डाव का मोडला ? रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे आपल्या वारसदारांशी का पटले नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 03:00 AM2017-09-10T03:00:00+5:302017-09-10T03:00:00+5:30

कमालीच्या काटेकोरपणे वारसदार निवडूनही रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे आपल्या वारसदारांशी का पटले नाही? कंपनीचे शिल्पकार आणि उत्तराधिकारी यांची मूल्यव्यवस्था निराळी होती? ‘जनरेशन गॅप’ मोठी होती? टाटा आणि मूर्ती यांना सत्तेच्या सिंहासनावरून एकदम वानप्रस्थात जाणं मानवलं नाही? व्यावसायिक मानसिकतेचा अभाव नडला? की उदारीकरणाच्या सरत्या गद्धेपंचविशीनं हे घडवून आणलं?..

The break of the innings? Why is Ratan Tata and Narayan idol not with his successors? | डाव का मोडला ? रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे आपल्या वारसदारांशी का पटले नाही? 

डाव का मोडला ? रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे आपल्या वारसदारांशी का पटले नाही? 

Next

अभय टिळक

कॉर्पोरेट विश्वातील ‘टाटा’ आणि ‘इन्फोसिस’ या दोन बड्या घराण्यांतील संसाराचं विस्कटलेलं चित्र..
रतन टाटा आणि सायरस मिस्त्री ही ‘सासरा-जावया’ची जोडी पहिल्या कुटुंबात, तर नारायण मूर्ती आणि विशाल सिक्का ही ‘सासरा-जावया’ची जोडी दुसºया चित्रात अगदी फिट्ट बसते. अवघ्या वर्षाच्या अंतराने भारतीय कॉर्पोरेट विश्वात हे दोन ‘घटस्फोट’ गाजले. कॉर्र्पोरेट विश्वात घडणाºया घडामोडींना बर्फाची उपमा देणे सर्वांत उचित. बर्फाचा सात-अष्टमांश हिस्सा पाण्याच्या खाली असतो तर एक-अष्टमांश भाग पृष्ठभागावर तरंगतो. कॉर्पोरेट विश्वातील कलहांचेही तसेच असते. रतन टाटा व सायरस मिस्त्री ही जोडी आणि नारायण मूर्ती व विशाल सिक्का ही जोडगोळी यांच्यात नेमके काय बिनसले, मुळात बिनसायला सुरुवात केव्हापासून झाली, मन दुरावण्यामागील कारणे निखळ व्यावसायिक व पैशांशी संबंधित होती, की अन्य काही घटकही तितकेच कळीचे होते, कमालीच्या काटेकोरपणे वारसदार निवडूनही रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांचे त्या वारसदाराशी का पटले नाही, कंपनीचे शिल्पकार आणि त्या शिल्पकारांनीच नियुक्त केलेला आपला उत्तराधिकारी यांची मूल्यव्यवस्थाच परस्परांपेक्षा कमालीची निराळी असल्यामुळे असे झाले असेल का, व्यावसायिकांच्या दोन पिढ्यांदरम्यानच्या विचारपद्धतीमधील ‘जनरेशन गॅप’मुळे हे घडले असावे, की रतन टाटा आणि नारायण मूर्ती यांच्यासारख्यांनाही सत्तेच्या मोहावर विजय मिळवता न आल्यामुळे असे पेच उद्भवले... यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कदाचित कधीच मिळणार नाहीत. ते काहीही असले तरी, आर्थिक पुनर्रचनेचे पर्व वयाची पंचविशी पार करत असतानाच टाटा आणि इन्फोसिस या दोन कॉर्पोरेट कुटुंबांत बेबनाव निर्माण झाल्याने अनेक प्रश्न आणि कोडी दाणदिशी चर्चाविश्वात आली. की, या दोन औद्योगिक घराण्यांत ही उलथापालथ होण्यामागे उदारीकरणाची सरती पंचविशीच मुख्यत्वे कारणभूत आहे?
आपल्या देशात १९९१ सालापासून वेगाने साकारलेले उदारीकरणाचे पर्व आता ऐन जवानीत प्रवेशलेले असल्याने हे सारे रागरंग तारुण्याच्या भराशी निगडित असावेत, असे मानायला जागा आहे. टाटा आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांमध्ये काही अत्यंत ढोबळ साम्ये आहेत.
