:06:52+5:30

लंडनमध्ये साधारण सातशे मराठी घरं. श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सारेच श्रद्धेनं आरतीला जमू लागले. दाक्षिणात्य कुटुंब डोळं मिटून ‘सुखकर्ताऽऽ दु:खहर्ताऽऽ’ म्हणू लागलं. गुजराती मंडळी कपाळाला टिळा लावून बाप्पाला मनोभावे वंदन करू लागली. ख्रिश्चन भाविक ‘घालीन लोटांगणऽऽ’ म्हणत स्वत:भोवती प्रदक्षिणा घालू लागले.. मुंबईचा एक मुस्लीम युवकही रोज आरतीला न चुकता हजर राहू लागला...

Bappa @ London: The authentic Maratha Mausoleum painted on the threshold of historic Thames | बाप्पा @ लंडन : ऐतिहासिक थेम्सच्या तीरावर रंगला अस्सल मराठमोळा सोहळा

बाप्पा @ लंडन : ऐतिहासिक थेम्सच्या तीरावर रंगला अस्सल मराठमोळा सोहळा

Next

- सचिन जवळकोटे

गणेशमूर्ती, चौरंगी पाट, दूर्वा थेट भारतातून!
लंडनच्या ‘हौनस्लोव’ मंडळासाठी भारतातूनच गणेशमूर्ती मागविण्याचा निर्णय झाला. मुंबईहून लंडनला ही मूर्ती पाठविण्यासाठी एका कुरिअर कंपनीला ठेका देण्यात आला. गंमत म्हणजे, मूर्तीच्या किमतीपेक्षा दुप्पट खर्च प्रवासावर झाला. मात्र, त्यासाठीही अनेक पौंडांचे प्रायोजक स्वत:हून मदतीला धावले. गणेशोत्सवासाठी लागणारा चौरंगी पाट अन् दूर्वांसारख्या दुर्मीळ गोष्टीही थेट भारतातूनच मागविण्यात आल्या.

