‘स्मार्ट’ नव्हे, ‘आर्ट’ सिटी! - अच्युत पालव सांगताहेत कलेचं जीवनातलं महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 06:01 AM2019-01-06T06:01:00+5:302019-01-06T06:05:02+5:30

कलात्मकतेला तिलांजली देऊन धावत्या घाईगर्दीच्या आणि गरजेच्या पोटी सगळीकडे भयावह वेगाने फ्लेक्सिकरण होत चाललं आहे. नाक्यानाक्यावर चौकाचौकात असलेले पुतळे, जुन्या इमारती अवाढव्य बटबटीत फ्लेक्सने झाकोळून गेले आहेत. हे का?

Celebrated Calligrapher Achyut Palaw stresses the need for 'Art Cities' before we go 'Smart' | ‘स्मार्ट’ नव्हे, ‘आर्ट’ सिटी! - अच्युत पालव सांगताहेत कलेचं जीवनातलं महत्त्व

‘स्मार्ट’ नव्हे, ‘आर्ट’ सिटी! - अच्युत पालव सांगताहेत कलेचं जीवनातलं महत्त्व

Next
ठळक मुद्देकला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रुजायला हवी.

- अच्युत पालव


बकाल झालेल्या सार्वजनिक अवकाशाला थोडे रंग, पोत आणि आकार दिले तर आपली शहरं ‘स्मार्ट’ होण्याआधी ‘सुंदर’ही होतील !

