दोन घडीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 06:00 AM2020-08-09T06:00:00+5:302020-08-09T06:00:02+5:30

प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवतो. लहानपणी बाहुल्या, भातुकली  आपल्याला सहजीवनाचे धडे देतात,  व्यक्तिमत्त्व विकास घडवतात.  ठोकळ्यांचे खेळ कल्पनांना आकार देतात, तर पटक्रीडा म्हणजे बोर्ड गेम आयुष्याचे धडे देतात.  सापशिडी आणि बुद्धिबळ हे भारताने जगाला दिलेले त्यातले दोन महत्त्वाचे खेळ.

Board games; which gives life lessons... | दोन घडीचा डाव

दोन घडीचा डाव

Next
ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- स्नेहल जोशी

आयुष्यात आपण नित्य नवीन उतार चढावांना सामोरे जात असतो. उद्याचा दिवस काय परिस्थिती घेऊन येईल हे आपल्याला माहीत नसतं तरीही आपण उद्याची योजना करतो. आपल्या अपेक्षेनुसार घडलं तर दिवसाचं समाधान मिळतं आणि अपेक्षे-विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर आपण नव्यानं निर्णय घेतो. त्यांच्या परिणामाचे अंदाज बांधतो आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करत जातो. नशिबाचीही साथ असेल तर इप्सित मार्ग सापडतो. काही वेळा मार्ग हरवतोही; पण हे चक्र अविरत चालू असतं.
खेळ तरी याहून काय वेगळे असतात? बरीच वर्षं संथ लयीनं चालणारं हे चक्र काही तासांत फिरवलं की त्याचं रूपांतर रंजक खेळात होतं. नशीब, बुद्धिमत्ता, कौशल्य आणि निर्णयक्षमता यांचा कल्पक वापर करून शेकडो बोर्ड गेम आजवर डिझाइन करण्यात आले आहेत.
लहानपणीच्या बाहुल्या, भातुकली आपल्याला सहजीवनाचे धडे देतात, व्यक्तिमत्त्व विकास घडवतात. ठोकळ्यांचे खेळ कल्पनांना आकार द्यायला मदत करतात. आणि पटक्रीडा म्हणजेच बोर्ड गेम खरोखरच आयुष्याचे धडे देतात. 
अर्थात करमणूक हा खेळाचा मुख्य हेतू विसरून चालणार नाही. त्याचबरोबर स्पर्धा हाही या खेळांचा एक महत्त्वाचा घटक आहे. सवंगड्यांशिवाय पटावरचे खेळ शक्यच होत नाहीत. मानव उत्क्रांतीचा मागोवा घेता असं लक्षात येतं की, भाषेचाही जन्म होण्याअगोदर खेळांची सुरुवात झाली आहे. टर्की येथील बसूर होऊक या ठिकाणी सापडलेले साधारण 5000 वर्षांपूर्वीचे दगडात कोरलेले रंगीत फासे या गोष्टीला दुजोरा देतात. इतकंच काय तर हरप्पाकालीन अनेक ठिकाणांहून उत्खननात सापडलेले घनाकृती फासे आणि कवड्या हे या खेळांच्या अस्तित्वाचे पहिले पुरावे म्हणता येतील. 


