सेलिब्रिटी शिवारात!
By admin | Published: June 4, 2016 11:48 PM2016-06-04T23:48:10+5:302016-06-04T23:48:10+5:30
डोंगरावरचा ‘चर’ किती फुटाचा हवा, याची चर्चा आमीर खानसोबत करण्यात गावचा तलाठी रंगून जातो. गावातल्या पोरीबाळींच्या बरोबरीनं सोनाली कुलकर्णी मातीची घमेली उचलते.
Next
>- सचिन जवळकोटे
डोंगरावरचा ‘चर’ किती फुटाचा हवा,
याची चर्चा आमीर खानसोबत करण्यात गावचा तलाठी रंगून जातो.
गावातल्या पोरीबाळींच्या बरोबरीनं
सोनाली कुलकर्णी मातीची घमेली उचलते.
एक एकरात आपल्याला किती खड्डे
खणावे लागतील, याचं गणित
सयाजी शिंदेला मांडायचं असतं.
आपण भेट म्हणून दिलेल्या ‘ठिबक सिंचन’ मधून आजर्पयत किती पाणी वाचवलं गेलं, याचा शोध नाना पाटेकर अन्
मकरंद अनासपुरे घेऊ लागतात.
गावच्या शिवारातल्या झाडांची संख्या अजूून वाढायला हवी, असं अतुल कुलकर्णी
कृषी सहायकाला ठणकावून सांगतात..
..हे काही एखाद्या चित्रपटाचं
स्क्रिप्ट नव्हे,
सातारा जिल्ह्यात सध्या घडणा:या
अनोख्या घटनांचा हा
‘ऑँखो देखा हाल’ आहे !
स्थळ : बांद्रय़ातला आमीर खानचा बंगला. वेळ रात्री आठची. फाटकासमोर एक से एक आलिशान गाडय़ा येऊन उभ्या राहतात. त्यातून उतरणारी दिग्गज सेलिब्रिटी मंडळी.. सलमान खान, सनी लिऑन, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, अतुल कुलकर्णीसह किमान पंचवीस-तीस चित्रपट कलाकार आमीरच्या बंगल्यात जमलेले.
सुरुवातीला वाटतं, असेल पार्टी! पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. अस्सल मराठमोळ्या जेवणाचा शुद्ध शाकाहारी बेत. अन् सोबतीला एक गंभीर विषय : ‘महाराष्ट्रातला दुष्काळ’!
‘मराठी मातीतल्या दुष्काळावर कशी मात करता येईल?’ यावर ही चित्रपट कलाकार मंडळी भरभरून बोलत होती. मनापासून प्रतिक्रिया व्यक्त करत होती.
यावेळी बोलता-बोलता आमीरने आपल्या मनातली ‘वॉटर कप’ स्पर्धेची कल्पना सा:यांना ऐकवली. ‘केवळ पाणी वाचवा असा संदेश न देता पाणी वाचविण्याची स्पर्धा घेऊ या,’ असं त्याने जाहीर करताच सारे भारावले. टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘या स्पर्धेत उतरणा:या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणही शिवारात जाऊ या, कुदळ-फावडं घेऊन मातीत उतरू या,’ असा शब्दही अनेकांनी दिला.
बैठक संपली. सारे गेले. त्यानंतर दुस:याच दिवशी आमीर थेट साता:यात पोचला. कृषी अधिका:यांच्या बैठकीत ‘वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाची कोणकोणती कामं घेतली पाहिजेत. कुठल्या-कुठल्या गावाजवळचे ओढे-नाले अडविले पाहिजेत,’ याची चर्चा त्याने सुरू केली तेव्हा सारे अवाक् झाले. ‘काम सुरू झाल्यावर मी स्वत: गावक:यांसोबत खड्डे खणायला उन्हा-तान्हात उभा राहीन’ असं वचन याच बैठकीत आमीरने दिलं होतं.
नुस्ती पब्लिसिटी नको, प्रत्यक्ष काम हवं’-चा आग्रह आमीरने नुसता धरलाच नाही, तर तो प्रत्यक्षात येईल याची सगळी काळजी घेतली. अगदी पहिल्या दिवसापासून!
काही दिवसांतच ‘वॉटर कप’ची घोषणा झाली. अमरावती, बीड अन् सातारा हे तीन जिल्हे यासाठी निवडले गेले. साता:याच्या कोरेगाव तालुक्यातील तब्बल चाळीस गावांचा समावेश केला गेला.
त्यानंतर एक दिवस आकस्मिकपणो आमीर पुन्हा साता:यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक गावच्या तलाठी, ग्रामसेवक अन् कृषी सहायकांची बैठक झाली. ‘प्रशासकीय यंत्रणोच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प यशस्वी होणं अशक्य आहे,’ हे आमीर सतत सांगत राहिला.
