सीमोल्लंघन स्वत:च्या बेड्या तोडण्याचा उत्सव!
By admin | Published: October 22, 2016 05:28 PM2016-10-22T17:28:52+5:302016-10-22T17:28:52+5:30
‘सीमोल्लंघन’ या शब्दात अनेक संभावना दडलेल्या आहेत. खरं तर सीमोल्लंघन म्हणजे स्वत:हून घालून घेतलेली कुंपणं तोडणं. राष्ट्रबांधणी करायची असेल तर दोन प्रकारच्या सीमोल्लंघनांची गरज असते. पहिलं वैयक्तिक पातळीवर, दुसरं सामूहिक पातळीवर. या सीमा ओलांडल्या तर स्वत:च्याच क्षमतांच्या उच्च स्थानी पोहोचता येतं. स्वत:तली स्वत्वं जर प्रत्येकानंच शोधली तर भारतात नवनिर्मितीचे मळे फुलतील..
Next
- ज्ञानेश्वर मुळे
दसरा सणाच्या अनेक कहाण्या आहेत. त्यात रामाच्या रावणावरच्या विजयापासून ते पांडवांनी वनवास संपल्यानंतर शमीच्या वृक्षावरून शस्त्रास्त्रं उतरवून कौरवांच्या केलेल्या पराभवापर्यंत अनेक कहाण्यांचा समावेश आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची नावं (उदाहरणार्थ दशहरा, दशेरा, विजयादशमी, दसरा) असलेल्या या सणाला महाराष्ट्राने दिलेला आयाम खास वेगळा आहे. तो आहे सीमोल्लंघनाचा. सुदूर प्रांतात स्वाऱ्या करण्यासाठी मराठी राजे आणि पेशवे दसऱ्याच्या मुहूर्तांची निवड करत.
मला वाटतं मराठ्यांचं साहस आणि परकीय आक्रमकांविरुद्धचा लढा ही कारणं तर होतीच, पण त्याबरोबरच आपल्या क्षमता वाढवणं आणि हे करत असताना आपल्याच नव्हे तर राज्याच्या नियत सीमांचं उल्लंघन करणं हेही एक कारण असावं. त्या सीमोल्लंघनाला आजच्या काळानुरूप नवीन अर्थ देणं आवश्यक आहे.
लोकमान्य टिळकांनी पारंपरिक गणेश चतुर्थीला नवीन आयाम दिला आणि संपूर्ण समाजात एकजूट आणण्यासाठी आवश्यक असा मंच उपलब्ध करून दिला. त्यांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचं आजचं स्वरूप पाहून ते खचितच गणेशोत्सव बंद करावा की काय अशा विचारानं संत्रस्त झाले असते.
असाच काहीसा विचार माझ्या मनात दिल्लीतल्या कानठळ्या बसवणारा फटाक्यांचा आवाज ऐकताना आला.
सगळं शहर रामाचा विजय आणि रावणदहन साजरा करताना त्या सगळ्या कोलाहलात आणि शुभेच्छांच्या ठोक देवाणघेवाणीत कुठेतरी या सणांचा आत्मा हरवत चाललाय.
होळीपासून नवरात्रीपर्यंत आणि दूर्गापूजेपासून गणेशोत्सवापर्यंत सर्वच सणांना नवीन आयाम देण्याची गरज आहे. म्हणूनच सीमोल्लंघन या एका शब्दात मला अनेक संभावना दडलेल्या दिसतात.
आज ‘सीमोल्लंघनाचा’ तो अर्थ तसाच राहिला नाही. वर्षभर आपण अनेक वेगवेगळे दिवस ज्यात ‘स्त्री दिवस’, ‘गुरुपौर्णिमा’, मातृदिन’, ‘वृद्ध दिवस’, ‘योग दिवस’ वगैरे साजरे करतो. त्या दिवशी आपण त्या नात्याचा गौरव करतो.
पण आपल्या सीमांचा म्हणजे मर्यादांचा विचार करून त्या आत्मपरीक्षणानंतर त्या सीमांना ओलांडण्याचा विचार करण्यासाठी एकही दिवस ठरलेला नाही. ‘सीमोल्लंघन’ दिवस त्यासाठी योग्य ठरावा.
मला वाटतं आजच्या काळानं सीमोल्लंघनाच्या अनेक संधी विनासायास आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत.
मी बोलतोय आपण स्वत:हून घालून घेतलेली कुंपणं तोडण्यासंबंधी. ही मानसिक, बौद्धिक आणि अन्य प्रकारची कुंपणं आणि सीमा यांना तोडल्याशिवाय सीमोल्लंघन शक्य नाही.
याचं एक उदाहरण सांगतो. विदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या २५-३० वयोगटातल्या युवकांसाठी आम्ही ‘भारत को जानिये’ नावाची एक सामान्यज्ञान (क्विझ) स्पर्धा भरवली होती. त्यातल्या अंतिम फेरीतल्या २० युवक-युवतींना आम्ही भारत सरकारच्या खर्चानं दिल्लीला आणलं. त्यांना भारत दर्शन घडवलं. त्यानंतर स्पर्धेसाठी दिल्लीत एकत्र आणलं. हे युवक माझ्या मागच्या रांगेत बसलेले.
