व्यक्तिवादी बेटांची युद्धभूमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 03:22 PM2018-02-17T15:22:03+5:302018-02-18T06:42:39+5:30
मी, माझं, मला.. हा व्यक्तिवाद आज सगळीकडे दिसतो आहे. प्रत्येक जण आपल्यापुरतं पाहतो. खासगीकरण, उदारीकरणानंतर तर आर्थिक भूक जास्तच बोकाळली. लेखन, अभिनय, नाटक, सिनेमा, सिरिअल्स.. आणि अगदी व्यक्तिगत आयुष्यातही अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्याची जणू स्पर्धाच लागली आहे ...
- रत्नाकर मतकरी
आजची पिढी काय करतेय, ते कोणत्या पद्धतीनं विचार करतात, त्यांना काय आवडतं, त्यांच्या जगात काय चाललंय, हे समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या जगात थोडंसं डोकावावं लागतं.
नवीन नाटकं, सिनेमा आणि लेख-पुस्तकांमधून आजची पिढी काय करतेय हे दिसतं. नाट्य चळवळीतल्या मित्रांशी मी आज जेव्हा बोलतो तेव्हा प्रायोगिक नाटकांमध्ये तरुणांच्या मनातली अस्वस्थता, खदखद बाहेर येतेय हे ऐकायला मिळतं. पण लिहिताना एखादी ‘पोझ’ घेऊन कोणी लिहू नये. इथं मला पोझ म्हणजे भूमिका अशा अर्थाने म्हणायचं नाही. भूमिका असली पाहिजे; पण पोझ म्हणजे मी अमक्या लेखकासारखा लिहितो अशा समजुतीमध्ये जाऊन लेखकांनी लिहू नये. प्रेरणाही स्वतंत्र विचारांतूनच घेतली जायला हवी.
स्वत:ची विचार करण्याची क्षमता असूनही विनाकारण प्रभावित होणं मला योग्य वाटत नाही. चांगली शैली असूनही क्लिष्ट लिहिणं, उगाचच नवे शब्द तयार करणं, इंग्लिश शब्द वापरणं हे अयोग्य वाटतं. आता ते नैसर्गिकरीत्या आणि सहज येत असेल तर चांगलं. एखाद्या लेखनात इंग्रजी शब्द सहज आले असतील तर ते समजू शकतं; पण ते सगळं ओढून-ताणून केलेलं नसावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लेखन शक्य तेवढं स्वतंत्र हवं. लेखनासकट सर्व गोष्टी प्रामाणिक हव्यात. केवळ दिखाऊपणा, मी म्हणजे ‘उच्चस्तरीय’ विचार करतो असा अभिनिवेश नको. विचार प्रामाणिक असला की बास. तो भले दुसºयांना आवडणार नाही; पण तो माझा आहे एवढं पुरेसं आहे.
आज तरुण आजूबाजूच्या विषयांवर किंवा स्वत:च्या आयुष्यावर लिहीत आहेत. पण ते झालं की त्यांना एकदम रिकामपण येतं. वर्षानुवर्षे साधना केल्यासारखे काही जुने लेखक लिहायचे ते श्रेष्ठ ठरतात, कारण ते सर्वच विषयांवर, सर्वच माणसांना सगळ्यांच वेळी कवेत घेऊ शकत होते. आता ते होत नाही. आता केवळ एखादा एकदम जवळचा विषय घेतला जातो. उदा. : आई-वडिलांचा घटस्फोट हा एकदम जवळचा विषय घेऊन झाला की, दुसरा पुढचा विषय उरत नाही. त्यानंतर त्यांचं लेखन होत नाही. हे लेखन चांगलं असू शकतं कारण ते आतून जाणवून, पाहून लिहिलेलं असतं. त्या विषयाबद्दल त्यांची जवळीकता असते; पण माझ्या मते ही जवळीकता संपूर्ण मानवजातीबद्दल वाटली पाहिजे अन्यथा तुम्ही तुमच्यापुरतेच मर्यादित राहता. हा व्यक्तिवाद मला सगळीकडे दिसतो.
आपला सगळा समाजच व्यक्तिवादी झाला आहे असं दिसतं. १९९१ नंतर म्हणजे खासगीकरण आणि जागतिकीकरण झाल्यापासून लोकांची आर्थिक भूक वाढली आणि माणसं व्यक्तिवादी झाली. मी माझं जास्तीत जास्त कसं बरं करू शकतो याचा विचार सुरू झाला. मग कुटुंबाचे विचारही मागे पडले. आपल्या कल्पनेतील सुखाच्या आयुष्यात कॉम्प्लिकेशन्स यायला नकोत म्हणून मुलंसुद्धा नकोत असा विचार केला जातो. वयस्कर माणसांना आधार नाही आणि तरुणांना संस्कार नाहीत अशा स्थितीत समाज सापडतोय. याच व्यक्तिवादी बेटांचं प्रतिबिंब लेखन, नाटकातही दिसतं.