स्थळ : लंडन सिटी. जगप्रसिद्ध थेम्स नदीकाठचा नयनरम्य परिसर. नदीकिनारी तरंगणाºया छोट्याशा बोटीत बसून दोन ब्रिटिश नाविक एका वेगळ्या घटनेची प्रतीक्षा करू लागलेले. आजची ही गोष्ट त्यांच्यासाठी जणू अपूर्वाईची होती. नवलाईची होती. ‘थेम्स’च्या इतिहासात आज काहीतरी वेगळंच घडणार होतं.
गर्दीतून वाजत-गाजत येणारी तीन-साडेतीन फुटांची गणेश बाप्पांची सुबक मूर्ती समोर दिसताच हे गोरे-गोमटे नाविक ताडकन् उठून उभारले. ‘हॅलोऽऽ बाप्पाऽऽ’ म्हणत त्यांनी ती मूर्ती बोटीवर अलगद ठेवून घेतली. सोबतीला चार भगवे फेटेवालेही येऊन बसले. त्यांच्या कपाळाला ‘मोरयाऽऽ’ची सुरेख रिबीनही बांधलेली.
नदीकाठी जमलेल्या दोन-तीनशे मंडळींचा भावनिक निरोप घेत बाप्पांची मूर्ती बोटीसह पुढं सरकली. नदीच्या मध्यभागी आल्यानंतर हळुवारपणे मूर्तीला पाण्यात सोडण्यात आलं. क्षणाधार्थ शाडूच्या मूर्तीचं विरघळणं सुरू झालं. पाहता पाहता मूर्ती नदीत लुप्त झाली. भारताची अस्सल गावरान माती इंग्लंडच्या पाण्यात सामावली गेली. बाप्पांच्या स्पर्शानं जणू थेम्स नदीही पुलकित जाहली.
हा वेगळा इतिहास घडविला इंग्लंडमधल्या भारतीयांनी. महाराष्टÑीयन परंपरेचा अभिमान असलेल्या मराठमोळ्या मंडळींनी. खरं तर, आजकाल ‘परदेशात गणेशोत्सव..’ ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. पोटापाण्यासाठी आपला देश सोडून परदेशात स्थायिक झालेली मंडळी तिथं भारताचे सण साजरे करतातच. मराठी माणसांचा समूह असलेल्या परिसरात तर गणेशोत्सवही मोठ्या उत्साहानं साजरा होतो. ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडन शहरात मराठी मंडळींची तीन-चार मंडळं आहेत. मात्र, यंदा ‘हौनस्लोव’ परिसरातील गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक लाखो लंडनवासीयांचं लक्ष वेधून घेणारी ठरली.
लंडनच्या ‘हौनस्लोव’ भागात भारतीयांची संख्या लक्षणीय. त्यात मराठी माणसांची तर सातशेहून अधिक घरं. सुमारे दहा वर्षांपूर्वी इथं गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली गेली, त्यावेळी फक्त घरगुती स्वरूपातच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जायची.
या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वैभव रावराणे मोठ्या कौतुकानं सांगत होते, ‘सुरुवातीला खूप त्रास झाला. अडचणी आल्या. घरातली छोटी मूर्तीही थेम्स नदीत विसर्जित करण्यापूर्वी इथल्या प्रशासन यंत्रणेच्या शेकडो चौकशांना सामोरं जावं लागलं. ही मूर्ती कुणाची.. कशापासून बनविली.. पाण्यात सोडणं गरजेची आहे का?.. असं बरंच काही.. पाच-सहा दिवस चौकशी चालली. मूर्तीची तपासणीही करण्यात आली. अखेर आम्हाला कशीबशी परवानगी मिळाली. आजपावेतो छोट्या स्वरूपातच आमच्या भागातला गणेशोत्सव साजरा केला जायचा. हे मंडळाचं दहावं वर्ष होतं. त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यातच साजरा करायचा निर्धार केला. त्याप्रमाणं आम्ही सारे कामाला लागलो.’
नितीन पारटे, सूरज लोखंडे, अमित जाधव, मोनाली मोहिते अन् अनघा अत्रे-पांबरेकर या तरुण-तरुणींनी पुढाकार घेतला. या भागातले हौशी कार्यकर्ते एकत्र जमले. बैठक झाली. त्यात रोख वर्गणीऐवजी प्रायोजक मिळविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाला एकेक जबाबदारी देण्यात आली. सर्वात मोठा प्रश्न होता, मूर्ती ठेवायची कुठं? कारण रस्त्यावर खड्डे करून मंडप उभारण्याला इथे परवानगी नाही. शिवाय अशा तोडफोडीला कार्यकर्त्यांचाच कडाडून विरोध होता.
