‘तुम्हारा कानून तोड दिया’

By admin | Published: December 26, 2015 05:54 PM2015-12-26T17:54:42+5:302015-12-26T17:54:42+5:30

जातपंचायतींनी आजवर अनन्वित अत्याचार केले. आता त्यांच्या विरोधातला जागर वाढतो आहे आणि जातपंचायतीही प्रवाहात येताहेत. दापोलीजवळील 19 गावांच्या गावकीनं कुणालाही वाळीत न टाकण्याचा निर्णय घेतला. यावर्षी नगर जिल्ह्यातील मढीच्या यात्रेत सुमारे पन्नास जातपंचायती झाल्या नाहीत. काही जातपंचायतींनी पोटातील, पाळण्यातील लग्नाची प्रथा थांबवत मुलींना शिक्षण देण्याचं ठरवलं. अनेक महिलांनी पंचांना जाहीरपणो सांगितलं, तुम्ही नाही, आम्हीच तुम्हाला ‘बहिष्कृत’ करतो.

'Broke your law' | ‘तुम्हारा कानून तोड दिया’

‘तुम्हारा कानून तोड दिया’

Next
>बहिष्कृतांच्या घरवापसीचा लढा.
-  कृष्णा चांदगुडे
 
जातपंचायतींच्या अत्याचाराचा इतिहास तसा खूप जुना आहे. सर्वसामान्य, गरीब नागरिकांना नाडण्याचा, त्यांना देशोधडीला लावण्याचा त्यांचा उद्योग वर्षानुवर्षे अव्याहत सुरूच आहे. आजही त्यात काहीच बदल झालेला नाही. पूर्वी ते उघडपणो होत होतं, आता अशा गोष्टी फारशा ‘बाहेर’ जाणार नाहीत याची काळजी घेत नागरिकांची गळचेपी केली जाते. 
बरं, हा प्रकार फक्त ग्रामीण आणि अशिक्षित समाजातच होतो म्हणावं तर तसंही नाही. जातपंचायतींनी आजवर अज्ञानी, अशिक्षित लोकांनाच समाजबहिष्कृत केलेलं आहे असं नाही. अनेक उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय व्यक्ती, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते. अशा अनेकांना या अनुभवांतून जावं लागलं आहे.
जातपंचायतींनी समाजातून बहिष्कृत केल्याची कारणं तरी किती, कशी आणि कोणती असावीत? मुळात त्याला कारणं तरी म्हणावीत का?
अभ्यासामुळे मुले होळीच्या ठिकाणी सहभागी न झाल्याने बहिष्कृत केलेल्या मोहिनी तळेकर यांनी मागील वर्षी आत्महत्त्या केली. विदर्भातही एका जातपंचायतमुळे चार आत्महत्त्या झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’मुळे नुकतेच उघडकीस आले आहे. शुद्धीकरणासाठी महिलांना मूत्र व विष्ठा खाऊ घातल्याची माहिती एका सामाजिक कार्यकत्र्याने दूरचित्रवाणीवर दिली. बारामती येथे जातीचा प्रश्न इतर जातीच्या लोकांकडे नेल्याच्या रागाने पंचांनी बहिष्कृत परिवारास मारहाण केली व महिलांच्या गुप्तांगात मिरचीची पूड कोंबली. यवतमाळ जिल्ह्यात एका शिक्षकाने पाणी भरणा:या महिलेस मारल्याने पंचानी उलट तिलाच दंड केला. दंडाची रक्कम चुकती न केल्याने तिला झाडाला बांधण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात इतर जातीतल्या पुरुषाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने ‘जात बाटवल्याचा’ आरोप पंचांनी तिच्यावरच केला आणि  शुद्धीकरणासाठी तिच्या जिभेवर लालबुंद केलेल्या मंगळसूत्रतील डोरल्याने चटका देण्यात आला. ‘हातावरच्या झाडाच्या पानावर तप्त कु:हाड ठेवून पाच पावले चालत हाताला इजा झाली नाही तर(च) तू गुन्हा केला नाही’. पंचाचा असा न्यायनिवाडा पुण्यातील एका वस्तीत आढळून आला. विवाहित महिलेचे चारित्र्य शुद्ध असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिला हात न भाजता उकळत्या तेलातून नाणो बाहेर काढण्यास पंचांनी सांगितल्याची घटना बीड जिल्ह्यात उघड झाली आहे. एका समाजात लग्नानंतर पंचांनी दिलेल्या पांढ:या वस्त्रवर नव:या मुला-मुलीने झोपल्यावर रक्ताचा डाग असेल तरच लग्न ग्राह्य धरण्यात येण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने निदरेष सोडलेल्या अहमदनगर येथील एका महिलेस जातपंचांनी अडीच लाख रुपये घेऊन जात बहिष्कृत केले. असे किती प्रकार?.
पण ‘असह्य’ झाल्यानं अनेक ठिकाणी आता नागरिक जातपंचायतींच्या या अन्यायाविरुद्ध बंड करू लागले आहेत. अंधश्रद्धा निमरूलन समितीही त्यांच्या पाठीशी उभी आहे. असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेत जातपंचायतींना सामाजिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या चळवळीलाही ब:यापैकी यश येतं आहे.
नाशिकच्या अण्णा हिंगमिरे यांनी सर्वात पहिली तक्रार नोंदविली. काही ठिकाणी पीडितांनी पंचांचा विरोध झुगारून दिला, काहींनी तर पंचांनाच ‘बहिष्कृत’ केले. 
हळूहळू जातपंचायतीचे जोखड उतरत आहे. काही पीडितांनी ‘तुम्हारा कानून तोड दिया’ असं पंचांना सुनावत सामाजिक परिवर्तन केले आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे हनमंत जावळे व स्वाती मोरे यांचा विवाह पंचांच्या परवानगीशिवाय पोलिसांच्या उपस्थितीत लावला गेला. अशा प्रकारचा हा पहिलाच विवाह ठरला. समाजातील ही एक प्रकारची मोठी क्र ांतीच आहे.
