कॅस्ट्रोंची मैत्रिण

By admin | Published: January 28, 2017 04:11 PM2017-01-28T16:11:59+5:302017-01-28T16:11:59+5:30

फिडेल कॅस्ट्रो रंगेल होते, त्यांना हज्जारो बायका होत्या असं त्यांचे विरोधक म्हणत. पण दोन लग्नं आणि नॅटीशी संबंध एवढंच अधिकृतपणे नोंदलं गेलं आहे. नॅटी विवाहित होत्या. कॅस्ट्रोंच्या नेतेपणावर त्या भाळल्या. त्यांना एक मुलगीही झाली. नॅटींच्या पतीनं त्यांना घटस्फोट दिला. कॅस्ट्रो राष्ट्राध्यक्ष झाल्यावर आपण क्युबाची फर्स्ट लेडी होऊ, कॅस्ट्रो आपल्याशी लग्न करतील अशी नॅटीची अपेक्षा होती. पण कॅस्ट्रो बदलले. त्यांनी नवं लग्न केलं.

Castro's friendship | कॅस्ट्रोंची मैत्रिण

कॅस्ट्रोंची मैत्रिण

Next
>- निळू दामले

फिडेल कॅस्ट्रो गेले त्याच्या काही महिने आधी त्यांची मैत्रीण वारली. तिचं नाव नटालिया रेवेल्टा. मैत्रीण म्हणजे तिला कॅस्ट्रोपासून एक अलिना नावाची मुलगी होती. नटालिया ऊर्फ नॅटी गाजावाजा न होता कबरीत पोचली. अंत्यसंस्काराच्या वेळी फिडेल कॅस्ट्रो हजर राहिले नाहीत. 
फिडेल रंगेल होते असा आरोप केला जातो. फिडेलना हज्जारो बायका होत्या असं त्यांचे विरोधक (अमेरिकन, कम्युनिझमविरोधी) कुत्सीतपणे लिहित असत. हज्जारो किंवा एकापेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध असणं ही गोष्ट मोठी गमतीची आहे. अमेरिकन समाजात सर्रास अनेक स्त्रियांशी असे किंवा तसे संबंध ठेवले जातात. कधी ते चोरून असतात, तर कधी ते पैसे देऊन ठेवले जातात. असे संबंध ठेवणारा माणूस नामांकित असेल आणि माध्यमं त्याच्या मागे लागली तर अशा संबंधांबद्दल लोकं नाकं मुरडू लागतात. तिकडं फ्रान्समध्ये मित्तराँ यांना एक न लग्नाची बायको होती, तिला मुलगीही झाली होती. ते सारं बरीच वर्षं गुप्त राहिलं. ते जाहीर झालं तेव्हा बोंबाबोंब झाली नाही. अनौरस मुलं हे पाप आहे असं फ्रेंच समाज मानत नाही. 
एकापेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध असणं याला कधी कौतुकानं रंगेलपणा असं म्हटलं जातं आणि कधी त्याच्यावर अयोग्यतेचा शिक्का बसतो. त्यातही गंमत अशी की एखाद्या स्त्रीनं अनेक माणसांशी संबंध ठेवणं मात्र समाज मान्य करत नाही. जगभर.
कृष्णाचे अनेक स्त्रियांशी संबंध होते हे भारतीय माणूस महाभारतातून समजून घेतो. द्रौपदीला पाच पती होते हेही महाभारत या महाकाव्यात भारतीय माणूस समजून घेतो. अर्थात फक्त महाभारतापुरतं.
कॅस्ट्रो रंगेल बिंगेल होते असे पुरावे नाहीत. पहिलं लग्न, नंतर नॅटीशी संबंध आणि नंतर एक लग्न एवढाच स्त्रियांशी असलेला संबंध नोंदला गेलेला दिसतो. 
नॅटी दिसायला सुंदर होत्या. त्यांचे निळे डोळे फार आकर्षक होते. एकदा अर्नेस्ट हेमिंग्वे हे कादंबरीकार कॅस्ट्रोंना भेटायला गेले होते. तिथं त्याना नॅटी भेटल्या. नॅटींचे डोळे आणि त्यांच्या सौंदर्याचं कौतुक हेमिंग्वेनं केलं. हेमिंग्वेलाही कॅस्ट्रोंचा हेवा वाटला.
ओरलँडो फर्नांडिझ हे त्यांचे पती एक यशस्वी आणि श्रीमंत डॉक्टर होते. समाजातल्या उच्च थरात त्यांचा वावर होता. पण उच्चभ्रू समाजात वावरण्यात त्यांना आनंद वाटत नसे. तो काळ १९५० च्या आसपासचा होता. बॅटिस्टाचं राज्य होतं. प्रचंड भ्रष्टाचार होता. पोलीस म्हणजे गणवेशातले गुंड होते. शोषण आणि विषमता होती. गरिबांना लुटलं जात होतं. नॅटीला ते सारं आवडत नसे. त्याच काळात कॅस्ट्रो यांचा ‘आॅर्टोडॉक्स’ हा पक्ष उदयाला आला. या पक्षानं गरिबांची बाजू घेऊन बॅटिस्टाविरोधात लढायला सुरुवात केली. 