सर्वसाधारणपणे पटक्रीडेशी आपली पहिली ओळख होते ती साप-शिडीच्या खेळातून. हा खेळ भारतात जन्माला आला तेव्हा तो ‘मोक्षपट’ या नावानं ओळखला जात असे. कर्म आणि काम (कामना) या कल्पना रुजवण्यासाठी मोक्षपटाची निर्मिती झाली. 81 चौकटीत बसवलेल्या या डावात, प्रत्येक चौकोन कर्म किंवा कामना दर्शवते. चांगल्या कर्माबद्दल शिडी चढून जात येते तर कामना केल्यास कामसर्प गिळंकृत करतो. त्याचं प्रायश्चित्त करून आपलं पुन्हा मार्गक्रमण सुरू होतं. मोक्षप्राप्तीचं अंतिम ध्येय ठरलेलंच आहे. त्यासाठी सवंगड्यांमध्ये लागलेली शर्यत हे करमणुकीचं मुख्य साधन ठरतं. निष्काम कर्मयोगाचा मौलिक धडा देणारा हा खेळ मात्र फाशांच्या दानावर म्हणजेच नशिबावर विसंबून आहे. इथे खेळणार्‍याकडे निर्णय घेण्याची स्वायत्तता नाही.
मोक्षपट युरोपात गेल्यावर खेळातलं तत्त्वज्ञान हरवलं आणि फक्त साप-शिडी शिल्लक राहिली. संस्कृती बदलते तसे खेळ बदलत जातात. काळाच्या गरजेनुसार मुलांना नवे धडे देणारी ‘सफाई साप शिडी’ नाशिकच्या निर्मलग्राम नावाच्या पर्यावरण आणि स्वच्छतेच्या कार्याला वाहिलेल्या संस्थेनं डिझाइन केली आहे. 
सापशिडीप्रमाणेच अजून एक प्रसिद्ध खेळ भारतानं जगाला दिला आहे. तो म्हणजे बुद्धिबळाचा. 
सहाव्या शतकात गुप्त राजवंशातला सर्वात धाकटा राजकुमार एका युद्धात मारला गेला. त्याच्या शौर्याची कहाणी त्याच्या शोकविव्हळ आईला सांगण्यासाठी पहिल्यांदा हा अष्टपदी पट रचण्यात आला. पायदळ, अश्वदळ, हत्तीदळ आणि रथदळ अशी चतुरंगी सेना या पटावर मांडण्यात आली आणि युद्धातल्या घटनांचं नाट्य राणीसमोर मांडण्यात आलं. ही रचना इतकी परिणामकारक होती की त्यापुढे ती युद्धाचे डावपेच योजण्याचं, राजकुमारांना रणनीतीचे धडे गिरवण्याचं साधन झाली. 
‘चतुरंग’ हा नवा दरबारी खेळ म्हणून पुढे आला तेव्हा त्यात पायदळ, हत्ती, घोडे आणि रथ यांच्या चालींचे निराळे नियम ठरवण्यात आले. राजाला पटावर मुक्त संचार होता. मुक्तीपटाप्रमाणे यात नशिबाच्या दानाला मुळीच जागा नाही; त्याउलट हा पूर्णपणे बुद्धिकौशल्याचा खेळ होता. राजा आपल्या रणनीतीच्या जोरावर चतुरंगी सेनेवर वार करत आणि सैन्याचे हल्ले परतवत पटावर विजय मिळवतो. 
असा हा रंजक खेळ रेशीम मार्गानं पर्शिया खंडात येऊन पोहोचला. राजकारणाचा, समाजपद्धतीचा, संस्कृतीचा परिणाम खेळांवर झालेला यापूर्वीही आपण पहिला आहे. चतुरंगाचंही तेच झालं. पर्शियात ‘चतरंग’ म्हणून पोहोचलेला हा खेळ, तिथल्या राजा म्हणजे ‘शाह’मुळे ‘शतरंज’ झाला.
राजा विरुद्ध सैन्य या युद्धाचं रूपांतरही दोन विरोधी शहा आणि त्यांच्या सैन्यांच्या युद्धात झालं. आता राजाचा सल्लागार म्हणून वजीर आला. कोण्या एकानं विरोधी ‘शाह’वर ‘मात’ (म्हणजे मौत किंवा मरण) आणली की खेळ संपला. ‘चेक-मेट’ हा ‘शाहमात’ याच शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश आहे. 15व्या शतकात युरोपात राणी प्रबळ होती. त्यामुळे वजिराची जागा राणीनं घेतली आणि खेळाच्या नियमात पुन्हा एकदा बदल करण्यात आले. राणीची राजकीय ताकद दर्शवायला, राणीला चौफेर हालचालीची स्वायत्तता देऊन राजाला र्मयादा घालण्यात आली. 
जसजशी राजेशाही संपत गेली तसतसा हा दरबारी बुद्धिबळाचा खेळ कॉफी शॉपमध्ये शिरला आणि सामान्य झाला. नवा चेस बुद्धिमत्तेचं, सृजनशीलतेचं प्रतीक झाला. खेळाचे डावपेच बदलू लागले आणि खेळ अजूनच रोमांचक आणि नाट्यपूर्ण होऊ लागला. 
काहीवेळा राणी गमवून विरोधी खेळाडूला शह-मात देणारे अँडॉल्फ अँण्डरसनसारखे धाडसी डावपेच रचणारे खेळाडू तयार झाले. 19व्या शतकात बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू झाल्या. रशियाई खेळाडूंनी बरीच वर्षं या स्पर्धेत अधिराज्य गाजवलंय. 
या खेळाला मोठी कलाटणी मिळाली जेव्हा आयबीएम कंपनीनं बुद्धिबळ खेळणारा संगणक तयार केला. आयबीएमच्या ‘डीप ब्लू’नं ग्रँड मास्टर गॅरी कॅस्पारॉव्हला हरवून नवा विक्रम केला होता. अर्थात कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार करणाराही माणूसच आहे, तेव्हा मानवी बुद्धिमत्ता काय उंची गाठू शकते याचा अंदाज आपण लावू शकता. शेवटी स्पर्धा हे कार्यशीलतेचं, खेळाचं केवळ दुय्यम साध्य आहे. 
सृजनशील खेळाडू इतरांना मागे टाकण्याच्या ईर्षेपेक्षा ध्येयसिद्धीसाठी अधिक प्रेरित, उत्तेजित असतो. आणि पटक्रीडा म्हणजे बोर्ड गेम आयुष्यातल्या प्रसंगांचीच रूपकं घेऊन आपल्या समोर ठेवतात. दान काय पडेल, सवंगडी कोण मिळेल हा नशिबाचा भाग झाला. ते स्वीकारून, यथाशक्ती निर्णय घेऊन खेळाप्रमाणेच आयुष्याची मजा घेणं आपल्या हातात आहे.
 
snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि 
प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

Web Title: Board games; which gives life lessons...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.