शरीर, मेंदू आणि मन कायम सक्रिय असले पाहिजे!- - डॉ. केकी टुरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 06:02 AM2021-02-28T06:02:00+5:302021-02-28T06:05:07+5:30

बॉम्बे हॉस्पिटलमधील न्युरोसर्जरी विभागातील डॉ. केकी टुरेल हे अत्यंत अनुभवी, निष्णात न्युरोसर्जन आहेत. न्युरोसर्जरी क्षेत्रातील तब्बल ४७ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. न्युरोलॉजिक सोसायटी ऑफ इंडिया, इपिलेप्सी असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया अशा विविध महत्वाच्या संस्थांमध्ये डॉ. केकी कार्यरत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. डॉक्टरी पेशाशिवाय छायाचित्रण, कला, भाषा, लेखन, क्रीडा असे छंदही त्यांनी जोपासले आहेत. ‘लोकमत’च्या वतीने डॉ. केकी टुरेल यांना ‘धन्वंतरी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद..

Body, brain and mind must be active forever!- Dr Keki Turel | शरीर, मेंदू आणि मन कायम सक्रिय असले पाहिजे!- - डॉ. केकी टुरेल

शरीर, मेंदू आणि मन कायम सक्रिय असले पाहिजे!- - डॉ. केकी टुरेल

Next
ठळक मुद्देशरीराप्रमाणे मेंदूचा व्यायामही आवश्यक असतो. योगा आणि ध्यानधारणेमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हे शास्त्रीयदृष्ट्या सिध्द झाले आहे. त्याबाबतचे रिसर्च पेपरही उपलब्ध आहेत.

- डॉ. केकी टुरेल

मेंदूच्या विकासासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? मेंदूची कार्यक्षमता कशी वाढवता येईल?

- सर्वसामान्य मनुष्य मेंदूचा वापर केवळ १५ टक्केच वापर करतो. प्रत्येकाच्या मेंदूची कार्यक्षमता कमालीची असते. काही जणांना कार्यक्षमता लवकर लक्षात येते, तर काहींना उशिरा लक्षात येते. एखादी कला किंवा ज्ञान उपजत असते, ते आपल्या जनुकांमध्ये असते. योग्य वेळी त्याचा शोध लागतो. आपला मेंदू प्रत्येक वेळी सक्रिय ठेवणे आवश्यक असते. एखादा गुण उपजत आहे, म्हणून प्रत्येक वेळी यश मिळत नाही. शरीराप्रमाणे मेंदूचा व्यायामही आवश्यक असतो. योगा आणि ध्यानधारणेमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हे शास्त्रीयदृष्ट्या सिध्द झाले आहे. त्याबाबतचे रिसर्च पेपरही उपलब्ध आहेत. मला दलाई लामा, बीकेएस अयंगार, श्री श्री रवीशंकर यांच्यासारख्या विभूतींचा सहवास लाभला आहे. त्यामुळेही योगा, प्राणायाम, ध्यानधारणा यांचा मेंदूवर होणारा परिणाम लक्षात आला आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत.

मेंदूशी संबंधित आरोग्याबाबत भारताचे स्थान कसे आहे?

- कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यासाठी योग्य माहिती, आकडेवारी आवश्यक असते. डेटा कलेक्शनच्या बाबतीत आपण पुरेशी प्रगती केलेली नाही. डेटा कलेक्शनशिवाय योग्य विश्लेषण करता येत नाही. एखादा आजार सर्वसामान्य आहे की नवीन स्वरुपाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रामाणिक आणि मुळापर्यंंत जाऊन केलेले रिपोर्टिंग आणि अचूक डेटा कलेक्शन आवश्यक आहे. त्यासाशिवात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही.

कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मेंदूशी संबंधित विकार उदभवतात का? त्याचे प्रमाण किती आहे?

