बारी समाज दशा आणि दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 03:45 PM2019-02-03T15:45:32+5:302019-02-03T15:47:50+5:30

विड्याच्या पानांचे उत्पादन करणारा बारी समाज आज २१ व्या शतकातही अत्यंत उपेक्षित जीवन जगत आहे.

Bari community : social condition and direction | बारी समाज दशा आणि दिशा

बारी समाज दशा आणि दिशा

googlenewsNext

- पी.एम. भगत

जेवण झाल्यावर राजेरजवाड्यापासून तर सामान्यांनापर्यंत शाही थाटात सेवन केले जाणारे विड्याचे पान (गोविंद विडा) माहिती नाही, अशी व्यक्ती भारतीय उपखंडात शोधूनही मिळायची नाही. मात्र, या विड्याच्या पानांचे उत्पादन करणारा बारी समाज आज २१ व्या शतकातही अत्यंत उपेक्षित जीवन जगत आहे. शासन दरबारी बारी समाजाला किती महत्व आहे ? विड्याच्या म्हणजेच नागवेलीच्या पानाची वेल औषधी गुणद्रव्यसमृद्ध आहे. या नागवेलीच्या लागवडीचे तंत्रज्ञान बारी समाजानेच आत्मसात केलेले आहे. या वेलीच्या वाढीसाठी भरपूर पाणी, मध्यम पोताची रेताळ जमीन हवी म्हणून या वेलीचा उत्पादक ‘बारी समाज’ पर्वताच्या पायथ्याशी राहून शेकडो वर्षापुर्वीपासून वंशपरंपरागत व्यवसाय म्हणून विड्याच्या पानाचे उत्पादन करू लागला. पण ही विकास उपयुक्त जमीन निकस झाली की हा समाज पुन्हा योग्य जमिनीच्या शोधात दुसऱ्या जागी स्थलांतरीत होई, अशा तºहेने विड्याचे पान उत्पादन करणाºया बारी समाजाती लोकांचे नशीबी भटके जीवन आले. वर्षानुवर्षे भटक्या जीवनशैलीमुळे या समाजाला शैक्षणिक आर्थिक प्रगतीपासून वंचित राहावे लागले.
पानवेलीपासून विड्याच्या पानाचे उत्पन्न बाराही महिने मिळत असे. म्हणून पानवेलीची शेती करणाºया या समाजास बाराही म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने बारी, बारई, बारिया असे त्यांचे नामांतर झाले. बारी समाज भारतामध्ये कमीजास्त प्रमाणात सर्व रज्यात विखुरलेला असून प्रामुख्याने महाराष्ट्र, दमण, मध्यप्रदेश, झत्तीसगढ, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, जम्मूकाश्मीर, दिल्ली, आंध्रप्रदेश, ओरिसा, मेघालय, हिमाचल प्रदेश, मिझोराम इत्यादी राज्यात आढळून येतो. हा समाज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या संवर्गाने व पोटजातीने ओळखल्या जाऊ लागला. जसे सुर्यवंशी, नागवंशी, तांबोळी, गोलाईत, यदुवंशी, कुमरावत, चौरसिया, जायस्वाल, गोंधळी, मिहोबिया, पुनम इत्यादी संपूर्ण भारतामध्ये या समाजाची लोकसंख्या ४ कोटीचे वर असून महाराष्ट्रात ५० लाखावर या समाजाची लोकसंख्या आहे. विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, मराठवाड्यात जालना, औरंगाबाद, खानदेश परिसरात नंदुरबार, धुळे, जळगाव, मुंबई परिसरात मुंबई, पनवेल, नवी मुंबई, डहाणू, वसई, पालघर, घोलवड इत्यादी भागात या समाजाची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात दिसून येते. साहजिकच राजकीय दृष्टीकोनातून विचार केल्यास नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा इत्यादीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून आणण्यामागे या समाजाचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा असतो. वरील निवडणुकात या समाजातील मतदारसंख्या निर्णायक ठरत असते. तथापि समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे इतर कुणीतरी (त्या त्या भागातील समाजेतर राजकीय शक्ती) या समाजावर वर्चस्व गाजवत राहतात.
