बिनदेशाची टीम

By admin | Published: August 12, 2016 06:08 PM2016-08-12T18:08:33+5:302016-08-12T18:33:34+5:30

जगातल्या कोणत्याच जमिनीवर त्यांना थारा नाही, हाती कोणत्याच देशाचा झेंडा नाही, त्यांच्या पाठी कोणत्याच देशाचं राष्ट्रगीत वाजणार नाही. ...असे एकूण दहा खेळाडू रिओ आॅलिम्पिकमध्ये उतरले आहेत. ही आहे ‘बिनदेशाची टीम’. कोण आहेत हे? कुठून आले? स्वत:च्या देशात खेळणं सोडा, राहणंही शक्य नसलेल्या ‘आॅलिम्पिक वीरां’च्या जिद्दीच्या या चित्तथरारक कहाण्या.

Bindayad team | बिनदेशाची टीम

बिनदेशाची टीम

Next

 - पवन देशपांडे

जगातल्या कोणत्याच जमिनीवर 
त्यांना थारा नाही,
हाती कोणत्याच देशाचा झेंडा नाही,
त्यांच्या पाठी कोणत्याच देशाचं
राष्ट्रगीत वाजणार नाही.
...असे एकूण दहा खेळाडू रिओ आॅलिम्पिकमध्ये उतरले आहेत.
ही आहे ‘बिनदेशाची टीम’.
कोण आहेत हे? कुठून आले? स्वत:च्या देशात खेळणं सोडा, राहणंही शक्य नसलेल्या ‘आॅलिम्पिक वीरां’च्या जिद्दीच्या 
या चित्तथरारक कहाण्या.

जेम्स न्यांग शिंजेइक
धावपटू, मूळ देश : दक्षिण सुदान
बंडखोरांकडून अपहरण होऊ नये या भीतीनं जेम्सनं वयाच्या तेराव्या वर्षी देश सोडला़ तो पळून केनियात आला़ तिथंच निर्वासितांच्या शाळेत प्रवेश घेतला़ आपण धावपटू बनू शकतो, याची जाणीव या शाळेत असताना झाली़ तो म्हणतो, जर तुम्हाला देवानं कौशल्य दिलं असेल तर तुम्हाला त्याचा वापरही करता आला पाहिजे़ जेम्सनं धावण्याच्या सरावाला सुरुवात केली, त्यावेळी धावण्यासाठीचे बूटही नव्हते़ सरावातच जखमाही झाल्या. मित्रांकडून तात्पुरते बूट घेऊन त्यावर सराव करून अखेरीस तो रिओमध्ये पोचला.

रामी अनिस 
जलतरणपटू, मूळ देश : सिरिया

एका छोट्या बॅगेत दोन जॅकेट, दोन टी-शर्ट अन् दोन पँट घेऊन तो निघाला. सिरियातून तुर्कीमध्ये. रोजच्या बॉम्बस्फोटांना, अपहरणांना कंटाळून त्याच्या घरच्यांनी त्याची बाजूच्या देशात जाण्याची व्यवस्था केली़ स्विमिंग हेच त्याचं आयुष्य होतं आणि स्विमिंगपूल हे त्याचं घऱ पण दहशतीच्या जगात पाण्यातलं हे जग सातत्यानं हेलकावे खाणारं होतं़ पुढे काय? हा प्रश्न एका महाकाय लाटेप्रमाणेच त्याच्यासमोर आ वासून उभा असायचा़ पण तो तुर्कीत गेला़ काही दिवस राहून परत सिरियात यावं अशी त्याची इच्छा होती़ पण सिरियातली परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत होती़ अशा वातावरणात आणि घरापासून दूर असतानाही त्यानं स्विमिंग थांबवलं नाही़ तुर्कीतल्या एका क्लबमध्ये आपल्या स्विमिंगला ‘धार’ दिली. पण जोवर त्याच्याकडे तुर्कीचं नागरिकत्व नसेल तोवर त्याला त्या देशाकडून खेळता येत नव्हतं़ तो फक्त स्विमिंगचा अभ्यास आणि अभ्यासच करत होता़ ‘परीक्षा’ कधी द्यायची हेच कळत नव्हतं अन् इच्छा असूनही परीक्षेला बसता येत नव्हतं. सिरियाकडून खेळण्याचा प्रश्नच नव्हता. आपलं कौशल्य सिद्ध करण्यासाठी तो एका छोट्याशा नावेनं ग्रीक आयलँडकडे निघाला. तिथून तो बेल्जियममध्ये घेंट शहरात पोहोचला. त्याला तिथं आश्रय मिळाला़ निर्वासित म्हणून जगू लागला़ त्याचं स्विमिंगचं स्वप्न या शहरात पूर्णत्वास येणार होतं़ कारण निर्वासितांच्या टीममध्ये त्याला स्थान मिळालं. बेल्जियममध्ये पाच वर्षं केलेल्या स्विमिंगचा सराव फळाला आला. त्याची निवड झाली. तो आता आपल्यासारख्याच निर्वासितांसाठी खेळू इच्छितोय. 