नॅटी त्या पक्षाकडं, त्या विचाराकडं, एक नेता म्हणून कॅस्ट्रो यांच्याकडं आकर्षित झाल्या. त्यांनी आपल्याजवळचे पैसे, दागदागिने, जवाहिर वगैरे चळवळीला दिले. चळवळीवर बॅटिस्टा यांचा राग होता. धरपकड, तुरुंगवास, मारहाण ही शस्त्रं बॅटिस्टा वापरत होता. अशा वेळी नॅटींनी आपलं घर कॅस्ट्रो आणि त्यांच्या सहकाऱ्यांंना वापरायला दिलं. भूमिगत कार्यकर्ते त्यांच्या घरात गुपचूप भेटत, अभ्यासवर्ग घेत असत. घराची एक चावी त्यांनी बिनधास्त चळवळीच्या स्वाधीन केली होती. या उद्योगांमुळं त्यांना आणि त्यांच्या पतीनाही त्रास होण्याची दाट शक्यता होती. पण तिकडं नॅटींनी दुर्लक्ष केलं.
एकदा नॅटीचं दर्शन कॅस्ट्रोना झालं आणि तिथं ते नॅटीच्या प्रेमात पडले. पहिल्या दर्शनातलं प्रेम. आपल्या एका मित्राकरवी ते नॅटीला भेटले. त्यांच्या भेटी सुरू झाल्या. प्रेमपत्रांची वाहतूक सुरू झाली. प्रेम सुरू असतानाच १९५३ साली कॅस्ट्रोना तुरुंगवास घडला. तुरुंगातही प्रेमपत्रांची देवाणघेवाण सुरू होती. नॅटी प्रेमपत्राबरोबरच दोस्तोवस्की, फ्रॉईड, कार्ल मार्क्स यांची पुस्तकं कॅस्ट्रोना पाठवत असे. असं म्हणतात की, या वाचनानंतर कॅस्ट्रो मार्क्सवादी कम्युनिस्ट झाले.
यातली काही पत्रं कॅस्ट्रोंची पत्नी मिर्टा दियाज बलार्ट यांच्या हाती लागली. त्या भडकल्या. संबंध बिघडले. फिडेल या आपल्या मुलासह त्या वेगळ्या झाल्या. हे सारं कॅस्ट्रो तुरुंगाबाहेर आल्यानंतर घडलं. तुरुंगाबाहेर पडल्यानंतर कॅस्ट्रोंचा सत्तेविरोधातला लढा अधिक जोमानं सुरू झाला. क्युबाबाहेर जाऊन ते लढा चालवत होते. याच काळात, १९५५ साली, काही महिने नॅटींबरोबर कॅस्ट्रोंनी घालवले आणि तिथंच त्या गरोदर राहिल्या. पण ही गोष्ट त्यांनी कॅस्ट्रोंना सांगितली नाही. मुलगी झाल्यावर यथावकाश नॅटींनी कॅस्ट्रोंना ही खबर दिली. कॅस्ट्रोंनी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु कॅस्ट्रो क्युबात परत येतील की नाही, ते जिवंत तरी राहतील की नाही याची शंका वाटल्यानं नॅटींनी लग्नाला नकार दिला.
इकडं कॅस्ट्रोंबरोबरचे प्रेमसंबंध आणि मुलगी होणं या गोष्टी उघड झाल्या. नॅटीचे पती वैतागले. त्यांनी नॅटीला घटस्फोट दिला. आधीची मुलगी नटाली आणि पती दोघं अमेरिकेत पळाले. नॅटी कॅस्ट्रोंपासून झालेली मुलगी अलिनासोबत क्युबात राहिल्या. अलिना दहा वर्षांची होईपर्यंत तिला आपण कॅस्ट्रोची मुलगी आहोत हे माहीत नव्हतं. क्युबा स्वतंत्र होऊन तिथं कॅस्ट्रोंची राजवट सुरू झाली होती. आपल्या देशाचा अध्यक्ष हा आपला बाप आहे हे अलिनाला माहीत नव्हतं. ते जेव्हा कळलं तेव्हा ती वैतागली आणि कॅस्ट्रोंना शिव्याशाप देत ती अमेरिकेत निघून गेली. तिनं एका पुस्तकात कॅस्ट्रोंना जाम बोल लावले. तिनं आईशी संबंधही तोडले.
कॅस्ट्रो राष्ट्राध्यक्ष झाल्यावर आपण क्युबाची फर्स्ट लेडी होऊ, कॅस्ट्रो आपल्याशी लग्न करतील अशी नॅटीची अपेक्षा होती. कॅस्ट्रो बदलले. त्यांनी नॅटीशी संबंध तोडले. नवं लग्न केलं. नॅटीनं कॅस्ट्रोचं सरकार असूनही फायदा न घेता नोकऱ्या करून आपल्या मुलीचा सांभाळ केला. कॅस्ट्रोचा भाऊ राऊल हा उपराष्ट्रप्रमुख होता. त्यानं फिडेलना न सांगता गुपचूप नॅटीची काळजी घेतली.
२०१५ साली मृत्यू होईपर्यंत नॅटी एकांतवासात जगल्या. अलिना निवळली, ती जमेल तशी आईची भेट घेऊन तिच्यासमवेत काही काळ व्यतीत करत होती. शेवटल्या दिवसांत ती आईबरोबर होती.
नॅटींनी कधीही कॅस्ट्रोंना दूषणं दिली नाहीत. कॅस्ट्रोंनी लिहिलेली पत्रं एका खोक्यात त्यांनी जपली आणि त्या आठवणीवर त्या जगल्या.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
damlenilkanth@gmail.com
 

Web Title: Castro's friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.