‘बलुतं’ची चाळीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 07:55 AM2018-09-16T07:55:23+5:302018-09-16T07:55:23+5:30

दया पवार यांच्या आत्मकथनाला चाळीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येत्या गुरुवारी एक विशेष संमेलन मुंबईत होतं आहे. दगडूच्या संदर्भ बिंदूपासून सुरुवात केली, तर काय दिसतं?

celebrating forty years of "Baluta" | ‘बलुतं’ची चाळीशी

‘बलुतं’ची चाळीशी

googlenewsNext


-प्रज्ञा दया पवार

मी त्यावेळी चौथी-पाचवीत असेन. 24 डिसेंबर 1978 या दिवशी ‘बलुतं’ प्रकाशित झालं आणि मराठी साहित्यात एक नवं वळण निर्माण झालं.  ‘बलुतं’ची चर्चा त्यावेळी अगदी एखादा बॉम्ब पडावा नि हलकल्लोळ माजावा तशाप्रकारे झालेली मी अनुभवलेली होती. टोकाची टीका, टोकाचं कौतुक, टोकाची प्रसिद्धी हे ‘बलुतं’च्या वाट्याला आलं जे फार विलक्षण आहे. चाळीस वर्ष झाली ‘बलुतं’ प्रसिद्ध होऊन पण हजाराची नवी आवृत्ती आली रे आली की हातोहात संपते. ‘वाचनसंस्कृती कुठं आहे?’ असल्या चर्चांच्या काळात आजही ‘बलुतं’ वाचलेली तरूण मुलं आढळतात. वाचून त्यांना प्रश्न पडतात. 

‘बलुतं’च्या आधीचं जे साहित्य होतं ते बाबूराव बागुल, आण्णाभाऊ साठे यांचा अपवाद वगळता अभिजनवादी होतं. साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहात या प्रकारचं दाहक जगणं कधी आलंच नव्हतं. त्यामुळंच साठोत्तरी साहित्य ही मूल्यात्मक संज्ञा वेगळ्या अनुभवविश्वाची नोंद घेताना हे जाणीवपूर्वक अधोरेखित करते. 

रूपबंध व प्रयोग म्हणूनसुद्धा ‘बलुतं’ वेगळं आहे. दया पवार चाळीस वर्षाचे झाले त्यावेळी एक कवी म्हणून मान्यता मिळायला लागली, लोक बोलवायला लागले इथंपर्यंतचा  टप्पा पार पडलेला आहे. तरीही जे एक ओझं नि अस्वस्थता आहे त्यातून मोकळं व्हायचंय, ती कोंडी फुटायला पाहिजे आणि ती कोंडी कविता लिहूनही फुटत नाही. मग आतूनच एक अशा प्रकारची मागणी होतेय की ती दीर्घपटावर जाऊ शकेल. मग दया पवार दगडू मारूती पवारला आपल्या आयुष्याची कहाणी सांगतो आहे अशा र्तहेने निवेदनाच्या पातळीवरही वेगळेपण ‘बलुतं’मध्ये होतं. ‘बलुतं’ निर्माण होण्याअगोदर आपल्याकडे महनीय माणसांनी लिहिलेली चरित्र आणि आत्मचरित्र होती ज्यात संपूर्ण आयुष्य आता जगून-भोगून झालेलं आहे, एक कृतार्थतेची किंवा गौरवीकरणाची भावना आहे हे दिसत होतं. इथं ‘बलुतं’चा नायक, खरं तर नायक हे सवयीचं, तो प्रतिनायकच आहे. तो जगण्याच्या ऐन प्रवाहात आहे. त्याचं जगणं व लिहिणं एकाच पातळीवर सुरू आहे असा ‘बलुतं’चा आकृतिबंध आहे. ते स्वकथन आहेच, पण जातिव्यवस्थेच्या उतरंडीसहचं प्रचंड धगधगतं समाजवास्तव आहे.

‘बलुतं’चा दगडू खेड्यात जगतो तेव्हाचंही वास्तव आपण यात पाहतो व तो शिकून शहरात येतो तेव्हा तिथल्या अधोविश्वाचंही जगणं त्यात येतं. खूप मोठा कालिक पट ‘बलुतं’मध्ये व्यापून उरतो. संपूर्ण महानगर आणि खेड्यातील दलितांच्या वाट्याला आलेलं जगणं, बाबासाहेबांची चळवळ, त्यांच्याशी, त्यांच्या तत्त्वज्ञानाशी ओळख, त्यानंतर गावगाडा व बाबासाहेबांच्या आवाहनानुसार बलुतं सोडणं, त्यामुळं पारंपारिक जातिव्यवस्थेनं लादलेले गावातले व्यवसाय सोडून दगडूसारख्या या जातीतल्या पहिल्या शिक्षित माणसानं शहरात नोकरीला येणं व तिथंही त्याला मेलेल्या जनावरांची चिरफाड करण्याचं लॅबोरेटरीमधलं काम वाट्याला येणं हा पट सांगताना अत्यंत रसरशीत व्यक्तिरेखा त्यात येतात. चळवळीनं घेतलेली वेगवेगळी वळणं कळतात.  एकप्रकारे हा सामाजिक सांस्कृतिक दस्तावेज लिहित असताना त्याला अनेक समाजशास्त्रीय, सांस्कृतिक व राजकीय परिमाणं आहेत. तरीही ते सामाजिक अंगानं लिहिलेलं नीरस किंवा शुष्क टिपण होत नाही. याचं कारण असं आहे की ते शेवटी ते दगडू मारूती पवार आणि त्याच्या आसपासचं जगणं आहे. जगण्यामध्ये असलेल्या अतिशय खुल्या प्रकारची लैंगिकता इथं दिसते. त्यावेळी लोक हादरले होते कारण यातलं उघडंवाघडं जगणं सहजपणे, कुठलाही आव न आणता किंवा कुठलीही पोज न घेता अतिशय साध्या, थेट भाषेमध्ये मांडलं गेलेलं आहे. जगण्याची वेगवेगळी अंगं, वेगवेगळे तपशील हे ज्या थेट व रोखठोकपणे ‘बलुतं’मध्ये आलंय त्यामुळं ‘बलुतं’शी जोडला गेलेला वाचकवर्ग हा महाराष्ट्राच्या सर्व थरांमधला होता. त्यानंतर दगडूच्या संदर्भबिंदूनं मराठीमध्ये जी आत्मकथनांची लाट आली त्यांचं निरीक्षण केल्यावर कळतं की समाजानं नाकारलेले कितीतरी दगडू व धोंडी लिहिते झाले.

 ज्या माणसांना व्यवस्था डिलीट करते त्या माणसांना कळलं की आपणही साहित्याच्या व संस्कृतीच्या संदर्भात एक इंटरवेन्शन करू शकतो! मुळात साहित्याचा नायक हा कोण असावा याच्या पारंपरिकतेला ‘बलुतं’मुळं छेद मिळाला किंवा प्रश्नचिन्हं निर्माण केली.इतिहास घडत किंवा घडवत असताना ज्या वंचितांचे श्रम, अश्रू  पायतळी तुडवले गेले त्यांचं भान व मान्यता यात ‘बलुतं’ची थोरवी आहे.    

शब्दांकन : सोनाली नवांगुळ

Web Title: celebrating forty years of "Baluta"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.