धक्का, भाऊचा धक्का आणि ससून डॉकला नव्या चैतन्याची चाहूल
By अोंकार करंबेळकर | Published: January 13, 2018 07:03 PM2018-01-13T19:03:14+5:302018-01-14T10:01:36+5:30
१९व्या शतकामध्ये मुंबई अठरापगड जाती आणि विविध धर्मांनी गजबजायला सुरुवात झाल्यावर बेटाच्या पूर्वेस असणाऱ्या किनाऱ्यावर बंदरं आणि धक्के बांधले जाऊ लागले. त्यातले प्रसिद्ध म्हणजे ससून डॉक आणि भाऊचा धक्का. या दोन्ही धक्क्यांचं जुनं, रेंगाळलेलं रूप आता कात टाकतं आहे. तिथे होऊ घातलेल्या नव्या चहलपहलीचा वेध...
चाकरमान्यांसाठी भाऊचा धक्का मुंबईचं प्रवेशद्वार होता. बदलत्या काळानुसार कोकणात आणि गोव्याला जायला रस्ते, रेल्वे असे नवे मार्ग मिळाल्यानंतर या धक्क्यांचा वापर त्याकाळाच्या तुलनेत कमी झाला असला तरी या धक्क्यांच्या वर्तमानाला आता नवी झळाळी येऊ घातली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत ससून डॉकचा विकास आणि कायापालट होणार आहे. मासेमारी बोटी थांबण्याचे धक्के म्हटलं की मासळीचा वास आणि मासे एवढंच काही लोकांच्या डोक्यात येतं. पण आता मासळीच्या वासापलीकडे जाऊन हे धक्के सागरमाला प्रकल्पाचा भाग म्हणून पर्यटनासाठी वापरले जाणार आहेत. गेल्या वर्षाच्या अखेरीस स्ट्रीट आर्ट प्रदर्शनाच्या निमित्ताने ससून डॉकने कात टाकली. १३ दशकांहून अधिक काळ मुंबईत मासेमारी, मत्स्य लिलाव आणि विक्रीची ही केंद्र पुन्हा एकदा गजबजून जातील. पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या जागांमध्ये पर्यटकांना माहिती देण्याची सोय, धक्क्याचा इतिहास समजावून देणारे केंद्र, कोळी महोत्सव, अॅग्रो टुरिझमच्या धर्तीवर मत्स्य पर्यटन असे प्रकल्प राबवण्यात येतील. आजही ससून आणि भाऊच्या धक्क्याचा वापर मासेमारी करणाऱ्या लोकांना होतो. तेथे चालणारे लिलाव पाहायला परदेशी पर्यटक पहाटेपासून तेथे येतात.
भाऊच्या धक्क्यावरून रेवस, मांडवा, उरण येथे जाणाऱ्या बोटी सुटतात. सागरमाला प्रकल्पामुळे भविष्यात पुन्हा एकदा कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या बोटी मुंबईतून सुटतील आणि या धक्क्यांवर नव्या चाकरमान्यांची गजबज वाढेल. त्यानिमित्ताने...
‘भाऊचा धक्का’ हे केवळ नाव कानावर पडलेलं असतं; पण भाऊ कोण? - तर भाऊ रसूल! त्याचं मूळ नाव ‘लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य’. १७८८ साली या लक्ष्मण अजिंक्य यांचा जन्म उरण जवळच्या करंजा गावात झाला. पोटापाण्याच्या व्यवसायासाठी लक्ष्मण यांचे वडील हरिश्चंद्र मुंबईत आले. मात्र पितृछत्र हरपलेल्या लक्ष्मण यांना लहान वयातच नोकरी करणं भाग पडलं. लक्ष्मण याचं इंग्रजीचं ज्ञानही उत्तम होतं. इंग्रजांनी तोफा, तोफेची दारू बनवण्यासाठी ‘गन कॅरिएज कंपनी’ स्थापन केली होती. भाऊंना या कंपनीत नोकरी मिळाली आणि तेथे ते हेड क्लार्कही झाले. असं म्हणतात की, एके दिवशी कंपनीतील एका मजुराला काठीने झोडपण्याची वरिष्ठाने ठोठावलेली शिक्षा लक्ष्मण हरिश्चंद्रजी यांनी रद्द केली. त्यानंतर त्यांना आदराने भाऊ नावाने हाक मारण्यास सुरुवात झाली. पुढे हेच नाव प्रचलित झालं. गन कॅरिएज कंपनीत भाऊंना एक युरोपियन मित्र मिळाला तो म्हणजे त्यांचे वरिष्ठ कॅप्टन रसेल. (या रसेलमुळे त्यांना भाऊ रसेल म्हटलं जाऊ लागलं आणि रसेलचा अपभ्रंश रसूल असा झाला)
कंपनीत नोकरी करत असले तरी भाऊंच्या डोक्यात सतत व्यवसायाच्या कल्पना येत असत. त्या काळात मुंबईच्या विविध भागांमधून येणाऱ्या कामगारांना पहाटे घर सोडावं लागे त्यामुळे इतक्या लवकर भाकरी खाऊन किंवा घेऊन येणं त्यांना जमत नसे. यामुळे बहुतांशवेळा या कामगारांना उपाशीपोटी काम करावं लागे. भाऊंनी या कामगारांसाठी कंपनीत चटणी-भाकरी तयार करण्याची परवानगी कॅप्टन रसेलकडे मागितली. रसेलने परवानगी तर दिलीच, शिवाय हे काम तूच कर असंही सुचवलं. रसेलच्या सूचनेनुसार भाऊंनी कंपनीमध्येच कॅन्टीन सुरू केलं. या पहिल्या उद्योगामुळं भाऊंच्या पुढच्या आयुष्यातील उद्यमामार्गाचा पाया रचला गेला. सतत खटपट करणाऱ्या भाऊंनी कंपनी सरकारकडून नंतर मुंबईत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाचा मक्ता घेतला आणि हा उद्योग सुरू झाल्यावर त्यांनी गन कॅरिएजमधली नोकरी सोडूनच दिली.
