पुस्तकांचे अड्डे

By admin | Published: January 9, 2016 02:56 PM2016-01-09T14:56:11+5:302016-01-09T14:56:11+5:30

पुस्तकांची नशा चढलेले लोक व ती पुरवणारे जगभरातले ठिकठिकाणचे अड्डे. त्यासाठी पायपीट तरी किती? कधी कबुतरांच्या किचाटात घुसायचं, कधी उन्हातान्हात रस्त्यावर उकिडवं बसून फुटपाथवरच पथारी पसरायची.कधी एका हातात ‘प्याला’, दुस:यात पुस्तक आणि समोर त्याचा अर्थ समजावणारी ‘साकी’. काही जागा अगदीच टिचभर, खोपटात, तर काहींचे आलिशान मजल्यावर मजले. - ज्याला जे हवं ते मिळेल. चावट गोष्टींपासून तर दुर्मीळ मालार्पयत. किंमत? 1 रुपयापासून हजारो डॉलर्सर्पयत म्हणाल ती!

Book Base | पुस्तकांचे अड्डे

पुस्तकांचे अड्डे

Next
- निळू दामले
 
बोरीबंदर स्टेशनमधून बाहेर पडल्यावर समोर दिसतो एक कबुतरखाना. तिथं असंख्य कबुतरांची फडफड आणि गुटरगू. अखंड. तिथंच उजव्या हाताला आहे पुस्तकाचं नवंकोरं दुकान. Wayword and Wise.
इमारत ब्रिटिश आहे. स्वत:चं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व पांघरलेली, लक्ष वेधून घ्यायला नकार देणारी. दुकानाची पाटी वेगळी, निळ्या रंगाची, लक्ष वेधून घ्यायला नकार देणारी. आजूबाजूला बसेस, कार, उडुपी हॉटेलं आणि कबुतरांचा गोंगाट. दुकानात दिव्यांचा लखलखाट नाही.  दीर्घ काळ टिकलेल्या, मुरलेल्या गोष्टी वातावरणात असतात. लंडनमधे, मँचेस्टरमधे, एडिंबरात जुन्या पबमधे गेल्यावर जसं वाटावं तसं काहीसं. 
दुकानात नीट मांडलेली पुस्तकं. लगट करत नाहीत, आपल्याला चिकटायचा प्रयत्न करत नाहीत. आदबीनं कपाटात असतात. दोन कपाटांच्या रांगेत दोन माणसं पाठीला पाठ लावून पुस्तक शांतपणो चाळू वाचू शकतील एवढं अंतर.
आत शिरतानाच समोर गिरकी घेऊ शकणा:या पुस्तकांच्या कपाटावर प्रिमो लेवी यांची चार पुठ्ठा बांधणीची पुस्तकं एका खोक्यात ठेवलेली दिसतात. किंमत सहा हजार रु पये. 
कोण हा प्रिमो लेवी? 
“Monsters exist, but they are too few in number to be truly dangerous. More dangerous are the common men, the functionaries ready to believe and to act without asking questions”, असं म्हणणारा.
प्रिमो लेवी हिटलरच्या ऑशविझ छळछावणीत होता. तिथून तो वाचला. इटालीत आपल्या गावी परतला. त्यानं कथा, कादंब:या लिहिल्या. तो अनुभवानं, विचारपूर्वक अश्रद्ध होता.  इंग्रजी साहित्यातला तो ऑलटाइम मोठा लेखक, विचारवंत मानला जातो. त्याच्या कादंब:या, लेख, कथा, निबंध. माणसं सतत वाचत असतात. उत्तम छपाई केलेले त्याच्या साहित्याचे वरील खंड नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या खंडांच्या निमित्तानं न्यू यॉर्करनं युरोपात सतत प्रिमो लेवीची आठवण का काढतात ते लिहिलं होतं. तो मजकूर प्रसिद्ध होत असतानाच इकडं मुंबईत लेवीचे खंड वेवर्ड अॅण्ड वाईजमधे पोचले होते. हे खंड विकत घेणारी माणसं मुंबईत थोडीच असतील, पण आहेत.