आमीरचा लाडका बंगला पाचगणीत. अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी तो सतत सातारा जिल्ह्याच्या परिसरातच राहिलेला. ‘सह्याद्री’ घाटाच्या प्रेमात पडलेला. म्हणून हा परिसर त्याच्या विशेष जिव्हाळ्याचा.
सध्या आमीरची ‘वॉटर कप’ स्पर्धा अंतिम टप्प्यात आलीय. आज 5 जूनला या स्पर्धेचा शेवटचा दिवस. कोरेगाव तालुक्यातील चाळीस गावांनी गेल्या महिनाभरात ‘साथी हाथ बढानाùù साथी रेùù’ चा कित्ता खूप छान गिरविलाय. गावा-गावात आबालवृद्धांसह महिलांनीही जलसंधारणाची कामं करण्यासाठी श्रमदान केलंय.
ज्या गावात कधीकाळी पारावर बसून चकाटय़ा पिटण्यात मंडळी मश्गूल असायची, एकमेकांचं उणंदुणं काढण्यात पुढाकार घ्यायची. तिथंच आज सारे गट-तट हातात हात घालून ओढय़ा-नाल्यांवर छोटे-छोटे बंधारे बांधताना दिसू लागलेत. आमीरला शब्द दिल्याप्रमाणो अनेक सेलिब्रिटीही या गावामध्ये येऊन श्रमदान करून गेले.
यमाई देवीच्या औंधकडं जाताना वाटेत
न्हावी बुद्रुक नावाचं गाव लागतं. या गावाच्या पाठीमागं भलामोठा डोंगर आùù वासून पसरलेला. मात्र आजर्पयत डोंगरावर पडलेला पाऊस ओढय़ा-नाल्यातून खळाळत पुढं कुठं निघून जायचा, याचा विचारच कधी या गावानं केला नव्हता. आमीरच्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर ‘टेक्निकल टीम’नं गावक:यांना त्यांच्या डोंगरावरच्या पावसाचं महत्त्व पटवून दिलं. मग काय.. रोज सकाळी सहा-साडेसहाला अख्खं गाव फावडं अन् कुदळ घेऊन डोंगरावर. गेल्या काही दिवसांतील श्रमदानामुळं अवघा डोंगर आडव्या चरांच्या ‘सीसीटी’नं सिद्ध झालाय, पावसाचा प्रत्येक थेंब ङोलायला. जागच्या जागीच मुरवायला..
याच गावात एकेदिवशी भल्या पहाटे मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी धडकली. साधी जीन्स पॅण्ट अन् वर ढगळा टी-शर्ट. गळ्यात मोठा रुमाल. गावातल्या पोरी-बाळींसोबत सोनाली ओढय़ात उतरून मातीच्या पाटय़ा उचलू लागली, तेव्हा आजूबाजूची मंडळी हरखली. फोटोफ्लॅशपुरतं वृक्षारोपणाचं झाड हातात घेणा:या नेतेमंडळींसारखं ही अभिनेत्री वागते की खरंच मन लावून काम करते, यावर बारीक लक्ष असलेल्यांना सोनालीने चकित केलं. ती न थांबता, न थकता पाटय़ा उचलत होती. ‘लूज बार्डर’ नामक बंधा:यावरचे दगड हलवून व्यवस्थित बसवत होती. हे पाहून आजूबाजूच्या ग्रामस्थांनाही हुरूप चढला.
अशीच गोष्ट अतुल कुलकर्णीची. ‘जायगाव’च्या जलसंधारण श्रमदानात हातात कुदळ घेऊन कामाला भिडलेल्या अतुलची लगन पाहून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनाही राहवलं नाही. त्यांनीही ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून घाम गाळला. आजर्पयत फक्त पडद्यावर दिसणारी सेलिब्रिटी मंडळी आपल्यासोबत आपल्या शिवारात खो:यानं माती उपसताहेत, ही कल्पनाच सर्वसामान्य नागरिकांसाठी विलक्षण होती. कारण फोटोपुरतं दोन मिनिटं उन्हात उभं राहून एअर कंडिशण्ड गाडीत बसून उडून जाणारे तारे-तारका पाहिलेल्या. पण इथे तर मंडळी दिवसदिवस मुक्काम ठोकून कामाला भिडली होती.