उदारीकरणानंतर प्रचंड वेगाने भरभराटीस आलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानाधारित सेवांसारख्या तुलनेने नवीन उद्योगक्षेत्रांत इन्फोसिसने झपाट्याने शिखरे गाठली. तर, पोलाद, वीज, दूरसंचार, वाहननिर्मिती यांसारख्या, आर्थिक पुनर्रचना पर्वाच्या आगमनानंतर जागतिक स्तरावरील स्पर्धेचा सोसाट्याचा वारा प्रथमच अंगावर घेणाºया उत्पादनक्षेत्रांत टाटा उद्योगसमूह कार्यरत होता. म्हणजेच, आर्थिक पुनर्रचना कार्यक्रमाच्या पंचविशीनंतर झपदिशी अंगावर आलेल्या वैश्विक स्तरावरील बदलत्या औद्योगिक पर्यावरणाचा सामना टाटा आणि इन्फोसिस या दोन्ही कंपन्या करत होत्या. आजही करत आहेत. अमेरिकेतील ट्रम्पशाही आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मलूल हवा यांच्या झळा भारतीय माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला आणि पर्यायाने इन्फोसिसला तीव्रतेने पोळू लागल्या. तर, प्रवासी चारचाकी मोटरगाड्यांची देशी बाजारपेठ तगड्या स्पर्धकांनी काबीज केल्यामुळे टाटांच्या वाहननिर्मितीला चटके बसत आहेत.
टाटा आणि इन्फोसिस या दोन्ही कंपन्यांचे सर्वेसर्वा असणारे अनुक्रमे रतन टाटा आणि नारायण मूर्ती हे दोघेही देश-विदेशातील कॉर्पोरेट विश्वात ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा मिरवणारे. टाटा उद्योगसमूहातील अग्रगण्य कंपन्या आणि इन्फोसिस या तांत्रिकदृष्ट्या पब्लिक लिमिटेड कंपन्या असल्या तरी भागधारकांचा भरवसा कंपन्यांच्या व्यावसायिक कामगिरीपेक्षाही रतन टाटा आणि नारायण मूर्ती या दोन पितामहस्वरूप व्यक्तिमत्त्वांवरच काकणभर अधिक. म्हणजेच, उद्योग आणि त्या उद्योगांची कामगिरी यांपेक्षाही भागधारकांचा विश्वास, ‘‘रतन टाटा आणि नारायण मूर्ती या दोन सात्त्विक, प्रामाणिक व्यावसायिकांच्या हातात आपले भागभांडवल सुरक्षित आहे’’, या कुटुंबवत्सल भावनेवरच जास्त. स्वत:च्या मूल्यचौकटीबाबत रतन टाटा आणि नारायण मूर्ती हे उभयता विलक्षण संवेदनशील. हे असे सगळे भावभावनांचे जंजाळ असल्यामुळेच कंपनीरूपी आपल्या कन्येचा हात ज्याच्या हातात द्यायचा त्या ‘जावया’बद्दलच्या दोघांच्याही अपेक्षा इतरांपेक्षा आगळ्या आणि अतितरल.
आता, ‘सासरे’च एवढे जबरदस्त प्रतिमा असलेले लाभल्यावर ‘जावयां’च्या मनावर ‘परफॉर्मन्स’ सिद्ध करण्याचे दडपण येणे स्वाभाविकच ठरते. त्यात पुन्हा, २०१३-१४ सालानंतर जागतिक स्तरावरील औद्योगिक-आर्थिक वातावरण कमालीचे अस्थिर बनलेले.
२००८ साली अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये उद्भवलेल्या ‘सबप्राइम क्रायसिस’नंतर जगातील अनेक देशांत पसरलेले मंदीचे मळभ हळूहळू विरळ होऊ लागतील, अशी बहुतेक सगळ्यांचीच धारणा होती. परंतु, अमेरिकेमधील सत्तांतर, सीरियामधून तसेच एकंदरच मध्य-पूर्वेमधील काही देशांमधून बाहेर पडलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यांनी युरोपातील अनेक देशांपुढे निर्माण केलेले प्रश्न, युरोपीय समुदायाला रामराम ठोकण्याचा ब्रिटिश नागरिकांनी व्यक्त केलेला मनोदय आणि पश्चिमेतील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थांनी माना टाकल्यामुळे घसरलेल्या मागणीच्या भोवºयांत घुसमटलेली चिनी अर्थव्यवस्था अशा अनेक कारणांपायी जागतिक स्तरावरील अर्थकारण अलीकडे अस्थिरतेच्या सावलीतून अनिश्चिततेच्या पर्वात मोकलले गेलेले आहे. सायरस मिस्त्री आणि विशाल सिक्का यांना सामोरी आलेली वैश्विक अर्थकारणाची आजची रणभूमी अशी आणि इतकी गुंतागुंतीची आहे. रतन टाटा यांच्याकडे टाटा उद्योगसमूहाची सूत्रे आली तेव्हाही वैश्विक स्तरावरील अर्थकारण कूस बदलत होतेच. मात्र, त्या वेळी जागतिक स्तरावरील उभे अर्थविश्व उभारीच्या युगात प्रवेश करत होते. रतन टाटा विस्तारू पाहत असलेल्या पंखांना वैश्विक बाजारपेठांचे आकाश तेव्हा मोकळे होते. आजची परिस्थिती नेमकी उलटी आहे. त्यामुळे, टाटा उद्योगसमूहाच्या ‘कोअर कॉम्पिटन्सीज्’वर लक्ष केंद्रित करण्याची रतन टाटा यांची ‘स्ट्रॅटेजी’ त्या वेळी कौतुकाचा विषय ठरली आणि रतन टाटा यांच्या सुदैवाने त्यांना जेआरडी टाटा यांच्यासारखी मवाळ, सुनेला कौतुकाने तिच्या चुकांसकट ओच्यात घेणारी सासूही भेटली. मात्र, बदललेल्या आर्थिक वास्तवाचे चटके अंगावर घेणाºया सायरस मिस्त्री यांनी तोच खाक्या अंगीकारण्यास सुुरुवात करताच प्रकरण त्यांच्यावरच उलटले.

