पर्यटकांना खुणावतेय झाडीपट्टीचे सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:13 PM2019-06-24T13:13:19+5:302019-06-24T13:14:01+5:30
वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात.
ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा:
वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात. कोकणचा तोडीचा निसर्ग एकदा अनुभवला की येथील अप्रतिम सौंदर्याच्या प्रेमात कुणीही पडल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने मुक्तहस्त उधळण केलेला हा परिसर म्हणजे झाडीपट्टीचे खरे सौंदर्य.
भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. आजही पवनीत अशोककालीन अवशेष आढळून येतात. गोंड राजे बक्त बुलंदशाह यांनी १७०० मध्ये बांधलेला अंबागड किल्ला गत वैभवाचे साक्ष देतो. भंडारा शहरातील सध्या जिल्हा कारागृह असलेला किल्ला ही तेवढाच अभेद्य आहे. गोंडवाणा म्हणून पुर्वी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशाला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.
साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेला भंडारा जिल्हा निसर्ग समृध्दीने नटलेला आहे. झाडीपट्टीचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतमाला त्यात गायमुख, चांदपूर, गायखोरी डोंगराचा समावेश आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, घनदाट वनश्रीचा गालीचा, खळखळणाºया नद्या आणि शांत जलाशय येथील निसर्ग सौंदर्यात भर घालतात. पावसाळ्याच्या दिवसात तर निसर्ग बहरून येतो. अशा या भंडारा जिल्ह्याच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ पडली आहे. देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येतात. मात्र सुविधा नसल्याने पर्यटनाचा विकास रखडला आहे. भंडारा जिल्ह्यातील तलावांचा उपयोग जल पर्यटनासाठी केला जाऊ शकतो. भंडारापासून हाकेचा अंतरावर असलेला रावणवाडी तलाव आता शुटींग पॉर्इंट झाला आहे. पुण्या-मुंबईतील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक याठिकाणी येऊन चित्रीकरण करतात. यासोबतच जिल्ह्यात बंदरझरा, नागझिरा, हत्तीडोह असे अनेक तलाव असून या तालवाचा विकास केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी संधी मिळू शकते.