बिअर...एक हेल्थ टॉनिक? कसं काय...वाचा इतिहासतील महत्वाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 05:47 AM2023-04-15T05:47:44+5:302023-04-15T05:49:34+5:30
सिएटलमध्ये १८७८ मध्ये रेनियर बिअरचे उत्पादन व्हायला सुरुवात झाली होती.
सिएटलमध्ये १८७८ मध्ये रेनियर बिअरचे उत्पादन व्हायला सुरुवात झाली होती. अँड्र्यू हेमरिच ह्या जर्मनीहून अमेरिकेत आलेल्या व्यावसायिकाने आपल्या बिअरलादेखील नाव दिले ‘रेनियर’! गावाजवळच्या माउंट रेनियरवरून वाहत येणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांचे पाणी आपण बीअर करताना वापरतो, असा प्रचार तो करीत असे. पुढे त्याने सिएटल ब्रूइंग अँड माल्टिंग कंपनीची स्थापना केली. अमेरिकेच्या पश्चिम भागात ह्या बिअरला खूप लोकप्रियता मिळाली. १९५४ मध्ये प्रतिष्ठित रेनियर कंपनीचे ‘R’ हे चिन्ह ब्रुअरीच्या वर लावले गेले. आजदेखील ती सिएटलची एक महत्त्वाची खूण मानली जाते.
रेनियरने आपल्या १९१२ सालच्या जाहिरातीत चक्क दहा हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. बीअरमध्ये मका, साखर किंवा साखरेपासून बनवलेले इतर कोणतेही पदार्थ, मध, ग्लुकोज किंवा तत्सम कृत्रिम घटक वापरल्याचे सिद्ध करणाऱ्याला ते बक्षीस होते.
त्याच वर्षीच्या दुसऱ्या एका जाहिरातीत रेनियरने आपण किती हजार डॉलर्स पगार म्हणून वाटतो, किती हजार डॉलर्सच्या वस्तूंची खरेदी करतो, सिएटलमध्ये किती हजार डॉलर्सचे उत्पन्न मिळवून देतो, असा सगळा छानछान तपशीलही दिला होता.
आपल्याकडेही मद्यविक्रीमधून राज्याच्या तिजोरीत किती कोटींची भर घातली जाते हे सांगत मद्यविक्रीचे समर्थन केले जाते, तसाच हा प्रकार! ह्या जाहिराती समजण्यासारख्या आहेत असे एकवेळ म्हणता येईल. पण, ह्या कंपनीने १९०६ साली केलेली जाहिरात बघून आपण हतबुद्ध होतो.
ह्या जाहिरातीत वृद्ध गृहस्थ आणि सातआठ वर्षांची लहान मुलगी दाखवली आहे.
‘आबालवृद्धांना ही बिअर लाभदायक आहे!’ असा मथळा देत ह्या जाहिरातीत आपल्या आजोबांना “GESUNDHEIT GRANDPA” म्हणजेच ‘टू द हेल्थ, ग्रँडपा’ अशा ‘शुभेच्छा’ देणारी नात दाखवली आहे. पुढच्या मजकुरात रेनियर बीअर पिण्याने नवसंजीवनी कशी मिळते.. आणि ह्या टॉनिकची बरोबरी दुसरे कोणतेही औषध कसे करू शकत नाही याचे (खुमासदार) वर्णन वाचायला मिळते. आज आपल्याकडेच नाही, तर अगदी अमेरिकेतसुद्धा लहान मुलांना टार्गेट करणारी अशी जाहिरात करता येणार नाही; पण एकशेसोळा वर्षांपूर्वी ती सर्रास केली जात असे हे आश्चर्यच मानले पाहिजे.
- दिलीप फडके, विपणन शास्त्राचे अभ्यासक,
pdilip_nsk@yahoo.com