निर्भय बना

By admin | Published: August 26, 2016 04:51 PM2016-08-26T16:51:17+5:302016-08-26T17:28:21+5:30

गांधींचं अहिंंसा, सत्य आणि आंबेडकरांची समानता व लोकशाही ही मानवाच्या भवितव्यासाठी फार मोठी मूल्यं आहेत. त्यांची हानी होऊ नये म्हणून माणसांना जोडत विचारप्रवृत्त करणारा एक प्रयत्न म्हणजे ‘दक्षिणायन’

Be fearless | निर्भय बना

निर्भय बना

Next

 - डॉ. गणेश देवी

‘दक्षिणायन’ म्हणजे?
तीन प्रकारांनी हा अर्थ सांगतो. हा वर्षाचा असा काळ जेव्हा रात्र मोठी असते. सांस्कृतिक, सामाजिक वातावरणामध्ये अशी लक्षणं गेली काही वर्षं दिसायला लागली आहेत. ‘ग्लोबल नॉर्थ’ आणि ‘ग्लोबल साउथ’ म्हणजे श्रीमंत आणि गरीब देश असं आपण म्हणतो. आपला देशही आता नवीन आर्थिक प्रगतीच्या रस्त्यावर आहे. मात्र ज्यावेळेस श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी फार वाढत जाते, अशावेळी वंचित लोकांकडे वळणं म्हणजे दक्षिणायन. देशातल्या सगळ्या गोष्टी आजकाल दिल्लीकेंद्रित बनल्या आहेत. महापालिकेचा महापौर कोण व्हावा याचे निर्णयसुद्धा दिल्लीतून होतात. तर उत्तरेकडे जे सगळे डोळे लागून आहेत ते थोडे जमिनीकडे, दक्षिणेकडे वळावेत म्हणूनही दक्षिणायन. वापरून गुळगुळीत, बोथट झालेले अभियान, आंदोलन, चळवळ असे शब्द मी यासाठी वापरणार नाही. त्याऐवजी एक नवी कल्पना ज्यात स्वत:च्या कल्पनाशक्तीला ढवळून स्वत:चं एक चांगलं, नवं प्रगतिशील कल्पनाविश्व बनवता यावं या दृष्टीने हा शब्द आला. 
हे कुठल्या पक्षाचं नाव नव्हे. कुठल्याही निवडणुका किंवा कुठल्याही पक्षाच्या बाजूनं अथवा विरोधात काम करणं हा या सगळ्याचा हेतू नाही. इथं कुणीही नेता नाही. आम्ही सगळे समान आहोत व प्रत्येकजण आपल्या पद्धतीने योगदान देतो आहे. ‘दक्षिणायन’ केवळ संगीत, नाटक, साहित्य यासाठी नाही, तर तो एक सामाजिक विचारांचा जागर, समविचारींची गुंफण आहे. देशातील वाढता तणाव, हिंंसक घटना, लेखकांवरील हल्ले याचा निषेध म्हणून साहित्य अकादमीचे पुरस्कार परत देण्याची कृती साहित्यिकांकडून घडली, तिचं लोण पसरत गेलं तेव्हा त्यावर राजकीय पक्षांकडून आरोप झाला की हा ‘मॅन्युफ्रॅक्चर्ड रिवोल्ट’ - ठरवून उभं केलेलं क्रांतीचं कारस्थान आहे व ते बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेलं आहे. खरंतर आम्ही सगळ्या लेखकांनी कुठलीच बैठक न घेता, एकमेकाला न विचारता पुरस्कार परत केले होते. या कृतीतून देशातल्या गढूळ वातावरणाविषयी, विचारवंतांच्या हत्त्यांविषयी बेफिकिरी दाखवणाऱ्या यंत्रणेबद्दल एक आक्रोश व वेदना प्रकट झाली. भारताच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याचे, कलेचे पुरस्कार परत करण्याची गोष्ट कधी झाली नव्हती. याचा काहीतरी विस्तृत, विशाल अर्थ आहे. केवळ कुठल्यातरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लेखक ही कृती करत नाहीयेत हे स्पष्ट व्हावं म्हणून मी दक्षिणेच्या राज्यांमध्ये लोकांशी चर्चा सुरू करावी हे ठरवलं. मग दाभोलकर, पानसरे आणि कळबुर्गी कुटुंब यांची भेट घेऊन सुरुवात करावी हेही ठरवलं. काही गुजराथी लेखक जमले आणि आम्ही पुण्यात आलो. तिथं मोठी सभा झाली. महाराष्ट्रात प्रगतिशील विचाराला अजूनही जागा आहे यावर विश्वास वाढवणारा प्रतिसाद तिथे मिळाला. त्यानंतर कर्नाटकमध्ये गेलो. हा संपूर्ण प्रवास कुठल्याही यात्रा प्रकारातला नव्हता. संवादाचा प्रयत्न होता. ३० जानेवारी म्हणजे हुतात्मादिनी दांडी ही जागा निवडली. तिथूनच चिमूटभर मीठ उचलून गांधींनी ब्रिटिशांची सत्ता परतवून लावण्याचं पाऊल उचललं होतं. देशातल्या सगळ्या राज्यातून तिथं सातशे व्यक्ती उपस्थित होत्या. त्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम नव्हता. फक्त राजमोहन गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये देशाला निर्भय बनण्याची शिकवण दिली होती याची आठवण करून दिली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतून बैठका व चर्चा घडू लागल्याची माहिती मला मिळाली. कर्नाटक व गुजरातमध्येही हे घडलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये एक विशाल दृष्टिकोन दिलेला आहे. भारत समानता असणारा एक लोकशाही देश व्हावा जो जाती व धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करतो! ही फार मोठी शिकवण आहे. गांधींचं अहिंसा, सत्य आणि आंबेडकरांची समानता व लोकशाही ही मानवाच्या भवितव्यासाठी फार मोठी मूल्यं आहेत. या तत्त्वांची हानी होऊ नये यासाठी ‘दक्षिणायन’ विचारप्रवृत्त करण्याचा व जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलं.

