तळघरात

By admin | Published: January 24, 2015 03:08 PM2015-01-24T15:08:18+5:302015-01-24T15:08:18+5:30

कुणालाही हेवा वाटावा असे तिचे आयुष्य. उंचावर जात असलेले उत्तम करिअर, पैसा, प्रसिद्धी, प्रशंसा, देखणे रूप, घर, शिवाय कुटुंबाचा आधार. एवढे असताना रडू येण्यासारखे आणि पोटात खड्डा पडण्याएवढी भीती वाटण्याइतके काय बिघडले होते? - तिचे मन.

In the basement | तळघरात

तळघरात

Next

- हिनाकौसर खान पिंजार

 
एका सकाळी मला जाग आली, तर उठावेसेच वाटेना. पोटात विचित्र खड्डा पडलेला. हातपाय गळून गेलेले. श्‍वास नीट घेता येत नव्हता. काहीच करू नये, कुठे जाऊ नये, कुणाला भेटू नयेसे वाटत होते. रोज सकाळी उठून कामाला जाणे ही एक लढाईच होऊन बसली होती माझ्यासाठी. कधीकधी एखादा दिवस बरा जाई, तर कधी उगीचच उंच जाऊन अचानक खाली येऊन आदळणार्‍या झोपाळ्यात बसल्यासारखी अवस्था. हे काय चालले आहे, ते माझे मलाच कळत नव्हते. कधी वाटे, कामात बुडवून घेतले; चार लोकांच्यात राहिले म्हणजे गाडे रुळावर येईल. विचार करायला वेळच मिळाला नाही, म्हणजे आपोआप बरे वाटेल. मी झगडत होते. स्वत:शीच लढत होते.’
- मग तिने चंग बांधला. स्वत:ला सावरायचा. कामात बुडून जायचा. त्रास होतो अशा गोष्टींचा विचारच न करण्याचा. सतत येणार्‍या कंटाळ्याकडे दुर्लक्ष करण्याचा.
- पण तिला ते जमले नाही.
‘ंकशातच लक्ष लागत नव्हते. पोटात खड्डा. कसलीतरी विचित्र भीती आणि एकटी असले की सतत रडू.’
- हे असे का व्हावे तिचे? खरेतर कुणालाही हेवा वाटावा असे होते तिचे आयुष्य. उंचावर जात असलेले उत्तम करिअर, पैसा, प्रसिद्धी, प्रशंसा, देखणे घर, महागडी गाडी, शिवाय कुटुंबाचा आधार. रडू येण्यासारखे आणि पोटात खड्डा पडण्याएवढी भीती वाटण्याइतके काय बिघडले होते?
- तिचे मन.
व्यावसायिक यशाला न जुमानणारे, व्यावहारिक श्रीमंती न मोजणारे, जगभरच्या प्रशंसेनेही न पुसले जाणारे नैराश्य मनाभोवती दाटून आल्यावर वाट्याला येणारी एक विचित्र लढाई लढणारी ही तरुणी म्हणजे दीपिका पदुकोन.
व्यावसायिक यशाच्या ऐन शिखरावर असताना, स्वत:च्या बिघडलेल्या मनाशी झालेल्या झगड्याची ही कहाणी दीपिकाने नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून जाहीरपणे सांगितली आहे.
एरवी बॉलिवूडमधल्या नट-नट्यांचे खासगी आयुष्य ही सर्वसामान्यांसाठी गुपितांची गुहाच असते. पण ती गुपिते असतात त्यांच्या प्रेमजीवनातल्या रोचक तपशिलांची. या तारेतारकांची मिळकत, त्यांचे प्रवास, त्यांची घरे, अगदी त्यांचे कपडेसुद्धा चर्चेत असतात. त्यातून प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असलेल्या दीपिकासारख्या अभिनेत्रीचे आयुष्य म्हणजे इतरेजनांसाठी जणू परीकथाच! - पण वरवर सगळे कसे उत्तम चालले आहे असा झगमगता भास निर्माण करणार्‍या या परीकथेमध्येही अंधारात दडलेले आणि अचानक येऊन दात विचकणारे राक्षस असतात, त्यांच्याशी झगडावे लागते याची कबुली देऊन दीपिकाने आपल्या समाजजीवनातल्या एका महत्त्वाच्या गुपिताचे दरवाजे हिमतीने उघडले आहेत.
हे गुपित आहे आपल्या मनाच्या तळघरातल्या उलथापालथींचे.