मुंबईच्या जोगेश्वरी येथील गोविंदीचे पोटात असताना लग्न लावण्यात आले होते. नवरा मुलगा अशिक्षित असल्याने या आयटी झालेल्या मुलीने लग्नाला नकार दिला. अंनिसच्या मदतीने पंचांचा दंड झुगारून जातपंचायत बहिष्कृत करत त्याचे सामाजिक सुधारणा मंडळात केलेले रूपांतर ‘पुढले पाऊल’ आहे.  
महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने कोल्हापूरच्या मंगलसिंग कांबळे व तरु णाच्या पुढाकाराने लगAात पंचाचा मोठा खर्च टाळून दीडशे रुपयात मध्यस्थीने लग्न करण्याचा प्रयत्न समाजात सुरू आहे. अन्यथा पंच लग्नात विविध परंपरेच्या नावाखाली ‘खुशाली’ वसूल करीत होते. 
धुळे येथील प्रा. भगवान गवळी यांनी आंतरजातीय विवाह केल्याने वीस वर्षापासून त्यांना आईवडिलांना भेटता आले नव्हते. महाराष्ट्र अंनिसच्या मोहिमेमुळे त्यांनी वाजतगाजत मिरवणूक काढून स्वगृही प्रवेश केला. त्यांच्या बहिणीच्या तक्रारीमुळे औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार पंचांना बहिष्कार उठवणो भाग पडले. 
परभणी येथे तीन लग्न मोडणा:या पंचांनी महाराष्ट्र अंनिसच्या हस्तक्षेपामुळे माघार घेत लग्नाला संमती दिली. पंचांच्या अगोदरच्या निर्णयामुळे आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या संकटातून त्यांची सुटका झाली. 
सातारा जिल्ह्यातील मरडमुरे येथे वयोवृद्ध दांपत्यावरील बहिष्कार उठविण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात लग्न करणारे मुलगा-मुलगी एकाच गावातील असल्याने बहिष्कृत करण्यात आले होते. अंनिसने पोलिसांच्या मदतीने समेट केला. 
महिलांनी गाऊन न घालण्याचा फतवा काढणा:या मुंबईच्या एका मंडळाला सामाजिक दबावापुढे झुकत फतवा रद्द करावा लागला. 
नाशिकच्या कळवण येथील आदिवासी कोकणा समाजाने महाराष्ट्र अंनिस व प्रशासनाच्या प्रबोधनामुळे जातपंचायत बंद केली आहे.
वर्षानुवर्षाच्या अत्याचारांनी पिचलेले समाजबांधव आणि चळवळीतल्या कार्यकत्र्याची पक्की साथ यामुळे पंचांची समाजावरची पकड आता सुटू पाहतेय. ‘तोंड लपवणा:या पंचांना आम्ही मानत नाही’, अशी क्र ांतिकारी भाषा समाजबांधव बोलायला लागले आहेत. 
जातपंचायतविरोधी लढा नाशिकमधून सुरू झाला. येथील अनेक पीडित महिला पंचांना उद्देशून जाहीरपणो म्हणतात, ‘तुम्ही आम्हाला काय वाळीत टाकाल? आम्ही तुम्हाला मानत नाही. जा, आम्हीच तुम्हाला वाळीत टाकतो!’ राज्यातील अनेक प्रकरणातील पंच अटक वाचविण्यासाठी फरार झाल्याने स्वत:च वाळीत टाकले गेले आहेत. लोक स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागले आहेत. अंनिसचे प्रबोधन, प्रशासनाचा धाक व प्रसारमाध्यमांचे सहकार्य यामुळे कालसुसंगत होणारा बदल पंच निमूटपणो बघत आहेत.
गेल्या अडीच वर्षातील प्रबोधनामुळे सकारात्मक बदल होत आहेत. दापोलीजवळच्या एकोणीस गावांच्या गावकीने एकत्र येऊन कुणालाही वाळीत न टाकण्याचे ठरवले. यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मढीच्या यात्रेतील सर्वच, जवळपास पन्नास जातपंचायती झाल्या नाहीत. त्यामुळे लाखो लोकांची सातशे वर्षाची गुलामगिरी संपली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविकांची माळेगाव (नांदेड) येथीलही यात्रेत जातपंचायती झाल्या नाहीत. जेजुरी येथील यात्रेत जातपंचायत घेण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली. काही जातपंचायतींनी अनिष्ट परंपरा नाकारत पोटातील, पाळण्यातील अथवा अल्पवयीन लग्नाची प्रथा थांबवत मुलींना शिक्षण देण्याचे व इतर निर्णय घेतले.
हे सारं नक्कीच आशादायक आहे. परिस्थिती बदलते आहे, जातपंचायतींना सर्वसामान्य नागरिक जाब विचारू लागले आहेत. त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल होताहेत. अर्थात आत्ताशी ही सुरुवात आहे. अजून बरीच मजल मारायची बाकी आहे. अनेक ठिकाणी पंचांची मनमानी सुरूच आहे. जातपंचायतीचे अस्तित्व बहुतांश जातीत आहेच. मुस्लीम जातपंचायतींविरोधातसुद्धा तक्र ारी दाखल झाल्या आहेत. जातपंचायत ही समांतर न्यायव्यवस्था असल्याने संविधानास गंभीर धोका निर्माण होत आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येत आहे. त्यामुळे जातपंचायतींविरोधात सक्षम कायदा होणं ही पहिली पायरी आहे. त्यासाठीचा आग्रह आपण सर्वानीच धरायला हवा.
 
