बियॉन्से, मेंदी आणि ‘प्रतिमा’

By Admin | Published: February 6, 2016 02:42 PM2016-02-06T14:42:46+5:302016-02-06T14:42:46+5:30

एका गाण्याच्या निमित्ताने सांस्कृतिक अफरातफर आणि संभ्रमाची चर्चा

Beyonce, Mardi and 'Imagery' | बियॉन्से, मेंदी आणि ‘प्रतिमा’

बियॉन्से, मेंदी आणि ‘प्रतिमा’

googlenewsNext
- सोनाली नवांगुळ 
 
तसं पाहिलं तर ‘या’ गाण्यात लगेच काही खटकत नाही. रंगीबेरंगी, ठेक्याचं, आकर्षक असं हे गाणं डोळ्यांत आणि कानात पाझरत राहतं. विचार करायला अवसरच मिळत नाही. आणि हे गाणं ‘पाहताना’ हेही आठवत नाही, की यावरून सध्या वादाची जुगलबंदी सुरू झाली आहे. भारताची ‘दृश्य प्रतिमा’ काय असावी आणि कोणी ती कशी (आणि कुणाला) दाखवावी यावरून सरळ सरळ दोन तट पडून सध्या वाद पेटला आहे - आणि या वादाच्या शीर्षस्थानी आहे दोन्ही तळहातांवर लालचुटुक मेंदी रेखलेली देखणी बियॉन्से!
- तर आधी त्या गाण्याबद्दल :
ब्रिटिश रॉक बॅण्ड ‘कोल्डप्ले’च्या ‘ए हेड फुल ऑफ ड्रीम्स’ नावाच्या अल्बममधलं ‘हिम फॉर द वीकएण्ड’ नावाचं नुकतंच रिलीज झालेलं हे गाणं. बरं, हा बॅण्ड म्हणजे काही नवं उगवलेलं तण नव्हे. गीतकार, गायक, अभिनेता ख्रिस मार्टिन आणि गिटारिस्ट जॉनी बकलॅण्ड यांनी 1996 मध्ये सुरू केलेल्या या बॅण्डनं अनेक उत्तमोत्तम गाणी देऊन जगभरातल्या तरुणाईचं आणि समीक्षकांचंही मन काबीज केलेलं आहे. सोप्या आणि अर्थवाही शब्दांचं गाणं करताना ते इतका जीव ओततात की ऐकणा:या- पाहणा:याची चित्तवृत्तीच पालटते. स्वत:चं अस्तित्व विसरून मनाला हलकंफुलकं करण्याची ताकद या बॅण्डमध्ये आहे. आनंद, दु:ख, वैफल्य, प्रेम, प्रेमभंग, जगभरातले महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय मुद्दे.. विषय कुठलाही असो, त्यांचं गाणं आपल्याला खेचून घेतंच. आपल्या कारकिर्दीत अत्यंत मानाच्या ग्रॅमी, ब्रॅट अशा 62 पुरस्कारांसह तब्बल 2क्9 नामांकनं त्यांनी पटकावलीत. जगभरातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या लाडक्या बॅण्डच्या ‘हिम फॉर द वीकएण्ड’ या गाण्यानं नेमका काय गोंधळ उडवलाय मग?
ख्रिस मार्टिन, जॅझ गायिका-अभिनेत्री बियॉन्से आणि अवघे काही सेकंद झळकलेली (आपली) सोनम कपूर ही ‘हिम फॉर द वीकएण्ड’ या व्हिडीओ सॉँगमधली पात्रं. 
गाण्याचं चित्रीकरण भारतातलं. 
गाण्यात दिसतो पिसारा फुलवलेला मोर, रंगपंचमीत बेहोश होऊन नाचणारी माणसं, झांजांच्या आवाजात फडफडणारी साधूंची भगवी परिधानं आणि त्यांच्या विशिष्ट मुद्रा, देवळाचा रंगीबेरंगी कळस, पिवळ्या टपांच्या आतून नक्षीकाम केलेल्या मुंबईच्या टॅक्स्या, वाहणारी कचराकुंडी, ‘बॉलिवूड राणी’ बियॉन्सेचं पोस्टर, कठपुतळ्या, तोंडातून आग काढण्याचा खेळ, दुचाकीवर जाणारे तिघे, तळ्यात उडय़ा ठोकणारे पुरुष, अख्खं शरीरच खपाटीला गेलेली आजी, माकडाचा मुखवटा लावून उभी असलेली भरजरी कपडय़ातली गरीब तोंडाची मुलं, कुचीपुडी, कथकली नृत्यातले कलाकार.. आणि होळीच्या रंगात चिंब भिजून मुलांसोबत खेळणारा ख्रिस मार्टिन.
या गाण्यातला बराचसा काळ ख्रिस भारतात शहरभर फिरतोय आणि लहानथोर बायाबापे बियॉन्सेला आशाळभूतपणो कधी फुलांच्या मुगुटात, तर कधी भरजरी ‘सो कॉल्ड’ भारतीय ड्रेपरी व दागदागिन्यात, मेंदीनी मढलेल्या हातांच्या वेलांटय़ा काढताना पाहतात. तेही कधी लाकडी धम्म पिवळ्या ‘बायोस्कोप’मध्ये, तर कधी कुठल्या जुनाट थिएटरमध्ये गंजक्या प्रोजेक्टरवर. 
..गाण्याच्या शेवटी पडक्या ओल्या किल्ल्यातून स्वप्नील धावणारी आणि फुलं उधळणारी मुग्ध तरुणी म्हणजे सोनम कपूर दिसते.
..अपार दृष्टिसुख. बघितलं, संपलं! कुणाला वाटेल, यात चर्चा काय करायची? 
- पण चर्चा दोन्ही प्रकारे उसळलीय आणि त्यात विरोधाची धार जरा जास्त आहे.