तत्त्वत: ही विदेशात वसलेली तिसरी किंवा चौथी पिढी. याचा अर्थ त्यांनी केव्हाच ‘सीमोल्लंघन’ केलेलं. पण त्यांचा संवाद ऐकून मी पूर्ण नेस्तनाबूत झालो. ऐका तर :
सुरेश, तुझ्या कपाळावर हा उभा गंध कसला आहे? याला काय म्हणतात?
‘अजित, आम्ही दाक्षिणात्य ब्राह्मण... त्यातही दोन पंथ आहेत.. वैष्णव आणि शैव. मी वैष्णव असल्यानं उभं गंध लावतो.’
‘अच्छा आणि तो सुजित. तो आडवा मार्किंग करतो.’
यू आर राईट, तो शैव आहे.’
आर यू कश्यप?’
नो, नो, आय एॅम शांडिल्य.’
मी मागे वळून पाहिलं. ही सगळी एरवी आधुनिक वाटणारी मंडळी कुठंतरी शतक- दीड शतक मागे पाय अडकलेली वाटली. सीमोल्लंघन केल्यानंतरही त्यांच्या या कुंपणांनी त्यांना तसेच वेटोळे घातलेले आहे.
मला वाटतं जसे ‘फेक एनकाउंटर’ असतात, तसेच ‘फेक सीमोल्लंघनही’ असते. सोनं दिलं- घेतलं जातं. पण ते व्हॉट्सअॅपवरती किंवा फेसबुकवर.
जे ‘खरं’ सोनं तीही ‘पानं’च. रावणाला जाळायला निघालेले स्वत:च रावण. रामाचं स्वागत करणारेही रावणच. विजयादशमी.
कोणता विजय? आपलं सगळं जीवन म्हणजे प्रतीकात्मक झालं आहे. सणाच्या दिवशी धिंगाणा घालायला, हॉर्न वाजवायला, जातीय मेळावे भरवायला आणि इतरांना भाषणं द्यायला आपण मोकळे.
राष्ट्रबांधणी करायची असेल तर दोन प्रकारच्या सीमोल्लंघनाची गरज आहे. पहिलं सीमोल्लंघन वैयक्तिक पातळीवर करावयाचं. आपली मानसिक, बौद्धिक, वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरी तोडायची. ‘फेक’ पाहायचं नाही. ‘फेक’ बोलायचं नाही आणि ‘फेक’ ऐकायचं नाही, ही त्रिसूत्री पाळली तर हे पहिलं सीमोल्लंघन शक्य आहे.
सावित्रीबाई फुल्यांपासून झाकिया सोमणपर्यंत आणि आगरकर, फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंत अनेक महामानवांचा आदर्श समोर आहे. स्वत:चं उत्थान, स्वत:ची मुक्ती स्वत: केली पाहिजे असं बुद्ध सदैव म्हणत.
‘उद्धवेदात्मनात्मानं नात्यानं अवसादयेत’ ही गीतेतली उक्ती असो वा ‘या विद्या या विमुक्तये’ हे वचन असो, प्रेरणादायक व्यक्ती आणि वाक्यांचा आपल्याकडे सुकाळ आहे. फक्त ते आचरणात आणणं महत्त्वाचं.
दुसऱ्या प्रकारचं सीमोल्लंघन हे ‘सामूहिक’ स्वरूपाचं आहे. २१ व्या शतकातसुद्धा आपल्या समाजात विलक्षण त्रासदायक छिद्रं दिसतात.
अशा वेळी नव्या सामूहिक मोहिमेची गरज भासते. पण मानसिकता बदलायची तर चांगलं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक नेतृत्व हवं. लोकप्रतिनिधी चांगले असणं आणि निवडणं हे लोकशाहीतलं सर्वप्रथम कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींची राष्ट्रीय जाणीव, आंतरराष्ट्रीय अभ्यास, संविधानातल्या तरतुदींविषयीची जागरूकता तपासूनच जनतेनं मतं दिली पाहिजेत. ‘स्वच्छ भारत’ महत्त्वाचं तसंच ‘स्वच्छ भारतीय राजकारण’ महत्त्वाचं.
जातीय, धार्मिक, क्षेत्रीय किंवा भाषिक समस्यांवर लोकक्षोभ वाढवून नकारात्मक विध्वंसक आणि विषारी विचार पसरवून समाजस्वास्थ्य बिघडवून टाकणाऱ्या प्रवृत्तींना उपटून टाकण्याची आवश्यकता आहे. हा आहे सामूहिक सीमोल्लंघनातला दुसरा टप्पा.
बाकी सर्व सीमोल्लंघन यानंतर येतात. सीमोल्लंघन म्हणजे आपल्या सर्व सीमांच्या पलीकडे जाणं.
स्वत:च्या क्षमतेच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचणं आणि पुन्हा स्वत:साठी नवीन अप्राप्य ध्येयांची आणि बिंदूंची यादी बनवणं. स्वत:च्या सर्जनशीलतेला आजूबाजूच्या सर्व संकुचित दबाव बिंदूपासून मुक्त करणं.
आपल्यातला ‘जीनियस’ ओळखणं आणि मग त्याला स्वत:च्याच सागरतळातून शोधून पृष्ठभागावर आणणं म्हणजे सीमोल्लंघन.
पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ असं स्वत:चं सत्त्व शोधण्यासाठी प्रत्येकानं केला तर भारतात नवनिर्मितीचे मळे फुलतील.
(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.)

dmulay58@gmail.com