घाबरण्यापेक्षा तयारीत असावं, हे उत्तम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 06:03 AM2021-05-23T06:03:00+5:302021-05-23T06:05:10+5:30
लक्षात ठेवा, माणसं चांगली असतात, त्यांना मदत करायची इच्छाही असते... मात्र ती मदत कशा तऱ्हेनं हवी याचे स्पष्ट संकेत किंवा सूचना जाणं गरजेचं असतं.
- लोकमत न्यूज नेटवर्क
आपल्याला कोविडने गाठलं तर? असा विचार करुन सतत भीतीच्या छायेखाली राहण्यापेक्षा आजारी पडलोच तर काय करायचं याची तयारी करून निर्धास्त राहण्याचा पर्याय केव्हाही सुखाचा ! लक्षात ठेवा, माणसं चांगली असतात, त्यांना मदत करायची इच्छाही असते... मात्र ती मदत कशा तऱ्हेनं हवी याचे स्पष्ट संकेत किंवा सूचना जाणं गरजेचं असतं.
काय करायची तयारी?
1. रोज घ्यावी लागतात अशी किमान चार आठवड्यांची औषधं हाताशी हवीत याची काळजी घ्या. या औषधांशिवाय ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी यावरची पॅरासिटामोलसारख्या टॅब्लेट्स, व्हिटॅमिन्स, अँटी अॅलर्जिक टॅब्लेट्स, आवडत्या चवीचं खोकल्याचं औषध स्टॉकमध्ये असायलाच हवं. वाफ घेण्याचं मशीन, ऑक्सिमीटर, थर्मामीटर याही गोष्टी घरात असायला हव्यात. नेहमीच्या मेडिकल स्टोअर शिवाय आणखी एखाद्या शॉपीचा नंबर हाताशी ठेवणं उत्तम.
2. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारं अन्नधान्य किमान महिनाभर पुरेल इतकं हाताशी हवंच. पूर्ण काळजी घेऊन छोटी खानावळ चालवणारे, घरगुती डबा देणारे लोक माहिती हवेत, त्यांचाही नंबर हाताशी ठेवावा. मेडिकल, वाणसामान, शेजारीपाजारी, डॉक्टर, तुमचा स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे संपर्क ठेवण्यानं घरातल्या कुणालाही ऐनवेळी शोधाशोध करावी लागणार नाही.
3. हाऊसिंग सोसायटीत राहत असाल, तर ‘सोसायटी व्हॉट्सअॅप ग्रुप’ टाळण्यापेक्षा त्यात वेळेनुसार राहा. शेजाऱ्यापाजाऱ्यांची माहिती असू द्या. कधी त्यांना गरज असेल, कधी तुम्हाला ! वेळ येऊन ठेपल्यावर जागं होण्यात काय अर्थ? कुणी मेडिकल प्रोफेशनमधलं असेल, कुणी कायद्याचे मार्गदर्शक, कुणी छोटेखानी मेस चालवू शकणारं, कुणी पुस्तकांचा व सिनेमांचा साठा असणारं. एकमेकांसाठी कधी काय उपलब्ध करून द्यायचं ते ठाऊक असेल तर रिलॅक्स वाटेल. सोबत वाटेल. घरच्या ड्युप्लिकेट चाव्या जवळ राहणाऱ्या एखाद्या विश्वासू शेजाऱ्याकडे व नातेवाईक-मित्राकडे देऊन ठेवाव्यात. गरज पडलीच तर त्यांना तुमच्यापर्यंत मदत पोहोचवणं सोयीचं जाईल.
4. ‘सपोर्ट ग्रुप’ तयार करा. लहान ग्रुपमुळं एकमेकांकडे काटेकोर लक्ष असेल. कुणी आजारी असेल तर नेमकी मदत करणं, भावनिक सोबत करणं सोपं जाईल. आजारी माणसाची तास दोन तासानं खबरबात घेत राहण्यानं परिस्थिती एकदम हाताबाहेर जात नाही ना याची खात्री राहील. तशी झालीच तर वेगात मदत पोहोचवता येईल. आपल्याला नक्की मदत मिळेल या भरवशामुळे सारखं भीतीच्या छायेत राहावं लागणार नाही.
5. एकटेच राहत असाल तर दिवसातून किमान एकदा कुटुंब किंवा जवळच्या मित्रमंडळींशी, कुटुंबाशी संपर्कात राहा.
6. तुमचे नेहमीचे डॉक्टर कुठले? तुम्ही रोज कुठली औषधं घेता? व्हिटॅमिन्स, थायरॉईड, डायबिटीस, ब्लड प्रेशर, अस्थमा - कशाहीसाठी ! ही यादी तुमच्या मोबाईलवर नोट्समध्ये किंवा टेक्स्ट मेसेजचे रूपात हाताशी हवी. आजारी पडल्यावर कदाचित सांगण्या इतकी उसंत मिळाली नाही तरी तुमच्या जवळच्या मित्रांना व कुटुंबीयांना ही यादी माहिती असेल. ते योग्य काळजी घेतील.
7. कधीकधी खाजगीपण राखण्यासाठी मोबाईल लॉक केलेला असतो. संपूर्ण मोबाईल लॉक करण्याऐवजी काही खासगी अॅप लॉक करणं हा पर्याय आपण वापरू शकतो. त्यामुळे तातडीच्या वेळी आपला फोन घेऊन संबंधित मेडिकल माहिती अथवा फोन डायरी मदत करणाऱ्यांना वापरता येऊ शकते.
8. मेडिकल इन्शुरन्स पेपर सापडतील अशा ठिकाणी ठेवा. इन्शुरन्स एजंटचं नाव, संपर्क व पेपर्सची आवश्यक ती माहिती जवळच्या लोकांना असणं जरूरीचं आहे.
9. तुमचे मित्रमैत्रिणी आणि तुमचं कुटुंब यांचा खाजगीपणा जपण्याची ही वेळ नाही. त्यांची ओळख करून द्या. तातडीची वेळ आली तर मित्रमैत्रिणी तुमच्याबद्दल निर्णय घेऊ शकणार नाहीत. किमान ते तुमच्या कुटुंबाशी वेळेत संपर्क साधतील.
10. आपलं ‘लिव्हिंग विल’ तयार करून ठेवणं गरजेचं आहे. आपण आजारी पडलो तर कुठंवर उपचार करावेत व कधी थांबावं याचे स्पष्ट निर्देश या विलमध्ये असतील. त्यामुळं आपल्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना निर्णय घेण्याचा ताण येणार नाही. हे ‘लिव्हिंग विल’ वकिलामार्फत तयार करवून त्याची जवळच्या दोन व्यक्तींना प्रत देऊन ठेवण्यानं आपली वाट सोपी होईल.