रोज नथिके लोकोन्येन 
धावपटू, मूळ देश : दक्षिण सुदान

दहा वर्षांची होती तेव्हा तिनं देश सोडला. ती केनियात आली़ उत्तर केनियातल्या काकुमा या निर्वासितांच्या छावणीत़ तिथंच शाळेत जाऊ लागली़ पण तिच्यातलं टॅलेंट तिथल्या शिक्षकानं ओळखलं़ तिला दहा किलोमीटरच्या शर्यतीत भाग घ्यायला सांगितलं़ आश्चर्य म्हणजे, त्यात रोजनं दुसरं स्थान पटकावलं़ तेव्हापर्यंत तिला खरं तर स्पर्धा काय असते याची कल्पनाही नव्हती़ या स्पर्धेनंतर तिचं प्रशिक्षण सुरू झालं़ पण तेही जुजबी़ आत्ताआत्तापर्यंत तिच्याकडे धावण्यासाठी लागणारे चांगले बूटही नव्हते़ त्यामुळं तिला अनेकदा दुखापतीही व्हायच्या. आता त्या दुखापतींवर अन् भेगाळल्या पायांवर आॅलिम्पिकचा बूट चढलाय़ ती म्हणते, मी अन् माझे कुटुंब जर सुदानमधून पळून आलो नसतो तर कदाचित आम्ही आता जिवंतही नसतो़ माझी निवड होणं हे खरं तर निर्वासितांसाठी आशेची किनार कुठेतरी असतेच, याचंच उदाहरण आहे़ रोज या आॅलिम्पिकमध्ये यशस्वी झाली तर तिला परत येऊन या अशांत जगात शांततेची मॅरेथॉन स्पर्धा भरवायचीय़ 

अँजेलिना नदाई लोहालिथ
धावपटू, मूळ देश : दक्षिण सुदान
वयाच्या सहाव्या वर्षीच तिला देश सोडावा लागला. युद्ध संपलेलं. गाव उद्ध्वस्त. उत्तर केनियातल्या निर्वासितांच्या छावणीतील शाळेत तिला आपल्यात धावपटू लपलेला असल्याचं गवसलं़ तेव्हापासून तिनं धावण्याची जिद्द सोडली नाही़ त्यानंतर तिनं अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही बाजी मारली. त्यातून मिळालेल्या पैशातून तिनं स्वत:चं आयुष्य बदललं. आता पदकं जिंकणं हे जसं महत्त्वाचं तसंच तिच्यासाठी त्यासोबत किती रकमेचं बक्षीस आहे, हेसुद्धा महत्त्वाचं असतं. कारण धावून धावून कमावलेल्या पैशातून तिला आपल्या वडिलांसाठी पक्कं घर बांधायचं आहे़

