बावनकशी

By admin | Published: April 9, 2016 02:36 PM2016-04-09T14:36:28+5:302016-04-09T14:36:28+5:30

मला परमेश्वर भेटला तो स्वरातून. अजाणत्या वयापासून माङया कानावर बालगंधर्वाचे लडिवाळ सूर पडले आणि त्याचे सहीसही अनुकरण करण्याचा एक वेडाच ध्यास मला लागला! जन्मानंतर बाळाला जी बाळगुटी दिली जाते, त्यात घोटीव स्वरांचे वळसेही उगाळून मला मिळाले. बहुधा हीच माङया रियाजाची सुरुवात असावी. श्रवणाच्या रियाजाची. मुळे मातीत घट्ट रुजली होती आणि उंच होण्यासाठी ‘मोकळे आकाश खुले आहे’ हा संदेश बीजाच्या गाभ्यापर्यंत गेला होता.

Bawankees | बावनकशी

बावनकशी

Next
>- आनंद भाटे
 
आयुष्याच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्यांना बालगंधर्व भेटले अशा काही मोजक्या भाग्यवंतांपैकी मी एक. ह्यात माङया कर्तृत्वाचा भाग किती आणि पुण्याचा भाग किती, हा न्याय नाही कदाचित मला करता येणार. पण एक नक्की, आपल्या आयुष्यात परमेश्वर भेटतो असे आपण मानले तर कसा भेटतो तो? एखाद्याला तो रंगातून भेटतो, तर कोणाला शब्दातून. कोणाच्या वाटेवर तो अवचित सावली देणारे झाड होऊन उभा राहतो, तर एखाद्याला अथांग मैत्रीचा असा किनारा होऊन जवळ करतो की उभं आयुष्य त्या उबेत निवांत जाते. 
मला परमेश्वर भेटला तो स्वरातून, बालगंधर्व नावाच्या एका अद्भुत स्वरांच्या किमयेतून. तसे नसते तर अगदी अजाणत्या वयापासून माङया कानावर त्यांचे लडिवाळ सूर पडले नसते आणि त्याचे सहीसही अनुकरण करण्याचा एक वेडाच ध्यास मला लागला नसता..! स्वरांमधून परमेश्वर भेटावा असे वातावरण असलेले कुटुंब मला लाभले. अखंड संगीत वाहत असायचे या माङया घरात. पणजोबा भाटेबुवा यांची नाटक कंपनी होती. ठुमरी आणि नाटय़पदे यात त्यांचा हातखंडा होता. ‘नाटय़पद म्हणजे बालगंधर्व’ असे समीकरण असलेला तो काळ होता आणि या जगात बालगंधर्वाचे स्थान निव्वळ एका कलाकाराचे नव्हते, तर संगीतावर प्रेम करणा:यांसाठी ते साक्षात ईश्वर होते आणि श्रोते त्यांचे वेडे भक्त. आमचे घरही याला फारसा अपवाद नव्हते. यामुळे जन्मानंतर लहान बाळाला जी बाळगुटी दिली जाते, त्यात जायफळ-वेखंडाबरोबर घोटीव स्वरांचे वळसेही उगाळून मला मिळाले. आणि ते स्वरही अगदी चोख बावनकशी शुद्ध होते, बालगंधर्वांचे आणि स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे..! आता असे वाटतेय हीच बहुधा माङया रियाजाची सुरुवात असावी. श्रवणाच्या रियाजाची. कारण अगदी तिस:या-चौथ्या वर्षीच कोणतेही शिक्षण न घेता आणि सहजपणो मी बुलबुल तरंग आणि हार्मोनियमवर गंधर्वांची नाटय़पदे वाजवायला लागलो. ऐकणा:या कोणालाही चमत्कार वाटावे असेच ते दृश्य होते. माङो वय आणि माङो वादन दोन्ही. पण आल्या-गेलेल्यांपुढे या चमत्काराचे प्रदर्शन करीत डोक्यात कौतुकाची हवा भरण्याचा वेडेपणा माङया शहाण्या घराने केला नाही. त्यांनी माङया उत्स्फूर्त कौशल्याला शिक्षणाची शिस्त आणि चौकट मिळावी यासाठी मग माङयासाठी गुरू शोधले. गंधर्वांचे ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे मी नाटय़पद शिकायला जात होतो. त्या काळातील ती नाटय़पदं ‘कशी या त्यजू पदाला’. अशा वळणाची अलंकारिक, सुघड मराठीमधील. त्याचा अर्थ तरी मला कळत असेल? - नक्कीच नाही, पण ते शब्द फार काही अनोळखीही वाटत नव्हते हे नक्की.  