‘दक्षिणायन’च्या नेतृत्वाखाली ३० आॅगस्टला धारवाडला कार्यक्रम होतोय, मग पुढे?
या दिवशी डॉ. कळबुर्गींना जाऊन एक वर्ष होईल. दाभोलकरांना अंनिससारख्या संस्थेचं आणि पानसरेंबाबतीत पक्षाचं पाठबळ उभं असल्यामुळे त्यांची हत्त्या झाल्यापासून काही कार्यक्रम विशिष्ट दिवशी राबवले जातात. असंतोष व्यक्त होतो. कळबुर्गी स्कॉलर होते. पुस्तकं लिहिणं, मतं व्यक्त करणं, संशोधन करणं हे त्यांचं काम होतं. त्यांना असं संस्थात्मक पाठबळ नव्हतं. म्हणून सहा महिन्यांपूर्वी विचार करून मी व माझी पत्नी धारवाडला भाड्याचं घर घेऊन राहू लागलो. तिथल्या समविचारी लोकांशी बोलून, त्यांना एकत्र आणून काही योजना सुरू केल्या. त्या राजकीय नाहीत, सामाजिक, वैचारिक आहेत. 
३० आॅगस्टला जवळपास सहा ते सात हजार लोक धारवाडला जमताहेत. त्यात जास्तीतजास्त महाविद्यालयातील व विद्यापीठातील तरुण असतील. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, कोलकाता, गोवा, बंगाल, पंजाब, दिल्ली इथूनही माणसं येताहेत. बॅनर्स, झेंडे, घोषणा असं काहीही न करता एक मूक मोर्चा कळबुर्गींच्या घरापासून आम्ही काढणार आहोत. नंतर बारा ते चारपर्यंत होणाऱ्या चर्चा व विचारमंथनात जवळजवळ चाळीसएक माणसं बोलणार आहेत. भूमिका पक्की करण्याचा हा एक टप्पा. 
पुढे १८ ते २० नोव्हेंबर गोव्यामध्ये एक संमेलन होतं आहे. ज्यांना संस्कृती, सामाजिक प्रगतिशील विचार, समानता आणि लोकशाही या चार गोष्टींसाठी काम करावंसं वाटतं त्या सगळ्या नेटवर्क्सची सभा डिसेंबरच्या १० व ११ तारखेला पुण्यात होईल. ही सगळी नेटवर्क्स एकत्र येऊन लांब पल्ल्यासाठी कृतिशील होतील.

नाव नसणारी, न बोलणारी सामान्य माणसं... ती कचरतात, घाबरतात.. त्यांचं काय? 
सत्तेपुढे लोक नमतात. शेतकरी किंवा ग्रामीण लोक नव्हे, तर खास करून शहरी मध्यमवर्ग स्वत:ला मिळणाऱ्या सुखांमध्ये काट येऊ नये यासाठी सावधपणानं वागण्याचं धोरण ठेवतो. मात्र शहरात असलेली ही मध्यमवर्गातली माणसं असंवेदनशील नाहीत. त्यांना गोष्टी समजतात. आपल्याकडे लोकशाहीची चौकट आहे तेव्हा योग्य वेळी ते आपली मतं गुप्त मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. 
दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये जेव्हा नवीन विचार आला, त्या-त्या वेळी बुद्ध, कबीर, नानक, तुकाराम किंवा गांधी या प्रत्येकाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे- ‘निर्भय बना!’ देशात कुठल्याही जातिधर्माचा माणूस असो, तो असं म्हणणार नाही की यांपैकी अमुकचा विचार मला मान्य नाही. आपण सगळे जर या व्यक्तींना मानतो तर याचा अर्थ निर्भयता ही समाजजीवनाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची गोष्ट आहे.
काही लोक बोलत नाहीत. पण मी म्हणतो, ते आत्ता नसतील बोलत, पण लोकशाहीने दिलेल्या मार्गावर चालत योग्यवेळी ते सुयोग्य अभिव्यक्तीचं हत्त्यार जरूर वापरतील. आपल्या देशातल्या ‘लोक’ नावाच्या तत्त्वाचं शहाणपण व सूक्ष्म-अतिसूक्ष्म समज (मोस्ट रिफाइण्ड अंडरस्टँडिंग) यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतही ते फार सुयोग्य निर्णय करतात. त्यामुळे त्यांना फार दिवस भिववणं, नमवणं, दडपणं शक्य होणार नाही. कुणी कितीही दडपलं, विवेकवाद्यांचे खून केले तरी नागरिक म्हणून कर्तव्य करायला लोक चुकणार नाहीत. हाच या देशाचा महान गुण आहे. तेव्हा लोकांवर श्रद्धा ठेवून आपण बुद्धिप्रामाण्यवादी, प्रगतिशील समतावादी विचार निर्भयपणे पसरवत राहिले पाहिजे. 

परस्परांना जोडून ताकदीचा गुणाकार 
करू पाहणारं एक संवादोत्सुक
रचनात्मक व्यासपीठ म्हणजे ‘दक्षिणायन’.
येत्या मंगळवारी म्हणजे
३० आॅगस्टला डॉ. कळबुर्गींच्या हत्त्येला
एक वर्ष पूर्ण होत आहे.
त्यादिवशी धारवाडमध्ये देशभरातून
काही माणसं एकत्र येत
या नव्या व्यासपीठाची वाटचाल ठरवणार आहेत.

Web Title: Be fearless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.