विरोधातल्यांची हरकत आहे ती भारताची तीच तीच प्रतिमा दाखवून पाश्चात्त्य जगाला तोच ‘जुना’ भारत विकण्याच्या निर्बुद्ध अट्टहासावर बोट ठेवणारी. दुस:या देशातलं, परंपरेतलं, संस्कृतीतलं सातत्याने बदलतं सूत्रं ठाऊक नसताना, अभ्यास न करता जे सोयीचं वाटतं तेवढंच उचलून बाकीचं वगळणं आणि त्यातून काही एक ‘प्रतिमा’ तयार करणं ही सांस्कृतिक अफरातफर भारताने (निदान आतातरी) सहन करू नये, असा विरोधकांचा आग्रह आहे.
 या अशा प्रतिमानिर्मितीमधून अमुक म्हणजे ‘हे’ नि ‘तमुक’ म्हणजे ते याचं कंडिशनिंग होत असतं. कधी नकळत तर कधी जाणीवपूर्वक. त्यामागे आर्थिक, राजकीय घटकांची गुंतागुंत असते. त्यातून घडणारी कोणाही देशाची प्रतिमा म्हणजेच आधुनिक विश्व-मांडणीतली ‘सॉफ्ट पॉवर’! ही ताकद संपत्ती आणि शस्त्रंच्या धाकाहून मोठी असते आणि सखोलही!
- म्हणून त्याबाबत जागं असणं हे समकालीन सूज्ञपणाचं लक्षण मानलं जातं.
पश्चिमेकडल्या कलाकारांच्या गाण्यात/ लघुपटात/सिनेमात दिसणारा भारत अजूनही  ‘तोच’ असेल तर तुमची आमच्या देशाविषयीची जाण फार तोकडी आणि अपूर्ण आहे, ती सुधारा; असा दम आपण (अगदी बियॉन्सेलाही) दिला पाहिजे, असा आग्रह धरणारी मतं समाजमाध्यमांमधून आक्रमकपणो व्यक्त होत आहेत. कायम रंगीबेरंगी, उत्सवात दंग असलेली माणसं, सणवार, दागदागिने, भरजरी कपडे, हत्ती, गायी, शेकोटय़ा, डोक्यावरचे पदर, झोपडपट्टय़ा, घाणोघाण, गरिबी, उपासमारी, लाचखोरी, गुन्हेगारी, जातीयवाद याच प्रतिमा पुन्हा पुन्हा वापरल्या जातात.. हाही भारताचा चेहरा आहे हे खरं, पण आजचा भारत केवळ हाच आणि एवढाच आहे का? अनेकानेक संदर्भानी घडत असलेल्या एखाद्या देशाच्या व्यक्तिमत्त्वातून कुणी ‘नेमकं काय’ उचलतो; हा ‘कलात्मक स्वातंत्र्य’ म्हणून सोडून देण्याचा नव्हे, तर विचार करण्याचा मुद्दा असला पाहिजे, हा विरोधकांच्या युक्तिवादाचा लसावि म्हणता येईल.
 बियॉन्सेसारख्या पश्चिमी स्त्रीने हाताला मेंदी लावून, भारतीय वेष करून 4.20 मिनिटांच्या गाण्यात ‘बॉलिवूड राणी’ म्हणून जास्तीत जास्त वेळ दिसावं आणि अस्सल भारतीय असणा-या सोनम कपूरला मात्र सेकंद- दोन सेकंद झळकून नाहिसं व्हावं लागावं, हे केवळ ‘कलात्मक स्वातंत्र्य’ नव्हे, त्यामागे असलेला ‘विचार’ निषेधार्हच मानला पाहिजे, असा एक आग्रह आहे. बदलत्या विश्वरचनेत अग्रणी असलेल्या भारताचा जुना न्यूनगंड गळून पडत असल्याचीच ही निशाणी!
 - मात्र एका साध्या गाण्याला भारताच्या सांस्कृतिकतेशी जोडण्याची चूक मुळात करावीच का, असा प्रश्न करणारा दुसरा गट म्हणतो, गाणं एंजॉय करा, संपलं!!
बियॉन्सेचं गाणं दृष्टीला आणि कानांना सुख देणारं आहे, त्यात फार खोलात शिरून त्याचा कीस पाडायला जाच कशाला, असा सवाल करणा:यांचं म्हणणं आहे, पश्चिमेकडच्या ‘त्यांना’ भारतीय संस्कृतीतलं काही दाखवावं वाटलं तर ते चूक कसं? आणि आपला भारत इतका देखणा आहे, हे जगाला दिसत असेल तर चांगलंच आहे की ते! एरवी कोटी कोटी रुपये खर्च करून सरकारी पर्यटन विभाग करतात, त्या जाहिरातींमध्ये तरी दुसरं काय असतं?
सत्यजित रे ‘पथेर पांचाली’ बनवतात त्यातली गरिबी चालते, पुरस्कार चालतात आणि ‘स्लमडॉग मिलेनिअर’नी तेच केलं तर त्याला झोडपायचं? - असा प्रश्न करणा:या गटाला मुळात ही चर्चाच अप्रस्तुत वाटते आहे. 
- दोन्हीकडच्या बाजू तुल्यबळ असाव्यात अशीच ही जंगी लढाई! यातल्या कुणाचं खरं मानावं, आणि कुणाला नाकारावं?
पण एक नक्की.
स्वत:च्या प्रतिमेबद्दल जागी झालेली माणसं आता आपल्या देशाच्या प्रतिमेबद्दल निदान विचार तरी करू लागली आहेत, आणि आजवर केवळ तज्ज्ञांपुरता, अभ्यासकांपुरता असलेला हा विषय आता सामान्य नागरिकांच्याही उत्सुकतेचं कारण बनला आहे. आपल्या परंपरांना समजून, त्यांचा अधिकार आणि योगदान मान्य करून कुणी काही कलाकृती बनवत असेल तर अडचण नाही; पण एखाद्या संस्कृतीला ‘प्रॉप’ म्हणून वापरणं आणि त्यावर आपल्या कलात्मक स्वातंत्र्याचा सोयिस्कर मुलामा चढवणं हे तरी किती योग्य?
 
