बिल आणि पेगी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 06:03 AM2019-03-31T06:03:00+5:302019-03-31T06:05:06+5:30

अमेरिकेत बर्कलीमध्ये मला ते जोडपं भेटलं. ते एकत्र राहत नाहीत, त्यांचं एकमेकांशी लग्न झालेलं नाही. बिलच्या जुळ्या मुलींचे नाव त्याने शक्ती आणि शांती ठेवले होते. पेगी तिच्या दोन मुलींना घेऊन दिल्लीत अडीच वर्षं राहिली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात खडबडीत रस्त्यांवरचा त्यांचा प्रवास होऊन गेलेला आहे, पण त्यांचं लोभस हळवेपण हवंहवंस वाटतं..

Bill and Peggy - Amruta Hardikar | बिल आणि पेगी..

बिल आणि पेगी..

Next
ठळक मुद्देकाळ बदलला, तसे देशांतराचे संदर्भ आणि कहाण्याही बदलत गेल्या. जिथे जन्मलो-शिकलो-वाढलो ती भूमी सोडून माणसे परदेशी मातीत आपली मुळे रुजवतात; तेव्हा नेमके काय बदलते? - त्या अनुभवांचा हा कोलाज..

- अमृता हर्डीकर

Bay Area मध्ये Sunnyvale, Mountain view, Fremont सारख्या शहरात शेकडो प्रकारची उत्तम भारतीय restaurants आहेत तशी बर्कलीमध्ये नाहीयेत. पण जिथे अड्डा टाकून, चहा आणि चविष्ट भारतीय पदार्थांचा आस्वाद घेताघेता, मित्र मैत्रिंणीबरोबर गप्पा मारत बसता येयील, असं बर्कली मधलं Viks chat आहे, आणि ते आमचं वीकेंडच्या brunch चे आवडतं ठिकाण आहे. Viks मध्ये उत्तर भारतीय पद्धतीचे चाटचे प्रकार मिळतात, ताजी मिठाई, कुल्फी, फालुदा, शहाळं, लस्सी आणि शंभरवेळा न उकळलेला, अस्सल वेलची घातलेला, योग्य प्रमाणात दूध असलेला उत्तम चहा मिळतो.

२०१५ च्या नोव्हेंबर मध्ये भारतातून आम्ही नुकतेच परतलो होतो. १० महिन्याची इरा, जिभल्या वेडावून दाखवायला शिकली होती. Viks मध्ये गर्दीची वेळ होती, टेबल मिळवण्यासाठी माझ्या मागे कुणीतरी येऊन उभं होतं म्हणून मी इराला माझ्या खांद्यावर घेऊन उभ्या उभ्याच माझी पाव भाजी संपवत होते, निकीत टेबल साफ करत होता, आणि इराने चार टेबल पलीकडल्या एका म्हाताऱ्या जोडप्याला जिभल्या वेडावून, डोळे मिचकावून, स्वतःच्या मोहात पाडलं. ते दोघंही आमच्याजवळ इराची ओळख करून घ्यायला आले. इरा ह्या शब्दाचा अर्थ काय ह्यावर आमची थोडी चर्चा झाली. बिल आणि पेगी, निकीत आणि अमृता अशा नावांची अदलाबदल झाली, हातमिळवणी झाली. त्या दोघांचे चंदेरी केस आणि आमची तिघांची छोटी ‘young family’, खरंतर परत आमची काही देवाणघेवाण होईल असं तेव्हा मला वाटलं नव्हतं. पण कथा, कादंबऱ्यामध्ये वर्णनं असतात न अनपेक्षित predestined भेटी, अनामिक मैत्र , चौकटीत न बसणाऱ्या ओळखी किंवा नाती, तशीच ती सुरुवात होती आमच्या आयुष्यातल्या एका बिल आणि पेगी नावाच्या नाजूक रेशमी विणीची. म्हणूनच मला इराने करून दिलेली आमची ती पहिली भेट ठळकपणे आठवते..

