धीर धर. मान जा.
By admin | Published: December 12, 2015 05:37 PM2015-12-12T17:37:21+5:302015-12-12T17:37:21+5:30
रोजच्या धबडग्यात आपला स्वत:शीच कितीसा संवाद होतो? मुळात त्याचा अवसर तरी आपल्याला मिळतो का? स्वत:मध्ये डोकावून बघायची, झाल्या गोष्टींचा हिशेब मांडायची कलात्मक संधी हिंदी चित्रगीतांनी आपल्याला वेळोवेळी मिळवून दिली आहे.
Next
>- विश्राम ढोले
एरवी रोजच्या धकाधकीत, इतरांशी सतत होणा:या संवाद-विसंवादात आपण स्वत:शीच खोलवरचा संवाद कधी साधतो? नेहमी इतरांना भेटण्याच्या घाईत असलेल्या आपल्याला स्वत:ला भेटण्याचा निवांतपणा कधी मिळतो? सदैव दुस:याला समजावून सांगण्याचे, पटवून देण्याचे प्रयत्न करताना स्वत:ला समजून घेण्याचा, स्वत:ची समजूत काढण्याचा प्रसंग आपल्या वाटय़ाला कधी येतो? असे प्रसंग खरंतर दुर्मीळच असतात. कधी ते एखाद्या अटीतटीच्या निर्णयाच्या स्थितीत येतात तर कधी मानसिक आंदोलनातून. काहीच सुचत नाही अशा किंकर्तव्यमुढ अवस्थेमुळे कधी ते येतात तर कधी दु:ख किंवा निराशेतून. या परिस्थितीशी सामना करणारे मन मग स्वत:शीच संवाद साधते. स्वत:मध्ये डोकावून बघते. झाल्या सा:या गोष्टींचा जमाखर्च मांडते. स्वत:ला दोष देते आणि आधारही. किंबहुना, असा आधार मिळावा या मानवीय ऊर्मीपोटीच हा खोलवरचा स्वसंवाद चाललेला असतो. प्रतिभावंतांच्या अशा स्वसंवादातून श्रेष्ठ कलाकृती निर्माण होतात आणि त्या कलाकृती मग तसाच संवाद इतर संवेदनशील मनांमध्येही जागृत करतात.
एरवी प्रणयी प्रेमाच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या हिंदी चित्रपटांमधील काही मोजकी गाणी अशा स्वसंवादाचीही उत्कट अनुभूती देतात. व्यावसायिक गणितांच्या मर्यादेची वेस ओलांडत कलाकृती म्हणून स्वत:ला सिद्ध करतात. ‘चित्रलेखा’मधील (1964) ‘मन रे तू काहे न धीर धरे’ हे त्यापैकी एक श्रेष्ठ गाणो. रफीने गायलेल्या सर्वोत्तम गीतांमधील एक आणि रोशनच्या सर्वश्रेष्ठ रचनांमधीलही एक. सांगितिकदृष्टय़ा चित्रलेखा ऐतिहासिक महत्त्वाचा असला, तरी चित्रपट म्हणून अतिशय सुमार होता. खरंतर हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक भगवती चरण वर्मा यांच्या चित्रलेखा नावाच्या गाजलेल्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. जुनेजाणते दिग्दर्शक केदार शर्मांनी त्यावर पहिल्यांदा 1941 साली चित्रलेखा काढला. नंतर 1964 साली त्यांनीच नव्या कलाकारांसह चित्रलेखा रंगीत रूपात सादर केला. पण संगीत वगळता बहुतेक सा:याच पातळ्यांवर चित्रपट फसला. वर्मांनी चित्रलेखा कादंबरीमध्ये मौर्यकालीन विलासी सरदार बीजगुप्त आणि नर्तकी चित्रलेखा यांच्या प्रेमकथेच्या माध्यमातून पाप कशाला म्हणायचे, पुण्य कशाला म्हणायचे, भोगविलास आणि वासनांचे काय करायचे, जीवनाची इतिकर्तव्यता वैराग्यात मानायची की विलासात यांसारख्या भारतीय मनाला सतत पडणा:या प्रश्नांची संवेदनशील मांडणी केली होती. हे खोलवरचे मानसिक द्वंद्व चित्रपटातून जरी पोहचत नसले तरी गाण्यांमधून त्याचा प्रत्यय येतो. ‘मन रे तू काहे न धीर धरे’ मधून तर सर्वाधिक. रफीचा गहिरा, आश्वासक सूर, मोरपीस फिरविल्यासारखा अनुभव देणारे रोशनचे हळुवार संगीत आणि शुद्ध हिंदीचा गेय लहेजा लाभलेले साहिरचे शब्द या गाण्याला एक विलक्षण स्थैर्य देतात आणि ऐकणा:याला विलक्षण शांतता. भोगविलासामध्ये ‘अचपळ मन माङो नावरे आवरिता’ अशी अवस्था झाली असताना, त्यात वैयर्थता पाहणारा पारंपरिक भारतीय स्व आपल्याच मनाला समजावितो- मन रे तू काहे न धीर धरे. वो निर्मोही मोह न जाने जिनका मोह करे.