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे... शाळेत असल्यापासून आजपर्यंत पुस्तकाच्या पहिल्या पानावर असलेल्या प्रतिज्ञेचा आजही अभिमान असतो आणि तो कायम राहणार.
भारत. १२५ कोटी लोकसंख्या असलेला देश. एकोणतीस राज्यं. अनेक भाषा आणि संस्कृतींनी जोडलेला आणि नटलेला देश. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सहज नजर टाकली तर जग बघण्याची गरज नाही एवढ्या परंपरा, रूढी, रंग, आकारांनी भरलेला हा देश.
एक कलाकार म्हणून या देशाकडे पाहातो तेव्हा अभिमान तर वाटतोच; पण मनात एक शंका उत्पन्न होते ती एवढं सगळं असताना ते रुजत का नाही? रुजलं तर उगवत का नाही? अन् उगवलं तर लोकांपर्यंत जात का नाही...?
सर जे जे स्कूल्स आॅफ आर्टमध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून कलेच्या एका मोठ्या प्रांताची ओळख झाली. देशाला, राज्याला प्रत्येक गावागावाला एका संस्कृतीची, रंगाची, आकाराची ओळख आहे. महाराष्ट्राला तर अनेक मातब्बर कलाकारांची ओळख आहे. मी पाहिलेल्यापैकी एस. पंडितांपासून रझा, मुळगावकर, आचरेकर, गायतोंडे ते आजच्या देवदत्त पाडेकरापर्यंत उपयोजित कला, रंगकला, चित्रकला, शिल्पकला अशा विविध प्रांतात या महाराष्ट्रीयन कलाकारांनी जगाच्या पाठीवर भारत देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. जगात कुठेही गेलात तरी आपल्या कलाकारांच्या कलेला मोठा मान आहे. हल्लीच गायतोंडेंचं चित्र कोट्यवधींना विकलं गेलं तेव्हा अनेकांनी अचंबित होऊन तोंडात बोटे घातली. अनेकांना कोण तरी गायतोंडे नावाचा चित्रकार या देशात होऊन गेला याची माहिती नव्याने मिळाली.
अशा अनेक कलाकारांची मांदियाळी या महाराष्ट्रात, देशात असूनही वर्तमान काळात मात्र या भूमीत कला हवी तशी रुजत नाही आहे. मान मिळतो आहे; पण सन्मान नाही अशी दुरवस्था कलेची आणि कलाकारांची झालेली आहे.
पूर्वी शाळेच्या अभ्यासक्र मात चित्रकला या विषयाला महत्त्वाचं स्थान होतं. मी ज्या शाळेत शिकत होतो त्या परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये चार कलाशिक्षक आणि दोन सुसज्ज वर्ग होते. कलेची जोपासना होत होती. अशा अनेक शाळा शहरात नव्हे तर काही गावातही होत्या; पण आज हे कलेचे जिवंत, सळसळते वर्ग नाहीसे झाले आहेत. चित्रकलेचं आधुनिकीकरण संगणकामध्ये झालंय. कागदाचा स्पर्श, रंगाची तीव्रता नाहीशी झाली आहे. एकाच वेळी २४/४० छटा असलेल्या रंगांच्या शेडची पॅलेट आज कमी होत चालली आहे.
हे का झालं? कसं झालं? या प्रश्नांइतकंच बोचतं ते आणखी एक वास्तव. ते म्हणजे जगभरात ही अशी परिस्थिती नाही.
कॅलिग्राफीच्या निमित्ताने मी जगभर फिरतो. बहुतांश देश आणि त्या त्या संस्कृतींमध्ये इतिहास, ऐतिहासिक वास्तू, कागदपत्रं, चित्रं, शिल्प यांच्या जपणुकीसाठी प्रयत्न होताना दिसतात. त्याचं प्रमाण आणि परिणामकारकता कमी-अधिक असेल; पण सर्व प्रकारच्या दृश्य-कलाविष्कारांबद्दल सर्वत्र आस्था दिसते.
१२५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात का असावी इतकी उदासीनता? खरं तर आपल्या देशात इतके रंग, गंध आणि पोत आहेत... त्यांचा वापर करणारे इतके कलाकार आहेत; पण या साऱ्या समृद्धीचा दृश्य परिणाम आपल्या सार्वजनिक अवकाशात दिसत नाही. कलात्मकतेला तिलांजली देऊन धावत्या घाईगर्दीच्या आणि गरजेच्या पोटी सगळीकडे भयावह वेगाने फ्लेक्सिकरण होत चाललं आहे. नाक्यानाक्यावर चौकाचौकात असलेले पुतळे, जुन्या इमारती अवाढव्य अशा फ्लेक्सने झाकोळून गेले आहेत. मी मोठा, की तू हे फ्लेक्सच्या आकारातून सिद्ध करण्याच्या चढाओढीत आपण आपल्या सार्वजनिक अवकाशाचं किती भयानक बकालीकरण करत सुटलो आहोत, याचा जणू विसरच पडला आहे.
सुलेखनावर काम करता करता २००७ साली या प्रवासाची २५ वर्षे पूर्ण केली. या देशातील सुलेखनकला आणि तिची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरलो तेव्हा भाषेची कलात्मकता सोडाच; त्या त्या प्रांतातल्या तरुण वर्गाला स्वत:च्या भाषेची लिपीही लिहिता येत नव्हती. संपूर्ण देश फिरलो तेव्हा या विदारक सत्याच्या अनुभवाने भणभणलो होतो.
आपल्या या संपन्न देशात इथल्या प्रत्येक प्रादेशिक लिपीचं, भाषेचं म्युझियम का नाही? राज्या-राज्यात आर्ट गॅलरीज का नाहीत?
या सगळ्या गोष्टीचा कलाकार म्हणून विचार करीत असतानाच ‘कॅलिफेस्ट : उत्सव भारतीय लिप्यांचा’ या कल्पनेचा उगम झाला आणि लिप्यांचं सौंदर्यीकरण सुरू केलं.
सगळ्या देशातील कलाकारांना एकत्र आणून १५ फुटाच्या फ्लेक्सऐवजी १५ फुटांचं अक्षर दाखवलं तर कदाचित लोकांची दृष्टी बदलेल, असा विचार केला. काही वर्षांपूर्वी दिवंगत भारतीय सुलेखनकार प्रा. र.कृ. जोशी यांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटरमध्ये भारतीय सुलेखनावर प्रदर्शन भरवलं तेव्हा एक-एक अक्षर १५ ते २० फूट लांबी-रुंदीचं आणि ७ ते ८ फूट उंचीचं केलं होतं. एक अक्षर म्हणजे एक व्यासपीठ होतं ही कल्पना जेव्हा लोकांनी प्रत्यक्ष साकार झालेली पाहिली तेव्हा अक्षरांचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे पाहून ते आश्चर्यचकीत झाले.
१५ दिवसांपूर्वीच नव्या मुंबईत भरलेल्या ‘कॅलिफेस्ट’मध्ये गुजरातच्या मुलांनी २० फुटांचं सरदार सरोवर उभं करून त्यातून पाण्याऐवजी अक्षरं पडताना दाखवली होती. उद्देश एकच होता : त्यातली दृश्यात्मक भव्यता लोकांना प्रत्यक्ष अनुभवू देणं.
गेल्या आठवड्यातच गुजरातेतल्या सूरतला एका प्रदर्शनानिमित्त गेलो होतो. एकेकाळी बदसुरत असलेलं हे शहर आता काही काळातच खुबसुरत दिसू लागेल, याची सुरुवात तिथे होताना मी पाहिली.
शहर सुंदर दिसण्यासाठी पाइप, लोखंड आणि इतर गोष्टींचा वापर करून भारतातीलच कलाकारांना संधी देऊन विलक्षण आकार आणि अनुभूती असलेल्या शिल्पाकृती स्क्रॅपमधून तयार केल्या जात आहेत. रस्त्यावरून चालतानासुद्धा नागरिकांना वेगळे दृश्यानुभव यावेत, या उद्देशाने सुरतमध्ये सध्या काम सुरू आहे.
- ही अशी सुरुवात तर कोणत्याही - प्रत्येक शहरात होऊ शकते. गरज आहे ती लोकांची आणि मुख्य म्हणजे शहर नियोजनाची जबाबदारी असलेल्या सरकारी खात्यांची मानसिकता बदलण्याची !
आपण जर स्मार्ट सिटीज उभ्या करू शकतो, तर आर्ट सिटीज का नाही?
केवळ भिंती रंगवून किंवा रस्त्यावर फ्लेक्स लावून चालणार नाही तर चौकाचौकाचं सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. कलादालनांची संख्या वाढवण्याची गरज आहे.
कला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रुजायला हवी.
परदेशात प्रवास करताना चौकाचौकात, रस्त्यारस्त्यावर जेव्हा हे असे विलक्षण दृश्यानुभव येतात तेव्हा वाटतं, हे सारं तर माझ्याही देशात आहे. फक्त ते ‘मांडण्याची दृष्टी’ आपल्याकडे नाही.
... ती लवकर येवो !
(लेखक जागतिक कीर्तीचे सुलेखनकार आहेत.)
manthan@lokmat.com

Web Title: Celebrated Calligrapher Achyut Palaw stresses the need for 'Art Cities' before we go 'Smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.