सामाजातून बहिष्कृत करण्याची कारणं.
 
जातपंचायतींकडून लोकांना समाजातून का बहिष्कृत केलं जातं? बरीच कारणं  हास्यस्पद वाटली तरी ती खरी आहेत.
जातीने अथवा गावकीने ठरवून दिलेले नियम मोडले, आंतरजातीय विवाह केला, पोलीसांत तक्र ार केली, परपुरूषाचा स्पर्श झाला, जमिनीवरुन वाद झाला, जातीवर आधारित व्यवसाय सोडला, संस्थेचा सभासद झाला नाही, वर्गणी दिली नाही, सार्वजनिक कार्यक्र माचा हिशेब विचारला, लग्नात परंपरेपेक्षा वेगळा विधि केला, लग्नात किंवा दहाव्याला गावजेवण घातलं नाही, महिलांनी गाऊन अथवा जिन्स घातली, पालखीच्या देवाची मालकी सांगितली, जातभाषेत न बोलता मराठीत बोलला, एकाच आडनावात अथवा सगोत्र विवाह केला, पाळण्यात अथवा लहानपणी झालेल्या लग्नाला मोठेपणी नकार दिला, जातीचे प्रश्नांसाठी इतर जातीच्या माणसांकडे मदत मागितली.
 
(लेखक ‘जातपंचायत मूठमाती 
अभियान’चे संयोजक आहेत.
krishnachandgude@gmail.com

Web Title: 'Broke your law'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.