पुढं गेल्यावर कपाटांत जपानी, आफ्रिकन, अमेरिकन, द. अमेरिकन, पोलिश, तुर्की इत्यादि साहित्यातली निवडक पुस्तकं दिसतात. पुस्तकं पाहत पुढं सरकलं की डाव्या बाजूला  कोप:यात टेबलं आणि खुच्र्या मांडून ठेवलेल्या दिसतात. सध्या त्या रिकाम्या आहेत. काही दिवसांत तिथं बसून कॉफी आणि ब्राऊनी खाता येणार आहे. आणखी काही महिन्यांनी तिथं चांगली वाइनही मिळणार आहे.  
लंडनमधे लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्सचं दुकान आहे. तिथं दुकानाच्या कडेला कॉफी मिळते, केक्स मिळतात आणि मद्याचे घोट घेत घेत पुस्तकं चाळता येतात. तिथं येणा:या वाचकांची जातकुळी लक्षात घेऊन खानदानी ब्रिटिश स्कॉच तयार करणारे लोक जातीवंत स्कॉच वर्षातून काही दिवस या दुकानात पाठवतात. स्कॉच आणि पुस्तक. 
हा सारा उद्योग उभारणा:या माणसाचं नाव आहे विराट चांडोक. याचं सारं आयुष्य पुस्तकांत गेलं आहे. वाचन आणि वाचन. सर्व विषयांचं. माणूस आहे पंजाबी. घराची परंपरा आहे आर्थिक उद्योगाची. वडील धनिक व्यावसायिक. विराटला कळायला लागलं तेव्हापासून वाचनाचा नाद. धंद्यात इंटरेस्ट नाही. वडिलांनी विराटला लहानपणापासून पुस्तकांच्या दुकानात फिरवलं, वाचनाचा नाद जोपासू दिला.
वीसेक वर्षं झाली असतील. वांद्रय़ाला एका पेट्रोलपंपात लोटस बुक स्टॉल विराटनं चालवला होता. पेट्रोलपंपात बुक स्टॉल. तिथं अगदी वेचक पुस्तकं असत. विजय तेंडुलकर, बाजी कुलकर्णी इत्यादि वाचणारी माणसं तिथं दर आठवडय़ाला फेरी मारत. काही तास पुस्तकं आणि विराटशी चर्चा. 
वाचकाचा कल पाहून त्यानं काय वाचावं, जगात काय नवं आलंय ते विराट सांगत असे. विराटनं लोटस सोडलं, नंतर तो क्र ॉसवर्डमधे गेला. क्रॉसवर्डच्याही काही मर्यादा होत्या.  विराट तिथं रमत नसावा. तिथंच त्याची गाठ अतुल सूद नावाच्या एका बिझनेसमनशी पडली. अतुल बिझनेस करतो आणि त्याला पुस्तकांची आवड आहे. उत्तम, अभिजात, निवडक पुस्तकांचं दुकान काढावं यावर दोघांचं एकमत झालं. वेवर्ड उघडलं. उघडल्या उघडल्या काही दिवसांतच रोमिला थापर दुकानात रेंगाळून गेल्या. 
***
मुंबईतला फ्लोरा फाउंटनचा फुटपाथ. हुतात्मा चौकातल्या हुतात्मा स्मारकाच्या समोरचा कोपरा. इंग्रजी यू आकाराचा फुटपाथ. पाठीमागं इमारतीच्या कंपाउंडच्या लोखंडी सळयांचं आणि डोक्यावर ताडपत्रीचं कायम तात्पुरतं छप्पर. फुटपाथवरच पुस्तकावर पुस्तक, त्यावर पुस्तक रचत तीन फूट, चार फूट, पाच फूट उंचीच्या पुस्तकभिंती. तीन चार दुकानं. भिंतीच नसल्यानं एका दुकानापासून दुसरं दुकान वेगळं ठरवणं कठीण. मालकांनाच ओळखता येतं आपलं दुकान.  