१८३३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिकांना भाडेपट्ट्यावर जागा द्यायला सुरुवात केली. त्याकाळी चिंचबंदर ते मशीद बंदर आणि मशीद बंदर ते क्रॉफर्ड मार्केट असा पाण्याखाली असणारा भाग भरून तेथे रस्ता बांधण्याची परवानगी भाऊंनी मागितली आणि भाऊंच्या बांधकाम व्यवसायाची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईच्या आसपासच्या भागातील गावांचा विकास करण्यासाठी प्रतिष्ठित लोकांना त्या गावाच्या वहिवाटीचे म्हणजे ‘खोतीचे हक्क’ देण्यास सुरुवात झाली. कंपनीने त्यांना आकुर्ली (कांदीवली पूर्व), चिंचवली (मालाड पश्चिम) आणि दिंडोशी (गोरेगाव पूर्व) अशा गावांचे खोती हक्क दिले. अशा एकेक उद्योगात भाऊंनी आपली वाटचाल सुरू केली असतानाच त्यांना एक मोठं काम मिळालं थेट बंदर बांधण्याचं. मुंबईच्या किनाºयावर लहानमोठ्या बोटींमधून उतरण्यासाठी उतारुंना कोणताही आधार नव्हता. त्यामुळे विविध बंदरं, धक्के बांधण्याची कंत्राटं द्यायला सुरुवात झाली आणि बंदरांची एक माळच तयार झाली. बोरीबंदर, कारनॅक, क्लेरबंदर, मशीद बंदर, चिंचबंदर, एलफिन्स्टन बंदर, वाडीबंदर अशी अनेक बंदरं तयार करून ती विविध मालाच्या चढ-उतारासाठी वापरली जात असतं. भाऊंनीही एक बंदर बांधण्यासाठी 1835 मध्ये कंत्राट घेतलं. त्यांच्या या धाडसी निर्णयावर साहजिकच चहूबाजूंनी टीका झाली. हे काम कसं पूर्ण होऊ शकेल अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती. पण भाऊंनी हे काम पूर्ण करायचं ठरवलंच. धक्का बांधताना त्याच्या पायात मातीऐवजी कचरा घालण्याची कल्पना त्यांना सुचली. शहरातला हा कचरा पायात घालून १८४१ साली त्यांनी या धक्क्याचं काम पूर्ण केलं, तोच हा ‘भाऊचा धक्का’!
ससून डॉक
भाऊच्या धक्क्याबरोबर आणखी एक प्रसिद्ध धक्का म्हणजे ससून डॉक. ससून हे बगदादी ज्यू कुटुंब मुंबई, पुणे आणि कलकत्ता येथील लोकांना माहिती नसेल तरच नवल. व्यापाराच्या निमित्ताने ससून कुटुंबाचा चीनशीही संपर्क होता. कापसाच्या व्यापारासाठी हा धक्का अल्बर्ट ससून यांनी १८७५ साली बांधला. अल्बर्ट हे डेव्हिड ससून यांचे पुत्र होते. डेव्हीड ससून ग्रंथालय, मागन डेव्हिड सिनेगाँग, ससून हायस्कूल, नेसेट इलियाहू सिनेगाँग अशा विविध ऐतिहासिक इमारतींशी हे कुटुंब संबंधित आहे.
बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी मुंबईच्या वृत्तांतामध्ये या धक्क्याचं वर्णन करून ठेवलंय.
त्यात ते लिहितात, ‘‘मधल्या कुलाब्याजवळ ससून डॉक आहे. ह्या गोदींत नेहमी आगबोटी व जहाजे येतात व जातात. त्यांतून लाखो खंडीचा माल शहरांत येतो व बाहेरगावी जातो. येथे नित्य हजारो मनुष्यांची गडबड दृष्टीस पडते तेनेकरुन नवख्या मनुष्याच्या अंत:करणांत सानंदाश्चर्य उत्पन्न होते.
येथील बंदर किनारा खडकाळ असल्यामुळे जहाजे व आगबोटी आंत येण्याची मोठी पंचाईत पडे, ती दूर व्हावी म्हणून डेव्हीड ससून कंपनीने ब्याकबे कंपनीस बराच पैसा देऊन ती जागा विकत घेतली व तेथे धक्का व गोदी बांधली.
ही गोदी काही वर्षांमागे पोर्ट ट्रस्ट करिता सरकाराने त्यांच्याकडून विकत घेतली. ह्या बंदराची जागा समुद्रांतून घेतली आहे व खडक फोडून गोदी बांधली आहे. येथे १८ फूट खोल पाणी आहे. बंदरावर मेसर्स ग्रेहाम आणि कंपनीकरिता वखारी बांधल्या आहेत.’’