- कोरोना झालेला असताना आणि कोरोना होऊन गेल्यानंतरही मेंदूशी संबंधित विकार उद्भवण्याची शक्यता असते. श्वसनमार्गामध्ये अडचण येण्यापूर्वीच चव जाणे, वास न येणे अशा लक्षणांवरुन कोविडचे निदान केले जाते. ही लक्षणे मेंदूशी संबंधित आहेत. कोरोनाचे परिणाम शरीरारील सर्वच संस्थांवर दिसून येतात. कोरोना होऊन गेल्यानंतरही थकवा येणे, नैराश्य दाटून येणे हे त्रासही न्युरोलॉजिकल सिस्टिमशी संबंधित आहेत. मात्र, कोरोनाचा स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याची उदाहरणे समोर आलेली नाहीत. श्वासोच्छवासाचे प्रकार, प्राणायाम, योगा यामुळे मेंदू कायम सतर्क आणि ताजातवाना ठेवण्यास मदत होते. त्यामुळे दररोज श्वासोच्छवासाचे तंत्र आत्मसात करुन आपण अनेक आजारांना दूर ठेवू शकतो.

जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्याप्रमाणे मेंदूशी संबंधित विकार वाढत आहेत का?

- कोणत्याही प्रकारचा आजार अथवा विकार हा तुमच्या जीवनशैलीशी निगडीत असतो. भारतीयांना अद्याप चांगल्या आरोग्याची व्याख्या समजलेली नाही. आपण योग्य त्याच प्रमाणात आहार घेतला पाहिजे आणि ऊर्जा योग्य पध्दतीने खर्च केली पाहिजे. आपण सेवन जास्त करतो आणि खर्च कमी करतो. आपण सतत खात राहिलो आणि ऊर्जा खर्चच केली नाही तर चरबीच्या स्वरुपात ती आपल्या शरीरात जमा होते. डिमेन्शिया, अल्झायमर, स्किझोफ्रिनिया अशा विकारांचे प्रमाण वाढत आहेत. हे विकार रक्ताभिसरण, विशिष्ट प्रथिने, रासायनिक बदल यांवर अवलंबून असतात. मेंदूशी संबंधित विकार शारीरिक अवस्थेवरही परिणाम करतात. त्यामुळे आपले शरीर, मेंदू आणि मन कायम सक्रिय असले पाहिजे.

मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया आणि उपचार महागडे आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपचार उपलब्ध होऊ शकतील का?

- इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील उपचार कमी खर्चिक आहेत. रुग्ण इंटेन्सिव्ह केअरमध्ये गेला की खर्च वाढतो. सर्वात जास्त खर्च तपासण्या आणि औषधांवर होतो. डॉक्टरांनी रुग्णांवर तपासण्यांचा मारा करण्यापेक्षा योग्य तंत्राचा वापर करुन रुग्णांचे निदान केले पाहिजे. कमीत कमी तपासण्यांमध्ये निदान आणि उपचार झाल्यास उपचारांना खर्च कमी होऊ शकतो.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते कसे असले पाहिजे?

- माझ्याकडे एखादा रुग्ण एमआरआय घेऊन येतो आणि म्हणतो की, डॉक्टर आधी रिपोर्ट तपासा. मी त्यांना सांगतो की मला रिपोर्टवर नाही, तर रुग्णावर उपचार करायचे आहेत. त्यामुळे माझा रुग्णाशी संवाद साधण्यावर जास्त विश्वास आहे. डॉक्टरांबद्दल रुग्णांच्या मनात अपार विश्वास निर्माण व्हायला हवा. मी रुग्णाला प्रत्येक रिपोर्ट समजावून सांगतो, त्यांना समजेल अशा भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतो. उपचार यशस्वी करायचे असतील तर डॉक्टर आणि रुग्णांमध्ये चांगले नाते निर्माण व्हायला हवे. संवाद वाढला तर डॉक्टरांवर हल्ले होणार नाहीत. आज प्रत्येकाकडे वेळ कमी आहे. मात्र, डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाला पुरेसा वेळ द्यायला हवा. एखादी अवघड गोष्ट रुग्णाच्या नातेवाईकांना सांगायची असल्यास त्यातही मृदूता हवी, समजावण्याचा सूर हवा.

गर्भावस्थेत बाळाला मेंदूशी संबंधित समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी काय काळजी घ्यायला हवी?