त्या पहिल्या भेटीनंतर पुढचे ६ -८ महिने आमचं नातं अतिशय संथ गतीने पुढे सरकत राहिलं. लांबचा कुठला पल्ला गाठायचा नव्हता, कुठल्या boundaries define करायच्या नव्हत्या, पण एकमेकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मात्र होती. आमच्या आईवडिलांच्या वयाचे किंवा जास्त मोठे असतील ते दोघंही पण आमच्या बाबतीत त्यांच्याकडून कधीच parental भूमिका डोकावली नाही. महिन्यातून २-३ शनिवारी / रविवारी आमची येता जाता भेट व्हायची. जुजबी बोलणं व्हायचं. ते त्यांच्या टेबलवर आणि आम्ही आमच्या मित्र मैत्रिणीनबरोबर किंवा आम्ही तिघंच वेगळ्या टेबलवर असायचो. Self service order घेऊन स्वतःच्या टेबल वर परत जाताना किंवा आवरून घरी जायला निघताना, बिल येऊन हाय म्हणायचा, मग पेगी आणि स्वतःचे टेबल दाखवायचा. बिल इराकडे कौतुकाने बघत, तिच्याशी लपंडाव खेळण्याचा प्रयत्न करायचा,किंवा डोक्यावरच्या टोपीने तोंड झाकून इराला हसवण्याचा प्रयत्न करायचा.पण इराला तो फारसा आवडत नसे. त्यांच्या टेबलाशी बोलायला गेलं की इरा किती बोलते, चालायला/ पळायला लागली का, उंची किती वाढली, तिला काय खेळायला आवडतं ह्याची चौकशी व्हायची. निकीतशी त्यांची फक्त हाय, हेलो पुरतीच ओळख होती. तेव्हा मला निकीतला वाटायचं, त्यांची नातवंड त्यांच्या जवळ नसणार म्हणून इराचे त्यांना इतकं कौतुक असेल.

पण मग माझ्या नकळत इराभवतीचे वलय विस्तारले आणि थोडेसे माझ्या भवती येऊन थांबलंं. मी कशी आहे, Motherhood/parenting चा माझा प्रवास कसा चालू आहे अशी विचारपूस पेगी करायला लागली. मध्येच एखादा स्वतःच्या मुलींचा किस्सा, आठवण सांगायला लागली. मी लिहिते असं कळल्यावर, नवीन काय लिहिणार आहेस, लिहायला वेळ कसा काढतेस, ह्याची विचारपूस ते दोघंही करत. हळूहळू  माझ्या मनातल्या न विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं मिळत गेली. पेगीच्या दोन्ही मुली, नातवंड बर्कलीतच राहतात हे कळलं. बिलच्या जुळ्या मुलींचे नाव त्याने शक्ती आणि शांती ठेवले होते; पण त्या वेगळ्या राज्यात राहतात, त्याच्यापासून दुरावलेल्या आहेत हे कळलं. पेगी तिच्या तिशीत असताना, तिच्या दोन मुलींना घेऊन दिल्लीत तब्बल अडीच वर्ष राहिली होती. शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न तिने केला होता आणि अजूनही तिला आणि बिलला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत ऐकायला खूप आवडतं. रस्त्यावरच्या टपरीवर कुल्ल्डमधून प्यायलेल्या चहाची ती अनेकदा आठवण काढते.

भारतीय वंशांचे नसून, भारताबद्दल अपार माया असणाऱ्या ह्या दोघांमधला आणि आमच्या मधला दुआ म्हणजे Viks आणि आमचं भारतीय असणं.. हळूहळू Viks मध्ये गेल्यावर आपसूक नजर एकमेकांना शोधायला लागली. पण एकमेकांचा फोन नंबर, घरी येण्याचे आमंत्रण, एकत्र एका टेबल वर बसणे असं काहीही झालं नाही.