पोपोल मिसेंगा
ज्युदो, मूळ देश : काँगो
तो नऊ वर्षांचा होता तेव्हा आपल्या कुटुंबासोबतच त्याला काँगोमधल्या किसंगानीमधून बाहेर पडावं लागलं़ यादवी युद्धात सारा देशच होरपळत होता़ त्यातच त्याची आणि कुटुंबाची ताटातूट झाली़ पोपोल मिसंगा गेला दुसरीकडेच़ एका जंगलात अडकला़ काळ्याकुट्ट अंधारात आणि पशू-प्राण्यांच्या भीतीच्या छायेतच त्यानं आठ दिवस जंगलात काढले़ शेवटी त्याची सुटका झाली अन् तिथून तो किन्शासा येथील निर्वासितांच्या छावणीत राहू लागला़ या छावणीनं त्याला ज्युदोचं वरदान दिलं़ ज्या वयात कुटुंबातील मोठ्या व्यक्तीकडून मार्गदर्शन हवं असतं त्या वयात निर्वासितांच्या छावणीत त्याला राहावं लागलं़ २०१३ मध्ये तो, योलांद मबिकासह अनेक खेळाडू रिओमध्ये वर्ल्ड ज्युदो चॅम्पियनशिपसाठी आले. तेव्हा त्यांच्यावर प्रशिक्षकानंच अन्याय केला़ शेवटी सारेच खेळाडू रस्त्यावर उतरले होते़ ब्राझीलमध्ये त्यांना निर्वासित म्हणून ‘दर्जा’ मिळाला़

निर्वासितांचा पहिलाच संघ

१८९६ साली आॅलिम्पिकची सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्यांदाच निर्वासितांची टीम आॅलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे़ त्यात आपापल्या देशांमधून हाकलले गेलेले / निर्वासित झालेले दहा खेळाडू आहेत. ४३ जणांमधून निवडलेले हे दहा खेळाडू २०० देशांच्या संघांशी लढतील़ या टीमला त्यांचं घर नाही, त्यांचा स्वत:चा राष्ट्रध्वज नाही आणि राष्ट्रगीतही नाही़ त्यांच्यामागे आहे आॅलिम्पिकचा ध्वज, आॅलिम्पिक गीत आणि आॅलिम्पिकचाच पैसा. आॅलिम्पिक समितीनंच पुरवलेले प्रशिक्षक, व्यवस्थापक या टीमला मार्गदर्शन करतात़ 
६.५ कोटी निर्वासितांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या ‘रेफ्यूजी टीम’मध्ये सिरियातले दोन जलतरणपटू, काँगोमधले दोन ज्युदोपटू, इथिओपियामधील मॅरेथॉन धावपटू, तर दक्षिण सुदानमधल्या पाच धावपटूंचा समावेश आहे़
हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत यातले अनेक खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेले असतील कदाचित, पण अनेकांच्या मते हरूनही ते रिओ आॅलिम्पिकचे चॅम्पियनच असतील! 

योनास किंदे
मॅरेथॉन, मूळ देश : इथिओपिया
पाच वर्षांपूर्वी त्यानं इथिओपियामधून स्वत:ची सुटका करून घेतली़ तो लक्झेंबर्गमध्ये आला़ कारण इथिओपियामध्ये त्याच्या जिवाला धोका होता़ कोणत्याही क्षणी आपला जीव घेतला जाऊ शकतो, याची त्याला भीती होती. त्यातूनच त्यानं देश सोडला़ तीस वर्षं खुल्या वातावरणात काढल्यानंतर कोणालाही एखाद्या निर्वासितांच्या छावण्यात जुळवून घेणं सहजासहजी शक्य नाही़ पण योनासनं ते केलं़ युरोपात राहून तो खूश आहे़ कारण त्याला इथं त्याचं करिअर करता येतंय़ रोजीरोटीसाठी टॅक्सी चालवायची आणि दोन वेळ मॅरेथॉनचा सराव करायचा हेच त्याचं रुटीऩ पण जेव्हा आॅलिम्पिकनं निर्वासितांच्या संघाची घोषणा केली, तेव्हापासून त्यानं सरावही वाढविला़ आता तो आॅलिम्पिकमध्ये आहे आणि त्यातूनच त्याला निर्वासितांना संदेश द्यायचाय़ आपल्यातले चांगले खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करू शकतात़ आपल्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. आपण निर्वासित आहोत, पण खचून न जाता उभं राहायला हवंच़ किमान निर्वासितांसाठी तरी... असं योनास म्हणतो़