196क् सालच्या सुमाराला इथं एकच दुकान होतं. आताच्या दुकानांपेक्षा लहान. मालकाचं नाव रामबाबू. जुनी पुस्तकं तिथं मिळायची. जुनी म्हणजे दुर्मीळ आणि वापरून टाकलेली नवी पुस्तकं. माणसं कथा-कादंब:या वाचतात. एकदा वाचून झाल्यावर रद्दीत विकतात. रद्दीतली ती पुस्तकं या दुकानात पोचतात. काही वेळा माणसानं रद्दीत टाकलेली पुस्तकं जुनी असतात, त्यांना एक दुर्मीळतेचं मोल असतं. शे- दोनशे वर्षापूर्वीचं पुस्तक असतं, आता ते मिळत नाही. काही पुस्तकांवर लेखकाच्या सह्या असतात. काही पुस्तकं भारतात मिळण्याची शक्यता नसलेली. काही पुस्तकांवर बंदी असल्यानं ती उघडपणो न मिळणारी. काही पुस्तकांच्या अगदी मर्यादित आवृत्त्या निघालेल्या असल्यानं त्या दुर्मीळ. पिवळ्या कव्हरांची चावट पुस्तकंही मिळायची. ती इतर पुस्तकांमधे लपवून ठेवलेली असत. आपल्याकडं कोणी पाहत नाहीये ना याची खात्री करून वाचक पटकन पुस्तक घेत असे, घासाघीस न करता.
तिथून जवळच एशियाटिक लायब्ररी. तिथं विद्वानांचा, वाचकांचा राबता. त्यातले अनेक विद्वान या दुकानावर थांबायचे, उभ्या उभ्या पुस्तकं चाळायचे.  दुकानात सर्व प्रकारची, सर्व किमतींची पुस्तकं मिळायची. एक रुपयापासून हजार रुपयांपर्यंतची पुस्तकं. भरड कादंब:यांपासून शेक्सपियर, शॉ, वूड हाउस इत्यादि इत्यादि.   इंजिनिअरिंग, मेडिकल इत्यादि शाखांची जाडजूड पुस्तकंही असायची. अनेक प्रकारचे विश्वकोश मिळायचे.
माणसं तिष्ठत उभी राहून, उकीडवी बसून पुस्तकांत रमलेली असायची. 
मुंबईत दुकानांत मिळणारी पुस्तकं म्हणजे मराठी कथा-कादंब:या आणि पाठय़पुस्तकं. इतर काहीच नाही. तेव्हा इंटरनेट नव्हतं, अॅमेझॉन नव्हतं आणि फ्लिपकार्टही नव्हतं. त्यामुळं वाचनाचा डोळा असणारी माणसं इथं पोचायची.
रामबाबूच्या मूळ दुकानाची आता चार-पाच दुकानं झाली आहेत. या चार-पाच दुकानांपैकी एक दुकानदार आहे सुरेश. जेमतेमच शिकलेला. इंग्रजीची अक्षरओळख. लखनऊवरून मुंबईत आला, कामाच्या शोधात. मुंबईत कामाचे अनेक तराफे. कुठला तरी तराफा तुमच्या नशिबी येतो.  रद्दी विकत घेणा:या माणसाकडं सुरेश कामाला लागला. रद्दी गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊ लागला. रद्दीतली पुस्तकं विकणा:या फुटपाथवरच्या दुकानदाराच्या संपर्कात आला. तिथं कामाला लागला. मेहनती असल्यानं पगारवाढ मिळू लागली. सुरेशनं धंदा आत्मसात केला. यथावकाश हुतात्मा चौकातलं एक दुकान घेतलं.
सुरेशला पुस्तकं घेण्यासाठी फिरावं लागत नाही. एव्हाना म्हणजे 2क्15 सालापर्यंत हा व्यवसाय आता व्यवस्थित स्थिरावला आहे. रद्दीवालेच हुशार झाले आहेत. रद्दीत आलेल्या पुस्तकांची वर्गवारी ते करतात आणि विकली जातील अशी पुस्तकं सुरेशकडं देतात.  
रद्दीवाला आणि सुरेश यांना लोकांना काय आवडतं ते कळलंय. भरड कादंब:या, शब्दकोश, पाठय़पुस्तकं, गाइड्स, अन्नपदार्थ शिकवणारी पुस्तकं, एका आठवडय़ात अमुक भाषा शिका, यशस्वी होण्याचा मंत्र, कादंबरी कशी लिहावी, कविता कशी करावी अशी पुस्तकं जास्त खपतात. 