आमची ओळख होऊन वर्ष दीड वर्ष झालं असेल पण काही कारणांमुळे आमचं दोन अडीच महिने Viks ला जाणं झालंच नाही.  परत गेलो तेव्हा बिल आणि पेगी पहिल्यांदा आम्हाला पाहून मोठ्या टेबलवर सरकले. त्या दोघांना आम्ही सामोरासमोरच्या खुर्च्या देऊ केल्यास, त्यांनी त्या बदलून ते एकमेकांच्या शेजारी एका बेन्चवर बसले. तसं एकमेकांच्या शेजारी बसायला जाताना त्यांची जी नजरा नजर झाली न, ती त्यांच्या नात्याबद्दल खूप काही सांगून गेली. त्यांची order, आमची order, वेगवेगळीच होती; पण ताटल्या एका हातातून दुसऱ्या हातात फिरल्या. थोडं पोटात गेल्यावर बिलने अचानक गंभीर होत आम्हाला सांगितलं, “ I have a confession to make. Three weeks ago I was in a really bad place, my long time spiritual guide passed away. I couldn't stop the tears, the bouts of crying; nothing helped. After a couple of days in mourning I had the most compelling urge to see you all but I had no way of meeting you, finding you. So I stalked Facebook, but I didn't find you ...I found Amruta's pictures on her sisters wall, but then I started reading one of her posts. It was a poem by a Sufi poet shared on her wall by her spiritual guru. I read it many many times and it gave me peace, it gave me light.” वरवरच्या भेटी आणि बोलण्यानंतर, अध्यात्मिक विहिरीत मारलेली ही उडी दोन क्षण मला आणि निकीतला शांत करून गेली. पेगी आमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे शांतपणे बघत होती, खोल डोहाची शांतता तिच्या डोळ्यात आणि ओठांवर होती, किंवा ती कायमच असेल तशी; मी तिच्याकडे पहिल्यांदा त्या जाणीवेने पाहिलं. पुढे काही बोलण्याच्या आधी बिल ने घसा खाकरून विषय बदलला, “Can I take a picture of you?” आणि त्याने आमचा फोटो काढला...

त्या दिवसा नंतर आम्ही Viks मध्ये अनेकदा जातो ते बिल आणि पेगीला भेटायलाच. गेल्या दोन वर्षात, मुलं, स्थलांतर इत्यादी कारणांमुळे आमच्या Viks मध्ये रंगणाऱ्या कट्ट्यामधली सगळी मंडळी वेगवेगळ्या दिशेला पांगली आहेत. Viks तेच आहे, आमच्या आवडीच्या पदार्थांची किंमत दर वर्षी थोडी वाढली आहे, आणि आमचं कट्टा पण बदलला आहे.

पेगीची मागच्या वर्षी हीप रिप्लेसमेंट झाली त्यानंतर लगेच पुढच्या आठवड्यात ती Viks मध्ये हजर होती, “ घरी विश्रांती घे, बरी कशी होशील?” असं निकीत म्हणाला तेव्हा तिने उत्तर दिलं, “ Viks Is like coming to Church. Good wholesome food, meeting the people we are meant to meet, how can I stay away? My body will heal in its own sweet time..” आम्ही जिथे फक्त पोटोबा भरायला जातो त्याला तिने चर्च वगैरे म्हणून आम्हाला गारच करून टाकलं. पण मग मी पण त्यांच्याबरोबरच्या आमच्या नात्याचा विचार करायला लागले... तिच्या surgery नंतर तिच्या मुलीच्या घरी मी डबा घेऊन गेले होते. पेगीला इतका आनंद झाला होता, ती कौतुकाने स्वतःच्या मुलीला सांगत होती की दुसऱ्या दिवशी मी भारतात चालले आहे तरी मी डबा घेऊन भेटायला आले आहे. तिची मुलगी आंगण झाडत होती, आम्ही कुठे भेटलो, आमची एकमेकांबद्दलची ओढ नक्की काय आहे हे तिला काही केल्या कळत नव्हतं, किंवा तिला ते समजून घ्यायचं नव्हतं. आम्ही दारातूनच निघतो असं म्हटलं तर पेगी हट्टाने तिच्या खोलीत घेऊन गेली . कवर घातलेली पेटी आणि संतूर तिने निकीतला दाखवली. निकीतने पेटीचा एक सूर छेडताच पेगीच्या चेहऱ्यावर जे तेज झळकलं ते मी कधीच विसरणार नाही...पुढे गाणी , शब्द काहीच उमटलं नाही , फक्त तो एकच सूर माझ्या मनात वाजत राहिला...