आपला जीवलग मित्र शरीराने आजारी झाला तर त्याच्या मदतीला धावून जाणे सोपे; पण शरीराने धडधाकट असणारी, एरवीचे व्यवहार नीट पार पाडणारी कुणी व्यक्ती मनाभोवतीच्या अस्वस्थ गुंत्यातून सुटण्यासाठी झगडत असेल, तर तिला मदतीचा हात मिळणे सध्यातरी दुरापास्तच आहे.
कारण शरीराच्या आरोग्याबाबत जाग्या झालेल्या आपल्या समाजात मानसिक आरोग्याबाबत अजूनही असणारे अज्ञान.
सतत सगळ्याचा कंटाळा येतो, सकाळी अंथरुणातून उठूच नयेसे वाटते, लक्ष लागत नाही, कुणाला भेटू नये, एकटे बसावेसे वाटते, उगीचच रडू येते ही सगळी लक्षणे ‘ड्रामेबाजी’ या सदराखाली ढकलून संबंधित व्यक्तीला चार शब्द सुनावण्याकडेच कल असतो.
- मुळात आपल्याला हे असे होते आहे म्हणजे काहीतरी बिघडले आहे, ते दुरुस्त केले पाहिजे, हे त्या व्यक्तीलाही अनेकदा कळत नाही, कारण तसे प्रशिक्षणच आपल्या व्यवस्थेत नाही. 
- साधे सर्दी-पडसे झाले तरी डॉक्टरांकडे धावणारी आणि ताप आला म्हणून उशापायथ्याशी बसणारी जवळची माणसे एखाद्याच्या मनाचा आजार कसा ओळखू शकणार? 
- मग ती एकट्याची लढाई होते. आपल्याच मनाशी झगडायची वेळ येते, तेव्हा दीपिकासारखाच पोटात खड्डा पडतो आणि रोजचे काम तरी आपल्याला जमेल का, याची शंका मनाला कुरतडू लागते.
बिघडते ते शरीर. मन ही ताब्यात ठेवण्याची गोष्ट. ते जिला जमत नाही अशा व्यक्तीला आधार, मदत मिळण्याऐवजी चार शब्द ऐकून घेणेच वाट्याला येते.
मनाचे डॉक्टर? - ते तर वेड्या लोकांसाठी असतात!
डिप्रेशन? - ते तर सिनेमातल्या हिरॉईनला येते. मग ते अंधार्‍या खोलीतले किंचाळणे, फ्लॉवरपॉट फेकून आरशाची काच फोडणे आणि मूठभर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्त्या! - हे सिनेमात होते. प्रत्यक्षात नाही.
- या सार्‍या पळपुट्या समजुती किती कचकडीच्या आहेत, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेपासून देशातल्या तज्ज्ञांपर्यंत सर्वांनी वारंवार सांगूनही जे झाले नाही, ते दीपिकाच्या एका कबुलीने होऊ पाहते आहे.
सारे काही सुरळीत चालू आहे असे वरवर दिसत असतानाही माणसांना मनाचे आजार होतात, याचा स्वीकार. मनाच्या आजारावर औषधोपचार करावे लागतात, याची जाणीव आणि ‘आपले आतून काहीतरी बिघडले आहे’ हे मान्य करण्याची तयारी!
‘सगळे तर आहे तुझ्याकडे, तुला कशाला डिप्रेशन येईल? - हा प्रश्न किती निर्थक आहे, हे मी अनुभवले आहे. म्हणूनच त्याबद्दल मोकळेपणाने बोलायचे मी ठरवले’ असे दीपिका म्हणते.
(तात्कालिक कारणासाठी) दु:खी असणे वेगळे आणि  ‘डिप्रेस्ड’ असणे वेगळे, त्यात फरक करा, असेही दीपिकाने बजावले आहे.
- अर्थात, हेही खरे, की तिने वेगळे काय सांगितले? भारतामध्ये मानसिक विकारांचे प्रमाण वाढते आहे, तुमच्या मुला-मित्रांकडे आणि स्वत:कडेही लक्ष ठेवा असे या क्षेत्रातले तज्ज्ञ कधीपासून सांगत होतेच. तेच दीपिकाने सांगितले.
- पण समकालीन भारतातल्या  ‘तरुण’ महत्त्वाकांक्षांचा आणि यश-लौकिकाचा जणू मापदंडच ठरलेल्या दीपिकासारख्या एका अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्रीने स्वत:च्या विकल मनाची जाहीर कबुली देणे वेगळे आहे आणि महत्त्वाचेही.
त्यातून मिळणारी हिंमत कितीतरी एकेकट्या लढायांना बळ  देईल.
 