कल्चरल अॅप्रोप्रिएशन
या विषयाच्या निमित्ताने सध्या एक संकल्पना चर्चेत आहे : कल्चरल अॅप्रोप्रिएशन. एखाद्या सांस्कृतिक परंपरेतील मूलतत्त्व किंवा मूलाधार यांचा अन्य सांस्कृतिक परंपरेचा भाग असणा:यांकडून स्वीकार किंवा वापर केला जाणं म्हणजे ‘कल्चरल अॅप्रोप्रिएशन’. 
पण वरचष्मा असणा:या परंपरेच्या सदस्यांकडून अल्पसंख्य किंवा कमी प्रभावी असणा:या गटांचे सांस्कृतिक ठेवे, त्याचं ज्ञान विनाअधिकार वापरलं, चुकीच्या पद्धतीने वापरलं तर मूळ संस्कृतींचं, त्यांच्या जतनाचं काम चालू ठेवलेल्या पिढय़ांचं श्रेय हरपतं. हे एक प्रकारचं शोषण, वसाहतवादी वृत्तीचं दर्शन आणि सांस्कृतिक अफरातफरही आहे असं मानणारा बुद्धिजीवींचा एक मोठा वर्ग आहे जो अशा प्रकारच्या कल्चर अॅप्रोप्रिएशनला सकारात्मक मान्यता देत नाही.
 
sonali.navangul@gmail.com

 

Web Title: Beyonce, Mardi and 'Imagery'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.