ही ‘जोहरा’ जगू शकेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 06:02 AM2021-09-05T06:02:00+5:302021-09-05T06:05:06+5:30
२०१०ला काबूलमध्ये मुलींची एक संगीत शाळा सुरु झाली! मुलींची शाळा, संगीत म्हटल्यावर जिथे तालिबान्यांची बंदूक लगेचंच उठते, अशा ठिकाणी मुलींचा संगीताचा रियाज सुरू होता. आपल्या देशाचं संगीत त्यांना पुनरुज्जीवित करायचं होतं. त्यासाठी या मुली जगभर हिंडल्या.. आज कुठे आहे ती शाळा आणि त्या मुली?...
- वंदना अत्रे
त्या गावातील फुलपाखरांची बाग आता उजाड झाली आहे. मध गोळा करण्यासाठी दूरदूरच्या प्रांतातून येणारी फुलपाखरे घाबरून, आपले इवलेसे रंगीबेरंगी पंख मिटून धपापत्या उराने गप्प बसून आहेत. कधीतरी पुन्हा बागेतील झाडांवर उन्हे येऊन हसरे दिवस उजाडण्याच्या क्षीण आशेवर...! पण ही आशा तरी बाळगायची कोणाच्या भरवशावर? दहशतीच्या मुठीत गुदमरत असलेल्या या गावापासून दूर जाण्यासाठी विमानाला लटकणाऱ्या आणि या खटाटोपात जीव गमावणाऱ्या, स्वतःच्या पोटच्या गोळ्याला कोण्या गोऱ्या सोजीराच्या हातात सोपवून देणाऱ्या आणि फटाके फुटावे तशा बंदुकीच्या फैरी मजेत जागोजागी उडत असणाऱ्या या गावात फुलपाखरांच्या बागेचा विचार करणार तरी कोण आणि कशाला? आणि त्या बागेचा माळी? स्वतःचे जगणे, संसार याची मोळी बांधून स्वतःच्या पाठीला बांधून तो जगभर फिरत होता. ज्याला-त्याला पटवून देत होता, जगातील युद्ध आणि हिंसा संपवायची तर एकच उपाय आहे, स्वरांच्या बागा जागोजागी फुलवल्या पाहिजेत. त्यात मध गोळा करणारी फुलपाखरे जोपासली पाहिजेत... त्याने मोठ्या उमेदीने जोपासलेल्या बागेत आता गावातील बंदुका घेऊन दहशतवादी शिरले आहेत. जागोजागी दिसतायत सतारीच्या तुटलेल्या तारा आणि रोबाबच्या खुंट्या...
xx
२०१० साली, बरोबर दहा वर्षांपूर्वी डॉ अहमद सरमस्त यांनी काबूलमध्ये अफगाणिस्तान नॅशनल म्युझिक स्कूलची स्थापना केली. अनेक अर्थाने ती शाळा अनोखी होती. युद्धाने जर्जर झालेल्या आणि या संघर्षात सगळ्या सांगीतिक परंपरा इतिहासाच्या अंधाऱ्या गुहेत ढकलून देणाऱ्या आपल्या देशातील, अफगाणिस्तानमधील संगीत पुनरुज्जीवित करण्याच्या वेडाने झपाटले होते त्यांना. रस्त्यावर बबलगम आणि उकडलेली अंडी विकून रोजचे घर चालवणाऱ्या छोट्या मुलांना आणि सतत बुरख्यात राहून आपल्या अम्मी-अब्बूचा डुगडुगता संसार चालवण्याच्या ओझ्याखाली वाकलेल्या मुलीना संगीताचे धडे देण्याची प्रखर महत्त्वाकांक्षा घेऊन ते जगभर प्रवास करीत होते. शाळेसाठी निधी गोळा करण्यासाठी, आपल्या या प्रयोगाचे महत्त्व जगातील सत्ताधीशांना समजावून सांगण्यासाठी. गेली दोन दशके धुमसत असलेल्या युद्धभूमीत संगीताची शाळा चालवण्याच्या त्याच्या कल्पनेला बहुतेकांनी वेड्यात काढले; पण काही माणसे आणि संस्था निर्धाराने त्यांच्या मागे उभी राहिली. काबूलमधील घराघरांमध्ये जाऊन या शिक्षणाची गरज पटवून देत त्यांनी मुलांना आपल्या स्वप्नात सामील करून घेतले आणि काबूलच्या भरवस्तीत उभी राहिलेली संगीताची ती शाळा गजबजली. संगीताचे शिक्षण देण्यासाठी युरोप-अमेरिकेपासून भारतापर्यंत अनेक देशांमधील कलाकार शिक्षक तिथे आले. देशोदेशीची वाद्ये आली. “संगीतासारख्या थिल्लर गोष्टींची या देशाला गरज नाही” असे सांगून दर दिवशी नवनवे फतवे काढणाऱ्या मुल्ला-मौलवींचे आदेश गुंडाळून ठेवत या शाळेत प्रथमच मुले आणि मुली एकत्र संगीत शिक्षणाचा आनंद घेऊ लागली. एवढे काही घडू लागल्यावर आपल्या धमक्या पोकळ नाहीत, हे सिद्ध करणे तालिबान्यांसाठी गरजेचे झाले ! आणि मग शाळेच्या एका कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून आलेल्या आणि डॉ. सरमस्त यांच्या मागेच बसलेल्या सुसाईड बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात डॉ. सरमस्त जबर जखमी झाले. दोघे जण ठार आणि कित्येक घायाळ झाले. डोक्यात शार्पनेल घुसल्याने तात्पुरते बहिरेपण आलेल्या डॉ. सरमस्त यांच्यावर त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. दहशतीचे हे रौद्र रूप मुलांना थिजवून टाकणारे असले तरी मुले मागे हटली नाहीत, कारण आजवर कधीच अनुभवास न आलेले अतिशय आनंदाचे दुर्मीळ क्षण त्यांच्या ओंजळीत होतेच की...