येइश पुर बेइल 
धावपटू, मूळ देश : दक्षिण सुदान

देश सोडला त्यावेळी तो उण्यापुऱ्या ११ वर्षांचा होता़ त्यानं दक्षिण सुदानमधल्या नासिर शहरापासून केनियातल्या निर्वासितांच्या छावणीपर्यंतची यात्रा एकट्यानं पार केली़ हरवलेलं पोर, अशी त्याची ओळख होती़ कारण त्याला तशाच पोरांच्या सोबत ठेवलेलं होतं़ दक्षिण सुदानमधली अशी हजारो हरवलेली पोरं एकत्र राहत होती़ त्यांच्यातच येइश मोठा झाला़ त्याला कळत होतं, आपल्याला काहीतरी करायचंय़ स्वत:च्या पायावर उभं राहायचंय़ आपली ओळख निर्माण करायचीय़ याच जिद्दीनं त्यानं फुटबॉल खेळायला सुरुवात केली. पण या खेळात इतरांवरही अवलंबून राहावं लागतंय, हे कळल्यावर त्याचं फुटबॉलमध्ये मन रमेना़ शेवटी त्याला धावण्याचा पर्याय सापडला़ एकट्यानं ध्येय गाठण्यासाठी या खेळाची निवड त्यानं केली़ निर्वासितांच्या छावणीत जीम नव्हती, धावताना पायात घालावे असे बूटही नव्हते, शिवाय धावण्याचा सराव करावा असं वातावरणही नव्हतं़ सकाळपासून सुरू होणारा उन्हाचा कडक मारा संध्याकाळपर्यंत कायम राहत होता़ पण साऱ्या समस्या नजरेसमोर असतानाच दक्षिण सुदानचं चित्र त्याच्या डोळ्यांत असायचं़ भयाण झालेला देश सुधारायची ताकद केवळ तरुणांमध्ये आहे असंही त्याला वाटायचं़ आपल्या कुटुंबाला, आई-वडिलांना चांगलं आयुष्य जगता यावं, असं त्याला वाटत राहायचं़ याच ऊर्मीतून त्यानं धावण्यात प्रावीण्य मिळवलं़ आता तो थेट आॅलिम्पिकमध्ये धावतोय़ कारण निर्वासितांचीही स्वप्न पूर्ण होऊ शकतात, अशी उमेद त्याला साऱ्यांमध्ये जागवायचीय़ 

योलांद मबिका 
ज्युदो, मूळ देश : कोेंगो

ज्युदो या खेळानं मला कधीच पैसा दिला नाही, पण मन मात्र स्ट्राँग झालं. मार खाऊन शरीर टणक व्हावं तसं मन घट्ट होत गेलं़ सगळे अन्याय, अत्याचार विसरण्यासाठी ज्युदो पुरेसं होतं़, असं योलांद सांगते. दुडूदुडू धावण्याचंही जेव्हा तिला अप्रूप वाटायचं त्या वयात ती आपल्या कुटुंबापासून विलग झाली. आफ्रिका खंडात कोंगो हा तिचा देश. त्यातल्या बुकावू या छोट्या शहरातून एका हेलिकॉप्टरनं तिला उचललं अन् किन्शासा शहरात आणलं. ती अनाथ मुलांच्या जगात आली़ तिथं ती ज्युदो शिकायला लागली़ प्रचंड मेहनत करायला लागली़ पण तिच्या प्रशिक्षकानं तिचा छळ मांडला. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ज्युदोसाठी जायची तेव्हा तेव्हा तिचा प्रशिक्षक तिचा पासपोर्ट हिसकावून जप्त करून घ्यायचा़ पुरेसं खायलाही द्यायचा नाही.अत्याचार करायचा़ २०१३ मध्ये ती रिओमध्ये वर्ल्ड ज्युदो चॅम्पियनशिपसाठी आली तेव्हाही असंच झालं. हॉटेलमध्ये बंदिवासात असल्यासारखं तिला ‘कैद’ केलेलं असायचं. या सगळ्या छळवादाला कंटाळून योलांद अखेर रस्त्यावर उतरली. येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे मदतीसाठी याचना करू लागली. जिद्दीला साथ मिळतेच, तशी योलांदलाही मिळाली़ आता ती रिओच्या आॅलिम्पिक संघात आहे. ज्युदोचं कठीण स्वप्न साकार करताना घरची आठवण आली की ज्युदोच्या किकमध्ये आपलं मन गुंतवते. ‘माझ्या देशात अजूनही अनेकांवर अत्याचार सुरू आहेत़ युद्धजन्य स्थितीत अनेक जण जगताहेत़ त्यांची सुटका व्हावी’ एवढीच इच्छा असल्याचं ती सांगते़ कठीण परिस्थितीचा सामना करत तिनं आॅलिम्पिक गाठलंय. 