जे जे देशी, पारंपरिक ते वाईट असं काहीतरी मानण्यामुळे आपलं सगळं जुनाट ठरवलं गेलं.
हा व्यक्तिवाद म्हणजे तरी काय, तर प्रत्येकाने स्वत:च्या विकासाची दिशा ठरवून घेतली आहे. ती दिशा, तो विकास, ती वाढ म्हणजे फक्त आर्थिकच वाढ त्यांना अपेक्षित आहे. मी जास्त पैसे मिळवेन, जास्त चांगल्या नोकºया मिळवेन, वस्तू मिळवेन यासाठी झटापट चालू होते. त्यातून फ्रस्ट्रेशन येतं. कारण आजकालच्या नोकºयांमधील कामाचं स्वरूप, कामाची वेळ पाहिली की तुम्हाला दुसरं काही करताच येत नाही. लेखन-वाचनाची आवड असेल किंवा तुम्हाला मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांना वेळ देता येत नाही. समोर फक्त पैसा असतो. स्वत:चं अधिक चांगलं होण्यासाठी, सतत वरच्या स्तरात जाण्याच्या या प्रवासात नकळत फ्रस्ट्रेशन येतं. तुम्ही करत असलेल्या स्पर्धेमध्ये तुम्ही किती तत्त्वांचा त्याग करणार याचा विचार करा म्हटलं की उत्तर येतं, स्पर्धेत राहायचं म्हणजे आम्हाला हे करावंच लागतं. मग नाइलाजाने का होईना तत्त्वं गुंडाळून ठेवून त्या कराव्या लागतात. या रॅटरेसमध्ये तुम्ही नक्की काय कमावत आहात आणि काय गमावत आहात याकडेही थोडं लक्ष असू द्या. प्रतिष्ठेच्या नावाखाली फरपट कशाला करायची? एकमेकांचं पाहून, याला ती वस्तू मिळाली मग मला का नको, असा विचार कशाला करायचा? ज्या वस्तू मिळवायच्या आहेत त्यातल्या खरोखरच किती आवश्यक, हेही पाहायला हवं.
मला दुसरा एक त्रासदायक प्रकार दिसतो तो म्हणजे प्रेक्षकांची अधोगती. गंभीर विषय, गंभीर हाताळणी नकोच असं त्यांना वाटतं. त्यापेक्षा काहीतरी हलकंफुलकं वरवरचं चटपटीत आवडून घेण्याची त्यांना सवय लागली आहे. त्यात भर घातली ती टीव्ही सिरियल्सने. एकेकाळी मीही सिरियल्स केल्या होत्या; पण ‘गॉन विथ द विंड’सारखी जी कादंबरी अडीच तासांच्या नाटक-सिनेमात बसू शकते ती अनेक भागांमध्ये का दाखवावी? आता तर मालिकांचे ५०० ते १००० भाग व्हायला लागले आहेत. आम्ही करायचो त्या १३ भागांच्या मालिका असत. आता मूर्खपणा जितका जास्त, तितका टीआरपी जास्त असं गणित आहे. हे सगळ्यांच क्षेत्रांमध्ये आहे.
चांगले निर्माते गेले. पूर्वी पणशीकरांसारखा विद्वान माणूस; जो निर्माता, चांगला अभिनेता, उत्तम वाचक, चांगल्या लेखकांशी संबंध असलेला होता.. असे अनेक निर्माते त्यावेळी दिसत; पण आता सगळी इंडस्ट्री मॅनेजर्सच्या ताब्यात गेली आहे. मग डायरेक्टरच म्हणतो, कशाला लेखक पाहिजे. लेखक नकोच शक्यतो सेटवर आणि युनिटवर. मीच लिहून काढतो सिन्स!
आपण सगळे मिळून एकत्रितपणे एखादी चांगली कलाकृती तयार करू हा विचारच संपला. मी माझं नाव मोठं करणार असा विचार होतो. ‘थर्ड असिस्टंट’लाही आपलं काम नीट करण्याच्या, येण्याच्या आधीच डायरेक्टर होण्याचे वेध लागतात. हे सगळ्यांच्या बाबतीत आहे.
व्ही. के. मूर्ती नावाचे एक उत्तम कॅमेरामन होते. त्यांनी गुरुदत्त, देवानंद अशांचे सिनेमे केले होते. त्यांना सगळे लोक विचारायचे, तुम्ही इतके चांगले काम करता, मग दिग्दर्शन का करत नाही? त्यावर ते म्हणायचे, एवढ्या चांगल्या लोकांबरोबर मला काम करायला मिळतं. त्यांचा सिनेमा चांगला होण्यासाठी जितकं करता येईल तितकं मी करतोय की. मग हे सोडून वेगळा डायरेक्टर होण्याची मला काय गरज आहे?
