बॉलिवूडच्या चाकांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 06:01 AM2020-12-13T06:01:00+5:302020-12-13T06:05:02+5:30

कोरोनामुळे बॉलिवूडचे जवळपास नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. जगातील मोठा व्यवहार असणारे हे मनोरंजन विश्व एकाही रुपयांची उलाढाल न करता थबकले. इतिहासात हे प्रथमच घडले आहे.

Bollywood's wheels are stopped due to corona | बॉलिवूडच्या चाकांना ब्रेक

बॉलिवूडच्या चाकांना ब्रेक

Next
ठळक मुद्देसिनेमा जगताचेच नव्हे तर यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

- संदीप आडनाईक

कोरोनामुळे जगभर न भुतो न भविष्यती असे नुकसान झालेले आहे. यातून सिनेउद्योगही सुटलेला नाही. जगभरातील सिनेमा जगताला याचा मोठा फटका बसलेला आहे. मात्र, जगभरात ज्या हिंदी चित्रपटसृष्टीने आपले नाव ठसठशीतपणे कोरलेले आहे, त्या बॉलिवूडलाही बसलेला फटका काही कमी नाही. बॉलिवूडचे जवळजवळ नऊ हजार कोटी रुपयांचे नुकसान कोरोनाच्या महामारीमुळे झाले आहे. यामुळे हिंदी सिनेमा उद्योगाची चाके संपूर्णपणे थंडावली. जगातील मोठा व्यवहार असणारे हे मनोरंजन विश्व एकाही रुपयांची उलाढाल न करता थबकले आहे, आणि हे इतिहासात प्रथमच घडले आहे.

सिनेमा जगताचेच नव्हे तर यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आता चित्रपटगृह सुरू झाले असले तरी प्रेक्षक नेहमीप्रमाणे चित्रपटगृहात यायला आणि हा उद्योग भरात यायलाच आणखी तीन ते चार महिने लागणार आहेत.

कोरोनामुळे अनेक बड्याबड्या कलाकारांनी आपल्या कामाचे स्वरूप बदलले. काही कलाकारांनी तर शेती सुरू केली. काहींनी स्वयंपाकघरात मुक्काम ठोकला. अनेकांना यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागला. आयफा, झी सिनेमा अवॉर्ड्ससारखे देशातील मोठे चित्रपट पुरस्कार सोहळेही रद्द करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाच्या तारखाही प्रथमच पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हिंदी सिनेमांचे नुकसान

कोरोना विषाणूमुळे सप्टेंबरच्या मध्यात सुमारे १५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. व्याजाची वाढती रक्कम, तंत्रज्ञांचे पगार, मेन्टेनन्स चार्जेससह अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. याशिवाय अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. केंद्र सरकारकडून या काळात कोणतीही आर्थिक मदत या इंडस्ट्रीला झालेली नाही. त्यामुळे हे केवळ आरोग्य संकट नव्हते तर आर्थिक संकट होते. ट्रेड विश्लेषक समीर दीक्षित यांच्या मते नुकसानीचा अंदाज आता नऊ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

0१८ मध्ये चित्रपट उद्योगाला १०,२०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, तर २0१९ मध्ये ही रक्कम ११,५०० कोटी रुपये इतके होती. प्रादेशिक चित्रपटांमधून सुमारे ५00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. हिंदी चित्रपटांसह २0१९ मध्ये एकूण १८३३ चित्रपटांची निर्मिती झाली तर १४६0 प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती झाली. 0१९च्या आकडेवारीनुसार चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या दहा कोटी होती. मराठीचा आकडा सुमारे चारशे कोटी रुपयांचा आहे.

चित्रपटगृहांना मोठा आर्थिक फटका

देशभरात एकूण ९५३७ चित्रपटगृहे असून, त्यात ६३२७ एकपडदा आणि ३२00 मल्टिप्लेक्स आहेत. मार्चपासून ती बंद असल्याने आजअखेर ९००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशातून २0१९ मध्ये २७00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर यंदा पाणी सोडावे लागले. याशिवाय जाहिरातींपासून मिळणारे उत्पन्न हे ७७०० कोटी रुपयांचे आहे. चित्रपटगृहे जेव्हापासून बंद झाली, तेव्हापासून केबल टेलिव्हिजन आणि ओटीटी ही माध्यमे सिनेमासाठी पर्याय ठरली असली तरी या माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या कमी आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. कोरोनाचा बॉलिवूडवर एवढा परिणाम यापूर्वी कधीच झाला नव्हता. सरकारने आधी दिल्ली, केरळ, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृहं बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि नंतर मुंबईतली चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्यानंतर देशभरातील सर्वच चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली. चित्रपट प्रदर्शितच न झाल्याने या काळात सर्वात मोठा फटका चित्रपटगृह मालकांना बसला. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हल सिनेमा अशा मोठ्या कंपन्यांच्या बहुपडदा चित्रपटगृहांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेल्या २५ लाख लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी आणि नाताळच्या तोंडावर चित्रपटगृहे सुरू झाली तरी अनेक जाचक अटींमुळे नेहमीचे उत्पन्न त्यांना मिळणार नाहीच, शिवाय जागेच्या भाड्याची रक्कमही देता येणार नाही, अशी स्थिती आहे. चित्रपटगृहे बंद होण्यापूर्वी साडेसहाशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती, असे मत सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी व्यक्त केले आहे.

(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

sandip.adnaik@gmail.com

Web Title: Bollywood's wheels are stopped due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.