बुमला पास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 04:00 AM2017-10-08T04:00:00+5:302017-10-08T04:00:00+5:30
बुमला पासवरची भारताची चौकी एका उंच पहाडावर आहे. पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला- ‘रॉक आॅफ पीस’! त्याच्या शेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले. दुर्बिणीच्या त्या टोकाला चीनची पहिली चौकी आहे.आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो. समोर दिसते ती चीनची भूमी?..
युद्धाचे ढग दाटू लागले, की चर्चेत येतात त्या दोन शेजारी देशांना दुभागणाºया नकाशावरल्या सीमारेषा! पण देशांच्या सीमारेषा फक्त नकाशावर नसतात, त्या वास्तवातल्या माणसांची आयुष्येही चिरफाळून टाकतात. साध्यासुध्या माणसांची घरे आणि आयुष्येही जेव्हा युद्धभूमी बनून धुमसायला लागतात, तेव्हा काय घडते?
मुलांच्या शाळेत जायच्या वाटेवरून जेव्हा सैन्याच्या तुकड्या पुढे सरकताना दिसतात... राहत्या गावापासून तिसेक किलोमीटर अंतरावर जेव्हा युद्धाचे नगारे वाजायला लागतात, तेव्हा काय घडते?
एकमेकांशी संघर्ष घेऊन विरोधात उभ्या ठाकलेल्या दोन महासत्ता सामान्य मुला-माणसांना जेव्हा तलवारीच्या पात्यावर उभे करतात, तेव्हा काय घडते?
- हे शोधायला निघालो होतो.
जिथे चकमकी सुरू होत्या, त्या डोकलामच्या प्रदेशात पोहचणे सुरक्षेच्या कारणास्तव अशक्य बनले होते. त्या परिसरात रहिवासी भाग तसा विरळच. वस्ती अगदीच तुरळक. त्यातून होती ती माणसेही सैन्याने सुरक्षेच्या कारणास्तव मागे हलवलेली.
... म्हणून मग १९६२च्या युद्धात चिनी सैन्याने कब्जा केलेल्या तवांग व बुमला येथील भारत-चीन सीमेच्या परिसराला भेट देण्याचे ठरले. तिथवर जाण्याची वाट बिकट, आडवळणाची. मैलभराचा चढणीचा रस्ता कापायचा तर काही तास हवेत, अशी बिकटवाट!
- पण निघालो.
भल्या सकाळी पुन्हा प्रवास सुरू झाला. तवांग ते बुमला पास हे जेमतेम ३७ किमीचे अंतर. भारत-चीन सीमेवर जाण्याची कल्पना थरारक असली तरी तेथवर पोहोचणे हे मोठे दिव्य! ओबडधोबड दगडांचा अरु ंद रस्ता... त्यावरून होडीसारखी डुलत जाणारी मोटार... समोरून लष्कराची अवजड वाहने आल्यावर तिचे अंग चोरून एका बाजूला उभे राहणे..
नवा ड्रायव्हर सांगतो, डाव्या बाजूच्या दरीत पाहा. गेल्या युद्धात चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांची प्रेते या दरीत भिरकावून दिली होती...
रस्त्यात एक झाड दिसेल तर शपथ! पाहावे तिथे पहाडी सुळके. कुठे काळे दगड, तर कुठे पांढुरके भुरे.
वाटेत ठिकठिकाणी लष्कराची उपाहारगृहे दिसतात. तिथे गरमागरम मोमो, समोसे आणि चहा शिवाय गरम पाणी मिळते. काही ठिकाणी गरम जाकिटे, टोप्याही मिळतात. शिवाय बुमला पासचे फोटो असलेले बिल्ले!
आणि जिकडे पाहावे तिकडे गस्तीवरचे जवान!
जसजसे वर चढत होतो, श्वास घेणे कठीण होत चालले होते. या इतक्या विरळ हवेत हे जवान कसे काम करीत असतील? - नुसत्या कल्पनेनेही ऊर भरून यावा, असे वातावरण!
बुमला पासवरची भारताची चौकी एका उंच पहाडावर आहे. पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला - ‘रॉक आॅफ पीस’!
त्याच्याशेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले.
दोघांपैकी एकाचा डोळा अखंड त्या दुर्बिणीला लागलेला.
दुर्बीण समोर रोखलेली...
दुर्बिणीच्या त्या टोकाला चीनची पहिली चौकी आहे.
आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो...
समोर दिसते ती चीनची भूमी?
कसं दिसतं तवांगमधलं आणि बुमला पासच्या अवतीभोवतीचं अरुणाचल प्रदेशातलं चित्र..
वाचा यंदाच्या लोकमत ‘दीपोत्सव’मध्ये..