आता बरोबर उलटं आहे. जरा कॅमेरा हाताळता यायला लागला की ते डायरेक्टर आणि मग लेखकही होतात. तोच माणूस मग गाणंसुद्धा लिहितो. अशी एकट्यापुरती अॅम्बिशन तेव्हा नव्हती. आम्ही सगळे एकत्र येऊन एक चांगली कृती करू अशी तीव्र इच्छा, धडपड तेव्हा दिसायची. आम्हाला काय मिळेल असा विचारच नव्हता. पदरचे पैसे घालून आम्ही झोपडपट्टीतसुद्धा नाट्यचळवळ वाढावी यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता सगळे सुटंसुटं काम करताना दिसतात. एक चांगला चित्रपट तयार होण्याऐवजी चार वाईट चित्रपट तयार होतात. यामुळेच आता संघटना नाहीत.
लोक एकत्र येत नाहीत. ज्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या एकत्र येत नसल्याने होत नाहीत. प्रायोगिक नाटकांना जागा मिळत नाहीत. म्हणून मी ‘नाटक तुमच्या दारी’ संकल्पना सुचवली होती. सोसायटीचा हॉल, गच्ची यांवरही थोड्या मदतीने हे प्रयोग करता आले असते. मोठी नाट्यगृहं भाड्याच्या दृष्टीने परवडत नाहीत. अशावेळी १००० जागांपैकी केवळ ३०० तिकिटं गेल्याने नुकसान करण्यापेक्षा ३०० लोकांसाठीच लहान जागी नाटक करायला काय हरकत आहे?
जे जे चांगलं, ते टिकलं पाहिजे. काळाच्या ओघात काही गोष्टी नष्ट होतील, लयाला जातील हे मान्य, पण लाटेबरोबर सगळंच वाहून जायला नको. नव्या संकल्पनांनी त्यांचे आविष्कारही बदलले पाहिजेत. जगवले पाहिजेत.
व्यक्तिवादाकडून समूहाकडे जाण्याच्या विचाराकडेही याच संकल्पनेतून पाहायला हवं..
लोणचं-मुरांब्यासारखं मुरायला हवं
थोडा काळ झाला की मुलांना कंटाळा येतो. एखाद्या क्षेत्रात तुम्ही उतरलात तर लगेच कसं यश मिळेल? मुळात यशाच्या मागे जायचं म्हणून पळापळ केलीत तर ते कधीच मिळणार नाही. तुम्ही काम करा, यश पाठोपाठ येईल. लोणचं, मुरांबा जसं आधी मुरायला हवं तसं तुम्ही त्या क्षेत्रात, नोकरीत मुरलं पाहिजे. ज्या वस्तू-पैसा मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करून नोकरी पकडलीत, ती तरी नीट झोकून देऊन करायला हवी. नव्या पिढीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ते रोज विकसित होतंय मात्र त्याच्या आहारी किती जायचं हे ठरवलं पाहिजे. आजकाल आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चा करून रोबोट वगैरे बनवले जातात; पण आधी नॅचरल इंटेलिजन्स तरी विकसित झालाय का हे कोण पाहाणार?
कुठे गेले ते शिक्षक?
गेल्या चाळीस-पन्नास वर्षांचा विचार केल्यावर मला एक बदल प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे शिक्षणाचा. मी १९५४ साली अकरावी (मॅट्रिक) झालो. कदाचित मला शिकवणाºयांसारख्या शिक्षकांची ती शेवटचीच बॅच म्हणावी लागेल. तेव्हा आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला शिकवायचे, प्रश्न पडले पाहिजेत असं त्यांना वाटायचं. एखाद्या साध्या मुद्द्यावरून ते पुष्कळ नवनवी माहिती द्यायचे कारण त्यांचा स्वत:चा अभ्यास आणि वाचन होतं. तेव्हा चार विषय इंग्रजीत आणि चार मराठीत शिकवले जायचे त्यामुळे महाविद्यालयात गेल्यावर आम्हाला कधीच त्रास झाला नाही. पण आमच्यानंतर सगळंच मराठीत शिकवायला सुरुवात झाली आणि पुढे कॉलेजात गेल्यावर काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मग कॉलेजात इंग्रजीचा त्रास नको म्हणून इंग्रजी शाळेच्याच माध्यमात मुलांना शिकवायची पद्धत निघाली. परवडो अगर न परवडो सगळे इंग्रजी शाळांच्या मागे लागले. यामुळे मराठी शाळांकडे अधिकच दुर्लक्ष केलं जातंय.
शब्दांकन : ओंकार करंबेळकर