इंग्रजांनाही आकर्षित करणारी झाडीपट्टी रंगभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:09 AM2020-02-23T00:09:54+5:302020-02-23T00:23:04+5:30
कवी कुलगुरू कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख 'सौराज्य रम्य' अशा सार्थ शब्दांत केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत होतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे झाडीबोली. या चार जिल्ह्यांच्या विस्तीर्ण अशा भूभागावर पसरलेल्या हिरव्यागार घनदाट वनराईमुळे हा भाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो.
- अतुल बुराडे/विष्णू दुनेदार
दिवाळी ते रंगपंचमीपर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीत आगळ्यावेगळ्या पण वैभवशाली, गौरवसंपन्न आणि समृद्ध अशा लोक उत्सवांची रेलचेल या भागात असते. यामध्ये मंडई, शंकरपट, गळ, यात्रा यांचा समावेश आहे. या उत्सवांच्या आयोजनातून सामूहिकरिीत्या साकार होणारी दंडार, नाटकं, गोंधळ, तमाशा, राधा यांचा विशेषत्वाने मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये समावेश होतो. अस्सल झाडीबोली भाषेतील संगीतमयी सांस्कृतिक नाट्यपरंपरेच्या या भूमीला झाडीपट्टी रंगभूमी म्हणून अनेक दशकांपासून ओळख मिळाली आहे.
झाडीपट्टी रंगभूमीची खरीखुरी, अस्सल आणि इथल्या मातीतल्या कणाकणात रुजलेली लोककला म्हणजे दंडार. पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक घटनांतील प्रसंग गीत आणि नृत्याच्या रूपातून सादर करण्यालाच दंडार म्हणतात. दंडारसह तमाशा, गोंधळ, खडीगंमत, राधा हे झाडीपट्टी रंगभूमीवरील पारंपरिक लोककलेचे वेगवेगळे रूप. पुढे कालौघात आधुनिकतेचा स्पर्श, नावीन्यतेचा ध्यास आणि आवड बदलत गेल्याने दंडार या नाट्य कलाकृतीची लोकप्रियता कमी होत गेली आणि रात्री सादर होणाऱ्या दंडारची जागा आता नाटक या कलेने घेतली. वर्तमानात नाटक हीच झाडीपट्टीच्या रंगभूमीवर सादर होणारी सर्वाधिक प्रसिद्ध नाट्यकृती होय.
झाडीपट्टीतील चारही जिल्ह्यांच्या केंद्रस्थानी असलेले देसाईगंज (वडसा) ही झाडीपट्टी रंगभूमीची राजधानी होय. याच ठिकाणाहून ५५ नाट्यरंगभूमी कंपन्या अख्ख्या झाडीपट्टीत आणि राज्यात तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यामध्येही नाटकांचे प्रयोग पुरवतात. दिवाळी ते होळीपर्यंत तीन हजारांवर नाट्यप्रयोग झाडीपट्टी रंगभूमीवर सादर होतात. हजारो कलाकार रात्रंदिवस राबून नाट्यरसिकांना कलामुग्ध करतात. आगळीवेगळी अशी ही झाडीपट्टी रंगभूमी भारतावर दीडशे वर्षांची सत्ता गाजवून गेलेल्या इंग्रजांनासुद्धा वेड लावून गेली.
आजच्या इंटरनेट युगात मानवी मनाला हवे ते अगदी सेकंदात ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळत असूनही झाडीतला प्रेक्षक मात्र झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांचा दिलदारपणे आस्वाद घेतो, ही झाडीपट्टी रंगभूमीची ही एक खासियत म्हणावी लागेल. रात्री १० वाजेपासून पहाटेपर्यंत चालणारी नाटकं हेही एक वैशिष्ट्य! इथल्या रंगभूमीची मनोभावे सेवा करून आपली कला अर्पण करणारे सारे कलावंत आणि त्यावर जीव ओवाळत प्रेम करणारे रसिक यांच्यामुळे झाडीच्या प्रत्येक नाटकाला आजही तोबा गर्दी उसळते. आजपासून तब्बल ९० वर्षांपूर्वी ब्रिटिशकालीन भारताच्या इंग्रज सत्ताधाऱ्यांनासुद्धा झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांनी पार वेड लावले होते. इंग्रजांना मराठी भाषा समजत नसल्यामुळे भाषांतरकाराची मदत घेऊन मराठीचे हिंदी, इंग्रजी भाषेत रूपांतर केले जात होते.
झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक योगदान
- झाडीपट्टी रंगभूमीचे सामाजिक महत्त्व फार आहे. नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन साधण्याचे काम होत आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोटण्याचे काम केले जात आहे. अनेकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेल्या लोकांना नाटकांच्या निमित्ताने गावाची ओढ लागते. त्यांची मातीशी नाळ कायम जुळवून ठेवण्याचे काम झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून होत आहे. गावात पाहुणे येत असल्याने अनेक उपवर मुला-मुलींचे विवाह जुळवून आणण्याचा योग या निमित्तानं साधला जातो.
- केवळ अंगभूत असलेल्या कलेच्या जोरावर येथील कलावंत रंगभूमीवर आपली कला सादर करीत आहे. परंतु झाडीपट्टीमध्ये अभिनय, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण झाल्यास झाडीपट्टी रंगभूमीचे भविष्य आणखी उज्वल होऊ शकते.
सीताराम पाटील डोंगरवार यांचा मेडल देऊन गौरव
- पौराणिक, ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग झाल्यावर नवेगावबांधच्या नाट्य मंडळाने प्रस्तुत केलेल्या नाटक प्रयोगांनी प्रभावित होऊन तत्कालीन कलेक्टर स्मिथ यांनी श्री बालाजी प्रासादिक नाट्य मंडळाचे कर्तेधर्ते सीताराम पाटील डोंगरवार यांचा पदक देऊन त्यांचा गुणगौरव केला. आजही ते मेडल सीताराम पाटलांचे नातू नारायण माधवराव डोंगरवार, रा.धाबेपवनी (जि.गोंदिया) यांच्या घरी जपून ठेवले आहे. झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून झाडीच्या रंगभूमीचा प्रभाव आणि लोकप्रियता यातून स्पष्ट होते.
- सीताराम पाटील डोंगरवार यांच्या नेतृत्वात नवेगावबांध येथील कलाकार मंडळींनी सिंहाचा छावा हे संगीत नाटक सादर केले. या नाटकात अरण्यपुत्र माधवराव डोंगरवार, रामकृष्ण डोंगरवार, लटारू पोतदार, गणा गायकवाड, सीताराम पवार, काशिनाथ डोंगरवार, आत्माराम बाळबुद्धे, पंढरी डोंगरवार, हरी खुणे, पांडुरंग बोरकर, रामा डोंगरवार यांनी अभिनय केला होता, अशी माहिती नारायण माधवराव डोंगरवार आणि भीमसेन नारायण डोंगरवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
- कलेला कसलेही बंधन नसतात. गुलामगिरीची भिंतसुद्धा झाडीच्या नाटकांनी आजपासून ९० वर्षांपूर्वीच तोडून टाकली होती, हेसुद्धा नवलच!