अखेर या भागातल्या राधा-कृष्ण मंदिरातली ऐसपैस जागा मिळाली. विशेष म्हणजे, हे मंदिर पंजाबी मंडळींंच्या अधिपत्याखालचं. तरीही त्यांनी मोठ्या कौतुकानं जागा दिली. बाकी साºया तांत्रिक गोष्टींसाठीही मनापासून सहकार्य केलं.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळ-संध्याकाळच्या आरतीला सारेच जमू लागले. यात केवळ मराठी मंडळीच नव्हे तर उत्तर अन् दक्षिण भारतीयही मोठ्या श्रद्धेनं उपस्थित राहू लागले. लंडनमध्ये रोज इंग्रजी बोलणाºया महेश शेट्टींचं दाक्षिणात्य कुटुंब डोळं मिटून ‘सुखकर्ताऽऽ दु:खहर्ताऽऽ’ म्हणू लागलं. सुजय सोहनी यांची गुजराती फॅमिलीही कपाळाला टिळा लावून बाप्पाला मनोभावे वंदन करू लागली. केरळातलं ख्रिश्चन कपल हात जोडून ‘घालीन लोटांगणऽऽ’ म्हणत स्वत:भोवती प्रदक्षिणा घालू लागलं.. हे कमी की काय म्हणून मुंबईचा शेख नामक एक तरुणही रोज आरतीला न चुकता हजर राहू लागला. आपल्या देशात फक्त मराठी माणसापुरता सीमित राहिलेला गणेशोत्सव लंडनमध्ये मात्र संपूर्ण भारतीयांचा बनला होता. साºयाच जाती-धर्मांचे भारतीय बाप्पाच्या सोहळ्यात सामील होऊ लागले होते. जे कधी भारतात शक्य होत नव्हतं, ते परदेशात मनापासून घडलं होतं.
अखेर विसर्जनाचा दिवस उजाडला. कधी दीड दिवसानी तर कधी पाचव्या दिवशी मूर्ती विसर्जित करणाºयांनी एकाच दिवशी मंडळांच्या मोठ्या बाप्पासोबतच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विसर्जनाची तयारी सुरू झाली.
मिरवणूक मार्गाच्या मॅनेजमेंटची जबाबदारी असणारे श्रेयस शेटे मोठ्या उत्साहानं बोलत होते, ‘मी मूळचा साताºयाचा. दरवर्षी सामाजिक बांधिलकीची मोहीम राबविणाºया प्रकाश मंडळाचं कार्य मी लहानपणापासूनच बघितलेलं. त्यामुळे लंडनमधली ही जबाबदारी पेलताना खूप त्रास झाला नाही. या मिरवणुकीची परवानगी आम्हाला बरेच दिवस अगोदर घ्यावी लागली. लंडन कौन्सिल, पोलीस अन् पर्यावरण विभागाची परवानगी घेताना बºयाच नियमांना बांधील राहावं लागलं. ज्या मार्गावरून मिरवणूक जाणार होती, तिथल्या प्रत्येक चौकाच्या कोपºयावर आम्हाला नोटीस चिकटवावी लागली; ज्यात मिरवणुकीची तारीख अन् वेळ होती. आमच्यामुळं कुणालाच त्रास होणार नाही. तरीही क्षमस्व.. असा मजकूर त्यात होता.’
लंडनच्या पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी देताना एक अट घातली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, ‘रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची जबाबदारी तुम्हीच घ्यायची. आम्ही फक्त लांबून लक्ष ठेवू. जर काही चूक झाली तर तुमच्यावर थेट केस होणार.. लक्षात ठेवा.’ त्यानंतर नियमानुसार ‘आम्ही कोणतीही चूक करणार नाही,’ असं लेखी पत्र मंडळानं दिलं. हे सारे सोपस्कार पार पाडताना ‘थेम्स लॅण्डस्केप स्ट्रॅटेजी’ संस्थेनं खूप मदत केली.
अखेर मिरवणुकीचा दिवस उजाडला. भारतीय वाद्यं वाजविणारं ‘ढोल ड्रम्स’ नावाचं पथक मागविण्यात आलं. कपाळाला गंध अन् डोक्यावर फेटे लावून पुरुष मंडळी मिरवणुकीत नाचू लागली. पैठणी अन् नऊवारी साडी घातलेल्या महिला हातात लेजीम घेऊन ढोल-ताशांच्या आवाजाला प्रतिसाद देऊ लागल्या.
सुरुवातीला दूर उभे राहून अत्यंत तटस्थपणे मिरवणुकीवर लक्ष ठेवणारे लंडनचे पोलीसही हळूहळू भारतीयांच्या या सुसंस्कृत उत्साहाला दाद देऊ लागले. गणेशाचं विसर्जन झालं, त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
खरं तर, हे अश्रू म्हणजे वेगवेगळ्या भावभावनांचा कल्लोळ होता. एकीकडं बाप्पा चालल्याचं दु:ख होतं तर दुसरीकडं ब्रिटनच्या साम्राज्यात यंदा दणक्यात गणेशोत्सव साजरा केल्याचा आनंद होता. अभिमान होता..


(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत. Sachin.javalkote@Lokamt.com)

Web Title: Bappa @ London: The authentic Maratha Mausoleum painted on the threshold of historic Thames

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.