*****
उच्च अशा भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे गोडवे घशाला कोरड पडेपर्यंत कोणीही कितीही गायले तरी, भारतीय आश्रमव्यवस्थेतील ‘वानप्रस्थ’ हा तिसरा आश्रम पोथ्यापुराणांमध्येच शोभून दिसतो ही आपल्या सगळ्यांचीच ठाम धारणा आहे, हे रतन टाटा आणि नारायण मूर्ती या दोघांनीही पुरते सिद्ध केले. आपण स्थापन केलेल्या आणि/अथवा निगुतीने वाढवलेल्या कंपनीबाबत कोवळा अपत्यभाव मनीमानसी सतत जागवत राहिल्यामुळेच टाटा आणि मूर्ती या दोघांनाही मुलीच्या संसारातून मनाने निवृत्त होता आले नसावे. ही उद्योगांकडे बघण्याची निखळ भारतीय दृष्टी म्हणावी लागेल. उद्योगव्यवसायांबाबत आपली परिभाषादेखील तशीच असते. ‘‘हाती असलेला उद्योग त्यांनी पोटच्या पोराप्रमाणे वाढवला’’, अशी वा अशा धर्तीची वर्णने जुन्या वा गेल्या पिढीतील अनेक भारतीय उद्योगमहर्षींच्या चरित्र-आत्मचरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. एकमालकी तत्त्वावरील उद्योग त्या अवस्थेत असेपर्यंत पुत्रवत वा कन्यावत मानणे (एकवेळ) समजण्यासारखे आहे. पण तो उद्योग वा ती कंपनी भागधारकांच्या मालकीची झाल्यावर मग काय? मुळात, एवढा वाढविस्तार झालेल्या कंपनीला वाढीची तिची म्हणून अशी एक गती व दिशा असते, हे तिला अपत्यवत सांभाळलेल्या ज्येष्ठांच्या ध्यानातच येत नाही. जोडीला, कंपनी आपण वाढवली-जोपासली असल्याने कंपनीचे हित केवळ आपल्यालाच काय ते कळते किंवा/आणि आपण समजतो तेच व तेवढेच कंपनीच्या हिताचे होय, असा एक सात्त्विक दंभ प्रवर्तक पितामहांच्या पोटात ठासून भरलेला असतो. त्यांतूनच मग, कंपनीची धुरा हाती सोपवलेल्या नवीन पिढीबाबत असमाधान अंकुरण्यास सुरुवात होते. जागतिक स्तरावर ठसा उमटवलेल्या भारतीय कंपन्यांचे जन्मदाते वा पालनकर्ते अजूनही निखळ व्यावसायिक मानसिकतेमध्ये स्थिरावले नसल्याचे हे सारे दाखले म्हणायला हवेत.
कुटुंबांतून उत्क्रांत झालेले उद्योग त्यांच्या वाढविस्ताराची काही एक मात्रा गाठली गेल्यानंतर व्यावसायिक मूल्ये जपणाºया, निखळ व्यावहारिक भूमिकेतून कंपनी चालवण्याची मानसिकता व क्षमता असणाºया तज्ज्ञ संचालकांकडे, व्यवस्थापकांकडे सोपवली जाणे हेच कंपनीच्या व तिला भांडवलाचा प्राणवायू पुरविणाºया भागधारकांच्या हिताचे असते, हे भान उद्योगांच्या वडीलधाºया पालकांना आजही आलेले नाही, हे दुसरे वास्तव टाटा आणि मूर्ती यांच्या उदाहरणांवरून अधोरेखित होते. इथे, प्रवर्तक-पालक-मालक या तिघांइतकीच भागधारकांची मानसिकताही आडवी येते.
