बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:24 AM2018-12-23T01:24:52+5:302018-12-23T01:29:02+5:30

आयुष्यातील चांगले वाईट अनुभव मनुष्याला बरंच काही शिकवून जातात. एखादा प्रसंग कायमचा मनावर कोरला जातो. दु:खद प्रसंगांना सामोरे जात आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ऊर्जा देऊन जातो. अशाच एका ध्येयवेड्या भावाने कर्करोगाने निधन झालेल्या बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्योती कॅन्सर रिलीफ अ‍ॅन्ड गाईड सेंटरची स्थापना करून कर्करुग्णसेवेचे घेतलेले व्रत प्रेरणादायी आहे.

The Cancer Cancer Relief Center, created for the memory of sister | बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटर

बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारले ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटर

googlenewsNext
ठळक मुद्देप्रेरणादायी शिक्षक सतीश मुस्कंदेयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मूळचे रहिवासी ध्येयवेड्या भावाचा तब्बल २२ वर्षापासूनचा संघर्ष



सुनील पु. आरेकर

लोकमत न्यूज नेटवर्क
आयुष्यातील चांगले वाईट अनुभव मनुष्याला बरंच काही शिकवून जातात. एखादा प्रसंग कायमचा मनावर कोरला जातो. दु:खद प्रसंगांना सामोरे जात आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ऊर्जा देऊन जातो. अशाच एका ध्येयवेड्या भावाने कर्करोगाने निधन झालेल्या बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्योती कॅन्सर रिलीफ अ‍ॅन्ड गाईड सेंटरची स्थापना करून कर्करुग्णसेवेचे घेतलेले व्रत प्रेरणादायी आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मूळचे रहिवासी सतीश मुस्कंदे पेशाने शिक्षक असून त्यांची मोठी बहीण सौ.ज्योती पारे हिला कर्करोगाने ग्रासले होते. तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तिच्या मरणयातना सतीशने अगदी जवळून अनुभवल्या होत्या. तब्बल दहा महिने मृत्यूशी झुंज देत तिची ९ सप्टेंबर २००१ रोजी प्राणज्योत विझली. वेळेवर योग्य उपचार होऊ न शकल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत होते. कॅन्सर रुग्णांसाठी काही तरी करावे, या विचाराने त्यांच्या मनात जन्म घेतला. सर्वसामान्य घरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांवर वाईट प्रसंग येऊ नयेत, असे त्यांना नेहमीच वाटायचे. कुटुंबावर कोसळलेल्या दु:खातून सावरत सतीशने नि:स्वार्थ रुग्णसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगले. कॅन्सरग्रस्तांच्या यातना त्यांनी स्वत:च्या घरी जवळून बघितल्या होत्या. रुग्णांच्या हालअपेष्टा व गैरसोय टाळण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी सन २००२ मध्ये बहिणीच्या प्रेरणेनेतून ज्योती कॅन्सर रिलीफ अ‍ॅन्ड गाईड सेंटर या सामाजिक संस्थेची स्थापना करून कार्यास प्रारंभ केला.
कर्करुग्णाच्या सेवेने झपाटलेला सतीश ग्रामीण भागातील गरजू रुग्णाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतो. रुग्णाच्या कुटुंबीयांना धीर देतो. कुठलाही शासकीय निधी न घेता कर्करोग जागृती अभियान सुरू केले. रुग्णालय, विविध सामाजिक संस्था तथा शासकीय निधीबाबत मार्गदर्शन करतोय. मुस्कंदे यांनी आजवर राज्यातील सुमारे चार हजार कर्करुग्णांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. लढा कॅन्सरशी या अभिनव उपक्र मातून शेकडो कर्करुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला. त्यांच्या विविध समस्यांबाबत अनेक वेळा धरणे आंदोलने केली. शासन दरबारी पाठपुरावा केला. जीवनदायी योजनेतील त्रुटी दूर करण्यास भाग पाडले. तसेच यवतमाळ येथे रक्त विघटन केंद्राची मागणी पूर्ण झाली. ग्रामीण तथा शहरी भागात व्यसनमुक्ती चळवळ, रक्तदान शिबिरे, रोगनिदान शिबिर, मार्गदर्शन शिबिर आदी उपक्र म राबवितात. जिल्हा शासकीय रुग्णालयातच स्वतंत्र कॅन्सर विभाग करून कर्करुग्णास योग्य उपचार मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.
कॅन्सरग्रस्तांच्या जिल्हा परिषद मदत निधीत वाढ, प्रवास सवलतीसाठी आंदोलन, दारूबंदी चळवळीत सहभाग नोंदविला. ब्लड कॅन्सर तथा सिकलसेलग्रस्तांसाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हजारो बाटल्या रक्त पुरविले. ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटरच्या माध्यमातून जीवन ज्योती कॅन्सर योद्धा सन्मान योजनेअंतर्गत कॅन्सरवर मात करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील महिला रुग्णाला व्यावसायिक पुनर्वसनासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ग्रामीण भागातील रुग्णांना नागपूर व मुंबई येथे वारंवार जावे लागत असल्याने प्रत्येक रु ग्णाला प्रवासासाठी एक हजार तर किमोथेरपीसाठी नऊ हजार रुपयांची मदत दिली जाते.
त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार, केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, राष्ट्रीय गौरव पुरस्कार, फिलीप कंपनीचा रेड अ‍ॅण्ड व्हाईट ब्रेव्हरी अवॉर्ड, एअर इंडिया बोल्ट अवॉर्ड, सत्यमेव जयते प्रेरणा पुरस्कार यासह राष्ट्रीय तथा राज्य पातळीवर अनेक पारितोषिके मिळाली. सिंगापूरच्या आरोग्य व शिक्षण अभ्यास दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली. त्यांची कर्करुग्णाविषयीची आत्मीयता, धडपड निश्चितच प्रेरणादायी असून त्या ध्येयवेड्या भावाचा तब्बल २२ वर्षापासून संघर्ष सुरूच आहे. कॅन्सरशी लढताना अनंतात विलीन झालेल्या बहिणीच्या प्रेरणेतून स्थापन झालेले ज्योती कॅन्सर रिलीफ सेंटर कॅन्सरग्रस्तांच्या आयुष्यात खरोखरंच जगण्याची नवज्योती तेवविते, असे म्हणणे वावगे ठरू नये.

Web Title: The Cancer Cancer Relief Center, created for the memory of sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.