मौजमजेत समुद्रस्नान --अमेरिकन सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:29 AM2019-07-21T00:29:06+5:302019-07-21T00:29:30+5:30
अमेरिकेतील समुद्रस्नान हा तिथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सर्वच लहान-थोर अमेरिकन्स कुटुंबीयांसमवेत सुटीच्या दिवसांत समुद्रस्नानास पसंती देतात. समुद्रस्नान ‘डी’ जीवनसत्व देते आणि कॅन्सरसारख्या रोगापासून वाचविते. सुटीच्या वेळी अमेरिका म्हणजे मौजमजा.. हे समीकरण ठरलेले..
-किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सी
समुद्रकिनाऱ्यावरील बीचवर येणाºया कोवळ्या सोनेरी किरणांचा हवाहवासा वाटणारा स्पर्श आणि कोवळ्या उन्हाची मजा चाखत मस्त समुद्रस्नान करणे आणि किनाºयावरील वाळूत डोळे मिटून तासन्तास पहुडणे, ही अमेरिकन लोकांची वर्षोनुवर्षाची जुनीच सवय...! महाविद्यालयीन जीवनात अनेकवेळा इंग्रजी चित्रपट विशेषत: बाँडपट कोल्हापुरातील उमा किंवा पार्वती चित्रपटगृहामध्ये बघायला जेव्हा जायचो, तेव्हा बीचवरील अशी दृश्ये नेहमीच बघायला मिळायची.
आता मात्र प्रत्यक्षात ती पाहायला मिळतील असे कधीच वाटले नव्हते. आम्ही नियमितपणे अमेरिकेत येतो. दरवेळेला कुठल्या ना कुठल्या बीचवर जातोच...! या वेळी भरपूर मोठा व लांबलचक किनारा लाभलेल्या पॉर्इंट प्लेझंट बीचकडे जाण्याचे ठरले. गेल्या वेळेलाही आम्ही इथे गेलो होतोच! शाळा कॉलेजिसना समर सीझनची सुटी आणि अमेरिकनांना शुक्रवार अर्धी आणि शनिवार, रविवार या अडीच दिवसांच्या सुटीच्या दिवसांत इथे हजारो अमेरिकन कोवळ्या उन्हातल्या समुद्रस्नानासाठी नियमितपणे येतात.
बीचवर प्रत्येकाने स्विमिंगचा सूट घालणे हा अमेरिकन बीचचा अलिखित नियम आहे. यामुळे लहान-थोर, सर्व लहान मुले-मुली, तरुणी, महिला एवढेच काय ज्येष्ठ महिला बिकिनी आणि पुरुष स्विमिंग सूट परिधान करूनच समुद्रात उतरतात. त्यापूर्वी, अंगाला तकाकी यावी म्हणून ‘सनस्क्रिम लोशन’ लावतात. समुद्रात एकदा उतरल्यावर खोल प्रवाहात सपासप हात मारत जाणे. लाटांच्या प्रवाहात वर-खाली डुंबणे. पाण्यावर तरंगणे आणि पोहून झाल्यावर वाळूत तासन्तास स्विमिंग ड्रेसमध्येच किंवा त्यापेक्षा तोकड्या वस्त्रात सोनेरी उन्हात चक्क पहुडणे ही अमेरिकनांच्या अनेक रूढी, परंपरांपैकी एक! या वाळूत अनेकांनी सोबत आणलेल्या आराम खुर्च्या असतात. (किंवा भाड्यानेही मिळतात.) याशिवाय स्वत:बरोबर आणलेल्या बीच ब्लँकेट वा बीच टॉवेलवर सोनेरी प्रकाशाची कोवळी किरणे घेत डोळे मिटून उताणे पडणे ही अमेरिकनांची खासियत...!
आम्ही नुकतेच पॉर्इंट प्लेझंट बीचवर गेलो असता, चहुबाजंूनी निरीक्षण केल्यास सर्वत्र गोरीपान तांबूस वर्णाची माणसेच माणसे दिसत होती. यात पुरुषांबरोबर महिला, तरुणी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश होता. अमेरिकेतील हे दृश्य आणि त्यांनी घातलेल्या कपड्यांची अवस्था पाहिल्यास ‘लज्जा’ नावाचा काही प्रकार असतो, हे इथे साफ विसरून जावे. कारण, केवळ मौज आणि करमणूक अनुभवण्यासाठी कपड्यांचा अडसर नको, असेच त्यांना वाटत असावे.
हे वर्णन करताना कुठलीही अतिशयोक्ती केलेली नाही. ‘जे आहे ते आहेच!’ सैरभैर पाहिल्यास जागोजागी ‘जिथे-तिथे’ आडोशासाठी निळे, पिवळे, लाल, रंगीबेरंगी तंबू ठोकलेले दिसतात. भारतीय संस्कृती मात्र शेवटी आपलीच. आपणच तिचा दर्जा आणि योग्यता जपावी हा उद्देश. येथे ठोकलेल्या तंबूत दोन-चार माणसे सहज मावावीत. ही माणसे, मुले विविध प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंक्ससोबत पोटॅटो फ्राईजचा आस्वाद घेत मजा करतात.
अमेरिकेत जगभरात एकवेळ कुठल्याही गोष्टीचे उत्पादन होत नसेल; पण दुसºया देशांकडून सर्व प्रकारचा माल मागवून त्यावर आपले लेबल लावून त्याचे योग्य मार्केटिंग करणे यात अमेरिकेचा हात कोणीही धरणार नाही. यामुळेच ‘अमेरिकेत काही मिळत नाही’ असे नाही. अमेरिका साध्यासुध्या गोष्टीतूनही कसे पैसे मिळवितो ते पहा. हे समुद्रकिनारे बीचसह स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी उदंड पैशांची गरज लागते. या सबबीखाली येथे बीचवर येणाºया प्रत्येकाला दरडोई आठ ते दहा डॉलरचे तिकीट घ्यावे लागते.
बीचवर इथे अनेक पथ्ये पाळावी लागतात. येथे दारू, सिगारेट यांसारखे अमलीपदार्थ घेता येत नाहीत. सोबत आणलेली कोल्ड्रिंक्स, चिकन नगेट्स, चिकन सँडविचेस, बर्गर, आदी मात्र खाता येते. सकाळी बीचवर गेल्यानंतर किंवा दिवसभर गेल्यानंतर अंगाला, पायाला लागलेली वाळू आणि माती काढण्यासाठी बीचच्या बाहेर भरपूर शॉवर बुथ्स असतात. तेथे सर्व स्री-पुरुष शॉवरखाली अंग स्वच्छ करतात. कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र चेंजिग रुम्स आहेत. तेथे कपडे बदलले जातात. अमेरिकेत आंबटशौकिनांना थारा नसतो.