अमुक एक व्यक्तीच उद्योगाच्या अथवा कॉर्पोरेट विश्वाच्या प्रमुखपदी असेल तर ती कंपनी वा समूह सुरक्षित राहील, अशी बहुसंख्य भागधारकांची धारणाच, एक प्रकारे, कंपनीच्या मूळ मालकांच्या वा पालकांच्या सात्त्विक दंभाचे भरणपोषण करत राहते. एका परीने, कॉर्पोरेट विश्वातील लोकशाहीवर आपल्या उद्योगविश्वातील ज्येष्ठांचा आजही पुरेसा भरवसा नाही, याची पावतीच जणू यावरून मिळत राहते.
उद्योगाच्या वा कंपनीच्या दैनंंदिन कामकाजाशी थेट संबंध नसणाºया; परंतु, ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या मी चार’ अशा भूमिकेत राहणे अपेक्षित असणाºया व्यक्ती ज्या वेळी कंपनीच्या कारभाराची सूत्रे व घेतलेल्या निर्णयांच्या भल्याबुºया परिणामांची जबाबदारी ज्यांच्या डोक्यावर प्रत्यक्ष असते अशा अधिकाºयांना काम करणे अवघड बनवतात अशा वेळी संचालक मंडळातील अन्य जबाबदार असामींचे वर्तन नेमके कसे असावयास हवे, हा पैलू टाटा आणि मूर्ती या दोघांच्या प्रकरणांमधून ठसठशीतपणे पुढ्यात अवतरलेला आहे.
या संदर्भात कॉर्पोरेट विश्वाशी संबंधित असणाºया नियामकांकडून नेमकी कशाची अपेक्षा असते, हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कंपन्यांच्या कारभाराशी संदर्भ असणाºया कायदेविषयक तरतुदींमध्ये काही सुधारणा वा बदल होणे गरजेचे आहे काय, याचीही चर्चा होणे अगत्याचे ठरते. एकंदरीने काय, तर ‘कुटुंबाने प्रवर्तित केलेला धंदा’ या प्रतिमेमधून बाहेर पडून वैश्विक उद्योगविश्वात स्वत:ची नाममुद्रा कोरण्यासाठी सिद्ध झालेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवस्थापन, वारसदारांची निवड, वारसदारांचे कंपनीनामक कुटुंबात मिसळून जाणे, कंपनी व तिचा नवीन वारसदार रूपी सर्वेसर्वा यांचा प्रपंच सुरळीत मार्गी लागेपर्यंत कंपनीच्या कुटुंबातील ज्येष्ठांचे वर्तन, कंपनीच्या व्यापक कुटुंबातील भागधारक रूपी सदस्यांची जबाबदारी... अशांसारख्या अनेकानेक बाबींसंदर्भात आपल्याला अजूनही बरेच काही नव्याने शिकावे लागणार आहे. रतन टाटा आणि नारायण मूर्ती या दोन सासवांपायी अर्ध्यावरती डाव मोडलेल्या सायरस मिस्त्री आणि विशाल सिक्का यांच्या संसारांवरून आपण हा धडा घेणार का, हाच खरा प्रश्न आहे.