असे असले तरी या समाजात जिल्हावार विभागवार, सामहिक विवाह, वधुवर परिचय मेळावे, महिला मेळावे, बचतगट, मार्गदर्शन वर्ग, गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनींचा सत्कार इत्यादींचे आयोजन होत असते.
बारी समाजाच्या प्रगतीसाठी चिंतन करूकरू जाता शासनने खालील बाबतीत मदतीचा हात पुढे केल्यास हा समाज मागासलेल्या अवस्थेतून सावरू शकतो नव्हे दशाला भरभक्कम परकीय चलन मिळवून देऊ शकतो.
समाजाने गरीबीत खितपत असलेल्या हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना अंमलात आणावी, असे मला वाटते. समाजातील ८० टक्क्यांच्याही वर लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्य करते. समाजातील किमान ८० टक्के लोकसंख्या शेतकरी व शेतमजूरच आहे. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुराची काही मुले मुली एस.एस.सी., एच.एस.सी. परिक्षेत ९० टक्क््यांपेक्षाही जास्त गुण मिळवतात. परंतु आर्थिक अभावी त्यांचे उच्चशिक्षण रखडते.
व्यक्ती व्यक्ती मिळून समाज बनतो. समाजातील एक विद्यार्थी जरी पैशाअभावी ९० टक्क्यापेक्षाही जास्त गुण मिळवूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहिला तर ते कुटुंब गुणवत्ता असूनही मागे राहिल.स माजाचा कुटुंब हा एक घटक मानला तर तो घटक मागे राहिल.
गावोगावच्या स्थानिक बारी मंडळाने ‘संत रुपलाल महाराज गरीब व होतकरु विद्यार्थी सहाय्यता निधी’ अशा स्वरुपाचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांच्या संयुक्त सह्यांनी आॅपरेट करता येईल, असे एक बँक खाते उघडावे. या खात्यात ज्याच्या घरी लग्न वा अनावश्यक कार्यावरील खर्च (यासाठी अंधश्रद्धा सोडून देणे आवश्यक आहे. लेखाच्या विस्तारभयास्तव त्याचे विश्लेषण इथे करता येणार नाही.) टाळून एक हजार रुपये उक्त खात्यात जमा करावे.
हा जमलेला पैसा बिनव्याजी कर्जरुपात गरीब विद्यार्थ्यांना द्यावा. बिनव्याजी कर्जरुपात दिलेली ही रक्कम तो विद्यार्थी, विद्यार्थीनी त्यांचा नोकरी व्यवसाय सुरू झाल्यानंतर हप्त्याहप्त्याने परत करेल, तशा कागदपत्रांची पुर्तता (बँकेतील कागदपत्राप्रमाणे) त्याजकडून कर्ज देताना करून घ्यावी. म्हणजे समाजातील हलाखीची आर्थिक परिस्थिती असणाºया कुटुंबातील हुशार विद्यार्थी, विद्यार्थीनी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही व समाजाची अविभाज्य घटक असणारी ही कुटुंंबे भविष्यात आर्थिकदृष्ट्या प्रगत होतील. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार समाजाची शैक्षणिक आर्थिक प्रगती होण्यास हातभार लागेल.

शेती व्यवसाय डबघाईस
या समाजाचा पारंपारिक पान व पान पिंपरी उत्पादनाचा शेती व्यवसाय मागील काही वर्षापासून डबघाईस आला आहे नव्हे हा व्यवसाय मृतावस्थेत झाल्यातच जमा आहे. विदर्भ विभागात या समाजातल्या लोकांनी आत्महत्यासुद्धा केल्या आहेत. तरी विड्याची पाने व पानपिंपरी शेती व्यवसायाच्या ºहासाची कारणे शोधन त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने ‘पानमळा व पानपिंपरी संशोधन केंद्रे’ स्थापन करणे आवश्यक झाले आहे.
विड्याची पाने परदेशात निर्यात करून परकीय चलन भरपूर मिळू शकेल. पानपिंपरी ही औषधी वनस्पती आहे. तिच्यावर रासायनिक प्रक्रिया करून औषधी तयार होते. यामुळे रोजगार उपलब्ध होतील व औषधी निर्यात करून परकीय चलन मिळू शकेल.
(लेखक बारी समाज विकास मंडळ, नवी मुंबईचे माजी उपाध्यक्ष आहेत.)

 

Web Title: Bari community : social condition and direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.