ज्या किमतीला रद्दीवाला देतो त्याच्या दुप्पट किमतीला सुरेश ती विकतो. दोनशे पानाची भरड कादंबरी रद्दीवाला दोन रु पयात घेतो, सुरेशला पाच रु पयाला विकतो आणि सुरेश ती 1क् रु पयाला विकतो.
जुनं पुस्तक आलं की सुरेश आतलं पान उघडून त्यावर पुस्तक केव्हा प्रसिद्ध झालंय ते पाहतो. जेवढं जुनं तेवढी किंमत जास्त. पुस्तकाचा विषय साहित्य, वैद्यकीय, इंजिनिअरिंग असा काहीही असला तरी चालतो. पुस्तकाच्या शीर्षकावरून विषय समजतो. तेवढं सुरेशला पुरतं. सुरेश दोन पुस्तकांचा संच उघडून दाखवतो. पिवळ्या पडलेल्या पानावर साल लिहिलेलं असतं 183क्. पुस्तक वैद्यकीय विषयावरचं असतं. सुरेश त्या पुस्तकाची किंमत सांगतो पाच हजार रु पये. मुळातली किंमत असते एखादा पाउंड. सलमान रश्दीची सेटॅनिक व्हर्सेस, अंबानींचं चरित्र ही पुस्तकं भारतात विकली जात नाहीत हे त्याला कळलं आहे. भरपूर पैसे घेऊन ती पुस्तकं तो लोकांना देतो.
***
जेवढी जागा जास्त तेवढी पुस्तकं जास्त. स्योलमधलं क्योबो बुक स्टोअर.  दुकानाचा कार्पेट एरिया एक हेक्टर आहे.
दुकानाचे दोन मजले जमिनीच्या खाली आहेत. मांडणी चकचकीत. ब्रिटिशांच्या दुस:या टोकाची. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक कपाट, प्रत्येक पुस्तकं रचलेलं टेबल वाचकांना आपल्याकडं खेचायचा प्रयत्न करतं. रंग, दिवे यांच्या मदतीनं.  पुस्तकाची कव्हरं फ्लोरोसंट रंगाची. हे पुस्तक बघू की ते पुस्तक बघू असं होतं.
बहुतांश पुस्तकं कोरियन भाषेतली. सर्व विषयांतली. इंजिनिअरिंग असो की टेक्नॉलॉजी की मेडिसीन, सर्व विषयातलं अद्ययावत ज्ञान कोरियन भाषेत. पुस्तकांची छपाई, मांडणी, फाँट्स, चित्रं वगैरे सारं काही आकर्षक. एका पुस्तकात शस्त्रक्रियेबद्दल काही तरी लिहिलेलं असतं. कोरियन भाषेत. त्यामुळं काय लिहिलंय ते कळत नाही. पण तिथं काढलेली आकृती आणि ऑपरेशन थिएटरचा फोटो या गोष्टी पाहतच राहाव्याशा वाटतात.
इंग्रजी पुस्तकं कमीच.
दुकानातला एकच मजला फिरता फिरता पाय दुखतात. दम खात, दुकानातच असलेल्या दोन खाणावळीत थांबत थांबत, खात-पीत एकेक दालन फिरायचं.
जागोजागी मदत करण्यासाठी माणसं. 
किती पुस्तकं आहेत या दुकानात?
23 लाख!
शनिवार- रविवारी सव्वा लाख माणसं दुकानात फेरी मारतात.
***
अशी पुस्तकं. झगमगत्या महानगरांमधल्या आलिशान दुकानातली.. कधी किचाट गर्दीच्या खोपटातली.. तर कधी रस्त्यावरची. जगभरात कुठेकुठे त्यांच्य शोधात हिंडलो. 
कधी पुस्तकांसोबत कॉफी होती, कधी मद्याचा प्याला तर कधी रस्त्यावर उकीडवं बसून वाचताना डोळ्यावर येणारी उन्हाची तिरीप!
 - परिस्थिती कुठलीही असो, पुस्तकं पाठ सोडत नाहीत; 
हेच खरं!
 