 
सूचना, सल्ले.. आणि आधार!
डिप्रेशन म्हणजे नैराश्य. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार येत्या दहा वर्षांत हा जगातला पहिल्या क्रमांकाचा आजार होईल. नैराश्य हे परिस्थितीशी कमी आणि मानसिकतेशी अधिक निगडित आहे. काहीतरी वाईट घडले किंवा अपेक्षेपेक्षा भिन्न, न आवडणारे घडले तर दु:ख होणे आणि काही वेळा निराश वाटणे शक्य आहे. डिप्रेशन ही मात्र दीर्घकाळ मनाला घेरून असणारी अवस्था असते.
 मेंदूतील काही रासायनिक बदल या अवस्थेला कारणीभूत असतात. आपले काहीतरी गंभीरपणे बिघडले आहे हे जाणवणे आणि ते मान्य करणे ही पायरी अत्यंत महत्त्वाची! वेळीच मानसोपचारतज्ज्ञांकडे जाऊन घेतलेला सल्ला, समुपदेशन, जरूर तर औषधोपचार आणि कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींचा समजूतदार पाठिंबा हा उपचाराचा मार्ग आहे. मनाच्या आजाराशी झगडणार्‍या व्यक्तीला सूचना आणि सल्ल्यांपेक्षा ‘आधार’ हवा असतो.          
- डॉ. संज्योत देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ
 
नैराश्याच्या गुहेत..
 
- मनाभोवती सतत नकारात्मकतेचे मळभ असणे
- अकारण अपराधीपणा वाटणे
- भूक आणि झोप याचे बिघडलेले चक्र
- कुणात मिसळू नयेसे वाटणे
- सतत कंटाळा, निरुत्साह 
- कशातही मन एकाग्र न होणे
- चिडचिड, पटकन राग येणे
- रोजच्या कामाची भीती
 
औषधोपचारांची गरज
- मनाची अस्वस्थ बेचैनी महिनाभरापेक्षा जास्त टिकते तेव्हा
- वर्षातून तीन-चार वेळा असे प्रसंग येतात तेव्हा
- सवयीचे, रोजचे काम करणे मुश्कील होऊन बसते तेव्हा
 
 
- जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात १२ कोटींहून अधिक लोक नैराश्याने ग्रस्त आहेत.
 
- दरवर्षी जगभरात साधारणत: ८.५ लाख आत्महत्त्या होतात. यातल्या ९0 टक्के जणांना सायकोटीक डिसऑर्डर असते, तर सुमारे ७0 टक्के लोक हे क्लिनिकली डिप्रेस्ड (वैद्यकीयदृष्ट्या नैराश्याची शिकार) असतात.
 
- ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या २0१३ साली झालेल्या अभ्यासानुसार भारतात आत्महत्त्या करणार्‍या तिशीच्या आतल्या व्यक्तींमध्ये तरुणींचे प्रमाण अधिक आहे. कारण?- कोणाला सांगता न येणारे नैराश्य!
 
(लेखिका लोकमतच्या पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत)

 

Web Title: In the basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.