BLOG: मी भोंगा बोलतोय!!...माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो, जरा माझंही ऐकता का?
By मोरेश्वर येरम | Published: April 27, 2022 11:20 AM2022-04-27T11:20:24+5:302022-04-27T11:26:06+5:30
धार्मिक मुद्द्यात मी पडत नाही कारण सर्वधर्मियांमध्ये माझा वावर असतो. सर्वांसाठी समान काम करतो.
- मोरेश्वर येरम
हॅलो हॅलो...टेस्टिंग वन टू थ्री फोर...ऐकताय का? मी भोंगा बोलतोय...भोंगा म्हणा लाऊडस्पीकर म्हणा...आम्ही भावंडच! कारण आमचं काम एकच आणि भावनाही एकच. आता म्हणाल असं काय झालं की आत्ताच मला कंठ फुटला. पण तुम्हीच राव सध्या माझी इतकी आठवण काढताय की उचक्यांनी नुसत्या शिट्या वाजताहेत अन् मला नीट कामच करता येईना. म्हणूनच म्हटलं एकदा काय ते मनातलं बोलूनच टाकू. बरं दरवेळी मी तुमचा आवाज होतोच की, पण माझा आवाज कोण होणार बरं? असो. आज माझं म्हणणं तुमच्या पर्यंत पोहोचायलाच हवं. म्हणूनच आज तुम्ही बोलाल ते नव्हे, तर मी बोलेन ते जरा कान देऊन ऐका अशी विनंती. अर्थात कमी आवाजात आणि डेसीबलची मर्यादा पाळूनच बोलेन. मूळात माझा आवाज वाढवला कुणी? तुम्हीच ना? सगळं तुम्हीच करता आणि मग त्रास होऊ लागला की नियम आणता, कायदा काय करता नी त्यावरून राजकारणही!
धार्मिक मुद्द्यात मी पडत नाही कारण सर्वधर्मियांमध्ये माझा वावर असतो. सर्वांसाठी समान काम करतो. पण काही गोष्टींची आठवण करून द्यायला हवी. मशीद, मंदिर यावरील भोग्यांचं राहूद्यात पण गिरणींवरच्या भोंग्यांचं तेवढ आधी बघा. खरंतर खूप उशीर झालाय. कारण अनेकांचं पोट भरणारे कारखाने आणि गिरण्या केव्हाच काळाच्या ओघात बंद झाल्यात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात लॉकडाऊनमुळे देशातील एकूण २३ गिरण्या बंद झाल्यात. त्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. या गिरण्यांवरील माझा आवाज सुरू करायला हवा. तिथं खरंतर लक्ष दिलं तर बरं होईल. माझ्या आवाजावर त्यांचं पोट भरत होतं पण आज तेच कामगार बाहेर अवसान गळून निष्क्रीय होऊन बसलेत. पापण्यांची ओली किनार घेऊन एकटक माझ्याकडे बघताहेत. त्यांच्यासाठी मला माझा आवाज परत हवाय. माझी निर्मिती तुम्हीच केलीत. अर्थात उद्देश सुविधा हाच होता. पण एखाद्या सुविधेमुळे इतरांना त्रास होऊ नये हे जितकं खरं आहे तितकंच यावर राजकारण कुणी करू नये याची काळजी देखील घ्यायला हवी. आज माझ्यामुळे तुमचा आवाज एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहोचतो. पण मी नसलो तर तुमचा आवाज कोण बनेल? मी तर एक माध्यम आहे. एक असं माध्यम की जे आवाजाची ताकद दाखवून देतं. सुविधा म्हणून होत असलेला माझा वापर मलाही खूप समाधान देतो. कारण आपण इतरांच्या कामी येतोय ही भावनाच तुम्हाला स्फूर्ती देत असते.
दर्यात जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या कोळी बांधवांनाही मी पाहत असतो. चक्रीवादळाची वर्दी देताना माझा उपयोग होतो हेही माझं भाग्यच. त्यामुळे माझा फक्त त्रासच होतो असं नाहीय. धार्मिक स्थळांवर होत असलेला माझा वापर आणि त्यातून होणारा त्रास हा मुद्दा आपण ग्राह्य धरूच. पण तेवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता गल्लीबोळात, चौका-चौकात राजकीय सभांवेळी याच राजकीय नेत्यांकडून केला जाणारा माझा अतिवापर आणि त्यानं विद्यार्थ्यांना होणारा त्रासही मी पाहात आलोय...
मला अडगळीत टाकण्यात यावं अशी माझीही इच्छा नाहीय. पण मला दूषण लागण्याऐवजी माझ्याकडून तुम्हाला फायदा झाला तरच ते या भूतलावरील माझं खरं योगदान ठरेल. हे तुम्हाला कळकळीनं सांगण्याचं कारण म्हणजे हे फक्त तुमच्याच हातात आहे. हाफकिनसारख्या लोकोपयोगी संस्थांवरील माझं अस्तित्व मला अभिमानास्पद वाटतं. तिथला माझा आवाज नव्या निर्मितीची प्रेरणा देणारा, नवचैतन्य देणारा असतो. खरंतर राजकीय, सामाजिक व्यासपीठावरही माझं अस्तित्व गरजेचंच आहे की. कारण एका व्यक्तीचे विचार हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. खूप सोयीचं ठरतं. शेवटी मी माझं काम करत असतो. माझ्या माध्यमातून काय आणि कसं पोहोचवायचं हे तुमच्याचाच हातात असतं. धार्मिक स्थळांवर माझं अस्तित्व त्रासदायक आणि अयोग्य वाटत असेल तेही मान्य. पण त्यामागे केवळ स्वार्थ नसावा इतकीच भोळी भाबडी अपेक्षा. माझा आवाज हा तुमचा आवाज असायला हवा. सध्या माझी डिमांड वाढलीय. खपही खूप होतोय म्हणे. पण राजकीय हेतूंनी वाढलेली डिमांड काय कामाची? तुमचे प्रश्न, अडचणी, व्याप, संकटं मांडण्यासाठी आणि त्यावर तोडगा निघण्यासाठी मला काम करायचंय. येत्या काळात कदाचित एकवेळ अशीही येईल की तुम्ही सगळे भोंगे बंद कराल पण संकटाची कल्पना देणारा भोंगा तुम्ही कधीच बंद करू शकणार नाही. नाहीतर तुम्ही संकटात याल!
थांबतो....