स्वयंपाकघरातील धुसफूस दिवाणखान्यात.. सिक्का आणि मिस्त्रींचा सासुरवाडीला ‘टाटा’!

जगातील देशोदेशींच्या बाजारपेठा एकमेकांमध्ये गुंफल्या जाणे म्हणजेच जागतिकीकरण, अशी सोपी व्याख्या करता येते. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात कंपनीच्या अथवा कॉर्पोरेट विश्वाच्या आकारमानाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. ते स्वाभाविकही होय.
गावाच्या जत्रेमध्ये रंगणाºया हौशी आखाड्यांमध्ये ४५ किलो वा ५० किलो वजनाच्या गटात कुस्ती मारून नारळ व पटका पटकावणाºया देशी, होतकरू, हौशी तालीमबाजाची गाठ जागतिक स्तरावरील कुस्ती स्पर्धा मारलेल्या आणि पार ८५ किलो वा ९० किलो वजनगटात कसून खेळलेल्या मल्लाशी पडावी तशा अवस्थेतून भारतीय कॉर्पोरेट विश्व आजमितीस प्रवास करते आहे. अशा परिस्थितीत, आपले वजन वाढवत अधिक उच्च वजनगटात स्थान पक्के करण्याखेरीज देशी मल्लांना पर्यायच उरत नाही. त्यामुळे, अनेक भारतीय कंपन्यांनी ‘मर्जर्स’ आणि ‘अ‍ॅक्विझिशन्स’ करण्याचा मार्ग निवडलेला आपण आजवर बघत आलो आहोत. रतन टाटा यांनीदेखील तेच केले. परंतु, तोच मार्ग विशाल सिक्का यांनी अवलंबताच नारायण मूर्ती यांनी उराशी जपलेल्या मूल्यचौकटीवर बहुधा आच आली. माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानासारख्या ज्ञानाधिष्ठित उद्योगविश्वात यंत्रसामग्रीपेक्षाही अव्वल ठरते ती मानवी सर्जनशीलता आणि बुद्धिचापल्य. आज जगभरातच माहिती-तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानाधिष्ठित सेवाक्षेत्राला कुशल, सर्जक, कल्पक उमेदवारांची चणचण भासते आहे. अशा परिस्थितीत, जिथे कोठे ‘टॅलेन्ट’ असेल ते हुडकून आणून, त्याला मोहवतील अशी ‘पे-पॅकेजे’ देऊन ती आपल्या कंपनीत आणणे बहुतेक उद्योजकांना आज अपरिहार्य बनते आहे. तीच अपरिहायर्ता सिक्का यांना कदाचित जाणवली असावी आणि नेमस्त जीवनसरणीचे संस्कार बालपणापासून अंत:करणावर उमटलेल्या नारायण मूर्ती यांना ती सगळीच संस्कृती अपरिचित असल्याने मसलत बिघडत गेली.
सुरुवातीला स्वयंपाकघराच्या चार भिंतींमध्येच धुसफुसणारे ते मतभेद होता होता मग दिवाणखान्यात आले. समेट काही झाला नाही आणि टाटांना टाटा करून मिस्त्रींनी आपले घर गाठले तर मूर्तींच्या शिक्क्यांखालून इन्फोसिसला बाहेर काढता नाही आले तर नाही; परंतु, आपण आपला रस्ता सुधारायचा हा पर्याय पत्करून सिक्का मोकळे झाले. इथे कोण बरोबर, कोण चुकले अशांसारख्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो. आर्थिक पुनर्रचनेचे आपल्या देशातील पर्व गद्धेपंचविशीचा टप्पा पार करत असताना भारतीय संघटित औद्योगिक क्षेत्रदेखील एका मोठ्या स्थित्यंतराच्या सत्रामधून वाटचाल करते आहे, एवढाच मुख्य निष्कष या सगळ्यांतून काढायचा. मात्र, या सगळ्या सव्यापसव्यामुळे काही कळीचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, हेही तितकेच खरे. त्यांतील काही मुद्दे हे मूल्यात्मक आहेत तर काही व्यवस्थात्मक. त्यांची चर्चा चौफेर घडायला हवी.

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Web Title: The break of the innings? Why is Ratan Tata and Narayan idol not with his successors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.