रंग, रूप, गंधांनी बांधलेल्या, वाढ आणि घट होणा:या या मोहमयी, स्वप्नवत जगाचा मोह करण्यापेक्षा ते निर्माण करूनही निर्मोही- निरंकार राहणा:या ईश्वरी तत्त्वाचा ध्यास घे असे सांगत हा स्व मनाला संयम राखण्याचा उपदेश करतो. तुङो जगणोही क्षणाचे आणि तुङया प्रियजनांची सोबतही. जेवढा सहवास लाभला तेवढय़ावर समाधान मान. तू जन्मालाही एकटाच आला आणि मरणारही एकटाच. म्हणूनच मोह न करता, संयम राख, धीर धर असे एका विलक्षण आश्वासक सुरात हे गाणो या अचपल-अधीर मनाला समजावत राहते. इथे गाण्याच्या ओळींमधून थेट व्यक्त होणारा अर्थ तसा मर्यादित आहे. गीतलेखनाच्या मर्यादांमुळे थोडा संदिग्धही आहे. पण पारंपरिक हिंदू संस्कार झालेले किंवा त्याच्याशी परिचय असणारे मन त्यातल्या गाळलेल्या जागा सहज भरून काढू शकते. सुरांमधून, लयीमधून, सांगितिक ध्वनींमधून या गाण्याचे व्यापक आश्वासक आवाहन समजून घेऊ शकते आणि त्यात विलक्षण शांतीही अनुभवू शकते. ‘मन रे’ मधील धीर धरण्याच्या आवाहनाला खरी ऊर्जा मिळते ते त्याला अनुरूप अशा शांत रसातून. एरवी भारतीय सौंदर्यशास्त्रतील नवरसांमध्ये हिंदी गाण्यांना सर्वाधिक आकर्षण ते शृंगाराचे. परंतु आत्यंतिक ‘रती’नंतर भारतीय मनाला होणारी ‘उपरती’ व्यक्त करण्यासाठी लागतो तो शांतरसच. म्हणूनच ‘मन रे’ मधील ठेहराव खूप वेगळा आणि विलक्षण वाटतो.
‘मन रे’ मधील या शांत रसाशी, त्यातील आवाहनाशी एका वेगळ्या पातळीवर नाते सांगणारे अतिशय सुंदर गाणो अलीकडेच येऊन गेले. ‘ये जवानी है दिवानी’मधील (2क्13) ‘ए कबीरा मान जा’ म्हणजे त्याच खोलवरच्या स्वसंवादाचा, स्वत:ची समजूत घालण्याच्या प्रयत्नाचा, त्यातून येणा:या त्याच गाढ शांततेचा ताजा, दमदार आविष्कार. प्रीतमने संगीत दिलेले ‘कबीरा मान जा’ हे ‘मन रे’ पेक्षा सांगितिकदृष्टय़ा फारच वेगळे आहे. शास्त्रीय, सुफी आणि रॉक यांची एक विलक्षण एकात्मिक गुंफण त्यात आहे. त्यात येणारे रेखा भारद्वाज आणि टोची रैनाच्या सुरांची जातकुळीही तशी हिंदीतील प्रमाण-प्रस्थापित सुरांच्या जातकुळीपेक्षा वेगळी. या गाण्याची लय वेगवान, वाद्यमेळातून निर्माण होणारा ध्वनिकल्लोळ मोठा आणि सूरही वरच्या पट्टीतील. तरीही ‘ए कबीरा मान जा, ए फकिरा मान जा’ मधून अनुभवायला येतो तो आश्वासक शांतरसच. इथेही मनाला स्थिर होण्याचाच सल्ला आहे. रेखा भारद्वाजच्या अतिशय वेगळ्या, भावपूर्ण सुरातील छोटय़ा आलापानंतर येणारी ‘कैसी तेरी खुदगर्जी, ना धुप चुने ना छाँव’ ही शांत, संयमी तक्र ार मनाचा एकदम ठाव घेते. तिचीही तक्र ार तीच आहे. सदैव नित्यनव्या मोहाच्या शोधात असलेल्या मनाला कशाचाच ठाव नाही, त्याची पावले कुठेच स्थिर होत नाही, मनाचे वढाय वढाय सारखे सुरूच असते हीच तिची तक्र ार आहे. अचपळ मनाने सात समुद्र पार केले, स्वत:च स्वत:चे प्रेषितपण घोषित केले तरीही ही आंतरिक अस्वस्थता का, सारे सागर पार करूनही मन आतून कोरडे का, वादळासारखी ऊर्जा अंतरी असूनही अशी मरगळ का, हा एका मनाने दुस:या मनाला केलेला सवाल आहे. हे गाणो या प्रश्नाचे उत्तरही देते- हे कोरडेपण, ही मरगळ, ही अस्वस्थता मनाच्या अस्थिरतेतून आली आहे. कशाचीच धड स्वीकृती न करता नुसते भिरभिरत राहण्यातून आली आहे. जमिनीतील आपली मुळं, जमिनीवरची आपली सावली आणि आपल्या आंतरिक ऊर्मी न ओळखण्याच्या वृत्तीतून ही अस्वस्थता, कोरडेपणा नि मरगळ आली आहे.
