हिंमतवाला
By admin | Published: November 12, 2016 02:46 PM2016-11-12T14:46:51+5:302016-11-12T15:10:13+5:30
इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहातील दीर्घ सेवेच्या काळात रामनाथ गोएंकांची अनेक रुपे जवळून पाहण्याची संधी मला मिळाली.
- दिनकर रायकर
इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहातील
दीर्घ सेवेच्या काळात
रामनाथ गोएंकांची अनेक रुपे
जवळून पाहण्याची
संधी मला मिळाली.
एकाच वेळी समकालीन आणि
पुढच्या पिढीशी खुले, मित्रत्वाचे
नाते ठेवणारा हा ‘हिंमतवाला’
म्हटले तर निष्ठुर आणि
म्हटले तर दर्यादिल होता.
माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा
एक नवा अध्याय
दृष्टिपथात असताना
त्यांच्या सामर्थ्यशाली हुंकाराचे स्मरण
अत्यंत औचित्याचे आहे.
गेल्या आठवड्यातील दोन प्रसंग भारतीय प्रसारमाध्यमांचे विश्व ढवळून काढणारे ठरले. एनडीटीव्हीवर केंद्र सरकारने लागू केलेली एक दिवसाची बंदी चर्चेचा विषय ठरली. दुसरा प्रसंग खरे तर माध्यमांच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा; पण त्याची म्हणावी तशी चर्चा झाली नाही.
रामनाथ गोएंका मेमोरिअल फाउंडेशनचे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारही गेल्याच आठवड्यात प्रदान केले गेले. म्हटले तर हा दरवर्षीचा सोहळा. पण पुरस्कारासाठी पात्र ठरणारे लिखाण, त्यासाठी संशोधक वृत्तीने, जिगरबाज पद्धतीने लेखणी शस्त्रासारखी परजणारे पत्रकार हे सारे लक्षणीय असते. माध्यमांची हिंमत अजूनही शिल्लक असल्याचा संदेश देणाऱ्या या पुरस्कारांच्या निमित्ताने यंदा प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य या विषयीचा विचार माझ्या मनात प्रकर्षाने डोकावला.
‘एनडीटीव्ही’वर लादलेल्या ‘ब्लॅक आउट’ची अर्थात एक दिवसाच्या प्रसारण बंदीची पार्श्वभूमी या विषयाला लाभली आहे. तशात केंद्राच्या या कृतीची चिकित्सक निर्भर्त्सना करताना दिले गेलेले संदर्भही स्वाभाविकपणे ‘आणीबाणी’च्या पर्वाशी जोडले गेलेले आहेत. आजमितीस या विषयावर खूप काही लिहून झाले. वारेमाप बोललेही गेले. केंद्र सरकारनेही तूर्तास या प्रस्तावित बंदीला अधिक सखोल चौकशीचे निमित्त करून स्थगिती दिली आहे. माध्यमांचे सामर्थ्य, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी टोकाचा लढा देण्याची जिगर या अनुषंगाने माध्यमांनीच नव्हे; उभ्या देशाने पाहिलेल्या एका सेनानीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. दरवर्षी ज्यांच्या नावे हे पुरस्कार दिले जातात, त्यांचे म्हणजे रामनाथ गोएंका यांचे हे आगळे स्मरण होय.
एक महत्त्वाचे विशेष असे की, इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहातील दीर्घ सेवेच्या काळात रामनाथ गोएंकांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. एका मोठ्या वृत्तपत्रसमूहाचा मालक, एक व्यक्ती, निर्भय हिंमतवाला आणि सर्वशक्तिमान सरकारच्या विरोधात एकाकी लढा देण्याची जिगर दाखविलेला माणूस अशी अनेक रुपे माझ्या मनावर तेव्हापासून कोरली गेली आहेत.
एनडीटीव्हीच्या विरोधातील केंद्राच्या प्रस्तावित कारवाईची तुलना ‘आणीबाणी’तील सेन्सॉरशिपशी केली गेली. पण यापेक्षा अधिक दमनकारी असलेल्या आणीबाणीतील निर्बंधांच्या विरोधात गोएंका शड्डू ठोकून उभे राहिले होते. आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याविना, या पद्धतीने आणखी कोणी साथीला आहे की नाही याचा विचार न करता एकांड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी आणीबाणी लादणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात एल्गार केला.