पाउलो अमोटून लोकोरो 
धावपटू, मूळ देश : दक्षिण सुदान

आपल्या कुटुंबानं पूर्वापार सांभाळलेली गुरं घ्यायची आणि चरायला न्यायची़, एवढंच त्याला माहीत. गावाबाहेरचं जग त्यानं पाहिलंही नव्हतं़ दक्षिण सुदानमधल्या गरीब कुटुंबात राहताना स्वप्नं फार मोठी नव्हतीच़ पण सततच्या युद्धांमुळे त्याला शेजारच्या देशात -केनियामध्ये - जावं लागलं. तो तिथं एक निर्वासितांच्या छावणीत राहिला. या छावणीत त्याच्या स्वप्नांची पहाट झाली़ नैरोबीजवळच्या एका शाळेत तो खेळात प्रवीण होताच; शिवाय त्याला तेग्ला लोरौप या विश्वविक्रमी धावपटूचं मार्गदर्शनही लाभलं. आॅलिम्पिकपर्यंत येण्यापूर्वी त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी लागणारे बूटही नव्हते़ पण, सतत अनवाणी पायानं धावल्यानंतर पडणारे घट्टे त्याची जिद्द मागे पडू देणार नव्हते. आता त्याला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय़ धावण्यात सगळ्या जगाला मागे सोडायचंय़ जेव्हा त्याची आॅलिम्पिकच्या निर्वासित संघात निवड झाली, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता़ तो म्हणतो, मी निर्वासित़ साऱ्यांसारखाच छावणीत राहणारा़ त्यांच्यासाठी माझी स्वप्नं घेऊन मी धावणार आहे़ मी जन्मलो, जगलो त्या ठिकाणांहून माझी माणसं मला धावताना पाहतील तेव्हा त्यांना आनंद होईल़ तेच माझ्यासाठी खरं पदक असेल़ 


युसरा मर्दिनी 
जलतरणपटू, मूळ देश : सिरिया
एका छोट्या नावेत बसून सारेच जण निघाले होते़ निर्वासितच़ फिरतीवऱ सिरियातील दहशती वातावरणाला कंटाळून घर, गाव, देश सोडलेले असंख्य जण असेच बाहेर पडलेले़ त्यातच युसरा आपल्या कुटुंबासोबत होती़ पण मध्येच त्या नावेचं इंजिन बंद पडलं़ तसंच थंडीत कुडकुडत राहून मरण येणार की काय, याची भीती होती़ थंड हवा, पाणीही गाऱ पण युसरा स्विमर होती़ युसरानं फिना वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सिरियाचं प्रतिनिधित्वही केलं होतं़ तिला असं पाण्यात मरण यावं, हे काही पटत नव्हतं़ ती अन् तिची बहीण पाण्यात उतरली़ दुसरा पर्याय नव्हता़ पोहणं दोघींनाच येत होतं़ या दोघींनी शेकडो मैल ढकलत ही नाव किनाऱ्यापर्यंत आणली़ साऱ्यांचा जीव वाचला़ आपल्या नावेतलं कोणी बुडणं ही कल्पनाच युसराला पराभवाची जाणीव करून देत होती. त्या दोघी साऱ्यांना ग्रीसपर्यंत घेऊन आल्या. ग्रीसमधल्या लेसबोसमध्ये आल्यानंतर हे लोक स्मगलर्सच्या तावडीत सापडले. पण ती तेथूनही निसटली़ पुढे जर्मनीत गेल्यावर तिनं पुन्हा प्रशिक्षण सुरू केलं़ जिवंत राहण्याची ही जिद्द... पाण्याशी असलेली मैत्री तिला आॅलिम्पिकपर्यंत घेऊन आलीय़ ती म्हणते, कठीण परिस्थिती वेदना देऊन जाते, आयुष्यात अनेक वादळं येतात पण त्यानंतर शांतता-सुख असतं, हे मी साऱ्यांना दाखवू इच्छिते़ सुतकी चेहऱ्यानं रोजचं जीवन रोजच्या मरणासारखं जगणाऱ्या निर्वासितांना मी जगण्याची उमेद देऊ इच्छिते... असं केवळ अठरा वर्षांची ही युसरा सांगते.

Web Title: Bindayad team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.