मन रे मध्ये संयमाचे, धीर धरण्याचे आवाहन आहे. कबीरामध्ये स्थैर्याचे, स्वशोधाचे आवाहन आहे. ‘मन रे’ प्रमाणो इथेही ओळींमधून थेट येणारा अर्थ मर्यादित आहे. अमिताभ भट्टाचार्याची शब्दकळा आकर्षक असली तरी संदिग्ध आहे. पण कबीरा, पैगंबर, मस्त मौला, मस्त कलंदर यांसारख्या शब्दसमूहातून व्यक्त होणारे सुफी काव्यकलेचे आणि अर्थातच तत्त्वज्ञानाचे अवकाश ओळींमधून गाळल्या गेलेल्या अर्थाच्या सा:या जागा भरून काढायला मदत करते. अप्रमाणित पण मातीचा सुगंध लाभलेल्या सुरांमधून, वेगवान लयीमधून आणि तीन सांगितिक संस्कारांच्या मुशीतून तयार होणा:या ध्वनिकल्लोळामधून या गाण्याचे व्यापक आश्वासक आवाहन समजून येऊ शकते आणि त्यात विलक्षण शांतीही अनुभवू शकते. गाण्याच्या अखेरीस विरत विरत जाणारी गिटार व इलेक्ट्रॉनिक वाद्यांची आवर्तने ती शांतता अधोरेखित करत जातात. बाहेरच्या जगात गुंतण्यापेक्षा स्वत:ला ओळखून स्थिरमती होण्याचे आवाहन हे गाणो अतिशय सार्थकपणो पोहचविते. ऐकणा:याच्या मनाला ‘मान जा’ असे करत राहते.
म्हणूनच ‘मन रे’ असो की ‘कबीरा’ ही गाणी जरी चित्रपटातील असली तरी ती चित्रपटापुरती मर्यादित राहत नाही. ती बीजगुप्त आणि चित्रलेखासारख्या ऐतिहासिक काळातील पात्रंच्या किंवा कबीर थापर आणि नैना तलवारसारख्या उत्तर आधुनिक काळातील पात्रंच्या संदर्भात येत असली तरी ती फक्त त्या पात्रंची गाणी राहत नाहीत. प्रेमविलास किंवा विवाहबंधन यासारख्या मुद्दय़ाच्या पाश्र्वभूमीवर येत असली तरी ती फक्त त्यातील पेचापुरती मर्यादित राहत नाहीत. या गाण्यातील शब्दकळा, त्यातून प्रत्ययाला येऊ शकणारी अर्थाची खोली आणि गाण्याच्या सूर-संगीतातून साकारणारी आश्वासक शांतता त्यांना पात्रंच्या, कथेच्या आणि चित्रपटाच्या बंधनातून मोकळा करते. म्हणूनच बाहेरच्या जगात गुंतताना स्वत:शी संवाद तुटल्याची भावना बाळगणा:या कोणालाही ही गाणी मोरपिसासारखा आश्वासक स्पर्श करू शकतात. स्वत:मध्ये डोकावून बघायला, झाल्या सा:या गोष्टींचा जमाखर्च मांडायला, दोष शोधायला आणि आधार मिळवायला ही गाणी एक सहजसोपे पण कलात्मक अवकाश मिळवून देतात. म्हणूनच बाहेरच्या मंत्रहीन, क्रियाहीन, भक्तिहीन कोलाहलामध्ये स्वत:शी संवाद करू पाहणा:यासाठी हिंदी चित्रपटातील अशी गाणी म्हणजे एक सेक्युलर प्रार्थना ठरतात.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com