एकीकडे आमीरच्या स्पर्धेनं गावागावात ‘एकीचं बळ’ निर्माण केलेलं असतानाच, दुसरीकडं सयाजी शिंदेंसारख्या दिग्गज कलाकारानंही माणदेशातल्या तब्बल चार गावांना ‘हिरवाई’च्या स्वप्नाचं वेड लावलं आहे. सयाजी हा सातारा जिल्ह्याचा सुपुत्र. त्याने माण तालुक्यातील चार गावांच्या परिसराला ‘देवराई’ बनविण्याचा चंग बांधलाय. पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळेवाडी अन् दिवडी या चार गावांभोवतीचा मोकळा परिसर हजारो झाडांनी बहरून टाकण्याचा विडाच त्याने उचललाय आणि त्याच्याबरोबर गावकरी कामाला भिडले आहेत.
ह.भ.प. सुभाष घाडगे (महाराज) सांगत होते, ‘दिवडीच्या शिवारात गायरान अन् फॉरेस्टची दीडशे एकर जमीन पडीकच होती. त्यातल्या पन्नास एकरात वृक्षलागवडीचं नियोजन आम्ही केलंय. अडीच कोटी बिया पेरण्याची तयारीही झालीय. पुढच्या आठवडय़ात पावसाच्या सरी पडल्या की रोपं लावायला आम्ही तयार. केवळ लोकसहभागातून तब्बल पन्नास एकरात वृक्षलागवडीची संकल्पना कदाचित महाराष्ट्रातली पहिली असावी.’
या मोहिमेत लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ही तयार केला गेलाय. यात चारही गावांमधील सर्व वयोगटांच्या नागरिकांचा सहभाग आहे. वेगवेगळ्या भाषेतील शेकडो चित्रपटांमध्ये काम करणारा कलाकार आपल्या मराठी बांधवांच्या इवल्याशा गावात ‘देवराई’ करण्यासाठी ‘सोशल मीडिया’चा ग्रुप तयार करतो, ही घटना जेवढी आश्चर्यकारक. तेवढीच कौतुकास्पदही!
आमीर खानची ‘पानी फाउंडेशन’ अन् सयाजी शिंदेंची ‘देवराई’ सातारा जिल्ह्याला जेवढी माहिती झालीय, तेवढीच नाना पाटेकर अन् मकरंद अनासपुरे या द्वयींची ‘नाम फाउंडेशन’ संस्थाही तोंडपाठ झालीय. कोरेगाव तालुक्यातील नलवडेवाडीचा पाणीपुरवठा शुद्ध व्हावा, यासाठी स्वत:च्या खर्चानं अन् स्वत:च्या हातानं ‘फिल्टर’ योजना कार्यान्वित करणारा ‘अवलिया नाना’ याच गावानं याचि देही याचि डोळा पाहिला आहे. शेतक:यांना मोफत ‘ठिबक सिंचन’ संच देणारा ‘मकरंद’ही जाखणगावच्या शिवारानं अनुभवला आहे.
‘नाना अन् मकरंद’ नलवडेवाडीत आले, तेव्हा कैक घरांवर गुढय़ा उभारल्या गेल्या होत्या. औक्षणानं त्यांचं स्वागत करण्यासाठी नटून-थटून सुवासिनींची लगबग झाली होती. मात्र, प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही दिग्गज जोडगोळी गावच्या शिवारात आल्यानंतर चक्क बांधावर जाऊन बसली आणि थेट कामाला भिडली. नानांनी भेट दिलेल्या फिल्टरचं पाणी पिऊन ‘फ्रेश’ झालेलं गावही श्रमदानाला निघालंय. ‘माङया शिवारातलं पाणी माङयाच जमिनीत जिरविणार!’ या जिद्दीनं ‘नाना-मकरंद’चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला भिडलंय.
.. आता आमच्या या भागात पाऊस येईल, तो वाहून नाही जाणार!
जमिनीत जिरेल आणि घामातून झाडंही उगवतील!
पावसाळ्यानंतर दुसरा टप्पा
‘सत्यमेव जयते’च्या निमित्ताने जी नाळ जुळली, त्याचंच विस्तारित रूप म्हणजे ‘वॉटर कप’ ही योजना. आयुष्यभर खूप-खूप काम करता येईल, असा हा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न होता. हाच विषय घेऊन समाजात जागृती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. महाराष्ट्रातील दुष्काळाचं भीषण चित्रही रोज मीडियातून झळकत होतं. महाराष्ट्रात ही स्पर्धा यशस्वी करण्याचं नियोजन केलं आणि कामाला सुरुवात झाली.