दहाव्या वर्षापासून यशवंतबुवा मराठे यांच्याकडे माङो शिक्षण सुरू झाले आणि माझा स्वरांचा रियाज सुरू झाला. हे माङो गुरू कोणत्याही घराण्याचे नव्हते, तर एक उत्तम संगीत शिक्षक होते. रागसंगीत, त्याची वेगवेगळी अंगं, स्वर-लयीचे त्यातील स्थान हे सगळे काही माङया गळ्यावर एखादा अलंकार चढवावा त्याप्रमाणो चढवणो आणि हे अलंकार पेलण्यासाठी माझा आवाज तयार करण्याचे काम त्यांनी मोठय़ा प्रेमाने केले. तो काळ एक कलाकार म्हणून माझा सांभाळ करण्याच्या दृष्टीने माङया कुटुंबासाठी मोठा गमतीशीर होता. तिस:या वर्षी हार्मोनियम वाजवत गंधर्वाची पदे गाणारा भाटेबुवांचा हा पणतू एव्हाना दहा वर्षाचा होऊन बालगंधर्वांची नाटय़पदं गाणारा  ‘आनंद गंधर्व’ म्हणून कमालीचा गाजत होता. 
हिराबाई बडोदेकर यांची माङयावर असीम माया. त्यांच्या घरी कोणीही कलाकार आला की या ‘आनंद गंधर्वा’ची त्यांच्यापुढे हजेरी ठरलेली असायची. मग ते वसंतराव किंवा पु. ल. देशपांडे असोत नाहीतर पंडित रविशंकर, अल्लारखासाहेब असोत.! 
सकाळी साडेपाच वाजता उठून खर्ज आणि ओंकाराचा रियाज, मग माझा अभ्यासाचा क्लास, तो संपला की यशवंतबुवांकडे शिक्षण आणि संध्याकाळी पुन्हा ताना-पलटे याचा रियाज. माङया या गुरूंची खासियत म्हणजे आवाजाला फिरत यावी म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त:हेत:हेच्या अनेक ठुम:या पाठ करून घेतल्या. आलापांचे स्वरात नोटेशन करणो आणि ते पाठ करायला लावले. पुढच्या गुरूकडे जाणारा मार्ग तेव्हा निश्चित नसेल, पण मुळे मातीत घट्ट रु जली होती आणि उंच होण्यासाठी ‘मोकळे आकाश खुले आहे’ हा संदेश बीजाच्या गाभ्यार्पयत गेला होता.. आणि या वळणावर भेटले पंडित भीमसेनजी. ज्यांचे गाणो सकाळी सूर्यप्रकाशाबरोबर आमच्या घरात यायचे आणि चंद्र मावळेपर्यंत अंगणात असायचे ते भीमसेनजी. एकीकडे बालगंधर्व हे त्यांचे दैवत आणि दुसरीकडे किराणा गायकी हे निस्सीम श्रद्धास्थान. लहानपणी ज्या गंधर्व गायकीचे अनुकरण करीत मी स्टेजवर निर्भयपणो गात होतो त्या गायकीचे मर्म, त्यामागचा सांगीतिक विचार मला त्यांनी उलगडून सांगितला. 
स्वरांमधील लाडिक लोच, नखरेल मुरक्या आणि खटक्या यातील सौंदर्य आणि त्याचा वापर याकडे बघण्याची नजर त्यांनी मला दिली. पंडितजी फार बोलत नसत. पण जे काही सांगत, बोलत ते अगदी मार्मिक. आणि त्यांचे शिकवणो? 
- ते अगदी शास्त्रशुद्ध, एखाद्या शिक्षकाप्रमाणो. 
पूर्वीचे गुरू दिवसाच्या चार प्रहरांचे चार राग  शिष्याला शिकवत, पण त्यातून त्या गायकीची खोलवर समज शिष्याला देत. पंडितजींनी मला याच त:हेने किराणा गायकीची सौंदर्यस्थळे दाखवली. स्वरांचे आकार, त्याची गोलाई, लयीशी खेळत गाणो पुढे नेण्याचा अंदाज आणि हे करीत असताना समोरच्या श्रोत्यांचे अवधान. पंडितजींकडे शिकलो ते फक्त संगीत शिक्षण नव्हते, त्यात मैफलीची मांडणी कशी करायची इथपासून श्रोत्यांची मानसिकता कशी ओळखायची असा संगीत ते मानसशास्त्र असा मोठा पल्ला होता. या शिक्षणाचे प्रात्यक्षिकही मग थेट त्यांच्या मैफलीतून मिळायचे. या सगळ्या अनुभवाने मला बालगंधर्वांची पुन्हा नव्याने, माङया जाणत्या वयात भेट घालून दिली. वयाच्या दहाव्या वर्षापासून मी मांडी घालून गुरूपुढे बसून स्वरांचे धडे घेतोय. प्रत्येक टप्प्यावर रियाजाची जातकुळी भले बदलत नसेल, कारण शेवट गायकी ज्या स्वरांच्या आधारे मांडायची ते स्वर सतत घासून-पुसून लखलखीतच ठेवायला हवेत ना. त्यामुळे रोजच्या रियाजाला पर्याय नाहीच. पण या मेहनतीत असा एखादा क्षण येतो, जेव्हा काहीतरी अनवट, आजवर न सुचलेले झपकन स्फुरते, सुचते. तेव्हा वाटते, आज काहीतरी नवे मिळाले. जे आजवर दिसले नव्हते. आणि सतत शोध याचाच तर असतो.. 
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे
vratre@gmail.com

Web Title: Bawankees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.