तो साधासुधा प्रकार नव्हता. त्यांच्या विरोधाची धार आणि जातकुळी जगावेगळी होती. त्यांच्या विरोधात असलेला आवेश, जोश मला जवळून पाहता आला. तेव्हा मी एक्स्प्रेसमध्ये होतो. मी जे पाहिले, अनुभवले नेमके त्यालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या गोएंका पुरस्कार सोहळ्यात शब्दरूप दिले. मोदींनी रामनाथ गोएंका तथा ‘आरएनजी’ यांचे अत्यंत चपखल वर्णन केले. माध्यमांच्या सामर्थ्याविषयी जनमानसात जी प्रतिमा होती, तिच्या आणीबाणीने चिंधड्या उडविल्या. अगदी मोजक्या लोकांनी आणीबाणीच्या विरोधात सामर्थ्यशाली हुंकार दिला आणि त्यांचे नेतृत्व ‘आरएनजीं’नी केले होते.
सत्तेच्या परिघातील एका कुटुंबाशी सख्य ठेवले तर देशभरात कसलीही तोशीस पडत नाही, अशी परिस्थिती होती. त्या काळात ‘आरएनजीं’नी त्या (इंदिरा गांधींच्या) कुटुंबाशी असलेले सौहार्दाचे संबंध ठोकरले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वासाठी लढाई सुरू केली.
केंद्र सरकारच्या तेव्हाच्या सेन्सॉरशिपला धुडकावून लावत जाज्वल्य, साहसी पत्रकारितेचा परिचय ‘आरएनजीं’नी दिला. एक्स्प्रेसमधल्या आम्हा सर्व पत्रकारांना तेव्हा स्पष्ट सूचना होत्या. काँग्रे्रसच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या संदर्भात बातमी दिलीच तर ती फक्त विरोधातच द्यायची. आणीबाणीच्या काळात याच पद्धतीने कव्हर केलेली शिवाजी पार्कवरील इंदिरा गांधींची एक सभा आणि तिचे वार्तांकन हा सर्वस्वी आगळा अनुभव होता.
दडपशाही झुगारून थेट सत्तेला आव्हान देण्याच्या त्या पवित्र्यातील थरार आज आणखी प्रकर्षाने जाणवतो. खरे तर ती सभा आणीबाणीनंतरच्या निवडणूक प्रचाराची होती. पण ‘आरएनजीं’ची लढाई तेव्हाही सुरूच होती.
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हाच तिचा गाभा होता. विशेष म्हणजे, स्वत: आरएनजी एकदा लोकशाहीतील निवडणुकीच्या मांडवाखालून जाऊन आलेले. पण तो काळ आणीबाणीच्या आधीचा. १९७१ साली ते मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. नंतर पुन्हा ते या वाटेला गेले नाहीत.
आणीबाणीसारख्या कसोटीच्या काळात हा माणूस खंबीरपणे लढा कसा देऊ शकला, याचे उत्तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडले होते. गीतेतील तत्त्वज्ञानाचा या माणसाने सहज स्वीकार केला होता.
एक लोटा घेऊन आलोय, तसाच जाणार आहे, यावर श्रद्धा असलेले ‘आरएनजी’ खऱ्या अर्थाने हिंमतवाला होते. काही गमावण्याची भीतीच त्यांना नव्हती. म्हणून तर इंदिरा गांधींच्या विरोधात जाऊन शरद पवारांची पाठराखण करण्याचे धैर्य त्यांच्यापाशी होते.
डॉ. दत्ता सामंत ऐन भरात असताना त्यांनी १९८१ साली एक्स्प्रेस ग्रुपमध्ये संप केला. प्रसंगी प्रेस बंद करेन, पण डॉ. सामंतांशी चकार शब्दाने चर्चा करणार नाही, या हेक्यावर ‘आरएनजी’ ठाम राहिले. इतकेच नव्हे, तर त्यांनी तो संप यशस्वीपणे मोडूनही काढला.
विद्याधर तथा अण्णा गोखले तेव्हा ‘लोकसत्ता’चे संपादक होते आणि एक्स्प्रेसला मुंबईत डॅरिल डिमॉण्टे, तर दिल्लीत अरुण शौरी संपादक होते.
एकाच वेळी समकालीन आणि पुढच्या पिढीशी खुले, मित्रत्वाचे नाते ठेवणारा हा ‘हिंमतवाला’ म्हटले तर निष्ठुर आणि म्हटले तर दर्यादिल होता. माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा एक नवा अध्याय दृष्टिपथात असताना त्यांच्या सामर्थ्यशाली हुंकाराचे स्मरण माझ्या लेखी औचित्याचे आहे.
निर्भय ‘आरएनजी’
प्रस्थापितांच्या विरोधातील पत्रकारितेचा पुरस्कार करणारे ‘आरएनजी’ सर्वार्थाने निर्भय होते. म्हणूनच राजीव गांधी पंतप्रधान असताना, अपॉइंटमेंट न घेता आल्याच्या कारणास्तव त्यांना आपल्या पेण्ट हाउसचा दरवाजा न उघडण्याची, भेट नाकारण्याची कृती ते करू शकले होते.
काँग्रेस शताब्दीच्या वेळचा मुंबईतील हा प्रसंग सर्वार्थाने विरळा होता.