बुरख्याचे बंधन झुगारून या शाळेत शिकलेल्या आणि आपल्या आवडीचे वाद्य घेऊन रंगमंचावर उभ्या फक्त मुलींच्या ‘जोहरा’ या पहिल्या-वहिल्या वाद्यवृंदाने अफगाणिस्तानच्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवले तेच जणू इतिहास घडवण्यासाठी! दर वर्षी जिनेव्हामध्ये जमून जगाच्या अर्थव्यवहारांची चिंता वाहणारे देशोदेशीचे विचारवंत यांना ‘जोहरा’च्या निमित्ताने अफगाणिस्तानचे असे रूप दिसले जे आजवर क्वचितच कोणालाच दिसले होते! काबूलमधील घराची सीमा न ओलांडलेल्या या मुली सगळा युरोप आणि तेथील प्रतिष्ठित कला महोत्सवांमधून हजेरी लावत, भविष्याचे वायदे आणि स्वप्नांची देवाणघेवाण करीत काबूलमध्ये परतल्या ते भयावह वास्तवाला सामोरे जाण्यासाठी..
संगीतावर मनोमन कमालीचा रोष असलेल्या तालिबानींना धर्म संगीत वगळता संगीत नावाची ‘उठवळ गोष्ट’ आपल्या भूमीत वाजणे मुळी मान्यच नाहीय. त्यामुळे संगीताचे कार्यक्रम करणे वगैरे दूर राहो, ते ऐकणाऱ्यांचेसुद्धा प्रसंगी कान छाटले जातात. त्यामुळे काबूल ताब्यात आल्यावर काही तासांमध्येच हातात कट्टर तालिबानी या शाळेत शिरणे अपेक्षितच होते. शाळा ताब्यात घेण्यापेक्षा संगीत निर्माण करणाऱ्या वाद्यांचा विध्वंस करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. बंदुकीचे वार करून शाळेतील वाद्य फोडून-ठेचून झाल्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी-आणण्यासाठी ठेवलेल्या गाड्या त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. आता याच्या पुढचा टप्पा म्हणजे, काबूलमध्ये घराघरांमध्ये जाऊन वाद्यांचा शोध घेतला जाईल आणि ते वाद्य बाळगणाऱ्या घराला आणि त्या वाद्याला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल ! शाळेत झालेल्या विध्वंसाचे चित्रण असलेले संदेश या शाळेचे जगभरातील हितचिंतक आणि माजी विद्यार्थी या प्रत्येकाकडे वेगाने पोहोचले; पण शाळा वाचवायची तर कशी? रोज बळी मागणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घायची तर कोणी आणि कशाला? या शाळेत शिक्षण घेऊन सध्या अमेरिकेत संगीतात मास्टर्स करणारा पियानोवादक एल्हम फनुसच्या मेसेज बॉक्समध्ये हे संदेश पडले तेव्हा शाळेत शिकलेली एक धून तो कोणासाठी तरी रेकॉर्ड करीत होता. मेसेज मिळाल्यावर पियानो बंद करून तो उठला. ‘अफगाणिस्तान म्हणजे कोणत्याही कलेचा कधीच स्पर्श न झालेली दफनभूमी होती असेच आमच्या पुढील पिढ्यांना वाटत राहणार नक्की...’ त्याने उत्तर दिले.
आणि तेथील तरुण मुली? त्यांच्यापैकी काहींच्या वाट्याला आलेला ‘जोहरा’ नावाचा तो मंतरलेला अनुभव? अकाली पोरकेपण वाट्याला आलेल्या त्यांच्या या अनुभवाच्या दुःखाचे चटके जगभरातील स्त्रियांना भाजत राहतील...
म्हणून तरी फुलपाखरांची ती बाग पुन्हा वसवली पाहिजे..!
(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)
vratre@gmail.com