उल्हासनगर का छोकरा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 10:20 AM2022-06-19T10:20:38+5:302022-06-19T10:21:04+5:30
भारतीय यूट्युबरच्या विश्वात पहिल्या पाचात असलेल्या आशिष चंचलानीविषयी...
जनरली उल्हासनगर म्हटलं की आपल्याकडे नाक मुरडण्याची प्रथा आहे. का, ते जाणकारांना सांगायला नको. मध्य रेल्वेवरच्या याच उपनगराने भारतातील टॉप टेनमधील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आशिष चंचलानी हा यूट्युबर दिला आहे. त्याच्या यूट्युब चॅनेलचे तब्बल २ कोटी ६० लाख दर्शक आहेत.
आशीष चंचलानीची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी श्रीमंत. वडिलांचे उल्हासनगरात चित्रपटगृह आहे. त्याची आई या व्यवसायात वडिलांना मदत करते. लाडाकोडात वाढलेल्या आशिषने बारावीनंतर इंजिनीअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली. सिव्हिल इंजिनीअरिंग करायचे होते त्याला. मात्र, लोकांना हसवणे, ॲक्टिंग करणे हा छंद त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. इंजिनीअरिंग कॉलेजला असतानाच त्याने स्वत:चे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या व्हिडीओंना लोकांची पसंतीही मिळायची. यातूनच त्याने युट्यूबर बनण्याचा निश्चय केला.
आशिषने इंजिनीअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडून देत पूर्णवेळ यूट्युबर होण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. २०१८ मध्ये त्याच्या यूट्युब चॅनेलचे ८५ लाख दर्शक होते. त्याचबरोबर ‘प्यार तुने क्या किया’ या शोद्वारे आशीषने छोट्या पडद्यावर आगमन केले. अनेक अभिनेत्यांबरोबर मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधीही आशीषला मिळाली. अलीकडेच झालेल्या कान चित्रपट महोत्सवातही आशीष सहभागी झाला होता. याआधीही त्याला या चित्रपट महोत्सवासाठी मानाचं निमंत्रण होते. उल्हानसगरच्या या छोकऱ्याची कीर्ती दिगंत आहे. ती अशीच कायम राहो.