- गर्भधारणेचे निदान झाल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञ प्रत्येक महिलेला हलकासा व्यायाम करण्याचा, योग्य आहार घेण्याचा आणि डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध न घेण्याचा सल्ला देतात. गर्भवती महिलेची नियमितपणे सोनोग्राफी आणि इतर चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमधून मेंदूशी संबंधित काही समस्या असल्यास त्याचे लवकर निदान होते आणि त्याप्रमाणे उपचारांची दिशा ठरवता येते. आई-बाबा होण्याची मानसिक तयारी झाल्याशिवाय नवीन जीव जन्माला घालण्याचा निर्णय घेऊ नये. कारण, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी वाढणार असते. बाळाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना उत्तम आरोग्य आणि शिक्षण या दोन सुविधा देण्यासाठी पालकांचे प्रयत्न प्रामुख्याने व्हायला हवेत.

मेंदूविकार शास्त्र शाखेत संशोधनाचे काय महत्व आहे? आपल्याकडील संशोधनाची स्थिती काय आहे?

- संशोधन कोणत्याही क्षेत्रात मैलाचा दगड असते आणि परिवर्तन घडवू शकते. भारतात संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे संशोधन, अद्ययावत उपकरणे यासाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागते. मी भारतातील व्यावसायिक कंपन्या, घराण्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या देशातील संशोधनासाठी आर्थिक हातभार लावावा. सीएसआरच्या माध्यमातून संशोधनासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. आरोग्यासाठी अधिकाधिक निधीची तरतूद गरजेची असते. आयुर्वेद ही आपली खूप मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासकीय आणि खासगी पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे. आयुर्वेदाचा अधिकाधिक प्रचार, प्रसार झाला पाहिजे. परदेशात इमर्जन्सी केअरची व्यवस्था खूप अद्ययावत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होते. आपल्याकडे इमर्जन्सी केअरची संसाधने वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील.

डॉक्टरी पेशाव्यतिरिक्त आपणास कला, क्रीडा तसेच छायाचित्रणाचा छंद आहे. पाचहून अधिक भाषा अवगत आहेत. या सर्व गोष्टींसाठी तुम्ही कसा वेळ देता?

- आपण कायम स्वत:च्या आणि इतरांच्या वेळेचा आदर करायला शिकले पाहिजे. मी कायम माझ्या प्रत्येक कामासाठी, छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकतो. कारण, वेळेचे नियोजन खूप महत्वाचे असते. मी कोणत्याही कामासाठी बाहेर पडलो तरी माझा कॅमेरा कायम बरोबर बाळगतो आणि छंद जोपासतो. मेंदू सतत सकारात्मक दिशेने कार्यरत असेल तर आपली कार्यक्षमता वाढते आणि थकवाही येत नाही. आपली सर्व इंद्रिये आणि संवेदना कायम जागृत असायला हव्यात. त्यामुळे सर्व नियोजन करता येते आणि आवडत्या कामासाठी वेळही काढता येतो. संधी वारंवार येत नाही. त्यामुळे प्रत्येक संधीचे सोने करता आले पाहिजे.

न्युरोलॉजी क्षेत्राबाबत भविष्यातील आपले काय नियोजन आहे?

- ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस’ उभारण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी सध्या मोठ्या जागेचा शोध सुरु आहे. शासन आणि इतर घटकांचा पाठिंबा मिळाल्यास ती जगातील सर्वोत्तम संस्था होण्यासाठी प्रयत्न असेल. त्याची ब्ल्यू प्रिंटही माझ्या मनात तयार आहे. इमर्जन्सी मेडिसिन, इंटेन्सिव्ह केअर युनिट, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारच्या चाचण्या, निदान या सुविधा तेथे उपलब्ध असतील. संस्थेमध्ये संशोधन आणि विकासासाठी स्वतंत्र इमारत असेल. याशिवाय, रुग्णांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असेल. आयुर्वेदाच्या जतन आणि संवर्धनाचाही वेगळा विभाग असेल. हेलिपॅड, मोठे उद्यान, रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी व्यवस्था, स्पेशलिस्ट डॉक्टर आणि तंत्रज्ञांसाठी स्वतंत्र इमारत, प्रशिक्षणासाठी वेगळा विभाग असे नियोजन आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. आपल्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक हा दुर्लक्षित घटक आहे. त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूटमध्ये वेगळी व्यवस्था केली जाईल. हे इन्स्टिट्यूट जगासाठी प्रेरणादायी ठरु शकेल, असा विश्वास आहे. 

(मुलाखतप्रज्ञा केळकर सिंग)

Web Title: Body, brain and mind must be active forever!- Dr Keki Turel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.