आज हे लिहायला घेतलं तेव्हा लक्षात आलं की परत त्यांना भेटून महिने होऊन गेले आहेत. शेवटचे भेटलो होतो तेव्हा बिल त्याच्या अंगणाच्या गजांमध्ये अडकलेल्या एका हरणाविषयी सांगत होता. ते हरीण अर्ध अंगणात आणि अर्ध रस्त्यावर होतं. Animal control ने गज फाकवून त्याला अंगणात ढकललं तर त्याला उठताच येयीना. अर्धा तास झाला , त्याच्या कानाशी मोठे आवाज करून झाले. अशा हरणाला सोडून दिलं, तर कुठेतरी रस्त्यात अपघात होऊ शकतो त्यामुळे त्याला मारून टाकणं हेच त्याच्या द्रुष्टीने योग्य ठरेल असं Animal control ला वाटत होतं. बिल चा जीव आम्हाला सांगताना सुद्धा तळमळत होता, डोळे पाणावले होते. त्याने हरणाभवती तात्पुरतं फेन्सिंग केलं आणि हरीण राहूदे त्यात रात्र भर अशी request केली. पहाटे स्वैपाकघरात कॉफ्फी पीत असताना , बिलला ते हरीण फेन्सिंग वर उडी मारून पळत जाताना दिसलं. पेगीने त्याचा हात थोपटला, त्याने तिच्याकडे पोटभर पाहिलं. आम्हला त्या हरणाचे फोटो दाखवले.

बिल आणि पेगीच्या डोळ्यात एकमेकांबद्दल एक हळवेपणा आहे; फक्त प्रेम नाही, हळवेपणा. तो खूप भुरळ घालणारा आहे. ते एकत्र राहत नाहीत, त्यांचं एकमेकांशी लग्न झालेलं नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा खडबडीत रस्त्यांवरचा लांबचा प्रवास होऊन गेलेला आहे, त्या वाटांवरच्या काट्यांचे बोचणे, चुकीच्या वळणाचे बसलेले धक्के, अपेक्षाभंग, स्वप्न पुरती, ध्येयपुरती, घर, कर्ज, मुलं, एक ना अनेक विवंचना पचवूनही, कुण्याएका व्यक्तीच्यासाठी डोळ्यात साठणारं ते हळवेपण मला खूप लोभस,खूप हवं हवंस वाटतं. त्यातून मला ऊर्जा मिळते, उमेद मिळते. वेगवेगळ्या वयात प्रेम कसं असावं ह्याच्या आपल्या कल्पना बदलत असतात...बिल आणि पेगीमुळे मला अजून एक कंगोरा सापडला आहे...चंदेरी केस होतील तेव्हाही माझ्या डोळ्यात हळवेपणा जिवंत ठेवणारा....

काही लोकांचं आपल्या आयुष्यात असणं...नुसतं ते असणं, त्यांचे मोजके शब्द, स्पर्श आणि ते नसतानाही तरळत राहणारा त्यांचा सहवास ..... असं असणं असायलाच हवं ...

तळ टीप: माझ्याकडे बिल पेगीचा फोटो नाही. एक दीड तास त्यांचे चित्र काढण्यात घालवले. इराने ते पाहिल्यावर मला विचारलं, "हे कोण आहेत?" मी म्हटलं बिल आणि पेगी. तर तिने “nope” असं उत्तर दिलं. खरच बिल आणि पेगी असे दिसत नाहीत. पण दोन तास मी त्यांच्या दिसण्याचे, असण्याचे चिंतन करत होते, त्यामुळे त्यांनाही स्वतःच्या फोटोपेक्षा हे चित्रच आवडेल.

(लेखिका अमेरिकास्थित रहिवासी आहेत.)

amrutahardikar@gmail.com

 

Web Title: Bill and Peggy - Amruta Hardikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.