सायकलींचं शहर...नाशिक शहराचा सायकल कॅपिटल’च्या दिशेनं धडका
By समीर मराठे | Published: September 10, 2017 01:00 AM2017-09-10T01:00:00+5:302017-09-10T01:00:00+5:30
२०१०चा दसरा. ‘लोग क्या कहेंगे?’ हा न्यूनगंड झटकून त्या वर्षी नाशिकमध्ये एका कुटुंबानं एकाच वेळी चार सायकली खरेदी केल्या. हे एक सीमोल्लंघन होतं, स्वत:पुरतं, घरापुरतं, प्रतीकात्मक..पण या घटनेनं सायकल चळवळीला एक नवी दिशा, नवा वेग मिळाला. त्याचा झपाटा इतका की, मग नाशिककर सायकलप्रेमींनी यंत्रभूमी, मंत्रभूमी, वाइन सिटी.. ही आपली ओळख मागे टाकत ‘सायकल कॅपिटल’च्या दिशेनं धडका मारायला सुरुवात केली...
सन २०१०.
यावर्षी नाशिकमध्ये एक छोटीशी घटना घडली. ही घटना काही फार मोठी नव्हती आणि तिला तसं ‘बातमीमूल्य’ही नव्हतं. कारण वैयक्तिक पातळीवरचा तो एक अगदी छोटासा, आपल्या कुटुंबापुरता घेतलेला निर्णय होता.
ज्येष्ठ पोलीस अधिकारी हरीष बैजल यांची मुंबईच्या ट्रॅफिक डिपार्टमेंटमधून नाशिकच्या अॅँटी करप्शन डिपार्टमेंटला पोलीस उपायुक्तपदी नुकतीच बदली झालेली होती.
त्या वर्षीचा तो दसरा..
सर्वसामान्यपणे दसºयाला अनेक जण वाहनांची म्हणजे कार, मोटरसायकलींची खरेदी करतात. हरीष बैजल यांनीही या दसºयाला वाहनांची खरेदी केली; पण ती होती सायकलींची. एकाच वेळी त्यांनी एकदम चार सायकली खरेदी केल्या. एक स्वत:साठी, एक पत्नीसाठी आणि आणखी दोन सायकली आपल्या दोन मुलांसाठी.. हे एक वेगळं सीमोल्लंघन होतं..
या सायकली त्यांनी नुसत्या खरेदीच केल्या नाहीत, तर अख्ख्या कुटुंबानं त्या चालवायलाही सुरुवात केली. एका ज्येष्ठ पोलीस अधिकाºयाचं अख्खं कुटुंब असं रस्त्यावर सायकलीनं फिरताना दिसायचं. लोकांनाही ते नवलाईचं वाटायचं. हरीष बैजल यांनी आणखी एक गोष्ट केली. आॅफिसलाही त्यांनी सायकलवरच जायला सुरुवात केली. त्यानंतर नाशिकच्या पोलीस अकॅडमीत त्यांची बदली झाली, तिथंही त्यांनी तोच क्रम चालू ठेवला.
या घटनेनं महत्त्वाची पायाभरणी केली.
..आता नाशिकमध्ये याअगोदर कुणी सायकल चालवत नव्हतं का? कोणी कधीच आॅफिसला, कंपनीत सायकलनं गेलं नाही का?..
- असं नाही. याउलट सर्वसामान्य लोकांमध्ये सायकलींबाबत जागरूकता निर्माण व्हावी, इंधनबचत, पर्यावरणरक्षण आणि स्वत:चं आरोग्य याबरोबरच सायकलींना पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी अनेकजण नाशिकमध्येही प्रयत्नशील होते. उद्योजक किरण चव्हाण आपल्या ‘इको ड्राइव्ह’ या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण, सायकलिंग, ट्रेकिंगचं महत्त्व तरुणाईमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करीत होते. ट्रेकिंगसाठीही सायकलनंच येण्याचा आग्रह ते धरत होते. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद पाटील आपल्या ‘कल्पतरू फाउण्डेशन’च्या माध्यमांतून ट्रेकिंग आणि सायकलिंगच्या अनेक मोहिमा राबवत होते. समाजप्रबोधनासाठी या संस्थेतील डॉक्टरांचा ग्रुप कधी नाशिक-मुंबई सायकल प्रवास, कधी वेगवेगळ्या सायकल रॅलीत सहभाग, तर कधी थेट सायकल स्पर्धांमध्येच भाग घेऊन त्या जिंकतही होते.
दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी सायकलनं कुठे कुठे भटकायला जाणारेही असंख्य ग्रुप पहिल्यापासून नाशिकमध्ये होतेच, आताही आहेत; पण त्यांना ‘आॅर्गनाइज्ड’ असं स्वरूप नव्हतं..
२०१२मध्ये आणखी एक घटना घडली. हरीष बैजल यांच्या आईचं निधन झालं. त्या अतिशय धार्मिक होत्या. पंढरपूरला जाऊन आईला श्रद्धांजली वाहण्याची बैजल यांची इच्छा होती. पायी जाणं शक्य नव्हतं, कारण एक जबाबदार अधिकारी या नात्यानं त्यासाठीची पंधरा-वीस दिवसांची सुटी काढणं शक्य नव्हतं. कारनं त्यांना जायचं नव्हतं, म्हणून त्यांनी ठरवलं, सायकलनं जाऊ या..
मग शोधाशोध सुरू झाली. याआधी कोणी सायकलनं नाशिकहून पंढरपूरला गेलं आहे का? काय काय अडचणी येऊ शकतील? नाशिकमधील आणखी कोण सायकलप्रेमी पंढरपूरला येऊ शकतील?...
इच्छुक बरेच जण होते; पण अनेकांच्या मनात धाकधूक होती.. इतक्या लांबचा प्रवास, कसं जायचं, कुठे राहायचं, सायकल मध्येच पंक्चर झाली किंवा बिघडली तर काय?.. शेवटी आठ जण तयार झाले.. हरीष बैजल यांच्यासह नाना गायधनी, शैलेश राजहंस, श्रीकांत शिंदे, दिलीप धोंडगे, विजय पाटील, अजय मिश्रा आणि हर्षद पूर्णपात्रे.. (हर्षद पूर्णपात्रे हा सायकलीनं झपाटलेला तरुण. नाशिक ते मुंबई, मुंबई ते दिल्ली, मुंबई ते कन्याकुमारी अशा अनेक खडतर सायकल मोहिमा त्यानं पार पाडलेल्या होत्या; पण दुर्दैवानं जुलै २०१५मध्ये मनाली-लेह-लडाख या मार्गावर सायकलिंग करताना आॅक्सिजनच्या कमतरतेअभावी त्याचा अकाली मृत्यू झाला.)
पंढरपूर वारीच्या निमित्तानं २०१२च्या सुमारास खºया अर्थानं नाशिकमधील सारे सायकलप्रेमी आणि ‘नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशन’ची अनौपचारिक स्थापना झाली. यानंतर मात्र संस्थेनं आणि नाशिककर सायकलप्रेमींनी मागे वळून पाहिलं नाही. धडाधड सीमोल्लंघन होऊ लागलं. अनेक उपक्रम झपाट्यानं आणि ठरवून राबवले जाऊ लागले. त्यातूनच सायकलप्रेमी महिला आणि मुलांची संख्याही नाशकात खूप मोठ्या प्रमाणात वाढली.
हरीष बैजल म्हणतात त्याप्रमाणे, ‘नाशिकमध्ये पूर्वीपासूनच अनेक सायकलप्रेमी होते, सायकल चळवळ रुजवण्यात त्यांचाही खूप मोठा वाटा आहे’; पण ‘लोग क्या कहेंगे?’ हा एक जो न्यूनगंड सर्वसामान्यांच्या मनात होता, तो तोडण्याचं काम हरीष बैजल आणि ‘नाशिक सायकलिस्ट’नं केलं.
आजही कोणत्याही दिवशी, कोणत्याही रस्त्यावर सकाळच्या वेळी तुम्ही चक्कर मारली, तर ग्रीन जर्सी घातलेला नाशिक सायकलिस्टचा जथ्था तुम्हाला हमखास पाहायला मिळेल.
साधी पंढरपूरची सायकल वारी. पहिल्या वर्षी त्यात फक्त आठ जण सहभागी झाले होते, दुसºया वर्षी १३, तिसºया वर्षी ७४ आणि यंदा तर पंढरपूरच्या सायकलींचं ‘रिंगण’ पाचशेच्या पार गेलं होतं. त्यात नऊ-दहा वर्षांच्या मुलांपासून ते सत्तरीच्या म्हाताºयांपर्यंत आणि लहान मुलींपासून ते सर्वसामान्य गृहिणींपर्यंत अनेकांचा समावेश होता.
नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचे अध्यक्ष या नात्यानं अगोदर विशाल उगले आणि त्यानंतर जसपालसिंग बिर्दी यांचं योगदानही अत्यंत मोलाचं ठरलं. विशाल उगले यांनी अगोदर सर्वसामान्यांमध्ये या चळवळीची रुजवात केली आणि त्यानंतर जसपालसिंग यांनी त्यावर कळस चढवला. जसपालसिंग यांच्या अकाली मृत्यूनंतर आता फाउण्डेशनच्या अध्यक्षपदाची धुरा प्रवीण खाबिया यांच्या खांद्यावर आहे.
नाशिकला राज्याच्या, देशाच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर न्यायचं जसपालसिंग यांचं स्वप्न होतं आणि त्यांच्याच कारकिर्दीत त्यांना ते पाहायलाही मिळालं.
डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन हे बंधू, श्रीनिवास गोकुळनाथ, ग्यानेंद्र शर्मा, डॉ. रमाकांत पाटील आणि डॉ. राजेंद्र नेहेते, भारत पन्नू आणि दर्शन दुबे, अम्मार मियाजी, किशोर काळे या साºया नाशिककरांनी सायकलिंगच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर भारताची, तिरंग्याची आणि नाशिकची ओळख गडद केली.
हे झालं जागतिक स्तरावरील सायकल स्पर्धांबाबत; पण नाशकात सर्वसामान्य नागरिकांमध्येही सायकल चळवळ मोठ्या प्रमाणावर रुजते आहे.
यंत्र आणि मंत्रभूमीचं शहर, वाइन सिटी.. यापेक्षाही ‘सायकलींचं शहर’ म्हणून नाशिकची एक वेगळी ओळख आता ठसते आहे.
नाशिकमध्ये ज्या वेगानं सायकलिंगचा प्रसार होतो आहे, तो वेग राज्यातच काय, भारतातल्या कुठल्याही शहराला अद्याप गाठता आलेला नाही. अनेक ठिकाणी ‘सायकलींचे शहर’ ही जुनी ओळख पुसली जात असताना नाशिक मात्र ‘सायकल कॅपिटल आॅफ इंडिया’च्या दिशेनं झपाट्यानं निघालं आहे. पूर्वी एखादी बरी सायकल शोधायची तर नाशिकच्या सायकलपटूंना मुंबई, बंगळुरूच्या वाºया कराव्या लागत होत्या. आता कोणत्याही बड्या ब्रॅँडची अशी एकही सायकल नाही, जी नाशकात उपलब्ध नाही. भारतातील प्रसिद्ध ‘डेकॅथलॉन’ या स्पोर्ट्स मॉलनंही पुण्याच्या अगोदर नाशिकमध्ये आपली शाखा सुरू केली, यावरूनही नाशिकमधील सायकलिंगचा वेग लक्षात यावा.
सामाजिक बांधिलकीचा झेंडाही नाशिककरांनी कायम अग्रेसर ठेवला आहे. हेल्मेट सक्तीची मोहीम असो, वृक्षारोपण असो, की रक्तदान, नो हॉर्न डे, आदिवासी मुलांना शेकडो सायकलींचं वाटप, महिला सक्षमीकरण, कायद्याचं पालन किंवा अगदी कालचा गणेशोत्सव.. इको-फ्रेंडली गणपतीच्या आग्रहापासून ते नदीस्वच्छता आणि निर्माल्य, गणेशमूर्ती गोळा करण्यापर्यंत नाशिकचे सायकलप्रेमी कायमच पुढे ठाकल्याचं दिसतं..
ग्रीन जर्सी घालून शिस्तबद्धपणे वाटचाल करणारे हे सायकलप्रेमी रस्तोरस्ती जसे भेटतात, तसेच प्रत्येक सामाजिक उपक्रमांतही! ही ‘ग्रीन आर्मी’ नाशिकला सायकलींच्या राजधानी’कडे वेगानं आणि शिस्तीत घेऊन जाते आहे.. एका नव्या सीमोल्लंघनासाठी!..
(लेखक लोकमत समुहात उपवृत्त संपादक आहेत.)