या दरम्यान मी तिन्हीही जिल्ह्यात फिरलो. लोकांबरोबर श्रमदान केलं. सातारकरांचा प्रतिसाद तर लक्षणीय होता. अविस्मरणीय होता. पाच जूनला ही स्पर्धा संपल्यानंतर आमची टीम गावागावात जाईल. प्रत्येक कामाचं काटेकोर मोजमाप होईल. जवळपास एक महिनाभर हे काम चालेल. पहिल्या टप्प्यात आम्ही तीन तालुके घेतले होते. आता नोव्हेंबरपासून दुसरा टप्पा सुरू होईल. त्यावेळी मात्र राज्यातील तब्बल तीस तालुके या स्पर्धेत उतरतील.
- सत्यजित भटकळ
निसर्गाला बाजूला ठेवून माणूस विकास करू शकत नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबावर प्रेम करा. डोंगरावरच्या मातीला जिवापाड जपा.
आपली जुनी पिढी निसर्गाशी एकरूप झाली होती म्हणूनच तोही त्याकाळी भरभरून देत होता. आता तो का रुसलाय, याचा शोध घेऊन गावकरी कामाला लागलेत, हे उत्तम!
- अतुल कुलकर्णी
आम्ही चार गावांमध्ये झाडं लावण्यासाठी लोकांना सहभागी करून घेतलंय. खड्डे तयार आहेत. रोपं तयार आहेत. आता प्रतीक्षा फक्त पावसाची. मग बघाच. ही गावं हिरवीगार होऊन जातात की नाही!
- सयाजी शिंदे
कष्ट मला नवीन नाहीत. एकेक शॉट उत्तम व्हावा म्हणून आम्ही खूप कष्ट घेतो. मात्र गावच्या शिवारातल्या या गावरान कष्टाची बात कुछ औरच. निसर्गासाठी सारे गावकरी एकत्र येतात काय अन् घाम गाळून शेकडो चर खोदतात काय. मी त्यांच्याबरोबर होते हे माझं नशीब!
- सोनाली कुलकर्णी
गावाला पुढं न्यायचं असेल तर एकोपा खूप महत्त्वाचा; पण तीच भावना गावागावात हरपत चाललीय. ज्यादिवशी केवळ एक कुटुंब म्हणून गाव वावरू लागेल, त्या दिवसापासून ख:या अर्थानं विकासाला वेग येईल. ही प्रक्रिया अव्याहत सुरू राहण्यासाठी सर्वानी एकदिलानं एकत्र आलं आणि राहिलं पाहिजे!
- नाना पाटेकर
‘नाम फाउंडेशन’ला प्रशासन स्वत:हून मदत करत नाही, हा आमचा आजर्पयतचा अनुभव. मात्र साता:यात एवढय़ा सा:या अधिका:यांचा सपोर्ट मिळतोय, हे पाहून इथली लोकसहभागाची कामं नक्कीच यशस्वी होणार, याची खात्री पटलीय. आम्ही परत पावसाळ्यात येऊ, तेव्हा इथलं चित्र नक्कीच पालटलेलं असेल.
- मकरंद अनासपुरे
सह्याद्रीच्या घाटाला निसर्गसंपन्नतेचा खूप मोठा वारसा. अशा वातावरणात पाचगणीला माझं घर आहे. याच सह्याद्रीच्या पायथ्याला असणा:या गावांमध्ये मात्र गावक:यांना कोसो दूर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं, हे चित्र बदलण्यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे.
- आमीर खान
डोक्यावर टोपलं; असंही अन् तसंही..
पावसाच्या पाण्यासोबत डोंगरावरून वाहून जाणारी माती अडविण्यासाठी ‘चर’ (सीसीटी) खोदण्यावर आमीर खानच्या टीमने भर दिलाय. ओढय़ा-नाल्यात छोटे-छोटे बांध टाकून वाहतं पाणी अडविण्याची मोहीमही शेवटच्या टप्प्यात आलीय. ‘पाणी अन् माती’ वाचविण्याची ही अनोखी स्पर्धा आमीरनं गावागावात लावली असली तरी यातून अजून एक नवाच फायदा झाल्याचं दिसतं.
‘शेजारच्या गावापेक्षा माझं गाव कसं श्रमदानात श्रेष्ठ’ हे दाखविण्याच्या इष्र्येत गावातले सारेच गट-तट एकत्र आलेत. आजर्पयत, एकमेकांचं तोंडही न पाहणारे आता खांद्याला खांदा लावून श्रमदान करू लागलेत. एकमेकांच्या ‘डोक्यावर टोपलं’ ठेवण्यात ज्यांची जिंदगानी गेली, ती मंडळीही ख:या अर्थानं समोरच्याला ‘मातीचं टोपलं’ देत ‘लोकसहभाग’ शब्दाचा अर्थ समजून घेऊ लागली आहेत.