 
 
‘साकी’!
स्योलमधलं क्योबो बुक स्टोअर. कार्पेट एरिया एक हेक्टर! एका पुस्तकावर इंग्रजी अक्षरं दिसतात. उत्सुकतेनं पाहावं तर त्या पुस्तकावर लिहिलेलं असतं की या पुस्तकात दिलेले शब्द आणि वाक्य कोरियन नसलेल्या लोकांनी कृपया जपून, काळजीपूर्वक वापरावीत. पुस्तक उघडल्यावर कोरियन आणि इंग्रजी भाषेत मजकूर असतो. कोरियन भाषेतल्या शिव्या, अपशब्द. पुस्तक चाळू लागलं की दुकानातली मदत करणारी कोरियन मुलगी गालातल्या गालात हसत, लाजत विचारते, काही मदत हवीय का? 
पुस्तकातलं एक पान उघडून त्यातली, त्यातल्या त्यात मुळमुळीत एक असभ्य ओळ ती वाचून दाखवते. 
 
न्यू यॉर्कमधलं ‘आर्गझी’
आणि लू कोहेन
न्यू यॉर्कमधे 59 व्या स्ट्रीटवर एक सहा मजली इमारत आहे. विटांची, खूपच जुनी. इमारतीच्या शेजारी आधुनिक गगनचुंबी इमारती आहेत. त्यांची दर्शनी बाजू काचांनी मढवलेली. ही तुलनेनं बुटकी इमारत विटांची आणि जुन्या खिडक्यांची. या इमारतीत आर्गझी नावाचं जुन्या पुस्तकांचं दुकान आहे. 1953 मधे लू कोहेन या माणसानं ही इमारत विकत घेतली, त्यात हे दुकान उघडलं. आर्गझीमधे जुनी, दुर्मीळ, लेखकाची सही असलेली, देखणी, इत्यादि पुस्तकं आहेत. आता लू कोहेनच्या तीन मुली हे दुकान चालवतात. लू आता म्हातारा झालाय. पुस्तकं खरेदीपासून सर्व गोष्टी या मुली सांभाळतात. या मुलींची वयंही सत्तरी ओलांडून गेली आहेत.
या दुकानाला 1925 पासूनचा इतिहास आहे. कोहेननं त:हेत:हेच्या लटपटी करून दुर्मीळ पुस्तकं जमवली आणि ती विकली. आता कोहेनची परंपरा मुली चालवतात.
एकदा एक फोन आला. एक नर्तिका मरण पावली होती, तिचं घर खाली करायचं होतं, त्यात पुस्तकं होती. आर्गझीबद्दल न्यू यॉर्कच्या लोकांना माहीत असल्यानं असं काही घडलं की आर्गझीला फोन येतात. बहीण पोचली. तिनं पुस्तकांवर नजर टाकली. तिच्या लक्षात आलं की बहुतेक पुस्तकं बंडल आहेत. ती म्हणाली, मी मला पाहिजेत ती 
दहा-पंधरा पुस्तकं नेईन, त्याचे 150 डॉलर देईन.
 डील झालं. बहिणीनं पुस्तकं कॅरीबॅगमधून नेली. त्यात लिओनादरे दा विंचीनं काढलेल्या चित्रंचं एक पुस्तक होतं. आणि ताज्या बाजारातली त्याची किंमत होती चार-पाच हजार डॉलर्स! जागतिक साहित्यात महान मानल्या गेलेल्या जेम्स जॉईसच्या युलिसिस या महाकाय कादंबरीची पहिली आवृत्ती अगदी मोजक्या प्रतींची होती. त्यातली एक प्रत आर्गझीकडं आहे. या पुस्तकाची किमत 65 हजार डॉलर ठरवलेली आहे. खरेदीदार? - एव्हाना भेटलाही असेल!
 
(जगभरात भटकंती करणारे लेखक ख्यातनाम पत्रकार आहेत)
damlenilkanth@gmail.com

 

Web Title: Book Base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.