सृष्टीच्या बागेतील फुलपाखरे

By admin | Published: June 14, 2014 06:30 PM2014-06-14T18:30:35+5:302014-06-14T18:30:35+5:30

शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल विचारले, तर वर्गातील वातट्र, दंगेखोर मुलांबद्दल नेहमी तक्रारीचा सूरच असतो. पण, वातट्रपणामागचे कुतूहल समजून घेत मुलांना मुक्त वाट देणारा आणि धोक्यांची जाणीवही करून देणारा मुख्याध्यापक असेल तर..

Butterflies in the Garden of Nature | सृष्टीच्या बागेतील फुलपाखरे

सृष्टीच्या बागेतील फुलपाखरे

Next

- प्रा. डॉ. द. ता. भोसले

 
सकाळी अकरापर्यंत असणारी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा नुकतीच सुटलेली. शेवटची दीर्घ घंटा होताच तुंबलेला पाण्याचा लोंढा उसळून बाहेर धावावा, तशी वर्गावर्गांतली मुले नाना प्रकारचे आवाज करीत बाहेर उसळली. चार तासांच्या बंदिवासातून मुक्त झाल्याचा तो आनंद होता की कंटाळवाण्या शिकवण्यातून झालेल्या सुटकेचा आनंद होता, हे नेमके सांगता येत नव्हते. उतार असलेल्या सपाट जमिनीवर चारी दिशांनी पाणी पसरावे, तशी सारी बच्चे कंपनी शाळेसमोरच्या मोकळ्या जागेत विखुरली. नाही म्हणायला तीन वर्गशिक्षकांनी आपापल्या वर्गातील दंगेखोर, शिस्त मोडणारी आणि वर्गातील शांतता भंग करून गैरवर्तन करणारी पाच-सहा मुले शाळाप्रमुखासमोर उभी करण्यासाठी डांबून ठेवली होती. त्यांच्या तक्रारी शाळाप्रमुखांना सांगून त्यांना शिक्षा करावी, अशी विनंती ते करणार होते. हे सगळे ‘बालगुन्हेगार’ सुकलेल्या चेहर्‍याने आणि मिटलेल्या ओठांनी शाळाप्रमुखांच्या न्यायालयाकडे निघाले होते.
शिपायाने कार्यालयाचा दरवाजा बंद करताच सर्वच शिक्षकांनी मुलांच्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. एक जण म्हणाले, ‘‘सर, हा प्रसाद पाटील. आपल्या बागेतल्या आंब्याच्या झाडावर चढतो. फांदीला धरून लोंबकळतो. झोके घेतो आणि उन्हाळ्यात कैर्‍यासुद्धा चोरतो.’’ 
‘‘नाही सर, मी कैर्‍या तोडत नाही. खाली पडल्या तर घेतो. मी एकटाच खात नाही. सगळ्यांना वाटतो.’’ घाबरलेल्या प्रसादने स्पष्टीकरण दिले. त्यावर सर पुन्हा म्हणाले, ‘‘आणि हा झाडावर चढताना, फांदीवरून लोंबकळताना खाली पडला, जखम झाली, हाड मोडले, तर याला जबाबदार कोण? पालक आपल्यालाच जबाबदार धरतील ना?’’ शिक्षकाने दरडावताच त्यानं खाली मान घातली; पण खालच्या मानेनंच म्हणाला, ‘‘मला झाडावर चांगले चढता येते. फार मजा वाटते लोंबकळताना!’’ त्यानंतर दुसर्‍या मुलाकडे बोट करीत तेच शिक्षक म्हणाले, ‘‘हा श्रीरंग ना, शाळेच्या शेजारी असलेल्या टेकडीवर जातो. रातकिडे पकड, फुलपाखरे पकड, झाडाझुडपांत पाखरांची अंडी शोध असले उद्योग करतो. काहीच मिळाले नाही, तर रंगीबेरंगी दगड आणि गारगोट्या गोळा करतो. करतो ते करतो आणि वर्गात गारगोट्या वाजवतो. माझ्यासह सारा वर्ग डिस्टर्ब होतो सर. हा उद्या पाय घसरून पडला, एकदा साप, विंचू चावला, तर आपणालाच लोक बोलतील; म्हणून त्याला तंबी द्या आणि कडक शिक्षाही करा. फार डांबरट आहे हा पोरगा.’’ आपले हे पराक्रम ऐकून आता सर आपल्याला कडक शिक्षा करणार, या भीतीने त्याने खाली घातलेली मान वर केली नाही.
नंतर दुसरे एक शिक्षक पुढे येत म्हणाले, ‘‘सर, या रमाकांतला आपल्या शाळेतून काढून टाका. फार वातट्रपणा करतो हा. मधल्या सुटीत आणि तासावर कोणी नसले, की हा सार्‍यांच्या नकला करतो. गाईसारखा हंबरतो. घोड्यासारखा खिंकाळतो. कुत्र्याच्या पिलाचा आवाज काढतो. एवढेच नव्हे, तर आपल्या काही शिक्षकांच्या नकला करतो. एकदा त्याच्या वर्गावर मी थोडासा उशिरा गेलो, तर मी जसा नाकातून बोलतो; तसा हा बोलत होता. माझीच नक्कल करताना मी पकडला. त्यामुळे माझी सार्‍या मुलांसमोर नाचक्की होते. एकदा तर त्याने वर्गात कुत्र्याचे पिलूदेखील आणले होते. रिकामा तास असला, की हा तोंडावर राक्षसाचा-भुताचा मुखवटा घालतो आणि थयाथया नाचतो. सार्‍या मुली घाबरून जातात. याला तुम्ही चांगला फोडून काढा आणि कायमचा हाकलून द्या.’’ हे सारे ऐकताच मुख्याध्यापक खळखळून हसले. ‘‘अरे वा! छोकरा मोठा कलावंत आणि अवखळ दिसतोय,’’ असे शाळाप्रमुखांनी त्याचे कौतुक केले. क्षणभर थांबून ते म्हणाले, ‘‘दिनेशजी, या वयात, ही मुले थोडीफार अशी वागणारच. या गमती, या खोड्या त्यांनी आता करायच्या नाहीत, तर केव्हा म्हातारपणी करायच्या? अहो, त्या वयात मीसुद्धा असला वातट्रपणा घरात करायचो. माझा भुताचा अवतार बघताच सार्‍या बहिणी किंचाळायच्या. घाबरून बाथरूममध्ये लपायच्या. आईने पाठीवर दोन रट्टे दिल्यावरच मी थांबायचो. ..तरीही मी त्याला कडक शब्दांत समज देतो. जे काय करायचे ते घरी कर; शाळेत नाही, असे सांगतो. तुम्ही फार गंभीरपणे घेऊ नका.’’ एवढे सांगून होताच तिसरे शिक्षक आपली तक्रार सांगू लागले. ते म्हणाले, ‘‘सर, तुमचे म्हणणे तसे बरोबर आहे; पण ही मुले काही वेळा जिवावर बेतणार्‍या गोष्टी करतात. त्यातील धोके त्यांना कळत नाहीत. आता हीच तुमच्या समोरची दोन मुले बघा. ही मुले तलावातल्या माशांना भाकरीचे तुकडे घालताना मी पाहिले. तुकडे खाण्यासाठी मासे घोळक्याने आले, की ते त्यांना पकडायचा प्रयत्न करतात. एक पाय घसरून पडलाही होता. मासे धरण्याच्या नादात एखादा पाण्यात बुडून मेला, तर ते केवढय़ाला पडेल?.. माझ्या पलीकडे उभा असलेल्या या बाबूने, तर तळ्याच्या काठावर असणार्‍या एका सापाच्या पिलाला धरताना पाहिले. कदाचित ते बिनविषारीही असेल; पण असला अगाऊपणा त्याच्या जिवावर बेतेल. आपली शाळा नाहक बदनाम होईल.’’ हे ऐकताच सारेच गंभीर झाले. 
शाळाप्रमुखही गंभीर होत म्हणाले, ‘‘या वयातील कुतूहल मोठे विलक्षण असते हे खरे आहे; पण त्याला विचारांची जोड नसते. संभाव्य धोक्याची कल्पना नसते. तेव्हा तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. आपल्या या तलावालाच आपण जाळीच्या तारांचे भक्कम कुंपण घालून घेऊ. मुलांना जे काय बघायचे असेल, ते बाहेरून. मासे बघा, नाही तर साप बघा.’’ आणि त्या मुलांनाही शाळाप्रमुखांनी पित्याच्या भूमिकेतून त्यातील धोके दाखवून दिले. छंद वेगळा आणि वेडाचार वेगळा हेही सांगून टाकले. समजुतीच्या चार 
गोष्टी सांगितल्या. ‘‘पुन्हा कुणाची तक्रार आली, तर 
कडक शिक्षा करीन,’’ अशी समजही त्यांना देऊन ऑफिसमधून बाहेर पिटाळले.
मुले निघून गेल्यावर शिक्षक शाळेच्या एकूण शिस्तीबद्दल मोकळेपणाने बोलत बसले. वरच्या वर्गातील मुलेही कशी वागतात, याची माहिती देऊ लागले. एक जण म्हणाला, ‘‘सर, वर्ग सुटताच काही मुले आपल्या मित्रांच्या चपलाच लपवून ठेवतात, तर काही चपलांची अदलाबदल करतात. एक सापडली, तर दुसरी सापडत नाही. काही मुले एखाद्या मुलाच्या पाठीवर बसून खणा-खणा घंटा वाजवण्याची आपली इच्छा पूर्ण करून घेतात. काही मुले तर बाटलीतले उरलेले पाणी प्रत्येक पायरीवर सांडत जातात; जेणेकरून कुणी तरी पाय घसरून पडावे; काही मुले गरीब मुलांच्या पाठीवर ‘मी वेडा आहे. मी मूर्ख आहे. मी गाढव आहे.’ अशा चिठय़ा चिटकवतात व चिडवतात, तर काही कार्टी फाटलेला रबरी चेंडू पायाने उडवत फुटबॉल खेळत अनेकांना पाडतात. या पोरांचे प्रताप-पराक्रम किती म्हणून सांगावेत? आपल्या शाळेची शिस्त हळूहळू बिघडत चाललीय सर.’’ 
प्रत्येक वाक्याला हसत-हसत प्रतिसाद देत असलेले शाळाप्रमुख म्हणाले, ‘‘अहो, या मुलांचे वय, त्यांचे निरागस मन आणि सृष्टीविषयी असणारे प्रचंड कुतूहल तुम्ही ध्यानात घ्या. या मुलांनी असे वागलेच पाहिजे. ही मुले म्हणजे सृष्टीच्या बागेतील मुक्तपणे फडफडणारी फुलपाखरे आहेत. ही फुलपाखरे फुलावर बसतील, काट्यावर टेकतील; प्रसंगी बागेतील प्रत्येक फुलाचा वास घेत-घेत मुक्तपणे बागडतील. अशा वेळी त्यांचा एखादा पंख दुखावला, तरी फारसे बिघडत नाही. त्यासाठी त्यांना बंदिस्त काचपात्रात डांबणे हे पाप आहे. त्यांच्या दृष्टीने आणि आपल्याही दृष्टीने! 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
नवृत्त प्राचार्य आहेत.)

Web Title: Butterflies in the Garden of Nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.